गन्स ऑफ पाचाड

_Pachad_1.jpg

रायगड किल्ल्याला भेट देताना पाचाड सोडले की डावीकडील डोंगरामध्ये तीन तोंडांची गुहा गिर्यारोहकांना खुणावते. पाचाडकडून त्या गुहेकडे पाहिले असता ती वाघाच्या मुखासारखी जागा दिसते. तीन तोंडे असणारी ती गुहा सह्याद्रीमधील सुंदर अलंकार आहे. गुहा नैसर्गिक असली तरी गुहेचा वापर अश्मयुगीन काळापासून होत आलेला आहे. गुहेला मराठीमध्ये वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा असे नाव आहे.

त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे अभ्यासक आर. व्ही. जोशी यांनी उत्खनन केले. त्यांना कोअर्स, तासण्या, छिलके, टोकदार पाती, नोक, वेधण, ट्रॅपिझ, आणि त्रिकोणी पद्धती मध्ये कोरलेल्या काही अवजारांचा आणि हत्यारांचा भाग मिळाला. त्या साधनांमुळे या नैसर्गिक गुहेमध्ये अश्मयुगीन मानव वास्तव्य करून असावा हे समजून आले. ती गुहा अत्यंत सुंदर आहे, परंतु गुहेच्या ठिकाणी पाण्याचा स्रोत मात्र सापडत नाही. पूर्वी तेथे काही ना काही पाण्याचा स्रोत असावा असे खात्रीपूर्वक वाटते.   

रायगडावर येणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ इतकी उत्कृष्ट जागा कोणतीही नाही. ह्या गुहेला पाचाडच्या दिशेला दोन तोंडे आहेत. पण तिकडून गुहेत प्रवेश करता येत नाही. अश्मयुगीन गुहेत प्रवेश करण्यासाठी रायगड वाडीच्या दिशेला तोंड आहे. पाचाड खिंडीतून हॉटेलच्या मागून त्या ठिकाणी येण्यास छोटीशी सोपी वाट आहे. गुहेतून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे सुंदर दर्शन होते.

गुहेमधील घोंगावणारा वारा आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. मात्र या विशुद्ध नैसर्गिक जागेला कोणतीही हानी न पोचवता ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ येथील मुक्काम जरूर करावा. अश्मयुगातील मानवी जीवन काय असू शकेल याची उजळणी मात्र नक्की करता येईल.

– शंतनू परांजपे

About Post Author