गिर्यारोहकांची ‘जाणीव’

0
36

 

ईशलगड सुळका इर्शालगड म्हणजे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावासमोरील डोंगर. ह्याच्या मागे आहे प्रबळगड; उजव्या हाताला माथेरान आणि पायथ्याशी मोरबे धरण. इर्शालगड हा दोन शिखरे धारण करणारा वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा सुळका आहे. गिर्यारोहकांना तो कायम खुणावत असतो. त्याची उंची आहे सुमारे दोन हजार फूट. डोंगराची एक सोंड चौक गावाकडे मोरबे धरणालगत उतरते. तीच इर्शालगडाकडे जाणारी पायवाट. पण तिचा चढ तीव्र आहे. चौक ते इर्शालगडाचा पायथा ही साधारण पाऊण तासाची चाल आहे. तिथपर्यंत वाहने जातात. पायथ्याशी मोरबे धरणग्रस्तांची वसाहत झाली आहे. गडावरील चढाईनंतर प्रथम येते माची. तेथेच सपाटीवर इर्शालगडाच्या सुळक्याखाली झाडीत वसली आहे इर्शालवाडी! इर्शालगडाचा पायथा ते इर्शालवाडी ही सव्वा तासाची पाऊलवाट आहे.

शरद ओवळेकरहे सगळे वर्णन एवढ्यासाठी की तेथे गिर्यांरोहक परत परत जात असतात. पण अशाच एका मोहिमेत तेथे प्रकाश दुर्वे या गिर्यारोहकाचा मृत्यू ओढवला. प्रकाश दुर्वे याचा अपघाती मृत्यू 21 जानेवारी 1972 रोजी झाला. त्या घटनेनंतर त्या दुर्गम ठिकाणी राहणार्‍या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे, या जाणिवेतून तेथे सामाजिक कार्याला सुरुवात झाली. त्याच प्रयत्नांचे रूपांतर ‘जाणीव’ या संस्थेत झाले. त्या मागे प्रेरणा होती शरद ओवळेकर यांची.

 ते 1960 च्या दशकातील मुंबई, पुणे भागातील गिर्यारोहक चळवळीचे प्रणेते व मार्गदर्शक. संस्थेचे सभासद 1974 पासून इर्शालवाडी येथे सतत जात राहून, वाडीच्या संपर्कात असतात. इर्शालवाडीत तीस-बत्तीस घरे आहेत. तेथील रहिवाशांना 26 जानेवारीला कपडे, शैक्षणिक साहित्य, संसारोपयोगी वस्तू यांचे वाटप होते. ‘जाणीव’ संस्थेने 1978 ते 1995 ही सतरा वर्षे सुरुवातीला महिन्यातून एकदा व नंतर आठवड्यातून एकदा या प्रकारे इर्शालवाडी व जवळपासच्या बारा पाड्यांतील ग्रामस्थांसाठी पायथ्याच्या चौक गावात विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. इर्शालवाडी येथे पाण्याची विहीरसुद्धा बांधून दिली. ती गावकर्‍यांना फारच उपयुक्त वाटते.घरटी एक असे 73 दिवे. उंबरणे वाड, पिरकडवाडी आणि अर्कसवाडी येथे. 13 फेब 2011. डावीकडील श्री. अग्रवाल. सामाजिक संस्‍थेचे कार्यकर्ते. संपूर्ण भारतभर सौरदिवे. त्‍यांच्‍याकडून स्‍पॉन्‍सर.

संस्थेच्या पुढाकाराने काही कामे ग्रामपंचायतीकडून सहाय्य घेऊन करण्यात आली आहेत. इर्शालवाडीत सौर दिवे असलेले पाच विद्युतखांब उभारण्यात आले आहेत. संस्थेतर्फे वाडीतल्या ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व या परिसरातील आदिवासी बांधवांसाठीही सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी शिबिरे, स्त्रियांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर, मोतिबिंदू शस्त्रक्रिया असे काही उपक्रम राबवले जातात.

 चौककडून इर्शालगडाकडे निघाल्यावर पायथ्याकडे न जाता त्याच्याजवळून, इर्शालगडाचा डोंगर डावीकडे ठेवत मोरबे धरणाच्या काठाने सरकत पुढे सुमारे दोन तास चालले की पिरकडवाडी येते. ही वाडी प्रबळगड व माथेरान यांच्या बेचक्यात वसलेली आहे. ‘जाणीव’च्या कार्यकर्त्यांनी आपले काम तेथेही सुरू केले आहे. त्यांचा 2009 पासून पिरकडवाडीबरोबर आरकसवाडी व उंबर्गेवाडी ह्या वाड्यांशी सतत संपर्क असतो. संस्था आपल्या परीने ग्रामीण भागातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करत आहे.

