गाविलगड – स्थलानुरूप जल नियोजनाचा वारसा (Gavilgad – Bahamani fort is known for its water management)

1
93

     गाविलगड किल्ला हे विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. तो सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर येतो. मेळघाटातील डोंगरद-यांमध्‍ये विखुरलेली किल्‍ल्‍याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्‍क होऊन जाते. गाविलगड किल्ल्यास एक हजार वर्षांचा इतिहास आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, निजामशाही, मोगल व मराठे अशा विविध राजवटी तेथे होऊन गेल्या. अखेरीस गाविलगड उद्ध्वस्त झाला तो इंग्रजांनी भूमिगत क्रांतिकारकांच्या भीतीने त्याची नासधूस केली तेव्हा.

गाविलगडाची ऐतिहासिक महती अशी, की तो जिंकल्याशिवाय व-हाड किंवा इलिचपूर जिंकता येत नव्हते. तो सारा प्रदेश डोंगरी-गवळी किंवा अहिर-गवळी या वन्यजातींचा म्हणून ओळखला जात असे. या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता असेही सांगतात. वास्तवात तो किल्ला गवळी राजाने (यादव) बाराव्या शतकात बांधला असा लेखी उल्लेख सापडतो. तो मू मातीचा होता. त्यावरून त्याला गाविलगडहे नाव पडले. मात्र आज अस्तित्वात हे तो दगडाचा किल्ला. इमादशाही बहामनी घराण्यातील नववा राजा अहमदशाह वली याने 1425 मध्ये गाविलगड ताब्यात घेतला. त्यानेच त्याचे बांधकाम सुरू केले. बहामनीशाहीचे विभाजन झाल्यानंतर इमादशाहीचा मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने 1488 मध्ये त्याची दुरुस्ती केली. दुसरी नोंद अशी सांगितली जाते की बहामनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. तो 1185 पासून 1302 पर्यंत देवगिरीच्या यादववंशीय राजांच्या ताब्यात होता. तशा खुणा तेथील वास्तुशिल्पांवर दिसून येतात. मात्र शासकीय गॅझेटिअर्समध्ये अकोला आणि अमरावती जिल्ह्यांच्या इतिहासात यादवकालीन गाविलगडाचा उल्लेख दिसून येत नाही. तसेच, गाविलगडाचा 1185 च्या पूर्वीचा व 1302 ते 1425 पर्यंतचा सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास उपलब्ध नाही. मोगलकालीन इतिहासात अकबरासोबतच शहाजहानपासून औरंगजेबापर्यंत गाविलगड मोगलांच्या ताब्यात असल्याचे उल्लेख आहेत. दौलताबादच्या किल्‍ल्‍याची निर्मिती होत असताना, गाविलगड औरंगजेबाच्या ताब्यातील प्रमुख किल्ला असल्याचे सांगण्यात येते. या सगळ्यातील ऐतिहासिक तथ्य तथ्यता तपासून पाहणे गरजेचे आहे. या किल्यावर 1803मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. त्यावेळी किल्ला भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीसिंहाने मोठा पराक्रम केला. त्याच्या त्या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी त्यांच्या नोंदवहीत करून ठेवली आहे.

गाविलगडाचा परिघ सुमारे बारा ते तेरा किलोमीटरचा आहे. त्याची भव्यता नजरेला जाणवते. समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर असलेल्या गाविलगडाभोवती घनदाट जंगल आहे. गडाच्या तिन्ही बाजूंना उंच, अभेद्य आणि सुस्थितीतील कडे आहेत. गाविलगडाच्या शार्दुल दरवाज्यांचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करणारे आहेत. दरवाज्यावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय आहे. फतेउल्ला इमादउल-मुलक हा 1471 पासून गडाचा सुभेदार होता. त्याने गडावरील प्रसिद्ध शार्दूल दरवाज्यावर विजयनगरच्या हिंदू राज्याचे विजयचिन्हगंड-भेरुंडकोरले. ती या किल्ल्यावरील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती मानली जाते. गंड-भेरुंड पक्षी हे विजयनगर साम्राज्याचे चिन्ह होते. खजुराचे झाड आणि शार्दुल, ही मुसलमान राज्यकर्त्यांची चिन्हे आहेत. या दोन्हीवरून गडाच्या संमिश्र इतिहासाची कल्पना येते. गंड-भेरुंड हा पक्षी वास्तवात नाही. तो काल्पनिक आहे. तो दोन डोकी असलेला गरुडासारखा सामर्थ्यवान पक्षी आहे. त्याच्या पायांमध्ये आणि चोचीत हत्ती पकडलेले दाखवले आहेत. ते सामर्थ्याचे प्रतीकच होय.

