जात म्हणे जात नाही!

1
19

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला किंवा कोणालाही शक्य नाही. जात नाहीशी करुया असे म्हणणे, आमच्या मते, शुद्ध वेडेपणाचे आहे. इतिहास पुसला जात नसतो. एक वेळ, तो इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकता येईल, संगणकाच्या मेमरीमधून ‘डिलीट’ करता येईल. पण तो जित्याजागत्या माणसांच्या मेमरीमधून नाहीसा कसा करणार? विशेषत: त्या पाठीमागे जेव्हा अनेक पिढ्यांच्या भावना दडलेल्या असतात, परंपरा दडलेल्या असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती दडलेली असते, ते डिलीट कसे होणार? आणि तशी जरूरी पण नाही.

जात म्हणे जात नाही! असे कोण म्हणतो?

– अनिलकुमार भाटे/ सर्जेराव घारगे-देशमुख

प्रस्तुत लेख आम्ही जोडीने एकत्र बसून लिहित आहोत. आम्ही म्हणजे अनिलकुमार भाटे ( जात-एकारान्त चित्पावन ब्राह्मण) आणि सर्जेराव घारगे-देशमुख (जात-शहाण्णव कुळी मराठा). इथे ते आवर्जून उल्लेख करून लिहिले, कारण की आम्ही दोघेही जातिभेद अजिबात मानत नाही. थोडा आणखी खुलासा करतो, की आम्ही जात मानत नाही. असे नव्हे, पण आम्ही जातीजातींमधला ‘भेद’ मानत नाही. इतकेच नव्हे, तर अशा भेदाला विरोध करतो. आम्ही दोघेजण वेगवेगळ्या जातींचे असलो तरी जात या विषयावरच्या आमच्या मतांमध्ये कमालीची एकवाक्यता आहे.

डॉ. अनिलकुमार भाटेआम्ही दोघे मूळचे इंजिनीयर. दोघांनाही इतिहासाची आवड पूर्वीपासून आहे आणि आम्ही इतिहासामध्ये संशोधनही करतो. एवंच, आमचे इतिहाससंशोधनदेखील जोडीने चालते.

जात या विषयावर आजकाल सवंग स्वरूपाची वारेमाप विधाने, पुराव्याशिवाय केली जात असतात, ती आम्हांला अनुचित वाटतात. उदाहरणार्थ, ब्राह्मणांनी पूर्वीच्या काळी इतर जातींच्या लोकांवर प्रचंड अन्याय केला असे अगदी जोरजोरात सांगितले जात असते, पण त्या पाठीमागचा पुरावा दाखवला जात नाही. तेव्हा हे कितपत खरे? किंवा किती प्रमाणात खरे? असे प्रश्न आमच्या मनात येऊ लागतात. जातीच्या बाबतीत कुठलेही विधान करताना पुरावे दाखवा, अशी आमची मागणी आहे.

प्रस्तुत लेख लिहिण्याची बुद्धी आम्हांला झाली, ती ‘थिंक महाराष्ट्र वेबसाईट’वरचा वसंत केळकर यांचा या विषयावरचा लेख वाचून. केळकरांचा लेख चांगला आहे. आम्हांला आवडला. त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत. केळकरांच्या लेखाचे औचित्य साधून याच विषयावर आमचा प्रतिसाद म्हणून समयोचित असा हा एक प्रतिलेख.

आम्ही दोघे अमेरिकन नागरिक आहोत आणि ‘प्रॅग्मॅटिझम’ हा आमच्या अमेरिकन संस्कृतीचा मुलभूत असा तात्त्विक गाभा आहे. तो आमच्या अंगवळणी पडला आहे. प्रॅग्मॅटिझमच्या तत्त्वज्ञानामध्ये उपयुक्ततता व उपयोगिता (ऊर्फ ‘युटिलिटेरियनिझम’) हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो असे सांगतो, की जे उपयोगाचे आहे, सर्वांच्या हिताचे आहे आणि जे ताबडतोब करता येण्यासारखे (ऊर्फ ‘डूएबल’) असे आहे ते आपण आधी करुया.

