जयंत भोपटकर – अष्टगुणांनी समृद्ध बहुरूपी कलाकार (Jayant Bhopatkar Multifaceted Talented Marathi Artist)

1
71

जयंत भोपटकर

जयंत भोपटकर हे अमेरिकेत सिअॅटलला राहतात. ते उत्तम तबलजी आहेत; तितकेच कसदार अभिनेतेही आहेत. ते मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांत भूमिका करतात. त्यांनी सिअॅटलच्या मराठी मंडळात सदस्य ते अध्यक्ष अशी विविध पदे अकरा वर्षे भूषवली आहेत व मंडळासाठी आवडीने आणि मन लावून काम केले आहे. त्यांनी अमेरिकेत वाढलेल्या आणि मराठी भाषेचा गंध नसलेल्या मुलांना तीन वर्षे मराठी शिकवले. नंतर त्यांनी ती शाळा गुरुकुलमध्ये विलीन केली. त्यांनी समलिंगी पाल्यांच्या पालकांचे संमेलन आयोजित केले होते. त्यांनी सायकलवरून सिअॅटल ते पोर्टलँड हा दोनशेसहा मैलांचा प्रवास गेल्या सत्तावीस वर्षांत बारा वेळा केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी छत्तीस हजार डॉलर्स (पंचवीस लाख वीस हजार रुपये) निधी महाराष्ट्र मंडळातर्फे जमा केला आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून थेट पीडितांच्या हातात पोचेल अशी व्यवस्था केली! अशा रीतीने,ते कलाकार, संयोजक, शिक्षक व दयाळू अंत:करणाचे सहाय्यकर्ते अशा विविध रूपांनी समाजात वावरत असलेले दिसतात. त्यांची महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीबद्दलची आस्था नमुनेदार वाटते. घडलेही तसेच. सिअॅटल महाराष्ट्र मंडळांनी मोठा निधी जमवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनादिला. अमेरिकेच्या मराठी समाजात इतके व्याप सांभाळून तो माणूस उदरनिर्वाहासाठी काय करतो? अशी शंका वाचकांच्या मनात आली तर त्याचे उत्तर आहे, ते मायक्रोसॉफ्टमध्ये 1997 पासून इमानेइतबारे नोकरी करतात! अशी ही छपन्न वर्षांची असामी, जयंत भोपटकर!

त्यांचे वडील बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला होते. जयंत यांचे वास्तव्य लहानपणी झकेरिया बंदर, काळाचौकी आणि वडाळा येथे होते. ते पुणे इंजिनीयरिंग कॉलेजमधून पदवी संपादन केल्यानंतर, भारतात एक वर्ष नोकरी करून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम एस करण्यासाठी अमेरिकेकडे विमानाने 1986 मध्ये, वयाच्या बावीसाव्या वर्षी उडाले आणि तिकडचेच होऊन गेले. त्यांना त्यांनी शिकागो येथे एम एस केल्यानंतर तेथेच नोकरी मिळाली. ते शिकागोतील महाराष्ट्र मंडळात गप्पा मारण्यासाठी जात. एके दिवशी, अशाच गप्पा चालू असताना एकाने विचारले, आपल्या मंडळातर्फे येत्या रविवारी सांगितिक कार्यक्रम आहे. पण अद्याप तबलजी मिळालेला नाही. काय करावे?” भोपटकर म्हणाले, मला येतो ना तबला वाजवायला.

 

