जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन

0
42
jayraj salgaonkar12

नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा प्राध्यापक आहे किंवा सरकारी नोकरी करतो वगैरे… मग जोशी विचारत, की ही झाली उपजीविका. मग तुमची जीविका काय? तो माणूस चक्रावत असे. जोशींना सुचवायचे एवढेच असायचे, की माणूस जगतो तो काही उद्देशाने. ते त्याचे स्वप्न असते, ध्येय असते, उद्दिष्ट असते किंवा आणखी काही. त्यासाठी तो चरितार्थाची साधने जमवून जीवन सुकर करत असतो. या लेखमालिकेत जीवनाची साधने उत्तम रीत्या उभी केलेल्या, परंतु त्याचबरोबर अधिक व्यापक जीवनोद्दिष्टाचा पाठपुरावा करणा-या व्यक्तींचा जीवनक्रम आणि त्यांचे विचार सादर करण्यात येतात.

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन

कार्यमग्‍न व्‍यक्तिमत्‍त्‍व जयराज साळगावकरमी ठरल्याप्रमाणे सकाळी ११ वाजता जयराज साळगावकर याच्या घरी पोचलो, तर त्यांच्याकडे लिफ्टदुरुस्ती करण्यासाठी आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीयर असे दोघे बसले होते. लिफ्टची मोटर वरून तळमजल्यावर आणली गेली होते. त्यामुळे वरच्या मजल्यावरील लिफ्ट ब्लॉकमध्ये स्टडीरूम करावी असा जयराजचा बेत होता. जयराजने त्यांच्यासमोर पटापट दोन-चार पुस्तके टाकली. त्यांपैकी एक होते प्रसिद्ध आर्किटेक्ट जी.बी. म्हात्रे यांच्या वास्तुशिल्पांबाबतचे, दुसरे होते ‘डिक्शनरी ऑफ आयकोनोग्राफी.’ म्हात्रे यांनी मुंबई मध्ये ज्या इमारती बांधल्या त्यांपैकीच एका ‘बडोदा हाऊस’मध्ये साळगावकर कुटुंबीय म्हणजे वडील जयंत व जयराज यांची कुटुंबे राहतात. त्या इमारतीचे नाव आता आहे लक्ष्मीसदन. जयराजचे बाकी दोन भाऊ मुंबईत अन्यत्र राहतात. तेदेखील त्याच उद्योग – व्यवसायात आहे. ती चार मजली इमारत दादरला आंबेडकर रोडवर पारशी जिमखान्याला लागून आहे. घराच्या गॅलरीत उभे राहिले की जिमखान्यामधील खेळांचे रमणीय दृश्य दिसते. मात्र कधी जिमखान्यात लग्ने होतात तेव्हा तो त्रास कर्णकटू असतो. ज्येष्ठ जयंत साळगावकर हे खरे तर सर्वसामर्थ्यशाली पुरुष. त्यांच्याइतका नैतिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रभाव महाराष्ट्रात अन्य कोणाचा नसेल, पण असल्या छोट्या पीडांपासून महापुरुषांचीदेखील सुटका होत नाही, हेच खरे!

ज्येष्ठ साळगावकरांपेक्षा जयराज सर्वार्थांनी वेगळा आहे. त्या दोघांची अभ्यासक्षेत्रेच वेगवेगळी आहेत. जयंतराव ज्योतिर्भास्कर व त्यामुळे धर्माचरणातील अधिकारी व्यक्ती मानले जातात, तर जयराज हा आधुनिक विद्यांमध्ये पारंगत. नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता, मानवी सुधारणांचा चाहता. परंतु बापलेकांनी मिळून ‘कालनिर्णय’ चा झेंडा मात्र गेली पस्तीस वर्षे सतत उंच ठेवला आहे. कारण दोघांमध्ये एक समान मोठा गुण आहे तो लोकसंग्रहाचा. जनसंपर्क हा विषय म्हणून जेव्हा जन्माला आला नव्हता त्या काळात जयंतरावांना महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांतील पुढारी वश होते. त्याचे एक कारण त्यांची ज्योतिष सांगण्याची हातोटी हे सांगितले जाते. जयराज त्यांच्या पुढे काकणभर गेला. त्याने मिडिया आणि जाहिरात ही क्षेत्रे काबीज केली व ‘कालनिर्णय’चा वरचश्मा कायम ठेवला.
नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता, मानवी सुधारणांचा चाहता जयराज...जयराज उद्योग-व्यवसायात प्रवीण आहेच, त्यामध्ये तो वेगवेगळ्या क्लृप्त्या सतत राबवत असतो, पण त्याचा व्यासंग विविध क्षेत्रांत आहे. तो त्या आर्किटेक्ट – इंजिनीयरना इमारतींची प्रबळ प्रेरणा कुठून येते हे आयकोनोग्राफीच्या पुस्तकामधील लक्षणचित्रांवरून व यज्ञवेदींच्या नकाशांवरून समजावून सांगत होता. त्याच ओघात म्हात्रे यांचे वास्तुशिल्पी म्हणून कर्तृत्व काय? त्यांनी बांधलेल्या इमारतींची रेखाटने वेगळी कशी आहेत? हे स्पष्ट करत होता. मधेच माझ्याकडे वळून तो म्हणाला, की म्हात्रे यांनी ही इमारत १९३३ साली बांधली, ती टाटा नावाच्या एका पारश्यासाठी. आम्ही ती १९८४ च्या सुमारास विकत घेतली.
तेवढ्यात, जयराजचा आणखी एक इंजिनीयर मित्र तिथे आला आणि त्यांची चर्चा सुरू झाली ती इमारत पावसाळ्यात गळते त्याबद्दल. त्यांच्या बोलण्यात छतांचे विविध प्रकार, त्यांमध्ये आलेली आधुनिकता, मंगलोरी आणि गावठी कौलांची खासियत, मंगलोरी कौलांचा नाद आणि त्यामधून प्रकट होणारा त्यांचा टिकाऊपणा असे विविध पोटविषय उमटत गेले. मला गंमत वाटत होती, की जयराज त्याच्या घरी दुरुस्तीच्या कामाकरता आलेल्या कंत्राटदारांशीदेखील किती चोखंदळपणे चर्चा करत आहे!
जयराज हा ‘रिनेसान्स मॅन’ आहे. त्याला गेल्या दोन-चारशे वर्षांत निर्माण झालेल्या विद्याकलांमध्ये आस्था आहे. त्याची त्यांमधील जाणकारी अद्यावत आहे व ती तशी ठेवण्यास तो धडपडत असतो. जयराजचे मला सतत तेच वैशिष्ट्य वाटत आले आहे. मी त्याला गेली तीस-पस्तीस वर्षे पाहतो आहे. त्याला अनेक विषयांमध्ये जिज्ञासा आहे आणि ती पुरी केल्याखेरीज तो शांत बसत नाही. तो सुस्थित-सुसंपन्न आहे. त्याची वाटेल तो ऐषोआराम करण्याची आर्थिक क्षमता आहे. परंतु आनंद कोठे मिळतो याचा त्याने विचार केलेला आहे. तशी उद्योग – छंदयुक्त जीवनशैली त्याने जपली आहे. तो पुस्तके –चित्रपट –संगीत यांचा विशेष छंदाभ्यास सतत चालू ठेवतो. त्या तऱ्हेची समाजाची जागरूक अवस्था म्हणजे ‘रिनेसान्स’ ती प्रक्रिया आहे समाजाच्या प्रबोधनाची. मानवी इतिहासात समाज दोन वेळा अशा विलक्षण जिज्ञासू अवस्थेत जगला. एक – वैदिक काळ. तो कोणता हे ढोबळ मानाने सांगता येते. दुसरा म्हणजे युरोपातील सतरावे ते एकोणिसावे शतक. ते ‘रिनेसान्स’ या संज्ञेनेच ओळखले जाते.
