गिरीश अभ्यंकर – मजेत राहणारा माणूस!

carasole1

गिरीश अभ्‍यंकरज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं आणि त्याच्या हजारोंनी प्रती बनवल्या अशी भानगड नाही. ज्याची त्याची (शारीरिक!) उंची, ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची सर्व सोय बघून ज्याचं त्याला सर्व करता येईल अशी रचना हवी.

तशी चूल त्यांनी तयार केलेली आहे. ती त्यांच्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये घडलेली आहे. ते म्‍हणतात, तशी चूल बघून माझ्याकडे येणारी माणसं विचारतात, की ती कुठे मिळते? कोण बनवून देतं? यावर मला उत्तर द्यावं लागतं, की ती चूल बनवण्याचा कारखाना नाही. उद्या जर मला आणखी एक चूल बनवावीशी वाटली तर ती माझी मलाच बनवता येणं अपेक्षित आहे. इंधन आणि जाळ यांचं तत्व समजलं, ज्याला त्याला उभं राहून काम करायचं आहे असं ठरलं, की मग पुढची गोष्ट ज्याची त्यानं करायची आहे.

अभ्‍यंकर पुढे सांगतात, की चूल हे काही एकमेव उदाहरण नाही. माझ्याकडे उभ्यानं दळण्याचं जातंदेखील आहे, खुंट्याऐवजी त्याला ड्रायव्हिंग व्हील बसवलेलं आहे. दोन्ही हातांनी जातं फिरवायचं. घरी लहान मुलं आली की त्यांचं पहिलं लक्ष त्या जात्याकडे जातं. ते चाक फिरवून बघण्याचा त्यांना कोण आनंद होतो! त्यातून पीठ पडताना बघून तर त्यांना जादूच वाटते. स्त्रिया आणि पुरुष, दोघांनाही जात्याचं ‘डिझाईन’ आकर्षून घेतं. जो तो करत असलेल्या गोष्टींना ज्याच्या त्याच्या लेखी प्रतिष्ठा पाहिजे, चाललंय कसंबसं-रडतखडत असं नाही. हा अभ्यंकरांचा दृष्टिकोन. ‘गोल्ड रश’ नावाच्या सिनेमात चार्ली चाप्लीनचा बूट शिजवून खाण्याचा प्रसंग आठवतो? तितकी वेळ ओढवलेली असतानासुद्धा बुटाचं जेवण चार्ली ज्या पद्धतीनं जेवतो ती ही गोष्ट आहे. सर्वसाधारण माणसावर तर अशी कोणतीही आणीबाणीची वेळ आलेली नाही आणि तरीही तो कसा राहतो, काय करतो याकडे फुरसतीनं पाहायची ज्याला त्याला संधीच नाही हे ठीक नाही.

स्त्रियांची म्हणून समजल्या गेलेल्या कामांकडे इतक्या गंभीरपणे पाहणारा, स्वतः ती कामं एखाद्या कुशल शास्त्रज्ञ-तंत्रज्ञाप्रमाणे करणारा तो पहिलाच माणूस मी बघितला. कपडे धुणं असो किंवा भांडी घासणं, त्या प्रत्येक कामाकडे दिलचस्पीनं बघून त्यातील तंत्र सुधारत अभ्यंकर ज्या पद्धतीनं त्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करतात त्याला तोड नाही.

