चंदाताई तिवाडी यांचा ‘बुर्गुंडा’

राजेंद्र शिंदे

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती. कलाकाराची पद्यामधील लयतालावर उंच उडी मारण्याची लकब प्रेक्षकांची दाद घेऊन जात होती. कलाकार लोककलेतील भारूड हा प्रकार सादर करत होता. भारूड सादर करणारा कलाकार सहसा पारंपरिक वेषातला पुरूष म्हणून अवतरतो. परंतु ही चक्क एक स्त्री होती. भारूडी चंदाताई तिवाडी!

चंदाबाई रंगमंचावर भारुडातल्या कलाप्रकाराला साजेशा ढोलकी व टाळांच्या नादावर उंच उड्या मारत होत्या.

अचानक, त्यांना नऊ महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला आणि त्यांनी तो श्रोत्यांना कथन केला. त्या नऊ महिन्यांपूर्वी टिटवाळा येथे भारुडाचा कार्यक्रम करत असताना, त्यांना त्यांच्या सुनेला दिवस गेले असल्याची आनंदाची बातमी समजली. सुनेला सोळा वर्षे मूल होत नव्हते. त्यामुळे नातवाचे तोंड पाहण्यास चंदाताई व घरची मंडळी आसुसली होती. त्यांनी उत्स्फूर्तपणे व श्रद्धापूर्वक टिटवाळ्यांचा ‘गणपती बाप्पा पावला!’ असे उद्गार काढले.

चंदाताईंचा आवाज भारावलेला होता. त्या कार्यक्रमात भारूड सादर करत होत्या आणि त्यांना आठवण होत होती येऊ घातलेल्या आपल्या नातवाची!

दुसरी आठवण सांगताना त्या म्हणाल्या, की मागे एकदा ‘महाराष्ट्र लोककला’ महोत्सवात माझा कार्यक्रम योजला गेला होता. त्या कार्यक्रमात एक ‘फॉरेनर बाई’ माझा कार्यक्रम संपल्यावर माझ्याकडे आली. तिला माझी भाषा व मला तिची भाषा समजत नव्हती. परंतु तिने माझ्या ‘बुर्गुंडा’ या गाण्यावर व नुसत्या भावनिक आविर्भावावर खूष होऊन मला तिच्या हातातली अंगठी काढून बक्षीस म्हणून दिली! मी ती सराफाला दाखवून तिची किंमत विचारली होती. ती वीस-पंचवीस हजारांची आहे. परंतु मला त्या किंमतीपेक्षा तिने दिलेल्या प्रेमाच्या भेटीचे मोल अधिक आहे असे सांगून त्यांनी ती अंगठी प्रेक्षकांना दाखवली.

नंतर त्यांनी ‘बुर्गुंडा’ हे गाणे साभिनय म्हणून दाखवले. त्यामध्ये त्यांनी लहान मूल म्हणून एक बाहुली घेतली होती व ती आपल्या खांद्याला कपड्यांनी झोळीसारखी अडकावली.  सुया, दाभण, फणी, आरसा, खेळणी वगैरें सामान तिच्या जवळच्या गाठोड्यात होते. तिने ते डोक्यावर ठेवले होते, तर एका हातात काठीला तोरणासारख्या मणी, बांगडी वगैरे गोष्टी अ़डकावल्या होत्या. या सार्‍या सरंजामासकट ती आपली कला पेश करत होती. ते बाहुले म्हणजे तिचे पोर!

ती गाण्यात सांगत होती. आम्ही भीक मागताना सात रंगांच्या भाक-या मिळवतो. बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ वगैरे आणि त्यामुळेच आम्हांला असा जन्मत: पाच किलो वजनाचा बुर्गुंडा होतो. तुमच्यासारखा नाही दोन किलोचा! हे एव्हाना स्पष्ट झाले होते, की ते धष्टपुष्ट पोर म्हणजेच बुर्गुंडा. त्या गाण्यातून भीक मागताना बायांची नावे घेऊन ‘मला भीक दिली व माझ्या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला बुर्गुंडा होईल गं’ असे सांगत होत्या.

चंदाताईंना वसंत सोमण स्मृती पुरस्कार लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर तेथेच त्यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर झाला.