सर्जेराव घारगे-देशमुखतर आमचा प्रॅग्मॅटिक विचार असा, की जात जाईल किंवा नाही किंवा कधी जाईल याचा विचार आपण तूर्तास बाजूला ठेवुया आणि त्यांतला ‘भेद’ कसा नाहीसा करता येईल याचा विचार करुया.

वर्णरचनेतून उपवर्ण आणि जाती व उपजाती आल्या. मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही थोडीफार प्राचीन आहे, असे म्हणावे लागते. या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, त्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला किंवा कोणालाही शक्य नाही. जात नाहीशी करुया असे म्हणणे, आमच्या मते, शुद्ध वेडेपणाचे आहे. इतिहास पुसला जात नसतो. एक वेळ, तो इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकता येईल, संगणकाच्या मेमरीमधून ‘डिलीट’ करता येईल. पण तो जित्याजागत्या माणसांच्या मेमरीमधून नाहीसा कसा करणार? विशेषत: त्या पाठीमागे जेव्हा अनेक पिढ्यांच्या भावना दडलेल्या असतात, परंपरा दडलेल्या असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती दडलेली असते, ते डिलीट कसे होणार? आणि तशी जरूरी पण नाही.

केळकर म्हणतात त्याप्रमाणे आम्हांला पण वाटते, की भारतीय सामाजिक विविधतेत अनेक सुंदर रंग आहेत. त्यांना गोंडस असे रूप आहे. ते काळाच्या ओघात यथावकाश नवीन स्थानी जातील. आपण ते बळजबरीने बदलायचे कारण नाही.

शिवाय, अमुक जात उच्च किंवा श्रेष्ठ आणि तमुक जात कमी किंवा खालच्या दर्जाची, अशी विधानेही फक्त ‘रिलेटिव्ह’ स्वरूपाची असतात. त्यांना स्वत:चे असे, ‘अ‍ॅब्सोल्युट’ म्हणावे असे ‘स्वतोमूल्य’ असत नाही. कुठलीच जात वरच्या किंवा खालच्या दर्जाची नाही आणि ज्या तथाकथित खालच्या जाती मानल्या जातात, त्या जातींमधला कुणीही माणूस स्वत:ची जात खालच्या दर्जाची आहे असे कधीच मानणार नाही. ज्याला त्याला स्वजातीचा अभिमान असणारच!

दुसरे असे, की जात हे एक प्रकारचे ‘सिक्युरिटी ब्लँकेट’ आहे. त्याच्यामध्ये भावनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असा आधार आहे. हा आधार जीवन जगण्याकरता महत्त्वाचा आहे. तो सोडायला कोणी तयार होतील असे वाटत नाही आणि खरे म्हटले तर तो सोडायची गरजदेखील नाही.

पण समाजहिताच्या वृद्धीसाठी आपण कोणीही जातपातीच्या बंधनामध्ये अडकून राहू नये. जन्म कोणालाही मागून मिळत नसतो. आपण कुठल्या जातीत जन्माला यायचे हे आपण ठरवू शकत नसतो. हिंदू तत्त्वज्ञान आपल्याला असे सांगते, की जन्म हा पूर्वसंस्कार, पूर्वसंचित यांपासून मिळत असतो. जन्माला येणे या घटनेच्या पार्श्वभूमीलाच प्रारब्ध असे म्हणतात. त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही आणि जर असे आहे, तर मग कर्तृत्व सोडून जातीपातीला इतके महत्त्व का द्यायचे? जातीमधला एक चांगला गुण असा, की एकाच जातीचा समुदाय (ऊर्फ ‘ग्रुप’) एक सामाजिक असा घटक बनलेला असतो आणि एक घटक असण्याचे फायदे त्यामधून मिळू शकतात. एकाच सांस्कृतिक, भावनिक आणि आचारविचारांच्या ‘घडी’मध्ये वाढलेली माणसे वागण्या-बोलण्याच्या बाबतीत एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सारखेपणा असतो. त्यांचे कुळधर्म, कुलाचार वगैरे एक असतात. या सर्वांमध्ये एकप्रकारची सहजता असते आणि त्यामध्ये नैतिक आधारदेखील असतो, हे तर उघडच आहे व हे कोणीही मान्य करेल. उदाहरणार्थ, ब्राह्मण घरात ब्राह्मण आचारविचारांत वाढलेली मुलगी समजा, मराठ्यांच्या घरी दिली तर तिला दस-याच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याऐवजी बोकड कापलेला बघून शॉकच बसायचा की !  आणि तिच्या उरात धडकीच भरायची. ( हे उदाहरण लेखकद्वयांपैकी शहाण्णवकुळी मराठा असलेल्या सर्जेराव घारगे-देशमुख यांनी स्वत:हून घातले.)