मी अभ्यंकरांकडून वेगळी गोष्ट अशी शिकले, की ते सारं करत असताना तंत्रज्ञानाचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. कपडे धुण्याची गोष्ट असेल तर मुख्य सुरुवात कपड्यांपासून. जितके जास्त कपडे तेवढा त्यांना सांभाळण्याचा व्याप अधिक. पुढची गोष्ट, कपडे का धुवावे लागतात? याची जी उत्तरं असतात, त्याबरहुकूम धुण्याचं तंत्र असतं. घाम आला असेल तर कपडे मूळ पाण्यात भिजावे लागतात, पायापाशी चिखल लागून खराब झाले असतील तर ब्रश लावावा लागतो. चुबकणं ही प्रक्रिया घडावी लागते. सगळे उचलून मशिनमधे टाकणं हे म्हणजे कपडे धुणं नव्हे. कपडे धुवायचे तर पाणी लागतं, ते कुठून आणायचं? ज्याचं त्यानं आणायचं ठरवलं तर ते कसं करता येईल? पावसाचं पाणी कसं आणि किती साठवता येईल? त्या साठलेल्या पाण्यात कपडे कसे चांगले धुता येतील? बंद बाथरूममधे पाठ दुखेल असं बसून कपडे धुवायचे नसतील तर? कपडे धुतलेलं पाणी परत वापरायचं असेल तर? या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्याला त्याला मानवेल त्या, कपडे धुण्याच्या तंत्राप्रत घेऊन जातात. बाजारातील उपलब्ध गोष्टींतूनच माझं धुण्याचं ‘मशीन’ घडतं. त्यात छोटं स्टूल आहे, टब आहे, पाणी वाहून नेणारा पाइप आहे. पण त्याला वीज लागत नाही. कपडे धुण्याचा असा वस्तुपाठ मी कुठेच बघितला नव्हता आणि त्या सर्वांवर कडी म्हणजे, ज्याचे त्याचे कपडे ज्यानं त्यानं धुतले पाहिजेत ही अट. एकट्या बाईवर किंवा बुवावर त्याचा बोजा पडता कामा नये. ज्याचं त्याला काम करायचं असलं म्हणजे ते केव्हा, कसं करावं हेसुद्धा जो तो ठरवणार. मध्येच कंटाळा आला तर थांबण्याची सोय असणं अनिवार्य! गिरीश अभ्यंकरांच्या कपडे धुण्याच्या मशीनचं नाव आहे  ‘गिरीश वॉशिंग मशीन’. त्यांनी बनवलं आहे म्हणून दिलं असेल तसं नाव, असं मला वाटलं. मग मला कळलं, की ते नाव देण्यामागचं कारण असं, की ते यंत्र गिरीशनं, गिरीशसाठी बनवलेलं आहे, म्हणून त्या यंत्राचं नाव तसं आहे. अन्य कुणी ते वापरून बघा, आवडल्याची पावती द्या ही भानगड नाही. मोठा अजब मामला!

अभ्यंकर एक दिवस मला म्हणाले, ‘माणूस हा प्राणी आहे हे तर मान्य आहे?’

हे न मान्य असण्याचं काय कारण होतं?

माणसाचं अन्न वनस्पतींपासून येतं. माणूस माणसाचं अन्न बनवत नाही. तसं करायचं ठरवल्यास माणसाला वनस्पती व्हावं लागेल! आणि मग हा संवाद निरुपयोगी ठरेल. माणूस इतर प्राण्यांप्रमाणे वनस्पतींपासून अन्न घेतो. तो अन्न खाऊन जो कचरा निर्माण करतो त्याचा निचरा सूक्ष्म जीव करतात. माणसासाठीच्या या दोन्ही महत्त्वाच्या सेवा जर दुसरे पुरवत असतील तर मग माणसानं काय केलं पाहिजे?

हा प्रश्न जरा अनपेक्षित होता. काय केलं पाहिजे?

‘मजा’!

हे त्यांचं उत्तर ऐकून मी चक्रावलेच. त्यांचा तर्क बरोबर होता. फक्त इतक्या सुखावह उत्तराची मी कल्पनाच केलेली नव्हती.

कष्ट, खूप कष्ट, अपरिमित कष्ट यांची भलावण माणूस लहानपणापासून ऐकत आलेला असतो. अभ्यंकर सांगत होते, की मजा असली पाहिजे. पण ती कशी मजा? जी वनस्पतींना त्यांचं काम करू देईल आणि सूक्ष्म जीवांना त्यांचं काम. त्यांना आपलं काम करता आलं नाही तर माणसाला मजा कशी येईल? माणसाला दीर्घकाळ मजा करायची असेल तर त्याला ती चौकट समजावून घेता आली पाहिजे.