किल्ल्याला पाच दरवाजे आहेत. चिखलद-याच्या पठाराकडे असलेला दिल्ली दरवाजा, त्यामागचा बुरुजबंद दरवाजा, अचलपूरच्या दिशेने असलेला, त्या काळी मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा अचलपूर किंवा पीरफत्ते दरवाजा आणि नरनाळ्याकडे जाणारा वस्तापूर दरवाजा हे किल्ल्यावरील मुख्य दरवाजे होत. किल्‍ल्याच्‍या लांबरुंद पायऱ्या संपल्या, की दरवाज्यामधून किल्ल्यात प्रवेश करता येतो. दरवाज्याच्या आतील बाजूस असलेली पहारेकऱ्यांची उभे राहण्याची जागा व घुमट पाहून पुढे गेले की पुन्हा एक दरवाजा लागतो. तो दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. तो ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य दिल्ली दरवाजा आहे. तो त्या मार्गावरील पाचवा दरवाजा. दिल्ली दरवाज्याच्या जवळच खाम तलावआहे. दिल्ली दरवाजाहा शार्दुल दरवाज्याला काटकोनात बांधलेला आहे. त्या  भव्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाज्याला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर आढळत नाही. गाविलगडाच्या भव्य वास्तूचे स्वरूप आणि ती उभी करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम कलाकारांनी व कारागिरांनी विविध कालखंडांत घेतलेले कष्ट किल्ला पाहताना जाणवतात. मात्र त्याचे उल्लेख इतिहासात आढळत नाहीत. मोझरी गावाच्या बाजूला एक चोर दरवाजा लागतो. तो बहराम बुरुजाकडे जातो. त्या बुरुजावर बारा खिडक्या आहेत, म्हणून त्याला बारा खिडकी बुरुज असे म्हटले जाते. या बुरूजाचे आणि किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम अहमदनगरच्या नवाबाचा अधिकारी बहराम याने 1577 मध्ये केल्याचा उल्लेख असलेला कोरीव दगड तेथे आहे.

गाविलगडाचे बुरुज, प्रचंड दगडी दरवाजे, नागमंदिर, राणीमहाल, त्या महालावरील राणीची देवळी’ (झरोका), हत्तीखाना, राजाची समाधी, देवीमंदिर, मोठी मशीद आणि इतर अनेक छोट्यामोठ्या वास्तू किल्ल्यावर आहेत. गाविलगडाचा जुळा भाऊ नरनाळा किल्ला वगळता महाराष्ट्रात एवढे मोठे इतिहासकालीन अवशेष क्वचितच एखाद्या किल्ल्यावर आढळतील. पैकी राणीची देवळी ही वास्तू राजपूत सुभेदारीण येथे राहून गेल्याचे द्योतक आहे असे मानले जाते. मात्र त्याबाबतचा इतिहास उपलब्ध नाही.

 

गडावर दोन मोठे तर पाच-सहा लहान तलाव आहेत. चिखलदरा गावातून पक्का रस्ता मछली तलावाच्या बाजूने गाविलगडाच्या मछली दरवाज्यापर्यंत जातो. तो भाग म्हणजे मुख्य किल्ल्याचा परकोट आहे. दक्षिणाभिमुख मछली दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंनी उंच तटबंदी असलेली वाट दुसर्‍या दरवाज्यापाशी पोचते. तो दरवाजा पहिल्या दरवाज्याला काटकोनात बांधलेला आहे. संपूर्ण परकोटाला संरक्षणाच्या दृष्टीने दुहेरी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. त्या भागावर पडणारे पावसाचे पाणी तेथेच थांबवून, अडवून आणि जिरवून ते वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या/तयार केलेल्या तलावांकडे वळवले आहे. विरभान प्रवेशद्वारापाशी येऊन डाव्या बाजूला गेल्यावर तेलीया बुरुजदिसतो. त्या बुरुजापासून तटबंदीच्या कडेकडेने चालत जाताना खाली दरीत दर्या तलावहा बांधीव लाशय दिसतो.

 

राणी महालाच्या दक्षिणेकडे धान्य कोठाराची दोन दालने असलेली इमारत आहे. त्याइमारतीच्या पुढे बरसाती तलाव धामाजी तलावआहेत. पश्चिम तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर किचक दरवाजाआहे. महाभारतकालीन दंतकथा अशी, की भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा येथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले म्हणून ती कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा शब्द कीचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. किचक दरवाज्याजवळ सती तलाव आहे. सती तलावाच्या बाजूला धोबी तलाव व लेंडी तलाव आहे, तर समोर देव तलाव आहे. सती तलावाच्या मागील बाजूस समाधी व वीरगळ आहेत. देव तलावाच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. मोठ्या मशि‍दीच्या जवळ इतिहासकाळी वापरले जाणारे पाणी शुद्धिकरण यंत्रही आहे.