उंबरणे वाडीची शाळावैद्यकीय शिबिरे होत असली तरी लोकांची स्वास्थ्याची दैनंदिन गरज वेगळी राहतेच, हे लक्षात घेऊन 2009 पासून पिरकडवाडी व इर्शालवाडी येथे प्रथमोपचार पेटी व दैनंदिन गरजेच्या औषधांची पेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. औषधांची भर वेळोवेळी त्या पेट्यांमध्ये टाकण्यात येते. वैद्यकीय मदतीसाठी संस्थेला लार्सन अॅण्ड टुब्रो (पवई) व बी.एस.इ.एस. हॉस्पिटल कडून (अंधेरी) मेडिकल व्हॅन व औषधे ह्यांची मदत मिळते.

 उंबर्गेवाडी येथे मे (2011)मध्ये तिथल्या शाळकरी मुलांसाठी शिबिर घेण्यात आले. पस्तीस मुलांनी शिबिरात भाग घेतला. चित्रकला, ओरिगामी, खेळ अशा विविध गोष्टींत मुले उत्साहाने सहभागी झाली. तरुण मुलांना संस्थेने व्हॉलीबॉल, नेट (जाळे) व पंप ह्या गोष्टी दिल्या तेव्हा ती खूप खूष झाली. डॉ विनायक गोखले, अर्कसवाडीतील फोटो. पेशंट तपासून औषधे देताना. दवाखाना.

‘जाणीव’ संस्थेने जून 2011मध्ये ठाण्याजवळच्या येऊर इथल्या पाटो पाड्यावर सुमारे एकशेवीस विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. ‘जाणीव’च्या कार्यकर्त्यांनी त्यांतल्या सहा कमजोर मुलांच्या पालकांना भेटून त्यांना उपचार समजावून सांगितले व काळजी घेण्यासाठीही बजावले. ह्याच प्रकारे वैद्यकीय तपासणी जुलैमध्ये पाटीलपाडा येथेही झाली. तेथील एकशेचाळीस मुलांपैकी चारजण विशेष लक्ष व उपचार द्यायला पाहिजेत असे आढळले. त्या कुटुंबांशी ‘जाणीव’चे कार्यकर्ते संपर्क ठेवून आहेत.

 फक्त गिर्यारोहण न करता जिथे आपण जातो तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या सुखदु:खांत सामील व्हावे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या राष्ट्रीय सणांत त्यांच्याबरोबर असावे- त्या दिवशी त्यांना प्रेमाने काही भेटी द्याव्यात अशा गोष्टी करणारे संस्थेचे वर्षानुवर्षे सभासद असलेले पंधरा-वीसजण आहेत. पण भालचंद्र शिंदे, राज नरसियन, सतीश वैवुडे, श्रीकृष्ण गोखले ह्यांचा सहभाग मोलाचा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हजरनीस हे कार्यक्रमांच्या आणि प्रकल्पांच्या मागे ठामपणे उभे असतात.

शाळा नंबर 65 ठाणे मनपा येउर इथे आणि पंडीत शाळा हाजी बचूअली हॉस्‍पीटल परळ, केईम समोर, डोळ्यांचे हॉस्‍पीटल. त्‍यांच्‍यातर्फे दर 2 वर्षी कॅम्‍प घेतला जातो. डोळ्यांची तपासणी, चष्‍मे दिले जातात. सर्जरी असेल तर आम्‍ही मदत उपलब्‍ध करून देतो. हॉस्‍पीटलकडून मोफत.सर्व कार्यकर्ते नोकरी करणारे किंवा व्यावसायिक असल्यामुळे स्वेच्छेने पदरमोड करतातच, पण विधायक कार्यासाठी समाजही उत्स्फूर्तपणे मदत करतो. संस्थेने दोन व्यावसायिक, लोकप्रिय कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यातून संस्थेसाठी आर्थिक मदत मिळाली. छोट्या-मोठ्या प्रमाणावर परिचित, स्नेहीही कामाला देणग्या, वस्तू देतात.