पण समाजाच्या हिताकरता, बहुसंख्यांच्या हिताकरता, सामाजिक एकोप्यासाठी आपण जातीजातींमधला भेद बाजूला सारला पाहिजे. (जातिभेदाबरोबरच धर्मभेदाचासुद्धा विचार बाजूला ठेवायला हवा, समाजहित साधण्याकरता. त्यात आपल्याला मुसलमान बांधवसुद्धा हवेत.) याची ज्वलंत उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. उदाहरणार्थ, छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मराठ्यांच्यापेक्षा ब्राह्मण व कायस्थ प्रभू जातींच्या लोकांची गणना अधिक होती व त्यांची सल्ला-मसलत ऐकून घेऊन मग महाराज स्वत: स्वत:चे निर्णय घेत असत. दुसरे उदाहरण म्हणजे थोरले बाजीरावसाहेब. ते ब्राह्मण असले तरी हिंदुस्थान पादाक्रांत करताना त्यांनी मराठी व तत्सम विविध जातींचे सरदार तयार केले व त्यांच्या सहकार्याने शिवाजी महाराजांच्या हिंदूपदपादशाहीचे (शाहू महाराजांना सांगून) पुनरुज्जीवन केले. असे धोरण अवलंबल्यामुळे त्यांना राजपुतांचे आणि उत्तर हिंदुस्थानातल्या स्थानिक जमीनदारांचे पाठबळ मिळाले. हा या धोरणाचा मोठाच फायदा म्हणावा लागेल.

आणखी एक उदाहरण म्हणजे माधवराव पेशवे व रामशास्त्री प्रभुणे यांचे. माधवराव पुजापाठ वगैरेंमध्ये काळ व्यतीत करत असलेले पाहून रामशास्त्र्यांनी त्यांना समज दिली होती, की तुम्ही क्षात्रधर्म स्वीकारला असल्यामुळे तुम्ही व्रतवैकल्यांपासून अलिप्त होऊन राज्यकारभारामध्ये अधिक लक्ष घातले पाहिजे. (थोडक्यात, जातीने ब्राह्मण असलात तरी कर्माने क्षत्रिय आहात!)

अशा थोर वक्तींची उदाहरणे ‘रोल मॉडेल’ म्हणून समोर ठेवून आपण वागले पाहिजे. या थोर व कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्याचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते, की त्यांनी फक्त स्वत:च्या ज्ञातीपुरता विचार केला नाही. स्वत:च्या जातीमध्ये राहूनसुद्धा त्यांनी ज्ञातीच्या पलीकडे जाऊन जनहिताचा विचार केला.

याहून मोठे उदाहरण भगवान श्रीकृष्णाचे. ते स्वत: यादवकुलीन होते तरी त्यांच्यापाशी सर्व ब्रह्मज्ञान होते आणि त्यांनी अर्जुनासारख्या संमोहात पडल्याने भ्रमिष्ट झालेल्या क्षत्रिय योद्ध्याला ज्ञानाचे महत्त्व समजावून कर्मयोग सांगितला व अंत: करणशुद्धीने व निष्काम कर्माने स्वधर्माचे कर्तव्यकर्म करण्यास प्रवृत्त केले.

तेव्हा मुळात, वर्णाधारित समाजव्यवस्था वाईट म्हणायचे कारण नाही. जगातल्या इतर देशांमध्येसुद्धा वर्णव्यवस्थेसारखा प्रकार दिसून येतो. फक्त त्याला वर्णव्यवस्था असे लेबल चिकटवले जात नाही, इतकेच.

