चला, एकत्र येऊ या!

2
22

हे काय आहे? प्रतिसंमेलन? सेलिब्रेशन? नव्हे, हे ‘रिअल टाइम’ निषेधनाट्य आहे! सत्तेपुढे मिंध्या नसलेल्या समविचारी लेखक-कवी-कलावंत-प्राध्यापक, शिक्षक-कार्यकर्ता, बिनचेहऱ्याचे वाचक… अशा साऱ्यांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन रचलेले. या निषेधनाट्याचे नाव- ‘चला, एकत्र येऊ या’. निषेध कोणाचा? अर्थातच अभिव्यक्तीची मुस्कटदाबी करणाऱ्या आणि अभिव्यक्तीसाठी प्राण धोक्यात घालणाऱ्यांना सुरक्षेच्या नावाखाली जेरबंद करणाऱ्या विद्यमान सत्ताधीशांचा. येथे कोणी अध्यक्ष नाही, स्वागताध्यक्ष नाही, शंभर-दोनशे किलोंचे अजगरी हारतुरे नाहीत, की फुकाचे मानपान नाहीत. श्रोत्यांमध्ये कोण कोण? आजारपणातून सावरलेले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ लेखक-प्रकाशक रामदास भटकळ, भाषातज्ज्ञ गणेश देवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी, शफाअत खान, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, कवी गणेश विसपुते, ‘दी वायर’चे संस्थापक-संपादक सिद्धार्थ वरदराजन, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि बरेच. मात्र त्यात विद्यमान अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे दिसत नाहीत!

रीतसर तिसरी घंटा होते. मिट्ट काळोख भेदत मुंबईतील दादरच्या, शिवाजी मंदिरचा रंगमच हलकेच प्रकाशमान होतो, तेव्हा बॅकग्राउंडला क्रांतिरंगातील फलकावर मानवी चेहरा, एक बाजूचा डोळा आणि दुसऱ्या बाजूचे ओठ झाकलेला आणि बाजूला ‘चला,एकत्र येऊ या’ – असे जोरकस अक्षरांचे फटकारे. मंचावरील सारा अवकाश मोकळा, फक्त उजव्या अंगाला तिरप्या प्रकाशरेषेत उजळून निघालेली एक रिकामी खुर्ची. ती रिकामी खुर्ची कोणाची? अर्थातच नयनतारा सहगल यांची. यवतमाळच्या साहित्य संमेलनात अपेक्षित असूनही मांडली न गेलेली.

म्हणूनच, कोणाच्या नजरेसही न पडलेली. ती येथे बंडखोरीचे प्रतीक होऊन अवतरते. घडून गेलेल्या आणि नव्याने घडणाऱ्या नाट्याची जाणीव करून देते. एखाद्या जिवंत व्यक्तिरेखेसारखी. तेवढ्यात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांची ‘चित्तो जेथा भयशून्यो… उच्छो जेथा शिर…’ ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकारा करणारी बंगाली कविता वातावरण कापत श्रोत्यांच्या काना-मनांत शिरते. पाठोपाठ दक्षिणेतील संदेश घेऊन टी.एम. कृष्णा रंगमंचावर अवतरतात. तो आजच्या काळातील कर्नाटक संगीतातील आघाडीचा गायक आणि बंडखोर संगीत सुधारकही. तो संगीतातील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देत आहेच, पण संगीतावर दुष्प्रभाव राखून असलेल्या राजकीय-सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेलाही शिंगावरही घेत आहे. त्याचा आग्रह एकच- संगीत परंपरेची कठोर चिकित्सा होऊ द्या. विरोध-विकासात्मक वैचारिक द्वंद्व घडू द्या.

कृष्णा यांचे तेथे असणे हेसुद्धा प्रतीकात्मक. दीडेक महिन्यांपूर्वी ‘एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया’ने हिंदुत्ववाद्यांच्या भीतीने दिल्लीतील त्यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला. पॅटर्न सेम… प्रस्थापित सत्तेविरूद्ध कृष्णा आवाज उठवतात, म्हणून सत्तासमर्थक देशभक्तांनी सरकारच्या ताब्यात असलेल्या आयोजकांना धमक्या दिल्या. सत्तेच्या हाती नाड्या असलेल्या आयोजकांनी मुकाट माघार घेतली. मग केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने धाडसाने, त्याच दि‌वशी त्यांचा कार्यक्रम आयोजित केला. कृष्णा त्यात देहभान हरपून गायले. त्यांनी तामिळमध्ये, हिंदीत, अगदी विठ्ठलाचा मराठी अभंगही दिल्लीकरांना त्या दिवशी ऐकवला. येथेसुद्धा कृष्णा यांनी बडेजाव न आणता आधी बसवण्णा, मग तामिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांची मदुरो बागान ही कविता आणि सरतेशवटी सुब्रमण्यम भारती यांची अभिव्यक्तीचा जयघोष करणारी संगीतरचना गाऊन वातावरण भारून टाकले. सांगणे एकच. फार पूर्वी, बसवण्णांनी सर्वधर्मसमभावाचा संस्कार पेरला, भारती आणि आताच्या मुरुगन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज बुलंद केला. वेळ आपली आली आहे!