ती त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाची सुरुवात होती! भोपटकर रविवारी कार्यक्रमाला गेले. त्यांनी काही सराव न करता साथसंगत केली. सारे छान जमले! आश्चर्यमिश्रित आनंद सर्वांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. तो आनंद मराठी समाजाला तारा अचानक लाभला त्याचा होता. जयंत भोपटकर यांना तबल्याची शिकवणी ते भारतात असताना त्यांच्या आईवडिलांनी लावली होती. तो ताल जयंत यांच्या बोटांत उतरला होता. पण त्याचे महत्त्व त्यांना लहानपणी जाणवले नव्हते, ते शिकागोमधील कार्यक्रमात कळले. भोपटकर अमेरिकेत सांगितिक कार्यक्रमांत सहभाग घेऊ लागले आणि तणाव दूर करण्यासाठी संगीतासारखे माध्यम नाही हे त्यांच्या मनावर बिंबले गेले, त्यांनी शाळेत एक-दोन नाटकांत कामे केली होती. शालेय जीवनात अभ्यासाला प्राधान्यया भारतीय मध्यमवर्गातील विचारसरणीमुळे मुलांचे तसे छंद पडद्याआड राहतात असेही त्यांच्या ध्यानी आले. अमेरिकेत त्यांची ती कला उफाळून आली. शिकागोच्या महाराष्ट्र मंडळात दरवर्षी नाटक सादर करायची परंपरा होती. भोपटकर यांनी एकदा त्यात सहभाग घेतला. विच्छा माजी पुरी कराहे वसंत सबनीस लिखित आणि दादा कोंडके यांची नाममुद्रा उमटलेले नाटक आयोजले होते! भोपटकर यांनी त्यात राजाची भूमिका केली. भोपटकर म्हणाले, की मी भारतात वडिलांबरोबर मराठी नाटके पाहिली होती, तो संस्कार माझ्या मनावर होता.भोपटकर यांचे मैत्र या उठाठेवींमुळे शिकागोमध्ये आणि मिडवेस्टमधील अनेक शहरांत चांगले जुळले; पण त्यांच्या कारकिर्दीचा शिकागो येथील हिस्सा तेवढ्यापुरता तरी संपला होता.

भोपटकर सिअॅटलला मायक्रोसॉफ्टमध्ये (1997) रूजू झाले. तेथील महाराष्ट्र मंडळ नुकतेच सुरू झाले होते. तेथे गणेशोत्सवात मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम आणि दिवाळीत एकत्र फराळ इतकेच उपक्रम चालायचे. भोपटकर यांनी नाटक का नाही करत?’ असा त्यांचा आवडता प्रश्न विचारला. सर्वांना मनोमन तसेच वाटत असणार. बैठकीत कारणमीमांसा न करता भोपटकर यांच्यावर नाटक सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली! प्रारंभ झाला रत्नाकर मतकरी यांच्या तुमचं आमचं गाणं या एकांकिकेने. ती लोकांना आवडली. मंडळाचा हुरूप वाढला. नाटके, नाट्याभिनय असे कार्यक्रम होत गेले. भोपटकर यांना त्यांच्या मनात भरलेल्या भूमिका करता आल्या. त्यांनी विच्छा माझी पुरी करामधील हवालदार, ‘शांतेचं कार्टं चालू आहेमधील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका, ‘कन्यादानमधील लागू यांची भूमिका आणि मोरूची मावशीमधील मावशी या भूमिका साकारल्या. शिवाय, पुलंचे एका रविवारची कहाणीआणि ती फुलराणीही नाटके रसिकांना आवडली. संगीत वस्त्रहरण करताना मोठे आव्हान होते, मालवणी बोलीभाषेचे. भोपटकर यांनी कलाकारांकडून मालवणी घोटून घेतले. ते म्हणाले, की मी मुंबईत वस्त्रहरणअनेक वेळा  पाहिले होते. त्यांतील काही कलावंत आमच्या बीपीटीत काम करत. त्यामुळे त्यांच्याकडून घरीदेखील मालवणी भाषेच्या गंमती कळल्या होत्या. तो ठेवा ते नाटक करताना उपयोगी पडला! त्यांतील पदे कलाकारांच्याच आवाजात रेकॉर्ड केली. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी ते लिप सिंक करत. ही नाटके आम्ही प्रारंभी सिअॅटलमध्ये करत असू. नंतर आम्ही जवळपासच्या शहरांत त्यांचे प्रयोग करू लागलो. भोपटकर म्हणाले.