त्यांतले एक उदाहरण द्यायचे म्हटले तर आर्यलण्डमध्ये पूर्वी वर्णव्यवस्था होती. त्यांनी तर चक्क वर्णव्यवस्थेनुसार आयर्लण्ड देशाचे चार भाग केले. पश्चिमेचा ‘कॅनॉट’ भाग  ‘डूइड’(‘प्रीस्टली कम्युनिटी’ ऊर्फ आयरिश भटजी) यांना दिला. हे आयरिश ब्राह्मण म्हणायला हवेत. दक्षिणेकडचा ‘मॅनस्टर’ हा प्रदेश कारागीर जमातीच्या लोकांना दिला. या कारागीरांमध्ये लोहार, सुतार, चांभार, विणकर वगैरे जातींचे लोक असायचे. यांना ‘आर्टिझन’ म्हणत. गंमत म्हणजे त्यांत संगीतकार आणि गायक व वादक लोकदेखील असायचे. कारण गायक व वादक लोक हे देखील एक प्रकारचे कारागीरच नव्हे का? नंतर पूर्वेकडचा ‘लिन्स्टर’ हा प्रदेश वैश्य जमाती (ऊर्फ ‘बिझनेस कम्युनिटी’) करता राखून ठेवला गेला आणि उत्तरेकडचा ‘अल्स्टर’ भाग राज्यशकट चालवणा-या (ऊर्फ ‘अ‍ॅडमिनीस्ट्रेटर’) व राज्यकर्ते यांच्याकरता राखून ठेवलेला होता. यांना आयरिश क्षत्रिय म्हणायला हवे आणि या सर्वांच्या मध्यभागी राजाचे निवासस्थान असायचे.

याशिवाय एक खास अमेरिकन उदाहरण असे, की अमेरिकेमधल्या कॉर्पोरेट जगतामध्ये परवां परवांपर्यंत ‘एम्प्लॉयी ट्रेनिंग’च्या संदर्भात एक विशिष्ट प्रकारचा खेळ खेळला जायचा. हे ट्रेनिंग कॉर्पोरेशनमधल्या सर्वांना दिले जायचे व त्यात कॉर्पोरेशनमधल्या सर्व विभागांमधले लोक सहभागी होत असत. हे ट्रेनिंग एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधल्या भव्य व प्रशस्त हॉलमध्ये असायचे. त्या हॉलच्या मध्यभागी असलेल्या डान्स फ्लोअरचे चार भाग (ऊर्फ चार ‘क्वाड्रण्टस्’) केले जायचे. त्यात डावीकडील क्रमांक १ च्या क्वाड्रण्टला मॅनेजर असे नाव होते, उजवीकडच्या क्रमांक २ चा क्वाड्रण्ट ही अ‍ॅनॅलिस्ट व इंजिनीयर यांची जागा असायची. त्याखाली क्रमांक ३ च्या क्वाड्रण्टमध्ये सेल्स व मार्केटिंग आणि प्रोजेक्टवाले लोक आणि त्याच्या डावीकडे क्रमांक ४ चा क्वाड्रण्ट कामगार लोकांसाठी असायचा.

ट्रेनिंगसाठी जमलेल्या पन्नासएक लोकांपैकी पंचवीस जणांना बोलावून त्यांना सांगितले जायचे, की त्यांच्या मते, ते स्वत: ज्या कुठल्या क्वाड्रण्टमध्ये योग्य ठरतील तेथे त्यांनी उभे राहवे. त्यानंतर त्यांतल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन ती व्यक्ती ‘इतरांच्या मते’ कोणत्या क्वाड्रण्टमध्ये पडते ते ठरवायचे. हा खेळ जातीपातीलाही लागू पडतो. त्यातले वैशिष्ट्य असे, की जरी प्रत्येकजण आपली जात सांगतो (आपला क्वाड्रण्ट ठरवतो) तरी इतर लोकांचे (समाजाचे) त्याबाबतीत काय मत आहे ते इतरांनी ठरवायचे. हे जातीचे ‘डायनॅमिक्स’ आहे. हा खेळ आपण सर्वांनी देखील प्रत्यक्ष खेळला पाहिजे.