एक टोक वृक्षांनी धरिले
दुसरे सूक्ष्म जीवांहाती
हलके टाका पाऊल आपुले
जीवास ठेवा विश्रांती!
(काव्य – श्यामला वनारसे)

हे ‘उद्दिष्ट’ मानवण्यासारखं होतं. ‘असेल माझा हरी’ अशी ती भूमिका नाही. जगण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. तंत्रज्ञान वापरण्यासाठी सुद्धा कष्ट असतात. फक्त त्यातून मिळणारे फायदे अधिक आहेत असं वाटलं तरच माणूस ते कष्ट सोसतो. जो तो वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची तो नेमकी काय किंमत देतो हे कळलंच नाही तर? उदाहरणार्थ, कोळसा खाण कशी चालते, तिच्यात काम करणाऱ्या मजुरांवर काय बेततं, पुढे वीज कशी बनते, तिथपासून ती माणसांपर्यंत कशी पोचते हे सगळं जर बघितलं तर सुधारणा कितीही अद्ययावत असतील तरी तो माणूस काही कोळसाखाणीत काम करणाऱ्या मजुराची जागा घेऊ शकणार नाही, हे त्याला जाणवल्यावाचून राहत नाही.

मग काय करायचं? विजेशिवाय राहायचं? कोळशाला पर्याय शोधायचे?

आधी हे तर बघू की वीज नेमकी लागते कशासाठी? एक म्हणजे उष्णतेसाठी. त्यात शिजवणं, गरम करणं अशा गोष्टी होतात. दुसरं म्हणजे प्रकाशासाठी आणि तिसरं म्हणजे डेटा प्रोसेसिंगसाठी; म्हणजे कंप्युटर, फोन इत्यादींमध्ये सध्या जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्यासाठी.

पहिल्या दोन गोष्टींसाठी वीज अनिवार्य नाही. तिसऱ्या गोष्टीसाठी ती अनिवार्य आहे. पहिल्या दोन गोष्टी निश्चितपणे जीवनावश्यक आहेत. त्यांची गरज विजेखेरीज अन्य थेट पर्यायांतून भागवली गेली तर?

माणसासमोरच्या प्रश्नाचा असा संगतवार विचार केला, की काही अवघड नाही असं वाटू लागतं. तंत्रज्ञान कशासाठी वापरायचं? याचंही अभ्यंकरांचं असंच काटेकोर उत्तर. माणसाला तंत्रज्ञानाकडून सुरक्षितता, आराम आणि रंजन या तीन गोष्टींची अपेक्षा असते. तंत्रज्ञान त्या अपेक्षा पूर्ण करणार नसेल तर काहीही करून ते वापरत राहण्याऐवजी त्याला पर्याय शोधला पाहिजे. ‘वाहवत’ जाता कामा नये. एवढया साध्या, सोप्या आणि तरीही कृतीच्या पातळीवर कितीतरी गोष्टी सुचवणारी ही मांडणी. एकदा हे ठरवल्यावर त्याला त्या परिसरासोबत कसं राहायचं आहे याचीही रीत ठरत जाते. माणूस किती वस्तू, सेवा वापरणार, निसर्गातून थेट मिळणाऱ्या गोष्टी किती वापरणार आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या किती वापरणार हा निर्णय हरघडी होऊ लागतो.

माणूस बाह्य उर्जा वापरतो. सुरुवात परिसरातील काडीकचरा जाळून ऊब आणि उष्णता वापरण्यापासून झाली. तो दोन लाख वर्षांचा इतिहास आहे. त्या प्रदीर्घ काळ वापरलेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम माणसावर असा झाला, की माणसाला त्याविना राहणं शक्य नाही. त्याला ‘अंगीभूत तंत्रज्ञान’ असं म्हणता येतं, कारण त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर झाले. त्याच्या अंगावर इतर प्राण्यांसारखे केस नाहीत, त्यानं शिजवलेलं अन्न खायला सरावलो आहोत इत्यादी.

