जावयाची गाढवावरून धिंड

20
60
carasole

नाशिकच्‍या वडांगळी गावची अजब प्रथा

नाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्‍याची अजब परंपरा पाळली जाते. त्‍यामुळे ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवले गेले तेथेच गाढवावरून धिंड काढली जाण्याची वेळ वडांगळीच्या जावयांवर येते.

वडांगळी गावची ती जगावेगळी प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते निश्चित सांगता येत नाही. मात्र तिला शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असल्‍याचे गावकरी सांगतात. इंग्रज आमदानीत एका इंग्रज मामलेदाराची वडांगळीच्‍या गावक-यांनी गोड बोलून गाढवावरून धिंड काढल्याची आठवण गावचे पूर्वज सांगत असत. प्रसिद्ध तमासगीर तुकाराम खेडकर यांचा तमाशा वडांगळी मुक्कामी असताना त्यांचीही या प्रथेमध्ये गाढवावरच्या धिंडीसाठी वर्णी लागली होती. गेल्‍या शंभर वर्षांच्या काळात कधी कधी ती प्रथा खंडीतही झाली, मात्र त्या त्या काळातील तरुणाईने तितक्याच उत्साहाने ती पुन्हा सुरूही केली.

धुलीवंदन ते रंगपंचमी या पाच दिवसांत गावातील घरजावई, गावजावई अथवा गावकरी ज्यांना जावयाच्या नात्याने वागवतात अशा व्यक्तींचा धिंडीसाठी प्राधान्याने विचार केला जातो. नोकरीधंद्यानिमित्त गावात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या व्यापारी, नोकरदार व्यक्तींशी गावक-यांकडून जावयाचे नाते लावले जाते. त्यांच्या बायकांना मुलीचा दर्जा दिला जातो. त्‍यांच्‍याशी गावातील तरुण मंडळींचे मेहुण्यांचे चेष्टेचे नाते निर्माण होते. दाजी दाजी म्हणत बहिणीच्या नव-याचा वर्षभर मान राखायचा, मात्र शिमग्याला वर्षभराचे उट्टे काढत त्याची गाढवावरून धिंड काढायची अशी ही मजेशीर प्रथा आहे.

जावयाला धिंडीसाठी राजी करणे हे दिव्यच असते. कोणी जावई राजीखुशीने स्वत:ची धिंड काढून घ्यायला तयार नसतोच. मग गावातील तरूण मंडळीकडून जावयांवर साम, दाम, दंड, भेद, इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी सर्व आयुधे वापरली जातात. त्‍यसाठी गुप्त मसलती, खलबते केली जातात. अनेक जावई होळी-रंगपंचमीच्‍या काळात गावाबाहेर निघून जातात. पण कोणी ना कोणी खिलाडूवृत्तीचा जावई सापडतोच! ज्याला गावात मान आहे, प्रतिष्ठा आहे अशा सुस्वभावी, मनमिळावू व्यक्तीला प्रथेसाठी प्राधान्य दिले जाते. ग्रामस्थांच्या दृष्टीनेही असा जावई म्हणजे टप्प्यातील सावज असते. किरकोळ आढेवेढे घेत, प्रसंगी “रेमंडचे कपडे घ्याल तर बसतो गाढवावर.” अशी मागणी करत तयार होणारे जावईही भेटतात. जावयाची मनधरणी करणा-या व्‍यक्‍तीकडेच बहुतेक वेळा प्रथेचे यजमानपद येते. मग धिंडीसाठी लागणारा खर्च, त्यानंतर जावयाला करायचा पंचवस्त्रांचा पोशाख याचा खर्च यजमानाला करावा लागतो आणि मग सुरू होते धिंड!

शिमग्याच्या दिवशी वडांगळी गावात वीरांची मिरवणूक पार पडते. गावात घरोघरी वीरांची तळी भरली गेली, की धुळवड सुरू होते. होळीतील राख पाण्यात कालवून धूळमातीची धूळवड खेळली जाते. पण वडांगळीकरांच्या धुळवडीला खरा रंग चढतो तो जावयाच्या गाढवावरील धिंडीने!

