गझल विधेची उपेक्षा मराठी वाङ्मयात का?

gazal

सुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील समग्र रचनाकारांनी भट यांच्या शैली व भाषा यांचे अनुकरण केले. त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात…

गझल हा पद्यप्रकार मराठी वाङ्मयात दाखल होऊन अर्धशतक लोटले असले तरी अजून, समीक्षकांना ती विधा दखलपात्र वाटत नाही. गझल ही वाङ्मयाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत का केली जात नाही? त्यास कारणीभूत कोण? गझलेला तंत्रानुगामी ‘कृतकविधा’ संबोधणारे छंदोविहीन, अनाकलनीय, अमूर्त रचनाकर्ते कवी व समीक्षक यांचे अज्ञान की त्यांचा गझलेबद्दलचा आकस?

गझलेचे बाह्यांग तर माधव जूलियन यांनी फार पूर्वी मराठीत ‘गज्जलांजली’ व ‘छंदोरचना’ यांद्वारे परिचित करून दिले होते, पण काव्यसमीक्षकांकडून ती विधा पद्यवाङ्मयात अंतर्भूत का केली जात नाही? गझल-संग्रहाला स्थान शासकीय पुरस्कारांत का नाही? त्याला कारणीभूत कोण? मराठी गझलकारांचे आद्यपीठ म्हणता येतील अशा सुरेश भट यांच्या मांदियाळीतील काही व्यक्तींचे गझलसंग्रह भट यांच्या हयातीत निघाले होते; काही कवींनी तर गझल-सर्जनानेच लेखनास थेट आरंभ केला. त्यांचा गझल वा काव्यसंग्रह पुढे आला असे नाही. त्यांच्या त्या रचनांवरही भट यांनी अत्याधिक परिष्करण केले होते. भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील (अपवाद : इलाही जमादार) समग्र रचनाकारांवर भट यांची शैली व भाषा यांचा प्रभाव अनुकरणसीमेपर्यंत होता (इतका, की त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात!).

गझलेचे समग्र शेर उत्स्फूर्तपणे साकारणे नव्याण्णव टक्के शक्यच नाही. ते मुक्त अथवा गद्यकविता या प्रकारांत शक्य असते. रदीफ-काफिया यांचे बंधन सर्जनकाराला कारागिरी करण्यास विवश करतेच. पण ती विवशता साऱ्या छंदोबद्ध काव्यास लागू पडते. मग प्रश्न पडतो- अनिल, मर्ढेकर, बोरकर, कुसुमाग्रज इत्यादी, छंदोबद्ध काव्ये रचणाऱ्या कवींच्या काव्याची दखल घेणारे मराठी समीक्षक गझलकाव्याची उपेक्षा का करतात? त्याबाबत माझी अशी धारणा आहे, की ती मंडळी विचार करत असतील-

1. गझलच्या शेरात प्रासादिकता व संप्रेषणीयता अभिप्रेत असते. समीक्षक वाचकाच्या आकलनकक्षेत येणाऱ्या काव्यावर जटिल भाषेत, विद्वत्ज्जड असे भाष्य काय करणार? त्यांना अमूर्त कवितेवर अत्याधिक जटिल व अमूर्त शैलीत लिहिणे सरावाचे असते.

2. गझल हा तंत्रानुगामी प्रकार आहे. गझलेवर लिहायचे म्हणजे बहर, रदीफ, काफिया, अलामत, मतला, इत्यादीचा (छंद, समांतिका, स्वराधार, स्वरांतिका, आरंभिका) अभ्यास करणे आले. तो अभ्यास कोण समीक्षक करत बसणार? अन् अनवधानाने अभ्यासकाच्या हातून ‘ती चूक’ झालीच, तर गझलकारवर्ग लगेच त्याचे अज्ञान उघडे पाडण्याची भीती; त्यापेक्षा त्याच्या अमूर्त समीक्षेची झाकली मूठ सव्वा लाखाची! मग कोणी विचारले तर सांगायचे, की ‘ते जॉनर वेगळे आहे.’ (म्हणजे ती काव्यविधा नाही? ‘जॉनर’चा अर्थ शोधत बसा ‘वेब्स्टर’मध्ये!)

