गझल तरुणाईची

1
84

चौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या ‘मिनी थिएटर’मध्ये, विजय गटलेवारांच्या ‘गझल तरुणाईची’ ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या हस्ते झाले. आल्बमच्या सर्व गझला कवी सदानंद डबीर यांच्या आहेत. ह्या प्रसंगी विजय गटलेवारांच्या गझल गायनाचाही कार्यक्रम झाला. आय्.पी.एल.चे वारे असूनही कार्यक्रम ‘हौसफुल्ल’ झाला!

माधव ज्यूलियनांनी गेल्या शतकात गझलची फारसी वृत्तं (बहर) मराठीत आणली, हे योगदान मान्य करूनही, मराठी गझलांचा प्रारंभ सुरेश भटांपासून झाला हे गृहित धरले जाते. खुद्द माधव ज्यूलियनांना गझलचा ‘एकयमकीपणा’ (रदीफ) मराठीत रुजेल का? अशी शंका होती, त्यामुळे त्यांनी, आपण फारसी वृत्तात ‘गीतरचना’ केल्याचे म्हटले आहे. त्यांनी फारसी शब्दांचा वापरही केला. भटांच्या हयातीत आणि नंतर मराठी गझल ‘लिहिणाऱ्यांची’ संख्या वाढत आहे. तो एक नवा ‘कल्ट’ तयार होत आहे. शेकडोजण मराठी गझला लिहिताहेत. त्यांतले बहुसंख्य, आपण भटांच्या प्रभावात आहोत हे कौतुकाने सांगतात आणि छातीला व मस्तकाला हात लावतात. (उर्दू ढंगाने की पंजाबी ढंगाने?) त्यांपैकी स्वतंत्र शैलीने ठसा उमटवणारे गझलकार हाताच्या बोटांवर मोजण्याइतके जेमतेम आढळतील. त्यांतही अलिकडे, ‘खयाल’ संग्रहानंतर सदानंद डबीरांचे नाव चर्चेत अधिक आहे. त्यांना आपली स्वतंत्र शैली गवसली आहे असा राम पंडितांसारख्यांनी अभिप्राय दिला आहे. त्यांची गीतेही लोकप्रिय झाली आहेत. फक्त त्यांच्या गझलांचा प्रस्तुत आल्बम हा तिसरा आहे. गटलेवारांच्या कार्यक्रमाचे निवेदन करताना सदानंद डबीरांनी दोन मुद्दे मांडले. एक – डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला गझल आल्बम प्रसिध्द होण्यातले औचित्य असे की ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ही डॉ. आंबेडकरांची त्रिसूत्री. गझल रुजवण्यासाठी सुरेश भटांनी ती वापरली. ते आधी गझल ‘शिकले’, त्यांनी नवोदितांना ‘संघटित केले’ आणि प्रस्थापित मराठी सारस्वतांशी ‘संघर्ष’ केला. सुरेश भटांच्या जन्मदिवसाची पूर्वसंध्या 14 एप्रिल रोजी येते.

दुसरा मुद्दा – सुरेश भटांचा ‘रूपगंधा’ हा पहिला संग्रह 15 मार्च 1961 रोजी प्रकाशित झाला. ‘मल्मली तारुण्य माझे’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ अशा त्यांतल्या गझला 1960 साली लिहिल्या गेल्या असाव्यात, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आणि मराठी गझलचा, दोन्ही सुवर्ण महोत्सव एकाच वर्षी येतात!

गझल गायकीतही फारसे नवे घडत नाही. ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे अनेक वर्षे गात आहेत. त्यांनी स्वत:चे (सं)स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या ‘एकनिष्ठे’त त्यांचा एकसूरीपणा ध्यानात घेतला जात नाही. त्यांचा एक चाहता वर्ग असला तरी त्यांच्या आवाजाच्या मर्यादा, वयोमानानुसार अधिक त्रासदायक झाल्या आहेत. दुसरे बरेचसे एकनिष्ठ गझलगायक माधव भागवत. त्यांचा आवाज गझलगायकीला योग्य आहे. त्यांना ‘गझल गंधर्व’ ही उपाधीही (उदयदादा लाडांनी) दिली आहे. पण त्यांच्याकडून पारंपरिक गझलगायकीव्यतिरिक्त नवे योगदान झालेले नाही. कवी चंद्रशेखर सानेकर व गायक मिथिलेश पाटणकर काही प्रयोग करतात, पण त्यांचाही एक साचा बनतोय. ही कोंडी फोडायला ताज्या दमाचा, सळसळत्या रक्ताचा युवा गायकच यायला हवा- तो विजय गटलेवारांच्या रूपाने मराठी गझलविश्वाला मिळणार का असा आशादायक विचार गटलेवारांच्या कार्यक्रमानंतर मनी आला.

हे ही लेख वाचा –
गझल आणि ‘ग्रामीण गझल’
मराठी गझल – अहाहा! टमाटे किती स्वस्त झाले !