मनधरणी, मिनतवा-या करून तयार झालेला जावई गाढवावर बसवला जातो. त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात. गळ्यात कांद्यांचा, फाटक्या खेटरांचा हार घातला जातो. काही फाटक्या टायरचेही हार असतात. डोक्‍याला लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्या सुपाचे बाशिंग बांधले जाते. मग यजमानाच्‍या घरापासून ती जगावेगळी मिरवणूक सुरू होते. होळीतील राख, रंग, गाळ, चिखल, माती यांची मनसोक्त उधळण करत गावातील एकेका गल्लीतून जावई गाढवावरून मिरवला जातो. जावई हा सासरेबुवांच्‍या कुंडलीतील ‘दशमग्रह’ समजला जातो. म्‍हणूनच जावयाची धिंड म्हटल्यावर मिरवणूकीत चांगलाच जोष संचारतो. बोंबला रे बोंबला बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत जावयाचे विविधांगांनी गुणवर्णन करत बोंबा मारल्या जातात. अनेक घरांपुढे खास धिंड थांबवून कांद्यांच्या, चपलांच्या माळा जावईबुवांच्या गळ्यात अडकवल्या जातात.

प्रथेचा उल्‍लेख ‘गाढवावरून धिंड’ असा केला जात असला तरी धिंडीसाठी गाढवीण वापरली जाते. त्‍या गाढविणीला धिंडीत नवरी संबोधले जाते. (लग्न लावले जात नाही हे नशीब!) करवले म्हणून गावातील सर्व तरुण मेहुणे हजर असतात. सोबतीला शिमग्याच्या बोंबांची मंगलाष्टकेही असतातच. असा जोरदार शिमगा करून यजमानाच्या दाराशी धिंड संपते.

त्‍यानंतर गल्लीतील चार घरच्या सुवासिनी एकत्र येऊन जावयाला सुगंधी उटणे लावून अंघोळ घालतात. त्यानंतर यजमानाकडून जावयाला पंचवस्त्रे देण्‍यात येतात. गावच्‍या प्रथेचा मान राखल्याबद्दल यजमान व ग्रामस्थ जावयाचे आभार मानतात. त्यानंतर जावई नवीन वस्त्रे परीधान करून ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारत गावातील प्रमुख रस्त्यावरून फेरी मारतो. त्यानंतर धिंडीचा कार्यक्रम संपतो.

जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा आहे. त्‍यामुळे जावयाला गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते.

या प्रथेमुळे जावयाच्‍या ठायी असलेला ताठा, अहंकार गळून पडतो असे मानले जाते. तसेच, जावई वर्गासाठी ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनण्याची ती मोठी संधीच! या प्रथेच्‍या नि‍मित्‍ताने वडांगळी गावच्‍या जावयांना त्‍यांच्‍या खिलाडूवृत्तीचे जगाला दर्शन घडवता येते.

लग्नाची मिरवणूक अन् धिंड यांची तुलना होतेच! दोन्हीत मात्र कमालीचा विरोधाभास! लग्नात घोडा असतो. या मिरवणुकीत गाढवाला मान, लग्नात जावयाला नवे कपडे, नवे बुट तर येथे असलेले कपडे फाडून लक्तरे मिरवत मिरवणूक काढली जाते. लग्नात कोरे बुट असतात तर या धिंडीत गळ्यात फाटक्या खेटरांचा हार असतो. मोत्यांच्या मुंडावळ्यांऐवजी लसणाच्या मुंडावळ्या अन् फुलांच्या हारांऐवजी कांद्याचे हार, अंगाला हळद लावण्याऐवजी चिखलमातीचा लेप लावला जातो. लग्नात शुभेच्छा दिल्या जातात तर येथे मात्र बोंबला रे म्हणत बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत तोंडावर आडवा हात मारत शिमगा केला जातो. चिखलमातीच्या रंगांच्या अक्षता उधळीत धिंडीत चांगलेच उट्टे काढले जाते.

धुळवड ते रंगपंचमी या पाच दिवसांत कधीही ती धिंड निघते. पाडव्याला जर जावई सापडला नाही तर किमान रंगपंचमीपर्यंत त्याची शोधमोहीम सुरू राहते. कधी कधी हा ‘जावईशोध’ रंगपंचमीला संपतो. अखेरच्या दिवसापर्यंत जावईशोध घेतल्यानंतर तो रंगपंचमीच्‍या दिवशी मिळाला तर प्रथेतील रंगत आणखी वाढते. जोपर्यंत जावई भेटत नाही तोपर्यंत, यंदा प्रथेत खंड पडतो की काय अशी धाकधूक सगळ्यांनाच असते.