जयराजचे वडिल ज्‍योर्तिभास्‍कर जयंत साळगावकरजयंतराव साळगावकर यांचे आयुष्य खडतर होते. त्यांच्या व्यवसायातील यशापयशाचे चढउतार फार तीव्र आहेत. त्यांना प्रसंगी अपार मानहानी सोसावी लागली. परंतु त्यांना ‘कालनिर्णय’ हा ‘प्रॉडक्ट’ गवसला आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा सतत उत्कर्षच होत गेला. त्यांनी ‘कालनिर्णय कॅले़ंडर’ सात भाषांमध्ये विविध आवृत्तींमध्ये लक्षावधी प्रतींमध्ये छापणे सुरू केले. त्यासाठी स्वत:च्या कंपनीची प्रिंटिंग डिव्हिजन निर्माण केली. तो सुमंगल कॅलेंडर कंपनीचा वेगळा उद्योग झाला. त्यांचा अंधेरीला मोठा प्रेस उभा राहिला. तेथे मुंबईतील महत्त्वाची वर्तमानपत्रेदेखील काही काळ छापली जात. ‘कालनिर्णय’ची कोटी-कोटींतील प्रतींची छपाई हा तर घरचाच उद्योग! महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांत ज्या महत्त्वाच्या चार-पाच सांस्कृतिक घटना घडल्या, व्यक्तीच-प्रवाह निर्माण झाले, त्यांमध्ये ‘कालनिर्णय’चा समावेश होईल. तो ‘प्रॉडक्ट’ सुचण्यातील कल्पनाशक्ती अलौकिक आहे.
जयराज सांगतो की तो अठरा वर्षांचा असतानाच वडिलांबरोबर नव्या उद्योगात सामील झाला. “एका बाजूला रुइया कॉलेजमध्ये शिक्षण आणि दुस-या बाजूला ‘मराठा’ वर्तमानपत्रामधील आमचा अड्डा. बाबा ‘मराठा’साठी अनेक कामे करत. त्यांचा आचार्य अत्र्यां शी जवळचा संबंध होता. ते व्यकंटेश व शिरीष पै यांच्यादेखील बैठकीतील होते.” जयराज त्यांच्या पाठोपाठ तिथे जाई. “त्यातून आम्हा तरुण मंडळींचा तिथे ग्रूप झाला. अनिल बर्वे, नामदेव ढसाळ यांच्याबरोबर माझे दिवसच्या दिवस जात. रुइया कॉलेजमध्ये भरतकुमार राऊत, सुहास फडके, नीना राऊत हे माझे मित्र. तेथील अड्डा हे एक वेगळेच प्रकरण होते. त्यांच्या पलीकडे माझा कॉस्मोपॉ़लिटन मित्रसमूह होता. मला सतत जाणवे, की मी इंग्रजी संभाषणात कमी पडतो. मुंबईत व्यवसाय वाढवायचा तर इंग्रजी बोलता यायला हवे. ती उणीव मी कॉस्मोपॉलिटन मित्रमैत्रिणींच्या मदतीने भरून काढली.”
जयराज पुढे इकॉनॉमिक्स घेऊन एम.ए. झाला. तो प्रा. ब्रम्हानंद यांचा लाडका विद्यार्थी. त्याची इकॉनॉमेट्रिक्स ही विशेष आवडती विषयशाखा. त्याने ‘कालनिर्णय’चे आर्थिक गणित मोठ्या पातळीवर नेले, ते त्यांमधील जाहिरातींची संख्या वाढवून. तो म्हणाला, की माझी अठरा जणांची मार्केटिंग टीम होती. तिच्या साहाय्याने मी नॉनमराठी क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिराती मिळवल्या. त्यासाठी माझी स्वत:ची अॅड एजन्सींमध्ये उठबस असे.
