गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा

0
361

हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते …

हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर परतवाडा अंजनगाव रोडच्या उत्तर दिशेला चार किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाजवळून आदर्श गाव देवगावसाठी दर्याबादमार्गे रस्ता जातो. पुढे हा रस्ता देवगाव मार्गे धामणगाव गढीजवळून थंड हवेचे ठिकाण चिखलदरा गावास जोडलेला आहे.

तेथील हवामान उष्ण व कोरडे आहे. गावाच्या पूर्वेला सुपीक अशी शेती आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. त्या सोबत मिरची, कांदा, गहू, तूर व काही प्रमाणात कापूस अशी पिके घेतली जातात. तेथील लोक कार्यमग्न व आनंदी आहेत. हवामान चांगले असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यही उत्तम असते.

गावात अंगणवाडी केंद्र आहे. त्याला लागूनच जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. शाळेचे माध्यम सेमी इंग्रजी आहे. शाळेत 2021-22 या शैक्षणिक सत्रात चौऱ्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावाच्या दक्षिणेला माध्यमिक विद्यालय आहे. तेथे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण जवळच असल्यामुळे गावातील बरेच विद्यार्थी शिकण्यास तेथे जातात.

गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. गावातील कुटुंबांची संख्या साडेतीनशेहून अधिक आहे. गावात स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायत कार्यालय आहे. ती इमारत आकर्षक आहे. ग्रामपंचायतीला चांगला सुसज्ज हॉल असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामसभा पार पडतात. ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य लक्षपूर्वक कामकाज सांभाळतात. त्यामुळे गावात रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण सुविधा योग्य प्रकारे कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा एकाच कॅम्पसमध्ये असून सामूहिक संरक्षण भिंत आहे. त्यामुळे शाळेला चांगले मैदान मिळाले आहे. प्रत्येक घरासमोर वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केल्यामुळे गावाची शोभा वृद्धिंगत झाली आहे.

गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे सर्पदंशावर उपचार करण्यासाठी बरेच पीडित तेथे येत. कोविडकाळात तेथील भजन, पूजन व नैवद्य असे कार्यक्रम बंद होते. त्यावेळी गावात एकदम दोनशे ते अडीचशे साप (नाग) आल्याचे गावातील लोकांकडून कळले. त्या नागांनी कोणालाही इजा न करता गावातून निर्गमन केल्याचे नागरिकांनी सांगितले.

अंजनगाव रोड ते हनवतखेडा मार्गावर जानामात देवस्थान आहे. त्या ठिकाणी एक विहीर असून त्या विहिरीतून गुप्त मार्ग (भूसुरुंग) असल्याचे सांगण्यात येते. तो सुरुंग इंग्रजांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. तो गुप्त मार्ग सरळ चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ल्यावर निघत असल्याचे लोक सांगतात. त्याचप्रमाणे उलट मार्गे तो सुरुंग अचलपूरलासुद्धा जोडला असल्याचे सांगण्यात येते. परंतु नागरिक अशा गोष्टी पूर्ण विश्वासाने ऐकत आले आहेत. त्या आख्यायिका आहेत – सत्यता नाहीत असे कोणी ठामपणे सांगतही नाही.

हनवतखेड्यातून चार किलोमीटर अंतरावर असणारा चंद्रभागा प्रकल्प सुद्धा पर्यटकांना खुणावतो, तो चिखलदऱ्याच्या सातपुड्यातून उगम पावलेल्या चंद्रभागा नदीवर निर्माण केलेला आहे. लोक त्या ठिकाणी ताजी मच्छी घेण्यासाठी जातात. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर लक्ष वेधतो.

सोबतच नदीपलीकडे दत्ताचे मंदिर असून त्या ठिकाणी पुरातन कुंड आहे. पूर्वी त्या कुंडात म्हणे पाण्याचा सतत झरा असे. त्याला लागूनच सातपुडा असल्यामुळे तेथील वाघ त्या ठिकाणी येऊन डरकाळ्या देत अशी माहिती नागरिकांनी दिली. मात्र मेळघाट टायगर प्रोजेक्टमध्ये वाघांची संख्या रोडावली असल्याची नोंद आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत सेमाडोहसारख्या ठिकाणी पाणवठ्यावर वाघांचे दर्शन घडते. जवळील जलालपूर या गावाला लागून दत्तझिरी मंदिर आहे. तेथे यात्रेचे आयोजन मोठया थाटामाटात केले जाते. दत्त जयंतीला दूरदूरचे लोक दर्शनासाठी येतात. गावाला लागूनच दर्याबाद हे गाव आहे. तेथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी ईद व इतर मुस्लिम धर्मीय सण उत्साहात साजरे केले जातात.

गावात गाईगोधनाचा कार्यक्रम साजरा केला जातो; तोही अनोख्या पद्धतीने. उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. गायीचे महात्म्य गावाने समजून घेतले व जपले आहे. तेथील शेतकरी सधन आहेत. तेथे शेतकऱ्यांचा मित्र बैलसुद्धा तितकाच पूजनीय आहे. त्याची प्रचीती गावात पोळा सणाला येते. पोळा हा सण गुरुदेव सेवा मंडळातर्फे मोठ्या थाटात साजरा केला जातो. बैलांची सुंदर सजावट करणाऱ्या शेतकऱ्याला मंडळाकडून बक्षीस दिले जाते.

गावातील लोक मोठ्या उत्साहाने सर्व उत्सवांत सहभागी होतात. मग तो राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन असो किंवा इतर धार्मिक उत्सव असोत. गावात भजनी मंडळ आहे. रात्री भजनी मंडळाचे कार्यक्रम, प्रवचन व सप्ताह यांचे आयोजन उत्साहाने केले जाते. त्याचप्रमाणे गावात बौद्धधर्मीय लोक मोठ्या प्रमाणावर असून बौद्ध धर्माचे वाचन व इतर धार्मिक कार्यक्रम होत असतात.

सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. गावातील वाद गावातच कसे मिटतील याकरता सरपंच, सदस्य, तंटामुक्ती समिती व गावचे पोलिस पाटील कार्यरत असतात. गावात संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळही आहे. ते मंडळ तुकडोजी महाजांच्या ग्रामगीतेचे वाचन व भजन-वादन आकर्षक पद्धतीने करते.

गावाची रचना आकर्षक असून गावात सधन लोक राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त घरे पक्की/स्लॅबची आहेत. गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी अंडरग्राउंड नाले आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या कचरा पेट्या दिलेल्या आहेत. गावात सुशिक्षित लोक आहेत. अनेकजण शेती करतात त्यातून उत्पादन घेतले जाते त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम आहे. गावात सढळ हाताने दान करणारे लोकही आहेत. असे हे निसर्गरम्य परिसर लाभलेले व माणुसकीचे दर्शन घडवणारे हनवतखेडा हे गाव !

(लेखातील फोटोंसाठी प्रताप राऊत यांचे सहाय्य लाभले आहे.)

– गोकुळ चारथळ 7972740553 gokulcharthal15@gmail.com

——————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here