सजग नि संवेदनशील कवी-लेखक-अभिनेता, ‘आपण सत्तेचे नव्हे समाजाचे देणे लागतो’ या भावनेने सार्वजनिक सभा-संमेलनांत आवर्जून उपस्थिती नोंदवणाऱ्या किशोर कदम यांनी निषेधनाट्याची सूत्रे हाती घेताना आवाजातील अचूक चढ-उतारांसह धुमिलांसह अनेक कवींच्या कविता जिवंत केल्या, हारतुऱ्यांचा आणि पाल्हाळिक स्तुतिवंदनेचा प्रश्नच नसल्याने टाळ्यांच्या कडकडाटात वयाची नव्वदी ओलांडलेल्या नयनतारा सहगल, गणेश देवी यांच्यासह आस्ते कदम रंगमंचावर आल्या. त्यांना सोबत केली, तोवर कार्यकर्त्याच्या रूपात एक-दोनदा रंगमंचावर येऊन गेलेल्या दिग्दर्शक-नट अतुल पेठे यांनी. त्याच रुपात आधी प्रतिथयश नट-दिग्दर्शक अमोल पालेकरही दिसले होते. नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे आणि नाट्यसंघटक अशोक मुळ्येसुद्धा दिसले होते. पडद्यामागे तसेच कष्ट संध्या गोखले, माधव पळशीकर, ‘मुक्त शब्द’चे येशू पाटील अशा कितीतरी जणांनी उपसले.

श्रोत्यांनी गच्च भरलेल्या नाट्यगृहात देवी यांनी धीरगंभीर आवाजात सहगल यांच्याबद्दल बोलण्यास सुरुवात केली. म्हणाले, दुर्धर आजार असूनही हजार मैल पार करून एकटीनेच कोणाच्याही आधाराविना सहगल येथवर आल्या. आम्हाला नवी आशा मिळाली. हाच आशेचा धागा पकडत वयाच्या नव्वदीत असलेल्या या विदुषीने नमस्कार-आदाब करत, आधी पुरोगामी राज्याचे आभार मानले आणि मग ‘जय महाराष्ट्र’असा नारा दिला. अर्थातच त्याला दुराभिमानाचा दर्प नव्हता, तर कृतज्ञतेचा गंध होता. त्या म्हणाल्या, हे कोठेच घडले नाही. माझे न झालेले भाषण किती ठिकाणी महाराष्ट्रात, भारतात, भारताबाहेर पोचले, वाचले गेले. बहोत बहोत शुक्रिया…मग स्वातंत्र्याचा अर्थ सांगत, खंतावल्या सुरात सिनेसृष्टीतील कागदी ताऱ्यांना सवाल करत्या झाल्या. ‘डेहराडून में बैठे मैंने नसिरुद्दीन शाह की दुखी आवाज सुनी, लेकिन यहाँ के बडे फिल्म स्टार्स को क्यों सुनाई नही दी?’ त्यांचा सवाल थेट होता. टोकदार होता. यशाच्या शिखरावर पोचलेल्या आणि त्याचमुळे असुरक्षिततेच्या भयाने पछाडलेल्या बड्या सुपरस्टार मंडळींच्या सत्ताशरणतेवर बोट ठेवणारा होता. काहीच मिनिटे, पण सहगल खूप पोटतिडिकीने बोलल्या आणि श्रोत्यांचे अभिवादन स्वीकारत निरोप घेत्या झाल्या.

त्या निषेधनाट्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे प्रकृती अस्वास्थामुळे व्हिलचेअरमध्ये बसूनच विचारमंचावर आल्या. त्यांना सोबत केली, अमोल पालेकर यांनी. भावे यांनी व्हिलचेअरवरूनच मनोगत व्यक्त केले. म्हणाल्या, नयनतारांप्रती महाराष्ट्राच्या वतीने केली गेलेली ही क्षमायाचना आहे. नेमके आणि खरेच होते ते. प्रत्येकाच्या मनात तेव्हा एकच प्रश्न उसळी मारून वर आला. आजारी अवस्थेत जर सहगल, नेमाडे, पुष्पा भावे हे दिग्गज येथवर आले, मग ढेरे येथे का नाहीत? अमोल पालेकर म्हणाले, यवतमाळमध्ये जुळून न आलेला योग आम्हाला येथे साधायचा होता, आम्ही ढेरे यांना आमंत्रणही दिले होते, पण कार्यबाहुल्यामुळे जमत नसल्याचे त्या म्हणाल्या. खरेच असेल का तसे? मग किमान संदेश पाठवता आला नसता त्यांना? की संमेलनाध्यक्षपदाच्या बेडीने पाय जडावले असतील त्यांचे? सत्ता मग ती साहित्यातील का असेना, पद देताना निषेधाची सूरपट्टी जप्त करून घेते का? माणसाच्या गळ्यातील?