इंग्रजी नाटकातील भूमिकेत

 

भोपटकर म्हणाले, की मी नाटके एकतीस वर्षे करत आहे. आतापर्यंत साठ नाटके झाली. त्यात मराठी-हिंदी-इंग्रजी असतात. पैकी वीस नाटके मीच दिग्दर्शित केली होती. बाकी नाटकांत निव्वळ अभिनय. अजून बरीच नाटके मला करायची आहेत. इंग्रजी नाटकांचे आव्हान वेगळे असते. त्यांचे अॅक्ट थिएटर खूप मोठे आहे. त्यावेळी मूळ अमेरिकन गोरा प्रेक्षकवर्ग उपस्थित असतो. भोपटकर यांची काही निरीक्षणे मार्मिक आहेत. ते म्हणाले, की मराठी नाट्य व अन्य कलाक्षेत्रात अस्सल कार्य अमेरिकेत, विशेषत: कॅलिफोर्नियात सध्या घडत आहे. त्यांना एकूण नाटकांचा घसरलेला दर्जा खंतावतो. ते म्हणाले, की नाटकातील गांभीर्य संपले असून थिल्लरपणा वाढला आहे.

          भोपटकर यांच्याकडून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्विवार्षिक अधिवेशनात अनेक कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यांपैकी डेट्राइट येथे केलेले संगीत शारदातील म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान, लग्नाअजुनि लहान आणि सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न, कृशहि न, वय चवदाची नटवरा||’ या दोन पदांचा समावेश असलेले नमन, प्रहसन त्यांना वैशिष्ट्यपूर्ण वाटते. त्या नाटकांचा वेगळाच सामाजिक परिणाम भोपटकर लक्षात आणून देतात. तो अमेरिकेतील मराठी समाजापुढील प्रश्न आहे. त्या सर्व नाटकांत काम करणाऱ्या मुलींना मागणी घालण्यासाठी नाटक संपल्यानंतर उपवर मुलांचे पालक भोपटकर यांना भेटत असतात. त्या मुलींचे नाटकांतील मराठी ऐकून, पालकांना त्या नुकत्याच भारतातून आल्या आहेत असे वाटे. इतकी त्यांची मराठी भाषा सच्ची व मूळ भाषिक वळणाची असे! भोपटकर त्यांना हसत हसत समजावत, की अहो, त्या मुली अमेरिकेतच जन्मलेल्या आहेत!” सिअॅटल येथे 2007 मध्ये बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अधिवेशन पार पडले. भोपटकर त्या अधिवेशनाचे संयोजक होते. ते अधिवेशन आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक यशस्वी अधिवेशनांपैकी एक होते. कारण त्या अधिवेशनाच्या रकमेचा काही भाग प्रथमच महाराष्ट्र फाउंडेशन आणि इतर ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांना देणगी म्हणून देण्यात आला होता.

          भोपटकर यांनी एकदा होलिकोत्सवात कविसंमेलन केले होते. तेसुद्धा नाविन्यपूर्ण पद्धतीने. त्यासाठी त्यांनी सिनेकलावंत त्यांच्या आवाजात आणि विशिष्ट ढबीमध्ये कविता सादर करतात असा बाज घेतला होता. त्यामध्ये राजकुमार, अमिताभ बच्चन, अजित यांच्या नकला झाल्या. स्वत: भोपटकर यांनी शोलेमधील संजीवकुमार साकारला होता.

          समलिंगी मराठी मुलामुलींचे आणि त्यांच्या पालकांचे संमेलन अमेरिकेत दरवर्षी वेगवेगळ्या शहरांत होते. त्याची आखणी आणि नियोजन पद्धतशीर असते. सिअॅटलच्या महाराष्ट्र मंडळातर्फे तसे संमेलन आयोजित करण्याचे ठरले. भोपटकर सांगत होते, येथील समाजाने अशा व्यक्तींचा स्वीकार केला आहे. त्या नोकरी-व्यवसाय करतात, समाजजीवनात मुक्तपणे वावरतात. पालकांचे पाल्यांच्या बाबतीत एकमत आढळले की  ते आमचे मूल आहे. एका परिसंवादात पालकांनी त्यांना त्यांच्या पाल्याची स्वभावप्रकृती कधी आणि कशी कळली, त्यांनी त्याला त्यांचे कसे मानले हे वस्तुनिष्ठपणे, बिलकूल भावनाहळवे न होता सांगितले होते. आपल्या तीन मराठी कुटुंबांत दोन मुलगे आणि एक मुलगी समलिंगी आहेत. त्यांपैकी एका मुलीने इंग्रजी मुलीशी विवाह केला आहे. मी त्या संमेलनात एक नाटिका केली होती.