जयराज जितका अभ्यासू आणि जिज्ञासू आहे तितकाच छांदिष्टही आहे. किंबहुना त्याची संवेदना व निर्मितिशीलता त्या बाजूनेही व्यक्त होते. तो एकाच वेळी व्यावहारिक असतो आणि आत्ममग्नही असतो आणि त्यामुळे तो व्यवहाराचे बोलत असताना कुठेतरी हरवलेला भासतो. तो काही वेळा त-हेवाईकपणानेही व्यक्त होतो. त्याने तीसएक वर्षांपूर्वी स्वत:च्या कविता ट्रेसिंगपेपरवर लिहून त्या छापून काढल्या. त्या तंत्रामध्ये त्यावेळी अभिनवता होती. त्याने संग्रहाच्या प्रती तयार झाल्यावर प्रकाशन समारंभ जाहीर केला. तो तागडी घेऊन व्यासपीठावर उभा राहिला आणि त्याने रद्दीच्या भावात कवितासंग्रहाचे वितरण सुरू केले! त्याला तो विक्षिप्तपणा त्या काळात हौसेपुरता परवडला, परंतु त्याच्याकडे ‘कालनिर्णय’ची जबाबदारी आल्यावर त्याने पोक्तेपणा धारण केला. अभ्यास, व्यवसाय आणि छंद यांची यथार्थ सांगड घातली.
जयराजचे जगण्याचे तत्त्वज्ञान सोपे, सरळ आहे. तो सर्व त-हेचे प्रभाव स्वीकारण्यास खुला असतो. परंतु ते ग्रहण करताना चिकित्सक राहतो. तो म्हणतो, सावरकरांनी मला दोन संस्कृतींची तुलना करून पाश्चात्य संस्कृतीमधील अद्ययावत राहण्याची संथा दिली. सावरकरांना त्यांच्या अनुयायांनी ‘हिदुत्वा’त बांधले. ते त्याहून खूप मोठे होते. त्यामुळे मी सतत आधुनिक काय आहे ते पाहून त्यामधील सर्वोत्तम ते टिपतो. आचार्य अत्र्यांनी ‘मी कोण आहे?’ या लेखामधून मनुष्यमात्र म्हणजे जिज्ञासा हा मंत्र मला दिला. मनुष्य जर चौकस नसेल, त्याच्या मनात कुतूहल नसेल तर त्याच्या जिवंत असण्याला अर्थ नाही हे आचार्य अत्र्यांच्या त्या निबंधामधून मला प्रत्ययकारी रीत्या भिडले. पु.ल.देशपांडे यांनी मला रसिकतेचे आनंदनिधान दिले. मी हे जग सुंदर करून जाईन हे त्यांचे विधान स्फुरण देणारे आहे. म्हणून मी सतत जिज्ञासू असतो. त्या ओघात आजच्या दिवसाशी संबद्ध असतो आणि जग जाणून घेण्याच्या त्या प्रक्रियेत आनंद भोगतो.
पुस्‍तकांच्‍या सान्निध्‍यातजयराजचे घर पुस्तकांनी भरलेले आहे. त्याच्याकडे नेमकी, मोजकी आणि तरीही अगणित वाटतील अशी पुस्तके शेल्फांमधून हारीने मांडलेली आहेत. घरदुरुस्ती करताना अधिकाधिक उंच शेल्फे बनतात आणि पुस्तके वरवर जाऊन बसतात, तरी टेबलांवर, टिपॉयवर, जमिनीवर पुस्तके साठत जातात! जयराज सांगत होता, की त्याने गेल्या वर्षी पन्नास हजार रुपयांची पुस्तके घेतली. तो नवीन पुस्तके आल्यासरशी वाचून टाकतोच, परंतु जरूर त्या ठिकाणी जुन्यादेखील पुस्तकांमधील संदर्भ फटाफट देत असतो. त्या बाबतीतला त्याचा उत्साह कुशल, माहितीसंपन्न ग्रंथपालाचा असतो. त्याचा अर्थकारण आणि तंत्रज्ञान या दोन्हींवर पूर्ण विश्वास आहे. जयराजला चित्रपट-नाटके व संगीत या संबंधात इतकीच भरपूर व तऱ्हेतऱ्हेची माहिती असते.