वसंत सोमण मित्र मंडळातर्फे प्रयोगक्षम कलेच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान करूनही उपेक्षित राहिलेल्या कलावंतास दरवर्षी ‘वसंत सोमण पुरस्कार’ देण्यात येतो. वसंत सोमण हे रंगभूमीवरील गाजलेले कलावंत. त्यांचे अकाली निधन झाले. विशेष असे, की कोणतीही स्थायी व्यवस्था नसताना नाट्यक्षेत्रातील कलावंत मंडळींकडून अत्स्फूर्तपणे त्यांच्या नावाने रंगभूमीवर कला सादर करणार्‍या कला सादर करणार्‍या कलावंतास गेली बारा वर्ष पुरस्कार दिला जाते. यावर्षी तो भारुडी चंदाताई तिवाडी यांना 2010 साली देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून वसंत सोमण मित्रमंडळातील डॉ. मालती अग्नेश्वरन होत्या. त्या ‘नालंदा अँकेडमी ऑफ डान्स’मध्ये ज्येष्ठ प्रोफेसर आहेत.

विठ्ठल उमप यांनी चंदाताईंना गाण्यातून मानवंदना दिली. गाण्याचे बोल होते, ‘चंदाताई तिवाडी तुमको मुबारक बात देता हूँ!’

कमलाकर नाडकर्णी यांनी चंदाताई तिवाडी यांच्याबद्दल सांगताना म्हटले, की मी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला व सर्दच झालो. मारवाडी कुटुंबात जन्म झालेला असताना आणि फारसे शिक्षण नसताना, शिवाय मराठी भाषा बोलण्याची घरात बंदी असताना, त्यांना एवढे अस्खलित मराठी कसे बोलता येते व भारूड कार्यक्रम कसा करता येतो असे विचारल्यावर त्यांनी सांगितले होते, की मी हे सर्व लहानपणापासून पाहत आले आणि मला निरीक्षण करण्याची सवय असल्यामुळे जमत गेले.

चंदाताई १९८२ सालापासून भारूड सादर करत आहेत. सर्वसामान्यांना भेडसावणा-या विषयांचे विवेचन चंदाताईं तिवाडी भारुडाच्या माध्यमातून, प्रसंगी विनोदाच्या अवगुंठनातून, तर कधी मार्मिक दाखले देऊन उपहासाच्या मदतीने करतात. चंदाताईंच्या सादरीकरणात नाट्यमयता असते आणि त्यांना लोकमानसाची नस सापडल्यामुळे त्या केवळ भक्तिमार्गाची थोरवी सांगत नाहीत, तर भारुडातून समाजामध्ये असणार्‍या अनिष्ट प्रथा-परंपरांवर जोरदार प्रहार करतात. दारू-गुटखा, एडस्, कुटुंबनियोजन, कृषी-योजना, पाणीप्रश्न, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या, राष्ट्रीय एकात्मता असे विषय त्यांच्या भारुडात आलेले आहेत.

चंदाताईंनी भारुडातून केवळ समाजप्रबोधन करून समाधान मानले नाही, तर ते कृतीतूनही उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पुढाकार घेऊन १९८१ साली पंढरपूरजवळ गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर, पंढरपूर अर्बन-बॅक व आमदार सुधाकर परिचारक यांच्या सहकार्याने गरजूंना घरे बांधून दिली, ती प्रत्येकी केवळ अठ्ठावीस हजार रुपयांत! तळागाळातील दीडशे लोकांना या योजनेचा फायदा झाला. त्या घरांसाठी त्यांनी वीज, पाणी उपलब्ध करुन दिलेच; शिवाय, तेथे आरोग्यसेवाही राबवली आणि तेथील मुलांच्या शिक्षणासाठी ‘गंगाई शिक्षणप्रसारक मंडळा’ची स्थापना केली. या संस्थेतर्फे श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू झाले आहे. अडीचशेहून जास्त विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. चंदाताई या स्वत: शिक्षण कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून महिलांचीच निवड केली आहे. विद्यालयात शिक्षणाबरोबर ज्ञानेश्वरीची पारायणे करवून घेतली जातात. त्यामागचा त्यांचा हेतू मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी हा आहे.  

 – राजेंद्र शिंदे

Thinkm2010@gamil.com

About Post Author