          भोपटकर यांचे कुटुंब चौघा जणांचे. त्यांच्या पत्नी ममता यासुद्धा मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत. त्यांच्या दोन मुली- मिलिंदा आणि वल्लरी कॉलेजात शिकत आहेत. भोपटकर यांनी सांगितले, त्यांना पाश्चात्य संगीत आवडते. त्या पियानोवर नोटेशनप्रमाणे मराठी गाणीही वाजवतात. त्यांचे ते बरे असते. मात्र नोटेशन नसेल तर त्या बाद.’’ भारतीय संगीत मौखिक असते. ती वेगळीच अडचण त्यांना वाटते. मोठी मुलगी मिलिंदा कॉलेजच्या भांगडा डान्स टीममधून नृत्य करते, तर धाकटी वल्लरी उत्तम चित्रे काढते. तिला ती देवदत्त देणगी असावी. ती स्वत:चित्रकला शिकते आणि लहान मुलांना शिकवतेही. त्यातून चार पैसे कमावते. भोपटकर म्हणाले, आमच्याकडे मुलांनी कॉलेजपासूनच स्वतंत्र कमावते होण्याची पद्धत आहे. ती भारतीय़ मुलांतही छान रूजली आहे. भोपटकर यांनी मुलींना स्वातंत्र्य दिले आहे. मात्र घराच्या उंबरठ्याच्या आत आल्यावर त्यांना मराठी बोलणे कंपल्सरीआहे. परंतु समारंभात भेटल्यावर गप्पांच्या ओघात, मुले मराठी बोलत नाहीत. काय करावे?’ असा हमखास विषय निघे. त्यातूनच भोपटकर यांना मराठी क्लास काढण्याची कल्पना सुचली. भाषेबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने भोपटकर रामायणातील आणि शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगायचे. कालांतराने, राजा  झंवर यांनी 1998 मध्ये सुरू केलेल्या गुरूकुलाचे शालेय शिक्षणासारखे स्वरूप आणि परीक्षापद्धत पाहून भोपटकर यांनी त्यांची शाळा गुरूकुलात विलीन करून टाकली.

2019च्या सायकल स्पर्धेत फिनिश लाईन पार करताना

 

भोपटकर यांचा एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी ठरलेला असतो. कास्केड बायसिकल क्लबतर्फे जुलै महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी, दोन दिवशी सिअॅटल ते पोर्टलँड हा दोनशेसहा मैलांचा सायकल प्रवास आयोजित केला जातो. ती स्पर्धा नसते. भोपटकर सांगत होते, तो उपक्रम 1979 पासून सुरू झाला आहे. त्यामध्ये देशोदेशींचे दहा हजार सायकलवीर सहभाग घेतात. मी या प्रवासात सहभागी गेली बारा वर्षे होत आहे. मी दोन-तीन महिने आधी सरावाला सुरुवात करतो. त्यात आपले मराठी शंभर जण तरी असतात. मी माझ्या परीने मराठी मित्रांना त्यासाठी उद्युक्त करत असतो. आम्ही पहिल्या दिवशी दीडशे मैल अंतर पार करून रात्री लाँग व्ह्यू येथे मुक्काम करतो. उरलेला छपन्न मैलांचा प्रवास दुसऱ्या दिवशी पूर्ण करतो. परतीचा प्रवास मात्र बसमधून केला जातो. मी त्या सायकल प्रवासास निधी संकलन मोहिमेची जोड दिली आहे. मी मैलामागे पन्नास सेंट देणगी मागतो. आमची मायक्रोसॉफ्ट कंपनी दानशूर आहे. कंपनी मी जेवढे पैसे जमवीन तेवढीच भर त्यात टाकत असते. कोणी मैलामागे पन्नास सेंट दिले, की मी माझी स्वतःची तेवढीच रक्कम त्यात टाकतो. त्यामुळे एक डॉलर बनतो. मग मायक्रोसॉफ्टचा डॉलरला डॉलर जमा होऊन देणगीदाराच्या पन्नास सेंटचे दोन डॉलर होतात. त्याला ते आकर्षण मोठे असते. असे दरवर्षी पाचशे डॉलर तरी माझ्याकडून जमा केले जातात. ते आम्ही आशा, क्राय अशा संस्थांना देणगी देतो”.