संपर्क भ्रमणध्वनी : खजिनदार, श्रीकृष्ण गोखले : 8879149417, संस्‍था स‍दस्‍य, भालचंद्र शिंदे : 9869078501

पत्ता : ए/1, फ्लॅटेड फॅक्टरी बिल्डिंग, तळमजला, एम,आय.डी.सी., एल.बी.एस.मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे – 400604 दूरध्वनी : (022)64168707, इमेल – janeevthane@gmail.com

इर्शालगडावर स्वातंत्र्यदिन

ज्योती शेट्ये

आम्ही सकाळी सव्वासहा वाजता ऐरोलीहून निघालो. साडेसात वाजता इर्शालगडाच्या पायथ्याशी पोचलोदेखील! ही 15 ऑगस्ट 2010ची गोष्ट. पूर्वी इथे यायला केवढा आटापिटा करावा लागे! शेवटची कर्जत गाडी पकडायची. ट्रेकची गाणी गात, गप्पा मारत कर्जतला पोचायचे. मग चालत चौकला जायचे. तिथे अंधार असेपर्यंत विश्रांती. मग धाब्यावर पोटपूजा करून गडाकडे कूच. आता बहुतेक सगळेच ‘वाहनधारक’ झालेले असल्यामुळे, घरापासून थेट पायथ्यापर्यंत गाडी! प्रगतीच म्हणायची ही.

आम्ही निघालो होतो इर्शालगडावरील स्वातंत्र्यदिन (2010) समारंभातील झेंडावंदन गाठायला.

चौकवरून आत आल्यावर प्रचंड जलाशय दिसला. हे होते मोरबे धरण, अलिकडेच काही वर्षांत बांधले गेलेले. त्याला बिलगून एक जुनी वाडी आणि इर्शालच्या पाय़थ्याशी वसलेले जुने गाव – नानिवली. त्याच्या जवळ धरणप्रकल्पग्रस्त विस्थापितांसाठी सरकारने वसवलेले नवे गाव आहे. मोठी, नीटनेटकी घरे. एका मोठ्या पाण्याच्या टाकीतल्या पाईपमधून गावाला पाणीपुरवठा होतो. हे सर्व मला नवीन होते. गाव अजून पूर्ण जागे झाले नव्हते.

स्वातंत्र्यदिन लगेच गड चढायला सुरुवात केली. वातावरण छान प्रसन्न होते. सुरेख पावसाळी हवा आणि हिरवीगार सृष्टी. खूप दिवसांनी असा योग आला होता. अर्ध्या वाटेवर थर्मासमधल्या चहाने आणि घरून आणलेल्या खाऊने क्षुधाशमन केले. गडाजवळ म्हणजे इर्शालवाडीजवळ आल्यावर मोबाईलने (ही आणखी प्रगती) वरच्या लोकांशी संपर्क साधला, तर कळले की बरोबर आठ वाजता झेंडावंदन झाले. सरकारी हुकूमावरून तिथल्या शिक्षकांनी ही वेळ पाळली. सगळे सरकारी कर्मचारी सदैव वेळेची अशी बंधने पाळतील तर किती छान होईल! मी मनातल्या मनात तिथूनच सलाम केला.

आम्ही पोचलो तेव्हा शाळेसमोर नुकतेच झेडांवदन झालेले, झेंडा छान हवेत लहरत होता. इर्शालगडाच्या पायथ्याची ही ‘छोटी वाडी’ गावात रूपांतरीत झाली आहे. शाळा म्हणजे बाहेर एक मोठी पडवी असलेला हॉल आहे. आतमध्ये सर्व मुले आणि त्यांचे पालक बसले होते. शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे व पटसंख्या चौदा. खालच्या गावातून रोज वर येणारे दोन शिक्षक आहेत, भाऊ पारधी हे गावचेच रहिवासी आहेत. ते इर्शालगडाचे दुर्गपालही नेमले गेले आहेत. दुसरे शिक्षक – स्वामी. हे मूळचे लातूर जिल्ह्याचे रहिवासी. शाळेची अवस्था ‘जाणीव’ ह्या संस्थेच्या मदतीमुळे चांगल्या रूपात आहे. त्यांनी खर्च करून शाळेचे रूप पालटले आहे. तेथे सरकारी नियमाप्रमाणे एक मोठी टाकी आणि स्वच्छतागृह बांधले गेले होते. टाकीचा काही उपयोग नाही, कारण त्याला नळच बसवलेले नाहीत! स्वच्छतागृह कोसळून गेले आहे. कितीही तक्रारी केल्या तरी कोणी दादच देत नाही असे गावकरी म्हणाले.

शाळेच्या मुलांना ताटे आणि पाणी पिण्याची भांडी भेट देण्यात आली. चॉकलेटे वाटण्यात आली. तीन मुलांचा खास सत्कार करण्यात आला. एक मुलगा बारावी पास झाला. त्याला रोख एक हजार रुपये देण्यात आले. दोन मुले दहावी पास झाली. त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. हे सर्व ‘जाणीव’तर्फे करण्यात आले. ‘तुम्ही पदवी मिळवा. आम्ही तुम्हाला अजून मदत करू’ असे ‘जाणीव’तर्फे उपस्थित असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले. मुलांच्या चेहे-यावर समाधान आणि कृतज्ञता होती. थोडा वेळ मुलामुलींचे खेळ घेण्यात आले आणि मग मुले आपापल्या घरी गेली.