3. बोरकर, ना. घ. देशपांडे, विंदा करंदीकर, शांता शेळके आदी अनेकांनी गझल-सर्जन करून पाहिले (कदाचित सुरेश भट यांना लाभलेली लोकप्रियता त्यास कारणीभूत असेल). मात्र, त्यांनी त्यांना ती काव्यविधा अनुकूल नाही हे जाणवल्याने गझलकडे पाठ फिरवली असावी. मंगेश पाडगावकर यांनी मात्र अनेक लक्षणीय गझला लिहिल्या. शांता शेळके यांनी त्यांच्या अनभिज्ञतेचा परिचय गझलविधा पूर्णपणे जाणून न घेता, टीकात्मक सूर लावून दिला.

गझलवर आक्षेप उर्दूतही डॉ. कलीमुद्दीन यांच्यापासून अनेक समीक्षकांनी नोंदवले आहेत; पण अमीर खुसरो ते आजवर हजारो गझलकारांनी लाखो गझला लिहिल्या. तो आकृतिबंध तरल व प्रेयस भाववृत्तीच्या कवींनाच नव्हे, तर अ-कवींनादेखील आकर्षित करतो. त्याचे कारण काय असावे याची मीमांसा व्हायला हवी. कोणत्याही वाङ्मयीन विधेचे एक तंत्र असतेच. कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे प्रकार परस्परांपासून पृथक ठरतात, ते त्यांतील संपृक्तता, विस्तार, कथनशैली आदी तंत्रांमुळे. नाटकात तर तंत्राचे महत्त्व संहितेएवढेच वाढले आहे. तेव्हा ‘नाटक ही साहित्यिक विधा नाही’ असे म्हणावे काय? गझलेतील शेर विविध विषयांवर असतात. उलट, काव्य एकाच विषयावरील असते. त्याचा आस्वाद घेण्याची सवय असलेल्या रसिकवर्गाला विषयाचे ते मार्गांतरण ग्राह्य होत नाही. त्याने रसोत्पत्तीत व्यत्यय जाणवतो. तो आक्षेप सर्वसामान्य गझलेच्या बाबतीत योग्य आहे, पण तो उच्चस्तरीय गझलेला लागू पडत नाही. विषयांची पृथगता दर्जेदार गझलेतील शेरांत असूनही आंतरिक एक सुसूत्रता विद्यमान असते. कारण कवीने ते विविध शेर एकाच काफियामध्ये रचलेले असतात. अशा गझलेची आस्वादक वृत्ती उर्दू काव्यरसिकांत रूजलेली आहे. क्रमबद्ध गझल एकाच विषयावरील शेरांची माळ असते. परंतु तिच्यातील प्रत्येक शेर परिपूर्ण कविता लेवून येतो; तसे नसेल तर ती रचना गझल आकृतिबंधातील गीत वा कविताच ठरते. मग तिच्यात रदीफ, काफिया, छंद, अलामत, इत्यादी तंत्र आढळले तरी! इक्बाल या तत्त्वज्ञ कवीच्या अनेक कविता गझल फॉर्ममध्ये आहेत.