 

किल्ल्यावर जलसंधारण करताना ते स्थलानुरूप योजले आहे. गडाच्या मधल्या भागात, जेथे रुंदी जास्त आहे आणि उतार थोडा आहे, तेथे असलेले पाच लहानमोठे तलाव एकाखाली एक असे आहेत. एक तलाव भरून वाहू लागला, की ते पाणी दुसऱ्या तलावाकडे जाते अशी सोपी योजना केली आहे. इतर ठिकाणी, जेथे उताराचे टप्पे आहेत अशा परिघाच्या जवळच्या भागांमध्येही लहानमोठे चार-पाच तलाव योग्य जागा निवडून केलेले दिसतात. गवळ्यांच्या प्रदेशातील किल्ला म्हणजे भरपूर पाण्याची आवश्यकता हे लक्षात घेतले तर कळेल, की त्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यात उपलब्ध पावसाच्या पाण्याचा उपयोग करून पुरेसा पाणीसाठा बांधण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यांनी शुद्धिकरण योजनाही राबवली होती. हा विशेष होय.

 

मला या किल्ल्याबद्दल पहिल्यांदा वाचण्यास मिळाले ते कर्नल मेडोज टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुस्तकात. त्या अधिकाऱ्याने याच किल्ल्यावर अटकेत असलेल्या एका ठगाच्या जबानीवरून ठगांचा उगम, त्यांची कार्यशैली आणि विचार करण्याची पद्धत, त्यांचा आढळ असण्याची ठिकाणे, त्यांचा बंदोबस्त कसा केला याबद्दलची माहिती संकलित केली. ती ‘ठगाची जबानी’ नावाच्या पुस्तकात येते. गाविलगडाची ख्याती होती ती त्यावरील अचूक मा-याच्या तोफांसाठी! मी 2007 मध्ये जेव्हा त्या किल्ल्यावर पहिल्यांदा गेलो, तेव्हा नऊ-दहा तोफा होत्या. त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. तरीही गडावर सुस्थितीत असलेल्या कालभैरव व बिजली या, त्यांच्या कड्यांसह घडवलेल्या अखंड तोफा पाहता येतात. त्यांपैकी एक एकोणीस फूट लांब, तर दुसरी सोळा फूट लांब आहे. एक तोफ पीर-फतेह दरवाज्यावर असून दुसरी चिखलद-याकडे आहे. काही तोफा अष्टधातूंच्या होत्या. अष्टधातूंच्या तोफेचे तीन क्विंटल वजनाचे अवशेष वन विभागाने जपून ठेवले आहेत. ऐने अकबरीतील उल्लेख आणि इतिहासकार अबुल फाजल याने केलेल्या वर्णनानुसार गाविलगडावर तोफा ढाळण्याचे आणि पोलादी शस्त्रांचे काम उत्कृष्ट दर्ज्याचे असे. कालभैरव तोफ पाहून पुढे राणी झरोक्याकडे जाताना हनुमानाची मूर्तीही दिसते. तोफांवर घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर आढळतो.

            किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. या किल्ल्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे. गाविलगड किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उमेश मुंडल्ये 9967054460 drumundlye@gmail.com

 

उमेश मुंडल्ये हे देवरायांचे संशोधक आहेत. त्यांना त्याच विषयात पीएच डी मिळाली आहे. त्यांनी तीन हजार सातशेअडुसष्ट देवरायांची नोंद केली आणि एक हजार अडुसष्ट वनस्पतींची ओळख पटवली. ते डोंबिवलीच्या पेंढारकर महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते पश्चिम घाटातील देवरायांचे लोकसहभागातून संरक्षण आणि संवर्धन यासाठी बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांच्या दोनशे गावांत जलसंधारण प्रकल्प लोकसहभागातून पूर्ण केले आहेत. ते पाणी आणि पर्यावरण या विषयांवर नियतकालिकांत नियमित लेखन करतात.

———————————————————————————————-———————————————————

About Post Author

Previous articleभीमसेन जोशी – शेरच तो ! (Remembering Bhimsen Joshi on his birth centenary)
Next articleकोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)
उमेश मुंडल्ये हे देवरायांचे संशोधक आहेत. त्यांना त्याच विषयात पीएच डी मिळाली आहे. त्यांनी तीन हजार सातशेअडुसष्ट देवरायांची नोंद केली आणि एक हजार अडुसष्ट वनस्पतींची ओळख पटवली. ते डोंबिवलीच्या पेंढारकर महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते पश्चिम घाटातील देवरायांचे लोकसहभागातून संरक्षण आणि संवर्धन यासाठी बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांच्या दोनशे गावांत जलसंधारण प्रकल्प लोकसहभागातून पूर्ण केले आहेत. ते पाणी आणि पर्यावरण या विषयांवर नियतकालिकांत नियमित लेखन करतात.9967054460

1 COMMENT

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here