मुलगा येउरच्‍या पाटोणी आदीवासी पाड्याचा मुलगा. जन्‍मतः फाटलेल्‍या ओठाचे शस्‍त्रक्रिया. दुभंगलेला. स्‍पीच थेरेपी देताना. शिल्‍पा वाळींबे. विकी फुफाणे, नंतर, आम्ही कपडे वाटण्यासाठी गावात फिरलो. प्रत्येक घरात जाऊन आम्ही कपडे दिले. ‘जाणीव’चे कार्यकर्ते गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीसकट ओळखत होते. सगळे कपडे चांगल्या अवस्थेतले होते. त्यांमध्ये मुद्दाम निव़डलेले साड्या-पोलकी, पंजाबी ड्रेस आणि मॅक्सी/गाऊन यांचा समावेश होता. दोन घरांत नवीन सुना आल्या होत्या. त्यांच्यासाठी नवीन कपडे, पाचशे रुपये आणि शिलाईखर्चाचे पैसे असा अहेर दिला गेला. फारच विचारपूर्वक केलेले हे आयोजन होते.

‘जाणीव’ ह्या संस्थेबद्दल खूपच सांगण्यासारखे आहे पण तूर्तास एवढेच सांगता येईल, की नवव्या गिरिसंमेलनात ज्या ‘दुर्गभरारी’ ह्या संस्थेची घोषणा करण्यात आली, तिच्या कार्याचा आरंभ इर्शालवाडीवर झाला. ही संस्था इथे गेली पंचवीस वर्षे काम करत आहे.

‘दुर्गभरारी’च्या योजनेचा भाग म्हणून 'जाणीव' ही संस्था इर्शालवाडी गडाची पालक व भाऊ पारधी हे दुर्गपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. दुर्गपाल दरवर्षी बदलण्यात येईल. दुर्गपालाकडे नोंदणी बुक व ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक देण्यात आले आहे. गडाला भेट देणा-या सर्वांची नोद ह्या बुकात होणार आहे. त्यांना दुर्गपालाकडून मार्गदर्शन, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था, नियोजित शुल्क आकारून होणार आहे. ‘जाणीव’तर्फे दरवर्षी १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला ध्वजवंदन होतेच, ते 2010 मध्ये ‘दुर्गभरारी’चा शुभारंभ म्हणून झाले.

उंबरणे वाडी येथे बाधेलला वनराइ बंधारा. संस्‍थेकडून गावक-यांच्‍या मदतीने  DSCN6331 पावसाळा असल्यामुळे आम्ही गडावर गेलो नाही. वर एक गुहा आहे. हा गड टेहळणी बुरूज म्हणून, आजुबाजूला संकेत देण्यासाठी शिवकाळात वापरत होते. आम्ही वाडीपासून निघून गडाला प्रदक्षिणा घालून परत वाडीपाशी शाळेत आलो. आम्ही छान पाऊसवाटेने फिरलो. हिरव्या साम्राज्यात फेरफटका झाला. एका झ-यावर पाणीही प्यायलो.

आम्ही खाली धरणाजवळ चार वाजता आलो. धरणावर खूप लोक गाड्या घेऊन फिरायला आलेले दिसले. माथेरानचे पर्यटक असावेत. (पुन्हा प्रगतीच!) तिथेच आम्हाला ‘पिरकडवाडी’ला पण ‘जाणीव’तर्फे ध्वजवंदन करण्याचा कार्यक्रम करणारे अन्य उत्साही कार्यकर्ते भेटले. त्यांना भेटून कारने आम्ही मुंबईकडे यायला निघालो.

ठाण्याला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी आम्ही घणसोलीला उतरलो. नवी मुंबईतल्या सर्व टोलेजंग, देखण्या इमारती नजरेत भरल्या. तिथली सर्व स्टेशनं पण भव्य, छान, स्वच्छ आहेत, पण ऐरोलीपासून ठाण्यापर्यंत पसरलेला कचरा, पक्क्या घरांच्या अपु-या मूलभूत सोयी असलेल्या घनदाट वस्त्या हेही ६३व्या स्वातंत्र्यदिनाचे वास्तव आहे, मन विषण्ण करणारे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे ही जाणीव करून देणारे!

ज्योती शेट्ये – भ्रमणध्वनी: 9820737301, इमेल :  jyotishalaka@gmail.com 

About Post Author

Previous articleकोजागरी पौर्णिमा
Next articleसेवालय – एका प्रार्थनेची गोष्ट
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.