मंडळी, हे तर चक्क चातुर्वर्ण्य झाले की! अ‍ॅडमिनीस्ट्रेशनवाले लोक क्षत्रिय, अ‍ॅनॅलिस्ट व इंजिनीयर हे ब्राह्मण, सेल्स व मार्केटिंगवाले लोक वैश्य आणि प्रॉडक्शन विभागातले लोक कारागीर. पण गेली वर्षानुवर्षे (खरे तर अनेक दशके) अमेरिकेतल्या कॉर्पोरेट जगतामध्ये एम्प्लॉयी ट्रेनिंगकरता हा खेळ खेळला जात आला आहे.

जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींच्या लहानपणी त्यांना लिहिलेली पत्रे ‘लेटर्स फ्रॉम फादर टू डॉटर’ या नावे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये त्यांनी सन १८४०च्या दशकातील एका इंग्लिश गव्हर्नरचे मत उद्धृत केले आहे. त्याने त्या काळी असे म्हटले, की “भारतातील ग्रामीण समाजाची रचना अशी आहे, की प्रत्येक खेडे हे एक स्वयंपूर्ण असे ‘रिपब्लिक’ म्हणता येईल. त्यामधली जडणघडणही जातींमधल्या एकमेकांच्या सहकार्याच्या आधारावर घडवली गेलेली समाजव्यवस्था होती. या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येक घटकाला समान महत्त्व होते. प्रत्येक खेडे हे स्वतंत्र गणराज्यासारखे होते. त्यामधली एकमेकांवर आधारलेली समाजव्यवस्था, अत्यंत प्रबळ व पूरक होती आणि आपत्तिकालामध्ये जरी सर्वनाश झाला आणि इतर काही टिकले नाही तरी अशी समाजव्यवस्था नक्कीच टिकून राहील.”

त्याचे मूळ इंग्रजीतील वाक्य असे– “These villages appeared as independent republics and they would survive where nothing else would survive. ” हे खरेच आहे, कारण त्याकाळी बारा आलोटे आणि बारा बलुतेदार यांनी बनलेली समाजरचना होती. ती जातींवर आधारलेली असायची व या जाती एकमेकांना पूरक असायच्या.

नेहरू पुढे सांगतात, की त्याकाळच्या जनगणनेप्रमाणे पंचावन्न टक्के लोक शहरांत राहून उद्योग व व्यवसाय करत. त्यामध्ये विणकर, कुंभार व कासार (भांडी बनवणारे) हे व्यवसाय प्रबळ होते. पण १७५७ पासून इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे तेथील माल विक्रीसाठी भारतात येऊन इंग्रजांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला. भारतीय माल हाताने केलेला, उत्कृष्ट दर्जाचा व स्वस्त होता. म्हणून भारतीय मालावर कर लादून तो विलायती मालाच्या तुलनेमध्ये महाग केला गेला. त्याने भारतीय उद्योजगता मंदावली व लोक शहरांकडून आपापल्या खेडेगावी माघारी फिरले. त्यामुळे शेतीवर अवलंबित माणसांचा बोजा पडला. हे एक प्रकारचे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ झाले.

नेहरूंच्या विधानावरून असे दिसते, की या घटनाक्रमामुळे खेड्यामधली समाजव्यवस्था खिळखिळी झाली व त्या काळात समाजामध्ये अगोदरच असलेल्या जातीपातींच्यामध्ये आपापसांतल्या भेदभावाला ऊत आला. म्हणजे जाती पूर्वी होत्याच, पण आता त्यांच्यामधले अंतर वाढले व एकमेकांमधल्या दुराव्याला सुरुवात झाली. पूर्वी, सर्व घटक एकमेकांच्यावर अवलंबून असत, पण त्यांच्यामध्ये ‘इकॉनॉमिक कॉम्पिटिशन’ सुरू झाली व दुराव्याला सुरुवात झाली. कर्तव्ये बाजूलाच राहिली आणि द्वेषाला सुरुवात झाली. यात इंग्रजी शिक्षणामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले, हे उघड दिसते.

मुद्दा असा, की सन १८४०पर्यंत समाजातल्या विविध जातींमध्ये फारसा दुरावा व द्वेष वगैरे नव्हता. विविध जातींमध्ये सामंजस्य व सलोखा होता. पण त्यानंतरच्या काळामध्ये हे सर्व बदलले.