जयराजची उंची आहे जेमतेम पाच फूट, त्याचे शरीरही स्थूलत्वाकडे झुकणारे आहे. त्याचे वय पंचावन्नच्या आसपास आहे. तो थोड्या जुन्या ब्रिटिश वळणाचा पोशाख – पॅंटचे पट्टे दोन्ही खांद्यांवरून घेऊन पॅंट कमरेवर स्थिर ठेवायची (सस्पेंडर्स) – घालतो. त्यामुळे त्याच्या व्यक्तिनमत्त्वास संशोधकाची डूब लाभते. त्याची पत्नी भारती लाघवी स्वभावाची आहे. त्या दोघांच्या सांस्कृतिक, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील उत्साही वावरामुळे ती दोघे प्रेमविवाहित वाटतात. परंतु त्यांचे लग्न योजून झाले आहे. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी शक्ती ही मिडियामध्ये आहे. ती सध्या इंग्रजी वर्तमानपत्रांत काम करते. पण तिने वडिलांचा लेखनगुण घेतला आहे. तिची इंग्रजी कादंबरी ‘Imperfect Mr.Right’ अलिकडेच प्रकाशित झाली. कांदबरीचे वेगवेगळ्या गावी प्रमोशन चालू आहे आणि शक्ती त्यासाठी उत्साहाने प्रत्येक गावी जात असते. दुसरी मुलगी नानी अमेरिकेत जाहिरातक्षेत्रात आहे.
जयराज स्वत:च्या लेखनाला वळण मिळाले ते कुमार केतकर यांच्यामुळे असे कृतज्ञतेने सांगतो. एरवी जयराजच्या बोलण्यातील व वर्तनातील भाव औपचारिक रीत्या व्यक्तत होत असतात. परंतु कुमार आणि शारदा यांचा विषय निघाला, की तो एकदम सुह्रदपणाने व्यक्त होतो. तो त्या दोघांचे प्रगल्भ वाचन-लेखन-संभाषण याबद्दल आदराने बोलतोच, परंतु त्यांच्याबद्दलच्या जिव्हाळ्याने हळवाही असतो. जयराज म्हणाला, “मी एका टप्प्यावर बहकणार होतो. मला उद्योगात ब-याच गोष्टी करायच्या होत्या, मी मोठी स्वप्ने पाहात होतो, पण अडचणी निर्माण झाल्या, मर्यादा येत गेल्या. मती कुंठित होते की काय असे वाटू लागले. दारू पिण्याचे प्रमाण वाढले. तो कोंडमारा विलक्षण होता. कुमारने त्यावेळेस माझ्यावर विश्वास टाकून मला ‘लोकसत्ते’ मध्ये लिहायला लावले. ते वळण माझ्यासाठी मोठे महत्त्वाचे ठरले. मी गंभीररीत्या विचार करू शकतो-लिहू शकतो-बोलूही शकतो हे लोकांना कळले. माझ्याबद्दलचा बभ्रा विरून जाऊ लागला आणि मी आत्मविश्वासाने पूर्ववत स्थितीला आलो. तो साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीचा काळ. कुमारने मला त्यावेळी सांभाळून घेतले.”

कालनिर्णयचा दिवाळी अंक अधिक सघन आणि कल्‍पक होण्‍यात जयराजचा मोठा वाटा आहेजयराजने त्यानंतर खूपच महत्त्वाची कामे केली. त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘कालनिर्णय सांस्कृतिक’ हा महत्त्वाचा दिवाळी अंक अधिकाधिक सघन आशयाचा आणि नवनव्या कल्पकतेचा होत गेला. त्याने ‘कालनिर्णय’ वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रगट केले. भारतातील पहिल्या काही वेबसाईट्समध्ये ‘कालनिर्णय’चा समावेश होतो. हा भविष्यवेध घेतला जयराजने. ते केव्हाच मोबाईलवर व काही महिन्यांपूर्वी तर आयपॅड आणि अॅंड्रॉइडवरदेखील अवतरले. ‘कालनिर्णय’च्या जाहिरातींतील कल्पकता ही जयराजची खुबी. त्यामध्ये सतत नवीन काही आढळते. ‘भिंतीवरी ‘कालनिर्णय’ असावे’ ही ‘स्लोगन’ जयंतरावांची-रामदासांच्या रचनेवर आधारित. पुढे, ‘कालनिर्णय’ बहुभाषिक झाले तेव्हा ‘कालनिर्णय द्याना – कालनिर्णय घ्याना’ ही समर्पक स्लोगन जयराजने केली व नंतर अनेक कल्पकतापूर्ण जाहिराती रचल्या.