भोपटकर यांनी वीणा सहस्त्रबुद्धे, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, श्रीधर फडके, शौनक अभिषेकी, महेश काळे (दोन शास्त्रीय संगीताचे आणि तीन नाट्यसंगीताचे कार्यक्रम) अशा संगीत क्षेत्रातील मान्यवरांना अमेरिकेतील कार्यक्रमांत तबला साथसंगत केली आहे. भोपटकर यांनी एक आठवण जपली आहे. पद्मा तळवलकर यांचा सिअॅटलचा कार्यक्रम झाल्यावर, त्यांचा पुढील कार्यक्रम पोर्टलँड येथे होता. त्यांना भोपटकर यांचे तबला वादन इतके आवडले होते, की त्यांनी भोपटकर यांना पोर्टलँड येथे चलण्याचा आग्रह केला. भोपटकर यांना ते शक्य नव्हते. त्यावर त्या बोलल्या, अरे, तू कसंही करून ये, अन्यथा माझा कार्यक्रम होणार नाही.पद्मा यांचे तसे बोलणे म्हणजे भोपटकर यांच्यातील कलावंताचा मोठाच मान होता! भोपटकर शुक्रवारी दुपारी लवकर निघाले. त्यांनी रात्री कार्यक्रम केला आणि ते शनिवारी पहाटे तीन वाजेपर्यंत परतले. सिअॅटल हे वॉशिंग्टन राज्यामधील मोठे शहर आहे. ऑलिंपिया ही वॉशिंग्टन राज्याची राजधानी आहे. तर पूर्व किनाऱ्यावरील वॉशिंग्टन डी.सी. ही अमेरिकेची राजधानी आहे. बहुरूपी कला रंगमंचावर अष्टपैलू गुणांनी सादर करणारे कलावंत माहीत असतात. जयंत भोपटकर हे त्यांचे जीवन तशा गुणांनी समृद्ध होऊन जगत आहेत.

जयंत भोपटकर  jbhopatkar@hotmail.com

 

आदिनाथ हरवंदे  9619845460 adharwande@gmail.com

आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. ते औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळा’त एकतीस वर्षे नोकरी करत होते. ते तेथून जनसंपर्क विभागप्रमुख पदावरून 2002 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये 1975 पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा – विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडाविषयक पुस्‍तक लिहिली आहेत.

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleरा. वि. भुस्कुटे यांचा आदिवासींसाठी लढा! (R.V.Bhuskute – Activist for the cause of Downtrodden)
Next articleवसईचे तळाण – पक्षीप्रेमींचा आनंद (Bird Watchers Love Vasai’s Talan)
आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख पदावरून 2002 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये 1975 पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा - विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्‍तक लिहिलेली. त्‍यात 'लालबाग' आणि 'जिगीषा' या दोन कादंब-याही आहेत. त्‍यांच्‍या लेखनास अनेक पुरस्‍कार प्राप्‍त असून त्‍यांना सचिन तेंडुलकर याच्‍या हस्‍ते 'ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. लेखकाचा दूरध्वनी 9619845460

1 COMMENT

  1. आदिनाथ हरवंदे हे एक अजब रसायन आहे। सिकॉमकंपनीमध्ये जनसंपर्क अधिकारी पदावर काम करीत असताना त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला तर होताच परंतु त्यासोबत क्रीडाक्षेत्रात सुध्दा विपुल लेखन केलेलं आहे। सूक्ष्म निरीक्षण करून ते त्यांनी त्यांच्या लेखनातून व्यक्त केलेलं आहे। त्यातूनच त्यांची “लालबाग” ही कादंबरी निर्माण झालेली आहे। “लालबाग” कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचा मी एक साक्षीदार आहे। यापुढेही ह्या अस्वस्थ साहित्यिकाकडून चांगल्या दर्जेदार साहित्याच्या निर्मितीसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो।

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here