आता आतापर्यंत वडांगळीतील हरहुन्नरी नाट्यकलावंत शिवाजी गोरे यांचा त्‍या प्रथेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सहभाग असे. त्यांचा स्वत:चा कुंभाराचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे स्वत:ची गाढवे होती. जावयाच्या धिंडीसाठी पोटाचा मोठा घेर असलेली ‘हरणी’ नावाची गाढवीण ते वापरत असत. ती गाढवीण चांगल्या भरभक्कम वजनाच्या जावयाचा बोजाही सहज पेलू शकत असे. धुळवडीतील गोंगाट, चिखलफेक व वाजंत्री यांचा तिच्यावर परिणाम होत नसे. त्यामुळे धिंड जोरात व्हायची. आता ‘हरणी’ गाढवीण नाही. तिचा मालक शिवाजी गोरेही नाही. त्यामुळे त्या प्रथेच्या मार्गात अनेक अडचणी उभी राहिली आहेत. बदलत्या काळात गावात गाढव मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावाहून गाढव भाड्याने आणून हौशी ग्रामस्थ धिंडीची प्रथा पार पाडत आहेत. सिन्नर, सायरवेडा अशा ठिकाणाहून गाढव स्पेशल गाडी करून भाड्याने आणण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे यजमानाला ‘जावयाच्या मानपानाचा खर्च परवडला पण गाढवाचा नको’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

असे असले तरी वडांगळी गावात धुळवडीच्या दिवशी न चुकता रंगांच्या अक्षता उधळत जावयाचे गाढवावरुन धिंडवडे निघतात. पण ते सारे परंपरेच्या आनंदासाठीच!

– किरण भावसार

Last Updated On – 2 Feb 2017

About Post Author

20 COMMENTS

  1. सदर लेख फार आवडला
    सदर लेख फार आवडला

  2. परपंरा जतन केल्या च पाहीजेत
    परपंरा जतन केल्याच पाहीजेत. पण जबरदस्ती नको. खेळी मेळीने आणि आरोग्याची काळजी घेऊन वडांगळीची ही प्रथा जपताहेत. त्याबद्दल वडांगळीकरांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. या वर्षीसाठी शुभेच्छा!

  3. बर झाले मी वाचलो.
    बर झाले मी वाचलो.

  4. मी लहानपणी पाहिले आहे .मधुकर
    मी हे लहानपणी पाहिले आहे. मधुकर बंडू खूळे याच्याबरोबर. (बंडू गंगाधर खूळे) माझे नंबर 9423474964, 9657793384

  5. सांस्कृतिक परंपरेचा अनमोल
    सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा.

  6. ह्या प्रथेमुळे वडांगळी
    ह्या प्रथेमुळे वडांगळी गावाची ओळख सार्‍या महाराष्ट्राला झाली. ही प्रथा अशीच सुरु राहावी याकरीता वडांगळीकरांना खुप खुप शुभेच्छा..!

  7. sarva gavkari ….tarun
    sarva gavkari tarun vargache abhar. parampara chalu thevli. Thanx! proud to be VADANGALI kar.

  8. हि प्रथा थांबवायला हवी….

    ही प्रथा थांबवायला हवी. असे काही नसते. जावयाची धिंड काढल्यावर पाउस होतो म्हणून.

  9. किरणभाऊ,

    किरणभाऊ, या प्रथेमुळे वडांगळीचा जावई होण्याचा धसका घेतला जात असेल नाही?

  10. परंपरांमागील शुद्ध हेतू
    परंपरांमागील शुद्ध हेतू अहंकार काढण्याचे शिक्षण अपेक्षित असावा.

  11. Khare tr aapan ya pratha,
    Khare tr aapan ya pratha, Rudi-Parampara japlyach pahijet…aani tyamulech tr aaplya sansjruticha varsa tikat asto…..hi parampara asich tikun rahavi asi mi vadangli-karankade apeksha thevto…..

  12. किरणभाऊ छान लेख,असेच छान-छान
    किरणभाऊ छान लेख,असेच छान-छान लेख आपल्याकडुन आम्हाला वाचायला भेटतात.
    असेच छान-छान लेख वाचायला मिळो,त्या साठी सुभेच्छा….!!

  13. वडांगळी गावच्या या प्रथेमुळे…
    वडांगळी गावच्या या प्रथेमुळे वडांगळी गावची ओळख पुर्ण महाराष्ट्रात झाली ..

  14. अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत…
    अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत .गाढवावरून मिरवणूक म्हणजे तो सन्मान नव्हे तर तो चेष्टेचा विषय ठरतो अशा प्रथा जोपासल्या पाहिजेत की गावाचा व प्रयायाने देशाचा मान वाढेल उगीच बिचार्‍या गाढवांना त्रास

Comments are closed.