ज्येष्ठ नाट्यलेखक, कथाकार समीक्षक जयंत पवार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते. त्यांच्या आजवरच्या लेखना-भाषणांतून त्याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे. त्यांची उपस्थिती नारा अधिक बुलंद करणारी ठरली. त्यांच्या लिखित भाषणाचे अतुल पेठे यांनी अत्यंत असोशीने वाचन केले. तत्पूर्वी पवार यांनी नयनतारा सहगल यांच्या आमंत्रण वापसीला कारण ठरलेल्या उन्मादी शक्तींविरोधात सहेतूक निष्क्रिय राहिलेल्या, आनंद तेलतुंबडें यांच्यासारख्या बुद्धिवादी लेखकावर शहरी नक्षल असा शिक्का मारणाऱ्या आणि लेखक-कलावंतांवर पोलिस संरक्षणात राहण्याची पाळी आणणाऱ्या राज्य सरकारचा तीव्र आणि स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला. स्रोत आणि साधने, संस्था आणि संघटना यांवरील वर्चस्व हे सत्तेच्या राजकारणात उतरलेल्या पक्षांचे एकमात्र ध्येय असते. ते वर्चस्व जाईल या असुरक्षिततेतून तत्कालिन युपीए सरकारने विनायक सेन यांच्यासारख्या बुद्धिवादी कार्यकर्त्यास तुरुंगांत डांबले. विद्यमान सरकारही निवडणुकांच्या तोंडावर विद्यार्थी नेत्यापांसून ज्येष्ठ बुद्धिवंतांपर्यंतचे विरोधी आवाज सूत्रबद्धरीत्या रोखू पाहत आहे, त्यांनी खुपणाऱ्या त्या वास्तवाकडे लक्ष वेधले. शत्रू संसदेत नाही, मंत्रालयात नाही, तो आपल्या जवळ, खुर्चीत किंवा तो आपल्या आतच आहे, असे म्हणून त्यांनी उपस्थितांमधील प्रत्येकाला झडझडूनही काढले. जबाबदारीचे भान दिले. त्याच एकीच्या मेळ्यात सिद्धार्थ वरदराजन यांनी ‘दी वायर’ या वेबपोर्टलच्या मराठी आवृत्तीची घोषणा केली. प्रस्थापित सत्ता प्रश्न विचारणाऱ्यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवत असल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणणाऱ्या ‘दी वायर’विरोधात सत्तासमर्थक व्यावसायिकांनी आजवर अकरा हजार चारशेसाठ कोटी रूपयांचे दावे न्यायालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा, सत्ताधाऱ्यांचे सटपटलेपण उपस्थितांपुढे आले.

निषेधनाट्याचे अखेरचे सत्र. विचारमंचावर लेखक-प्राध्यापक समीना दलवाई, पोलिस संरक्षणात वावरणारे लेखक प्रवीण दशरथ बांदेकर, कवयत्री-लेखिका प्रज्ञा दया पवार, दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर, गायक-संगीतकार टी.एम. कृष्णा आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पत्रकार अलका धुपकर व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नाट्यलेखक सुनील शानभाग. सारे मान्यवर साहित्य, संगीत, समाज, नाटक-सिनेमा या परिघात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेल्या अंतर्गत आणि बाह्य धोक्यांबाबत थेटपणे बोलले. नावे घेऊन बोलले. संताप होता, चीड होती, खंतही होती. त्यातील बांदेकर यांना प्रश्न विचारला गेला, तुम्हाला पोलिस संरक्षणात का वावरावे लागते? बांदेकर म्हणाले, “मला ठाऊक नाही. एक दिवस उच्चपदस्थ पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या जीवाला धोका आहे”, असे सांगत पोलिस संरक्षण घ्या असे सांगितले. मग कोणी तरी मुद्दा मांडला, सरकारची बुद्धिवाद्यांवर पाळत ठेवण्याची ही नवी पद्धत आहे, त्यावर बांदेकरांच्या पाठीमागे संरक्षणार्थ उभा साध्या वेशातील पोलिसही गालातील गालात हसल्यासारखा दिसला. सरकारची चालबाजी तुम्ही बरोब्बर ओळखली, हेच बहुधा त्याला सुचवायचे असावे. बांदेकर यांनी ज्यांचा उल्लेख केला ते कृष्णप्रकाश हे तर कला आणि क्रीडा या प्रांतातील बहुमुखी प्रतिभेचे पोलिस अधिकारी. त्यांनी हिंसक झुंडीचा बंदोबस्त करण्यापेक्षा बांदेकर यांनाच जेरबंद करावे? माझ्या गाठीशी दहा-बारा वर्षांपूर्वी सांगलीत झालेल्या एका अवचित भेटीच्या वेळी याच कृष्णप्रकाशांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ संग्रहातील कविता उत्स्फूर्तपणे ऐकवल्याचा सुखद अनुभव जमा आहे. असे संवेदनशील मनाचे, लेखक-कलावंतांचे मन जाणणारे कृष्णप्रकाशही बांदेकर यांना संरक्षण घेण्याची विनंती करताना गालातील गालात हसले असावेत, बहुधा.