तेव्हा या सगळ्यातला मथितार्थ असा, की सन १८४० पर्यंत चातुर्वर्ण्य हे एक प्रकारचे ‘सिस्टीमटायझेशन’ होते. ते ‘सायकल ऑफ लाइफ’ ह्या गोष्टीचे रूपक आहे. त्यात खूप मोठी शक्ती दडलेली आहे. जर का प्रत्येकाने आपापले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले, म्हणजे समाजाला असलेले ‘देय’ उत्तम प्रकारे देण्याचा प्रयत्न केला तर या सामाजिक मांडणीमध्ये दडलेल्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आपल्याला येईल. सध्याच्या काळामध्ये या चातुर्वर्ण्यामध्ये शिक्षण व व्यवसायाभिमुखता खूप ‘ओव्हरलॅप’ झाली आहे. तेव्हा ज्या कुठल्या सामाजिक विभागांमध्ये व व्यवसायामध्ये आपण आहोत, त्यातले कर्तव्यकर्म आपण सर्वांनी चोखपणे बजावल्यास (असे कर्तव्य हीच आता आपली नवी जात, आपण या नव्या जातीप्रमाणे वागायला हवे, असे मानून) प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले, तर समाजामधल्या विविध घटकांमध्ये ‘सिम्बॉयसिस’ निर्माण होऊ शकेल व त्यामुळे ‘सोशल हार्मनी’ निर्माण होऊन ती सर्वांच्या फायद्याची ठरेल.

हे घडत असताना त्यामधूनच हळुहळू का होईना, जातीपातींमधल्या भेदाची धार कमी होऊ लागेल आणि मग त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून जातीपातींचे महत्त्व कमी होऊ लागेल. याला खूप वेळ लागेल हे खरे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हाच एकमेव मार्ग दिसत आहे.

तेव्हा मंडळी, आपण जातीपातींच्याकडे ‘जातिभेदा’च्या ‘टिण्टेड’ काचेच्या चष्म्यामधून बघायच्या ऐवजी स्वच्छ पारदर्शक काचांच्या चष्म्यामधून बघायला लागुया का?

डॉ.अनिलकुमार भाटे

निवृत्त प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका

ईमेल- anilbhate1@hotmail.com


सर्जेराव घारगे-देशमुख

निवृत्त इंजिनीयर
न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर इन्स्ट्रुमेन्टेशन तज्ज्ञ
वेस्ट काल्डवेल शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका

ईमेल- pratisar@aol.com

 

About Post Author

Previous articleमुंबई ON Sale
Next articleदेशवंदना
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. भारतातील जातीयवाद नाहीसा
    भारतातील जातीयवाद नाहीसा व्हायला पाहिजे असे अनेकांना वाटते. जातीयवादाला जिवंत ठेवणारे सगळ्यात मोठे कारण आहे ते म्हणजे आपल्या येथील लग्न ठरवण्याची पद्धत. आजही मुला-मुलींची लग्ने पालक ठरवतात. पालकांना आपला जावई किंवा सून आपल्याच जातीची पाहिजे असते. पालकांनी ठरवलेल्या लग्नात जात हीच सर्वात मोठी अट असते.

    आजकाल अनेक मुला-मुलींची लग्ने ३० ते ३५ या वयात होतात. तरीदेखील ही लग्ने पालक त्यांच्या मर्जीनुसार ठरवतात. हा एक प्रकारचा बालविवाहच आहे. अशा बालविवाहांना आळा घातला पाहिजे. मुला-मुलींनी आपली लग्ने आपणच ठरवायला पाहिजेत.

    जेंव्हा मुले-मुली आपला जोडीदार आपणच निवडायला लागतील तेंव्हा जात, धर्म यासारख्या गोष्टींना फारसी किंमत रहाणार नाही. हुंडा हा प्रकारही बंद होईल, कारण पालकांनी ठरवलेल्या लग्नात हुंडा हाही एक महत्वाचा घटक असतो.

    पालकांनी ठरवलेली बहुतेक लग्ने ही जातीतच असतात. याउलट मुला-मुलींनी स्वत:च ठरवलेली बहुतेक लग्ने जातीबाहेरची असतात, हे आपल्याला दिसून येतेच.

Comments are closed.