गायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता

0
107

माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ? परंतु आधुनिक काळात भावना नष्ट होत आहेत …

धुळे जिल्हा-तालुक्यातील चौगाव म्हशींसाठी प्रसिद्ध होते आणि आहे. म्हशीला पारडी झाली तर तिला जतन करतात; पण लोकांचा कल हेला झाला तर त्याला मरू देण्याकडे असतो. म्हैस स्वत:चे पिलू पाहिल्याशिवाय पान्हवत नसे व दूध देत नसे. रेडकू मेले तर तशा वेळी चांभाराकडून त्याच्या कातड्यात भुसा भरून ते म्हशीच्या जवळ उभे करत. म्हैस या प्राण्याला अक्कल मुळातच कमी असावी. दुभती म्हैस पेंढा भरलेले रेडकू पाहूनही पान्हवत असे ! ते दृश्य हृदयस्पर्शी वाटे. आता, दुभत्या जनावरांना पान्हवण्यासाठी दूध काढण्याआधी त्यांना इंजेक्शन दिले जाते. आधुनिक काळात भावना अशा नष्ट होत आहेत.

माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ! पण आपण माणसे त्यांच्या बाळांना त्यांच्या मायच्या दुधापासून वंचित करतो. त्यांच्या दुधाचा व्यापार करून व्यापारी माणूस त्याचे खिसे भरतो. खरे तर, सर्व प्राणिमात्रांचा हक्क निसर्गावर समान आहे. तसे मानले तर सर्व प्राणिमात्रांत मनुष्य प्राणी हा सर्वात जास्त स्वार्थी ठरतो. मी असे ऐकले आहे, की काही शाकाहारी पंथातील लोकांना दूध व दुग्धजन्य पदार्थही वर्ज्य असतात. ते किती मानवी संवेदनेला, सच्चेपणाला धरून आहे !

माझे भिवतास धबधबा पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात जाणे झाले होते. तिकडे मला बैलांपेक्षा हेले जास्त दिसले. मी त्याचे कारण एका वृद्ध माणसाला विचारले. त्याने सांगितले, “हेले शेती करण्यास बैलांसारखेच उपयोगी पडतात. बैल म्हातारे झाल्यावर उपयोगाचे नसतात. कसाईही त्यांना चांगल्या किंमतीत घेत नाहीत. पण हेले म्हातारे झाल्यावरही कसाई चांगल्या किंमतीला विकत घेतात.” आयुष्यभर हेल्यांकडून एवढी मशागतीची कामे करून घेतली त्याच्या प्रती कृतघ्नपणाची ही भावना ऐकून मी अवाक झालो. अशा वेळी माणसाच्या तोंडातील प्रेम, दया, माया हे शब्द केवळ शब्दकोशातील खोगीरभरती वाटू लागतात. माणसाचे प्रेम कोणाची उपयुक्तता किती आहे याच्यावर ठरते का? बैलांचीही अवस्था पुढे हेल्यांसारखीच होईल असे वाटू लागले आहे. एका डेअरीला भेट दिली होती. शंभर-दोनशे गायी असणाऱ्या त्या डेअरीत गाय व्याल्यानंतर जर तिला गोऱ्हा झाला तर त्याची कशी विल्हेवाट लावली जाते हे ऐकून माझे काळीज चर्रर्र झाले होते. शेती यांत्रिक पद्धतीने होऊ लागली. बैल, हेला यांची उपयुक्तता कमी होऊ लागली. इतर देशांत त्यांचा उपयोग मांसासाठी केला जातो. भारतात त्यांचे मांस निषिद्ध मानतात. एका बाजूला गायीमध्ये तेहतीस कोटी देव; पण त्याच वेळी तिच्या लेकराला वाईट वागणूक ! ‘गाय ही देवता नसून एक उपयुक्त पशू आहे’ असे सावरकर यांनी लिहून ठेवले आहे. भारतीय लोकांचे आचार आणि विचार यांमध्ये मोठी विसंगती आढळते. ‘हे विश्वची माझे घर’ ही म्हणे भारताची उच्च विचारसरणी आहे, पण त्याच वेळी भारतीयांचे वागणे/वर्तन अतिशय संकुचित आहे.

गोविंद मोरे 9588431912 gm24507@gmail.com

——————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here