चर्चेत कलावंतांच्या अभिव्यक्तीचा मुद्दा मांडताना, पालेकर यांनी प्री-सेन्सॉरशीपविरोधातील त्यांच्या न्यायालयीन लढ्याचा उल्लेख केला. म्हणाले, तुम्ही हिंसक, प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांकडून भाषणाचे स्क्रिप्ट आधीच मागता का, तुम्ही टीव्हीवर चर्चेच्या नावाखाली शाब्दिक हिंसाचार घडवून आणणाऱ्या अर्णब गोस्वामीटाइप लोकांकडून कार्यक्रमाआधी संहिता मागवता का? त्याविरूद्ध प्रेक्षक का पुढे येत नाहीत? अभिव्यक्तीची ती लढाई एकट्या अमोल पालेकर यांची का राहते, ती अवघ्या समाजाची का होत नाही? त्यांच्या या प्रश्नाने निषेधनाट्याला उंची दिली. बुद्धिवादी लेखक-कलावंत पुरस्कार वापसीनंतरही पुढे आले. दक्षिणायन चळवळीने कलावंत आणि समाज यांना जोडले. त्याचा पुढचा टप्पा पार झाला असा आशावाद जागवत प्रज्ञा पवार यांनी निषेध नाट्याच्या प्रयोगाचा शेवट केला. मग विचारमंचावरील मान्यवरांसह सभागृहात उपस्थित प्रत्येकाने कोणत्याही शपथा न घेता किंवा पोकळ प्रतिज्ञा न म्हणता दमनकारी व्यवस्थेविरोधातील एकीचे प्रतिक म्हणून एकमेकांचे हात तेवढे हातात घेतले. एकीच्या वचनाशी असलेली बांधिलकी स्पर्शातून एक-दुसऱ्यापर्यंत पोचवली.

मुंबईतील एका सभागृहात एका बाजूला असा हा निषेधाचा सूर उंचावत असताना, बाहेर रस्त्यांवरून हजारो भिज्ञ-अनभिज्ञ लोक त्यांच्या त्यांच्या वंचनेत ऊर फुटेस्तोवर धावत होते. त्यातील काही अधिकारशाही-हुकूमशाही व्यवस्थेतच सुरक्षितता मानणारे असतील, काहींना वृत्ती-प्रवृत्तीने फॅसिस्ट असलेल्या व्यवस्थेच्या दुष्परिणामांची सखोल जाणही असेल. त्या धकाधकीत पालेकर यांना अपेक्षित अभिव्यक्ती स्वांतत्र्याची लढाई त्यांचीसुद्धा होईल का? तशी ती व्हावी ही वर्तमानाची मागणी स्पष्ट आहे. तत्पूर्वी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किमान जाणीव आणि प्रत्यक्ष लढ्यात न उतरल्याची खंत प्रत्येकांत पेरली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समकाळात तो परिणाम निदान एका राज्यापुरता जरी साधला गेला तरी ‘चला एकत्र येऊ या’ निमित्ताने झालेल्या उत्स्फूर्त एकीचा हेतू सफल होईल!

– शेखर देशमुख 9819696676     

About Post Author

2 COMMENTS

  1. एका ऎतिहासिक घटनेची घेतलेली…
    एका ऎतिहासिक घटनेची घेतलेली ही यथोचित दखल घेतलेला हा लेख मनाला दुःखी करुन गेला. मात्र लेख लिहिल्या बद्दल लेखकाचे व तो मंथन मध्ये प्रसिध्द केल्याबद्दल संपादकांचे खास आभार

  2. कार्यक्रम. कोणत्या तारखेला…
    कार्यक्रम. कोणत्या तारखेला झाला?

Comments are closed.