जयराज उद्योग-व्यवसायाच्या नेटवर्कमधून असा – तसा भिडत असतो. त्याचवेळी समांतरपणे तो त्याच्या मित्रमंडळींना आणि इच्छुकांना त-हेत-हेचे अभ्याससाहित्य, छंद साहित्य, कलाविचारसाहित्य पुरवत असतो. त्याचे ते इमेल अथवा प्रिंट आऊट म्हणजे मोठी मेजवानी असते. त्यासंबंधात एखादा मुद्दा काढून त्याला छे़डले, की तो आणखी सजग होतो आणि भरभरून संदर्भ देऊ लागतो. त्यावेळी त्याची विविध विषयांमधील गती जाणवते. तिचा पाया त्याची जागरूकता, जग जाणण्याचे कुतूहल हाच असतो.

जयराज लिखित 'अजिंक्य योद्धा- बाजीराव' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठजयराज लिखित 'पैसा आणि मध्‍यमवर्ग' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठत्याने वर्तमानपत्रांत लिहिणे सुरू केल्यानंतर त्याच्या अभ्यासाला दिशा आली. अर्थकारण, शेती व पर्यावरण, तंत्रज्ञान आणि त्यातून येणारी आधुनिकता हे त्याचे विषय ठरून गेले. त्याचे फलित म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्याची दोन पुस्तके प्रकाशित झाली. त्यांपैकी एक ‘पैसा आणि मध्यमवर्ग’ असे आहे, तर दुसरे ‘अजिंक्य योद्धा- बाजीराव’ हे पहिल्या बाजीरावाच्या युद्धकौशल्यावर आहे. ‘पैसा आणि मध्यमवर्ग’ या पुस्तकात समाजाची अर्थसाक्षरता वाढावी असा हेतू आहे, तर बाजीराव हा इतिहासातील एकमेव योद्धा आहे, की जो आयुष्यात युद्धच हरला नाही असे जयराजचे म्हणणे आहे. म्हणून त्याने बाजीराव-मस्तानी वगैरे रंजक कथांमध्ये न अडकता केवळ बाजीरावाच्या युद्धतंत्रावर व त्यावेळच्या रणभूमी-इतिहासावर हे अभ्यासपू्र्ण पुस्तक लिहिले. त्या पुस्तकातील संदर्भ सूची आणि परिशिष्टे यांवरून नजर फिरवली तरी अंचबित व्हायला होते. तरी तो सांगतो, की ते पुस्तक छापल्यावर त्याला युद्धशास्त्रास उपयुक्त असे बाजीरावाच्या लढायांचे नकाशे सापडले आहेत! त्या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर , अर्थतज्ज्ञ विजय केळकर आणि योगव्यवस्थापनकुशल भीष्मराज बाम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जयराजची माणसे जमा करण्याची ही हातोटी. त्या तिघांनी जयराजच्या अभ्यास-संशोधनाचे कौतुक केले. त्याच्या आधुनिक दृष्टीचा गौरव केला आणि विवेचक बुद्धीची प्रशंसा केली. पण श्रोत्यांच्या स्मरणात राहिले ते जयराजने केलेले सरळ, स्वाभाविक प्रास्ताविक. त्याने खुल्या अर्थकारणाचा पुरस्कार केला, पण त्याचबरोबर हे बजावले की मुक्त भांडवलशाहीवर सामाजिक नियंत्रण हवेच हवे. जयराज त्या संदर्भात पंडित नेहरूंना बराच मानतो. तो म्हणाला की नेहरूंनीही गांधींच्या प्रभावाखाली येऊन पंचा नेसला असता तर आज देश भिकेला लागला असता. परंतु नेहरूंनी संमिश्र अर्थव्यवस्था आणली. खाजगी आणि सार्वजनिक अशी व्यवस्था निर्माण केली. त्याचे फलित म्हणजे देश आज महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचला.