काहींना गझलेतील रदीफ, काफिया यांच्यामुळे त्या विधेवर मर्यादा पडतात असे वाटते. खरे तर, काफियातील लयात्मक पुनरावृत्ती शेरातील छंदास माधुर्य आणते अन् रदीफची आवर्तने काफियाच्या गेयतेत वृद्धी करतात. सुरेश भट यांनी काफियाला ‘यमक’ असे म्हटले आहे. खरे तर, ती व्याख्या अपूर्ण आहे. काफिया म्हणजे उर्दूत ‘सौती हमआहंगी’! त्याचा अर्थ स्वरसाम्यता, आवाजाची एकरूपता होय. अर्थात त्यात यमकाचा अंतर्भाव होतोच; परंतु त्याव्यतिरिक्तही ध्वनिसाम्य असलेल्या शब्दांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, ‘पाहू, राहू, साहू’ ही यमके आहेत. काफियात ‘आशा, पावा, गाथा, भाषा’ हे शब्द (वर्णयोजना गुरू-गुरू असल्याने उच्चारात ध्वनिसाम्य आहे) येऊ शकतात. भट यांना ते ज्ञात निश्चित होते. पण त्यांनी यमकावर भर कदाचित, नवोदित गझलकार त्यात अनवधानाने चुका करतील म्हणून दिला असावा. परंतु, यमकांच्या मर्यादित संख्येमुळे गझलेच्या कॅनव्हासवरही मर्यादा पडल्या. कवी गझलेत ‘हासरा, साजरा, लाजरा..’ अशी यमके आल्यावर शेरांसाठी ‘घागरा, खाकरा…’ अशी यमके नाइलाजाने आणून पाच शेर पूर्ण करू लागले. अन् त्या काफियांना अनुरूप आशय शेरांमध्ये पेरू लागले. तेथेच कृतक गजल-सर्जनाचा आरंभ झाला. काफियाचे क्षेत्र ‘शब्दांची स्वरसाम्यता’ या मूळ व्याख्येने अत्यंत विस्तृत होते अन् मग यमकासवे काफियाबंदी ही टीकादेखील संपुष्टात येते. गझलविधेचा आवाका छंदोबद्धच नव्हे, तर मुक्तछंदीय काव्याच्या समकक्ष होतो हे काव्य-समीक्षकांच्या ध्यानात येईल. मराठीतील समकालीन गझलकार हा ‘स्वरांचा ऊर्फ सौती काफिया’(उर्दूत असे वेगळे नाव नाही) समर्थपणे वापरत आहेत.

-craft

गझलची उपेक्षा होण्यास गझलक्षेत्रात वावरणारे कृतक गझलकार सर्वाधिक जबाबदार आहेत. तंत्र अवगत झालेल्यांनी गझल रचण्याचे ‘कार्यशाळा’ नावाचे ‘कोचिंग क्लासेस’ सुरेश भट यांच्यानंतर काढले. ‘झटपट गझलकार’ घडवण्याचा तो व्यवसाय फोफावला. भट यांना ‘शिष्य’ ही प्राचीन उर्दू गझलक्षेत्रातील संकल्पना ग्राह्यच वाटत नव्हती. पण दूरदृष्टीची काही मंडळी ‘भट-शिष्य’ स्वयंघोषित झाली. त्यांची स्वत:ची गझल तंत्रदृष्ट्या निर्दोष असली तरी वाङ्मयीन दृष्ट्या सुमार होती. मग त्यांनी ‘कोचिंग क्लासेस’कडे मोर्चा वळवला. त्यांनी ‘उस्ताद’ ही उपाधी माळून घेतली. ते त्यांच्याकडे तंत्र शिकणाऱ्यांचा उल्लेख ‘गंडाबंद शागीर्द’ असा करू लागले. त्या बुवाबाजीचा संसर्ग कविताक्षेत्रात अद्याप झालेला नाही हे गझलेतर कवींचे नशीब! गझलची उपेक्षा करणे मराठी काव्यज्ञांनी तो हास्यास्पद ‘सिनेरिओ’ पाहून योग्य मानले, असे तर नाही ना?

सुरेश भट यांनी गझलकार हा मूलत: उत्तम कवी असावा, हा निकष लावला होता. खुद्द त्यांच्या मांदियाळीतील किती जण मूलत: कवी होते? बरेच जण थेट गझल लिहू लागले होते. त्यांचे सर्जन भट यांच्या हयातीतच थंडावले. आज गझल- सर्जनात जी संख्यात्मक वाढ झाली आहे त्याला ‘कोचिंग क्लासेस’ बहुतांशी जबाबदार आहेत. पण काही कवी त्यातून गझलकार म्हणून घडले, हेही सत्य आहे. गुणात्मक वाढ झाली आहे, तिचा टक्काही हळूहळू वाढत आहे, पण संख्यात्मक वाढीच्या गर्दीत, ती गुणवत्ता दृष्टीस पडत नसावी.