 

 

‘ग़ज़ल तरुणाईची’ ह्या आल्बमच्या शीर्षकातच विजय गटलेवारांनी अर्धी बाजी मारली आहे असा अभिप्राय उपस्थितांनी दिला. ‘श्रावणातल्या उन्हात बांधू घर वेडयाचे’ ही गझल त्यांनी म्युझिक ट्रॅकवर सादर केली. हा प्रकार बुर्जूगांना धक्का देणारा, तर तरुणाईला आकर्षून घेणारा होता. ‘सर एक पावसाची’ आणि ‘गझल असावी’ ह्या गझला पूर्ण ‘पॉप’ शैलीत नसल्या तरी संयतपणे वेगळे वळण घेणाऱ्या आहेत. आल्बममधल्या अन्य गझला ताज्या असूनही परंपरेचा ‘आब व अदब’ सांभाळणाऱ्या आहेत. आल्बम सुरेश भटांना यथोचितपणे समर्पित करण्यात आला आहे. आल्बमच्या शेवटी, सदानंद डबीरांनी सुरेश भटांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेली गझल आहे. तीदेखील वेधक वाटते.

डबीरांचे निवेदन ‘मिश्किल’ असते, पण त्यातून त्यांचा अभ्यास व त्यांची निष्ठा जाणवते. ते ‘कुसुमाकर‘ मासिकात व त्याआधी ‘रुची’त कविता व गझल ह्यां सातत्याने वाचनवेधक लिहित आले आहेत. विजयने पहिली गझल गायल्यावर विनंती केली, की सभागृहातले दिवे लावावे. त्यावर डबीरांनी हजरजबाबीपणे कॉमेंट केली, की ‘आम्हाला प्रेक्षकांना अंधारात ठेवायचे नाही!’- ह्या वाक्याने हशा व टाळया तर आल्याच, पण मैफिलीतले श्रोते एकदम मोकळे झाले व मैफिल उत्तरोत्तर रंगत केली.

गझल एक ‘तहजीब’ (संस्कृती) आहे, हे निदा फासलींचे वाक्य उद्धृत करून, सुरेश भटांचा संदर्भ देत डबीरांनी स्पष्ट केले, की आम्ही गझलचा आकृतिबंध घेतला आहे- संस्कृती नाही. त्यामुळे मराठी गझल ही मराठी संस्कृती सांगणार व मराठीच वाटणार.

विजयला ‘थोडीच शुध्द बाकी’ ह्या गझलसाठी ‘वन्समोअर’ मिळाला. विशेषत: ‘काळोख सोबतीला घेऊन मी निघालो। लाजून सूर्य आता मागून येत आहे’- ह्या बाबा आमटे यांना समर्पित केलेल्या शेराने मैफिल कळसाला गेली.

गायक-नट बावडेकर सन्माननीय पाहुणे होते. त्यांनी एखादी रचना सादर करावी अशी सूचना आयोजकांनी (किंवा प्रायोजकांनी) केली. त्यांनी नव्या नाटकातल्या अशोक पत्कींच्या संगीतातली सदानंद डबीरांची दोन गीते (त्यामुळे ती जणू ‘सदानंद डबीर-रजनी’ घडून आली!) व ‘कैवल्याच्या चांदण्याला’ हे पद म्हटले. त्यांचे गायन चांगले असले तरी त्यांनी वीस-पंचवीस मिनिटे घेतल्याने प्रकाशन समारंभ लांबणीवर पडला. संयोजकांना व कलाकारांना वेळेचे भान ही फार आवश्यक गोष्ट आहे.

‘झी सारेगमप’मुळे विजय गटलेवार हे नाव घराघरात आणि रसिकांच्या मनापर्यंत पोचले आहे. त्या स्पर्धेतही त्यांचे गझलगायन लक्षवेधी झाले होते. मात्र तेथे ते बाजी मारू शकले नाहीत, ते त्यांच्या गायनाच्या आडदांडपणामुळे. त्यांचा त्यावेळचा ‘ऍप्रोच’ गावरान वाटे, पण मुंबईत राहून त्यांच्यामध्ये जरूर ते ‘सॉफिस्टिकेशन’ येत आहे असे जाणवले.

विजयने संगीत दिलेला व अन्य गायकांसोबत गायलेला ‘कॉलेजच्या कट्टयावर’ हा ‘पॉप आल्बम’ व इलाही जमादारांच्या गझलांची ‘करार केला’ ही सी.डी. ह्याआधीच प्रकाशित झाली आहे.

‘गझल तरुणाईची’ ह्या आल्बमची निर्मिती ‘कृणाल’ ह्या कंपनीने केली आहे. ह्या आल्मबने नावाप्रमाणे मराठी गझलविश्वात नवे वारे खेळू लागेल अशी आशा!

About Post Author

Previous article‘रक्ताचं नातं’
Next articleकल्पनेतल्या देवदेवता
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. लेख वाचला गटलेवारांच्या गजल…
    लेख वाचला गटलेवारांच्या गजल ऐकल्यावर बोलता येईल…नवे शोधून शोधून वाचावे ऐकावे लागते. खूप सुखद अनुभव येतात. गजलची तहजीब मोह घालणारी आहेच पण पेलणे शिवधनुष्याप्रमाणे मराठी बाज गजलेत यावा भटांचा आग्रह आमच्या गजलेत आला पण अनेकदा तो विचार मांडला. त्यामुळे डबीरांचे नवे वाटले नाही.

Comments are closed.