जप्तीवाले!

सुनंदा आणि चंद्रहास जप्‍तीवालेवंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे नाव सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले. दोघांचे वय पन्नाशीच्या अलिकडे-पलीकडे. चंद्रहासांनी बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग आपल्‍या हाती असलेल्‍या वेळेचा सदुपयोग करायचे उभयतांनी ठरवले आणि आपल्या घराजवळच्या पालिकां शाळेतील अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी सुट्टीच्या काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिर आयोजित केले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांच्या सहकार्याने.

सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले यांची मुलगी अश्विनी हिचा वयाच्‍या तेविसाव्या व्‍या वर्षी, १ ऑगस्‍ट २००५ रोजी वाडिया कॉलेजजवळ अपघाती मृत्‍यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही चंद्रहास जप्‍तीवाले यांनी अश्विनीच्‍या (तिने पूर्वी कळवलेल्‍या) इच्‍छेप्रमाणे तिचे नेत्रदान केले. अश्विनीच्‍या स्‍मृतीप्रीत्‍यर्थ त्या दांपत्‍याने तिच्‍या नावाचा कौटुंबिक खासगी ट्रस्‍ट तयार केला. अश्विनीने नोकरीतून साठवलेले तसेच जप्तीवाले दांपत्‍याने तिच्‍यासाठी ठेवलेले पैसे त्या ट्रस्‍टमध्‍ये ठेवण्‍यात आले. जप्‍तीवाले दांपत्‍य आपण करत असलेल्‍या कामासाठी कोणत्‍याही प्रकारची देणगी न स्‍वीकारता या ठेवीच्‍या व्‍याजातूनच आपले कार्य करत असतात.

dance shikatana muleअश्विनीच्‍या प्रथम स्‍मृतिदिनी, १ ऑगस्‍ट २००६ रोजी ‘अॅश, तू जिंकलंस’ हे तिच्या आठवणींचे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले. त्या पुस्‍तकात काही समदुःखी पालकांचे त्यांच्या पाल्‍यांसंबंधीचे लेखही समाविष्‍ट करण्‍यात आले आहेत. जप्‍तीवाले दांपत्‍य समदुःखी दांपत्‍यांना भेटून हे पुस्‍तक भेट देतात. तळेगाव दाभाडे येथे ट्रस्‍टतर्फे देणगी देऊन ‘‍अश्विनी सभागृह’ बांधण्‍यात आले आहे. त्‍यानंतर १ ऑगस्‍ट २०१० पासून अश्विनीच्‍या स्‍मृतीप्रीत्‍यर्थ ‘अश्विनी जप्‍तीवाले स्‍मृती संजीवनी पुरस्‍कार’ देण्‍यास सुरूवात करण्‍यात आली. पाच हजार रुपये रोख, स्‍मृतिचिन्‍ह, गौरवपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे.

मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलांवर घरच्या घरी संस्कार होतात, मुलांच्या गरजा विनासायास पुरवल्या जातात. उलट परिस्थिती पालिका शाळांतील मुलांची असते. तिथे तर मूलभूत गरजा भागवण्याची मारामार! मग कसले संस्कार आणि कसल्या सोयी! हे सत्य पाहून, जाणून ह्या उभयतांनी ठरवले की त्या मुलांवर संस्कार घडवायचे, तेही त्यांच्या कलाने, आणि त्यांच्या छंदातून. त्यासाठी त्यांनी प्रथम एका आठवड्याचे शिबिर आयोजित केले. ओळखी ओळखीतून अनेक कुशल व्यक्ती ह्या शिबिरात विविध उपक्रम शिकवायला आपणहून पुढे आल्या, तेही विनामोबदला.