‘मराठी गझल सुरेश भट यांच्या पुढे गेली नाही’ असे दहा वर्षांपूर्वी वाटायचे, पण आज तसे म्हणता येणार नाही. निवडक जुने, नवे, समकालीन गझलकार (विशेषत: गेल्या पंधरा-सोळा वर्षांत) आशय व शैलीदृष्ट्या भट यांच्या शैलीहून पृथक गझल लिहीत आहेत. त्या गझलेत सामाजिक भान, वैचारिक प्रगल्भता, तर्कशुद्धता उर्दू गझलप्रमाणे कवितेच्या अंगाने साकारत आहे. मात्र, फारसी, उर्दू, प्रारंभिक गुजराती भाषांमधील गझलेत तरलता, शब्दलालित्य इत्यादी गझलची खासियत गणल्या जाणाऱ्या गोष्टींची (गझलची कविता व गीत यांपासून विलगता दर्शवणारी शैली) कमतरता जाणवते.

गझल हा काव्य प्रकार सुसंस्कृत गणला जात असे. भाषेत सभ्यवर्गाला जे शब्द अग्राह्य होते ते कवितेत येत असत. पण गझलेत स्वीकारार्ह नव्हते. आदिल मंसूरी यांनी एक गजल ‘देखता क्या है कमीने कुत्ते, सुंघता क्या है कमीने कुत्ते’ या स्वरूपाची लिहिली असता, त्यावर गदारोळ झाला. गझलची भाषा ती नव्हे असा आक्षेप घेतला गेला. गझलमधे कर्णकटू ग्राम्य (ग्रामीण नव्हे) शब्द उर्दू, फारसीत वापरले जात नाहीत. शब्दलालित्य गझलच्या सौंदर्यात वृध्दी करते. येथे सहज संप्रेषित होणारे, अंगभूत गेयता असणारे शब्द असे म्हणता येईल. उदाहरणार्थ ‘मालवून टाक दीप चेतवून अंगअंग’ येथे विझवून, घालवून पेक्षा मालवून हा शब्द तरल आहे. देह, शरीर यांच्यापेक्षा ‘अंग अंग’ हे शब्द मोहकता आणतात व ‘अंग अंग’ ही पुनरूक्ती गेयता धारण करून येते. कंठ = नरडा, चेहरा = थोबाड इत्यादीमध्ये असाच काहीसा फरक आहे असे सांगता येईल. शब्दलालित्यात अभिनवगुप्तच्या ‘ध्वनी सिध्दांता’प्रमाणे शब्द हे आशय ध्वनित करतात, म्हणजे प्रतीकात्मक भूमिका वठवतात अन् ग्राम्य शब्द थेट मूळ अर्थाशीच भिडतात. 

-madhav-juliyanकाही व्यक्ती टाळ्याखाऊ, छद्मी आणि उपहासपर रचनाही सवंग प्रसिद्धीसाठी करतात. परंतु त्या गझला नसतात, तर ‘हझला’ असतात. विद्यमान गझल ‘वाह’ची आहे. ‘आह’ची गझल क्वचितच सापडते. परंतु समकालीन मराठी कवितेच्या तुलनेने तांत्रिक भाग सोडून वाङ्मयीन दृष्ट्या गझल कितपत उभी राहते, याचे तरी काव्य-समीक्षकांनी परखड मूल्यांकन करण्यास हरकत नाही. काही गझल तंत्रविशारद दुसऱ्याच्या गझलेतील काव्यसौंदर्याऐवजी फक्त तांत्रिक चुका अधोरेखित करण्यालाच समीक्षा मानू लागले आहेत. त्यामुळे छंदांवर हुकूमत असलेला उत्तम कविवर्गही गझल-सर्जनास कृतक ठरवू पाहत आहे.

– राम पंडित ‘पद्मानन्दन’ 9819723756
 dr.rampandit@gmail.com

(टीप : डॉ. राम पंडित गजल हा शब्द वापरतात)

About Post Author