जलसंपन्न कोंढापुरीचे स्वप्न – धनंजय गायकवाड (Dhananjay Gaikwad’s Dream of Plentyful Kondhapuri)

10
59

 

पुणे-नगर रस्त्यावरील कोंढापुरी गावचे धनंजय गायकवाड. ते गावात पाणीटंचाई भेडसावू लागल्याने खवळले आणि त्यांनी दोन वर्षांच्या अवधीत गावाला जलसंपन्न करून टाकले! म्हणजे ते म्हणाले, की अजून दोन-पाच वर्षें उन्हाळ्यात गावात पाण्याची टंचाई नसेल; परंतु नंतर मे महिन्यातही गावात पाणी असेल! आणि खरोखरच, 2020 सालच्या फेब्रुवारी महिन्यात गावातील तीन सखल केलेले ओढे दुथडी भरून वाहत होते. हे सारे लोकांच्या सहभागातून घडले याबद्दल गायकवाड अभिमानाने सांगतात. ते म्हणाले, सगळ्या राजकीय पक्षांचे लोक येथे आहेत. एरवी, गावगुंडगिरी खूप चालते, पण पाण्याचा मुद्दा आला, की गावातील सगळे झेंडे एकत्र येतात. ते सारे गावाचे हित मानतात.

गावातील बंधारे
गायकवाड म्हणाले, की आमच्या मूळगावाची लोकसंख्या एकतीसशे, पण गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास झाल्यामुळे परिसरात जवळ जवळ सात हजार लोक वाढले आहेत. त्या सर्वांनाच पाणी हवे ना? गावात तलाव दोन. एक – 1969 साली बांधलेला, दुसरा 1972 साली. त्यांना मायनर इरिगेशनची तळी म्हणतात. मी पाणी निर्माण करण्याचा – गावापुढील पाणीप्रश्न सोडवण्यासाठीचा – पहिला प्रयोग 2013 साली गावापुढे मांडला. तीन जुने ओढे होते. ते जमिनीखाली जिवंत होते. जुन्या लोकांना घेऊन त्यांचा शोध लावला. जुने लोक म्हणाले, की येथे तर आम्ही आमची गुरे चारायचो!’ तरुणांना प्रश्न कळला, पाण्याचा शोध लागला, लोकसहभाग वाढत गेला आणि मे-जून 2019 पर्यंत गावामध्ये साडेचार किलोमीटर लांबीचे तीन सखोल ओढे तयार झाले. त्यांची रुंदी कोठे वीस फूट तर कोठे चाळीस फूट अशी आहे. त्या ओढ्यांवर बत्तीस बंधारे बांधले आहेत. 2019 च्या पावसाळ्यात ओढे भरून वाहू लागले. जमिनीत पाणी जिरत गेले. सर्वत्र आल्हाद तयार झाला.

गायकवाड म्हणाले, की ओढे उकरताना एक काळजी घेतली, की त्यातून खणलेली माती तेथेच पसरत गेलो. ओढ्यांना मातीची हद्द तयार झाली. ती माती तीस-चाळीस वर्षांची मुरलेली सकस होती. त्यात झाडे लावत गेलो. आता ओढ्यांकाठी अकराशे झाडे बहरली आहेत.गायकवाड लोकसहभागाचे वर्णन फार रम्य करतात. ते म्हणाले, ग्रामपंचायत, सोसायटी, बचतगट, शाळा सारे सारे आमच्या या प्रयत्नांत सामील झाले. कोणी ट्रॅक्टर दिला, कोणी डिझेल पुरवले. उद्योगांनी सीएसआरखाली आर्थिक मदत केली. शाळांची चार-चारशे मुले श्रमदानाला येत. हाक मारली, की लोक कामाला पुढे सरसावत असा अनुभव आला. सगळी देशी झाडे लावली. वनखात्याने बेल, आपटा, कांचन, वड, पिंपळ, उंबर असे अनेकानेक वृक्ष पुरवले. बेल-आपटा हे वृक्ष तर दुर्मीळ होऊन गेले आहेत. ते महाशिवरात्रीला आणि विजया दशमीला ओरबाडले जातात. आता त्यांचा एकेक वृक्ष शिल्लक राहिला आहे, पण ते नष्ट होण्याच्या आधी आम्ही नवीन लावलेली झाडे बहरणार आहेत. ओढ्यांच्या काठी अकराशे झाडे लावली आहेत- त्यात बेलाची चांगली पाच-पन्नास झाडे आहेत. त्यांना ड्रीप इरिगेशनने पाणी पुरवले जाते. त्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतातील पाणी देतात. त्याहून कहर म्हणजे त्या झाडांचे राखणदार धनगर आणि मेंढपाळ आहेत. म्हणजे ज्यांच्या शेळ्यामेंढ्या नव्या झाडांचा पाला खाणार त्यांनाच तेथे संरक्षणाची जबाबदारी दिली आहे!”

रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्याभोवती कुंपण केले आहे.

 

धनंजय गायकवाड हे सारे खुबीने साधतात व तसेच लकबीने सांगतात. ते म्हणाले, की आमच्या भागात ऊसशेती भरपूर. परंतु ऊसक्षेत्र वाढले, की पक्षी कमी होतात. म्हणून आम्ही पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी लोखंडी ट्रे लावले आहेत. त्यामध्ये धान्य टाकण्याचे आवाहन विद्यार्थी, खंडोबाचे भक्त यांना केले जाते. एकेकाने ओंजळभर धान्य टाकले तरी तीनशे ओंजळीत एक पोते तयार होते. गायकवाड म्हणाले, की असा सगळा माहोलच बदलून गेला आहे. लोकमानस घडवायचे तर कायदा लागू होत नाही. लोकांच्या भावनांना हाक घालणे महत्त्वाचे आहे!”
धनंजय गायकवाड हे इतिहास-भूगोल घेऊन एम ए शिकलेले आहेत. त्यांचा हॉटेलचा छोटा व्यवसाय आहे. ते ग्राहक पंचायतीत पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत. त्यांचा संसार ते, त्यांच्या पत्नी लता आणि दोन मुले असा आहे. मुलगी व मुलगा दोघेही कॉलेजांमध्ये आहेत. गायकवाड म्हणाले, माझा एक भाऊ ऐन उमेदीत वारला. त्यामुळे वडील खचले. म्हणून मी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. गावाकडे छान रमून गेलो आहे. इकडेच खरे जीवन जगता येते असा माझा अनुभव आहे. आता एकच ध्यास फक्त ग्रामविकासहे ब्रीद घेऊन काम करत आहे. त्यात तरुणाई मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली आहे.ते पुढे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात गावचे गावपण संपत चालले असताना आम्ही जलसंवर्धन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पक्षीसंवर्धन जपण्याचा वसा घेतला आहे. आम्ही निसर्गापासून दुरावलेल्या माणसाला निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाव करील ते राव करू शकत नाहीया म्हणीचा प्रत्यय या कामातून आल्याशिवाय राणार नाहीहा माझा विश्वास आहे.
 धनंजय गाय़कवाड 9922789100 dhananjaygaikwadsir@gmail.com
– नितेश शिंदे 9323343406
niteshshinde4u@gmail.com / info@thinkmaharashtra.com 
 

 

सीएसआर फंड्स मिळवताना

 

 

 

 

 

 

 

 

———————————————————————————————————————————–

About Post Author

10 COMMENTS

  1. गायकवाड सर अप्रतिम काम केले आहेत. तुमच्या पुढाकाराने साध्य झालेल निसर्गाचे मनोहर दृश्य.तुम्हा सर्वांचे मनापासुन अभिनंदन. सर पण आता मात्र प्रत्यक्ष पहायला येणे जरुरीचे आहे.������

  2. गायकवाड साहेब खुप छान काम आहे आम्हीही तुमचा आदर्श घेऊन बकोरीचे डोंगरावर २५००० झाडे लावली आहेत व त्याचे संगोपन नियमित चालु आहे

  3. गायकवाड साहेब खुप छान काम आहे आम्हीही तुमचा आदर्श घेऊन बकोरीचे डोंगरावर २५००० झाडे लावली आहेत व त्याचे संगोपन नियमित चालु आहे

  4. धनंजयजी गायकवाड यांचे काम मी जवळून पहिले आहे, अनुभवले आहे. निसर्गावर खूप प्रेम करणारा आणि निसर्गाच्या रक्षणासाठी, वाढीसाठी झपाटलेला आणि गावाच्या प्रत्येक चांगल्या कार्यात कायम पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस….संदीप कोलते

  5. मनाशी बाळगलेली जिद्द आणि चिकाटी माणसाला नेहमीच काहीतरी करण्याची संधी येकदा तरी जीवनात देत असते आणि ती वास्तवात उतरवण्याची हिम्मत ज्याच्यात असते ना त्याचे नाव ऐकी, आणि ते ज्याला जमते ना त्याचे उधारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आमचे सम्मधी धनंजय रावसाहेब गायकवाड साहेब यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या

  6. मनाशी बाळगलेली जिद्द आणि चिकाटी माणसाला नेहमीच काहीतरी करण्याची संधी येकदा तरी जीवनात देत असते आणि ती वास्तवात उतरवण्याची हिम्मत ज्याच्यात असते ना त्याचे नाव ऐकी, आणि ते ज्याला जमते ना त्याचे उधारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आमचे सम्मधी धनंजय रावसाहेब गायकवाड साहेब यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here