जयराज उद्योग उत्तम सांभाळतो. तेथे तऱ्हतऱ्हेची धाडसी पावले उचलतो. त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात मन:पूर्वक रमतो. त्याची स्वत:ची निवड चोखदंळ असली तरी अनेकविध कार्यक्रमांना तो आणि भारती यांची हजेरी असते.
जयराजला कॉलेजमध्ये गिर्यारोहणाचे वेड लागले. त्याने ते बरेच पुढे नेले व १९९८ साली तो एव्हरेस्टच्या बेस्ट कॅंपपर्यंत जाऊन आला. तो म्हणतो, की त्याला गिर्यारोहणाने जेवढे शिकवले तेवढे धडे शाळा-कॉलेजमध्येही मिळाले नाहीत. तसेच, तो विकास धोरणाच्या बाजूचा असल्यामुळे त्याने ‘एन्रॉचन’ व्हावे यासाठी जसा आग्रह धरला त्याच प्रकारे जैतापूर अणुप्रकल्पाच्या बाजूने जोरदार प्रचार चालवला आहे. जयराजला सामाजिक भान असल्यामुळे तो ‘ग्रंथ संग्रहालय बचाओ’ सारख्या मोहिमांतदेखील सामील असतो.
नावीन्‍याच्‍या शोधातला मुसाफिरजयराज नावीन्याच्या शोधात तर असतोच. ज्याने सहाशे वर्षांपूर्वी छपाईचे तंत्र शोधून काढले तो जर्मन यंत्रज्ञ गटेनबर्ग हे जयराजचे एक प्रिय लक्षण आहे. त्याने सध्या नवीन उपक्रम हाती घेतला आहे तो ‘निओगटेनबर्ग डॉट कॉम’चा. त्यात त्याचा तरुण डिजिटल साथीदार आहे ‘ग्यान टेक’चा अमित चटर्जी. ते दोघे मिळून कम्युनिकेशनचा विकास आजपर्यंत कसा होत गेला त्याचा शोध घेत आहेत. गटेनबर्गच्या यंत्राने क्रांती घडली, युरोपात ‘रिनेसान्स’ घडून आले. जयराज अलिकडेच घडून आलेल्या ट्युनिशिया, इजिप्तमधील घडामोडींचे दाखले देतो आणि जगात नव्या तंत्रज्ञानाने क्रांती घडून येणार असे खात्रीने सांगतो. जयराजचा विश्वास आहे, की ट्विटर, फेसबूक क्रांतीने नव्या ‘रिनेसान्स’चा आरंभ होणार आहे. त्यासाठी तो त्याचा ग्रंथराज ऑन लाइन मोफत उपलब्ध करून देणार आहे. नव्या प्रबोधन पर्वाचे उद्गाते आपण व्हावे ही केवढी थोर मनीषा आहे! त्याचा हॉर्नोमीटर हा असाच प्रकल्प आहे. त्यात प्रत्येक तीन व चार चाकी वाहनाला मीटर बनवणे सक्ती व्हावे असे अभिप्रेत आहे. तसाच त्याचा प्रयत्न झेरॉक्सविरोधी रसायन विकसित व प्रसृत करण्याचा आहे.
कधी कधी वाटते, की जयराज आणि त्याच्यासारखे तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेचे चाहते यांना क्रांती घडण्यासाठी ‘रिनेसान्स’चे प्रबोधन साधण्यासाठी आधुनिक विद्याकला आणि त्यांचेच अपत्य असलेला मिडिया यांच्या ध्यासामध्ये तत्त्वज्ञानाची, सिद्धांताची, सांस्कृतिकतेची गरज तेवढीच तीव्र असते याची जाणीव का होत नाही?

दिनकर गांगल, ९८६७११८५१७
thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleशशिकांत सावंत – आजचा ऋषिमुनीच तो!
Next articleखानदेशचा पोळा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.