बाह्य इंधन माणसाला पुढेही नक्की लागणार. तीच बाह्य उर्जा माणूस वस्तू/अवजार बनवण्यासाठी वापरू लागला. केवळ शरीराला ऊब हवी, शिजवलेलं अन्न हवं म्हणून जेवढं इंधन लागत होतं त्यापेक्षा पुष्कळ जास्त प्रमाणात इंधन लागू लागलं. माणसानं धातू वापरण्यास सुरुवात केली. त्यात फार मोठा टप्पा तेव्हा आला जेव्हा उष्णतेचं रूपांतर यांत्रिक उर्जेत होऊ लागलं. तो औद्योगिक युगाचा टप्पा. तिथं तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या प्रश्नांचं प्रमाण एवढं झालं, की त्यातून मिळतं काय आणि त्याची किंमत किती या दोन्हींचा अदमास घेणंही अवघड झालं. आपल्याला तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी ऊर्जावापराच्या पहिल्या टप्प्यात जेवढा अवधी मिळाला तेवढा तिसऱ्या टप्प्यात मिळाला नाही. आज नाही तर उद्या मिळेल असं मानायलाही जागा नाही, कारण ऊर्जेचे स्रोत अत्यंत मर्यादित आहेत. परिस्थिती अशी आहे, की त्यांना वापरण्यासाठी जी ऊर्जा खर्च करावी लागते तीच खूप जास्त आहे. त्या परिस्थितीत ऊर्जेचा वापर चालू ठेवण्याची किंमत द्यावी लागते ती आपल्या वाढलेल्या कष्टांच्या आणि हानीच्या स्वरूपात.

तेव्हा माणसासाठी फायद्याचं हे आहे, की माणसानं ऊर्जावापराच्या उल्लेखित पहिल्या आणि दुसऱ्या प्रकाराकडे अधिक गांभीर्यानं बघावं. माणसाला तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवायची नाही (ठरवून ते होणारही नाही) आणि तंत्रज्ञानाला डोक्यावरही बसवायचं नाही. माणसाला मजेत राहायचं आहे. अन्नावाटे मिळालेली ऊर्जासुद्धा खर्च करायची आहे, मग ती जगण्यासाठी वापरली तर?

तंत्रज्ञान की विकास. पर्यावरण की सुधारणा अशा वादात माणूस विभागला जात असताना त्या प्रकारची मांडणी मला माणूस आणि त्याचा परिसर यांच्याकडे बघण्याची वेगळीच दृष्टी देते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याआधी स्वतःला मदत करायला उद्युक्त करते.

अभ्यंकरांनी त्यांची मांडणी ‘राँग थिअरी’ या त्यांच्या इंग्रजी पुस्तकात संग्रहित केलेली आहे. (हे पुस्तक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. जिज्ञासू वाचकांसाठी ते उपलब्ध करून देण्याची सोय ठेवली आहे!) सांगण्याची गोष्ट अशी, की विचार आणि कृती यांच्यातील अंतर मिटवण्याचं काम माझ्यासाठी त्या मांडणीनं केलं. केवळ भौतिकशास्त्राशी संबंधित अशी ज्यांची ओळख असते त्या ऊर्जेच्या नियमांचा रोजच्या जगण्याशी काय संबंध आहे हे मला त्यातून कळलं आणि सर्वांत मोठी गोष्ट अशी, की त्यासाठी माणसाला भौतिकशास्त्रातील पदवी लागते असं नव्हे हेही कळलं.

(साप्ताहिक सकाळ, १६ नोव्हेंबर २०१३ वरून)

‘रॉग थिअरी’ पुस्‍तकाबद्दल वाचा…

गिरीश अभ्‍यंकर,
९८६०५४७४७१
girish.abhyankar@gmail.com

मृणालिनी वनारसे,
आवर्तन ५ हिल व्‍ह्यू सोसायटी,
४६/४ एरंडवणे, पौड रोड,
पुणे – ४११०३८
९८२२०००८६२
ioraespune@gmail.com

 Last Updated On – 8 June 2016

About Post Author

4 COMMENTS

  1. I hv discussed with Mr Girish
    I hv discussed with Mr Girish Abhyankar on phone. I wanted to meet him todiscuss with him about his actvities . But he advised me to first go through his Book Wrong Theory n then hw would like to discuss with me. I purchased the book n will meet him during my next vidit to pune

Comments are closed.