क्रिस्‍पीन्‍स चर्च रांगोळी विभागअसे पहिले शिबिर ९ मे २००६ रोजी वारजे येथील ‘आपलं घर’ या अनाथालयात घेतले गेले. दुसरे ऑक्टोबर २००६ मध्ये बोपोडीच्या ‘विद्यानिकेतन’ शाळेत. शिबिरांत अल्प उत्पन्न गटातील मुलांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विविध विषयांतील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतात. हे दांपत्य स्वखर्चाने शिबिरकाळात लागणारे सगळे साहित्य, सामग्री आणि संध्याकाळचा नाश्ता पुरवते. एप्रिल २००७ पासून पालिका शाळा क्र. १२८/ब, शास्त्रीनगर, पौड रोड, इथं पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी नियमित शिबिरे भरवली जाऊ लागली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे दोन-तीन तास मुलांमध्ये मूल होऊन रमले. त्यांनी चित्रांची खैरात केली. मुलांना गमतीजमतीतून विज्ञान, पर्यावरण, गणित, नकाशावाचन, ओरिगामी, जादूचे प्रयोग, आपत्कालीन सुरक्षितता इत्यादि विषय शिकवले जातात. जुन्या कपड्यांपासून पायपुसणी बनवणे, कागदी फुले, वस्तू, भेटकार्डं बनवणे, रांगोळी काढणे अशा कलांमधून मुलांच्या कल्पकतेला चालना दिली जाते. यातून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. आरोग्यतपासणी, खेळ, योगासने, पौगंडावस्थेतील शंकांचे निरसन असेही उपक्रम हाताळले जातात. मुलांना सहलीला नेले जाते. त्यातून निसर्ग निरीक्षण, पशु-पक्षी, पर्यावरण, विज्ञान यांचे ज्ञान मुलांना सहजरीत्या दिले जाते. तर कधी कधी, मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे ‘बाहुलाबाहुली’चे लग्न अगदी वाजत-गाजत, थाटामाटात लावतात. सर्व जण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सोहळा पार पाडतात. यातून आपुलकीचे नाते हळुहळू निर्माण होऊ लागले आहे. समजुतीचा सेतू बांधला जाऊ लागला आहे. शिबिराच्या शेवटी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली जातात.

fugyanche mukhavateह्या शिबिरांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. खरे तर, अशी शिबिरे एकाच वेळी अनेक ठिकाणी भरवली जावीत असे मी सुचवले. त्यासाठी लागणारा वेळ, व्यवस्थापन आणि आर्थिक मदत उपलब्ध झाली तर जास्त मुलांचा फायदा होईल. त्यासाठी वेगवेगळ्या विभागांतील उत्साही मंडळींनी पुढाकार घ्यायला हवा, एकत्र यायला हवे आणि एक साखळी निर्माण व्हायला हवी असे त्या दोघांनाही वाटते. असे झाले तर पालिका शाळांतील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला गती मिळेल आणि अशी सुसंस्कारित मुले वाममार्गाला जाणारही नाहीत, कदाचित.

हे दांपत्य केवळ अशी शिबिरे घेऊन थांबलेले नाही. गरज मुलांना उच्च शिक्षणास आर्थिक मदत, मुले-महिला-वृद्धाश्रम यांना आर्थिक मदत मिळवून देणे, अनाथाश्रमातील मुलांसाठी कपडे- खेळणी-वस्तू-पुस्तकं गोळा करणे, गरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत करणे- मिळवून देणे. अशा अनेक कामांबरोबर रक्तदान, नेत्रदान , देहदान या संकल्पनांचा ते प्रचारही करतात. रस्ते सुरक्षा अभियानातर्फे वाहतूक सुरक्षा कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांनी पालिका शाळेत बालवाचनालय सुरू केले आहे. चंद्रहास जप्‍तीवाले यांनी आतापर्यंत ६८ वेळा रक्‍तदान केले आहे. वैयक्तिक पातळीवरही आपण काय काय करू शकतो याचा हे दांपत्य म्हणजे आदर्श आहे.

अश्विनी जप्तीवाले मेमोरियल ट्रस्ट
२, आराधना अपार्टमेंट, प्लॉट नं. ८७/६, डावी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड, पुणे – ४११०३८
९८९०९०१६३६, ०२०-२५२८०७४४,

About Post Author