गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

0
166

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरील गायक नट होते. तसेच, ते देखणे आणि केवळ ऐकून गायन आत्मसात करणारे कलाकार होते. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत गंधर्वतुल्य गायन करणारे नट म्हणून कीर्ती संपादन केली होती.

भाऊराव यांचा जन्म 9 मार्च 1863 रोजी बडोदे येथे झाला. भाऊरावांचे आजोबा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील माखजन या गावाहून बडोद्याला आले. त्यांचा पेशा हरिदासाचा होता. भाऊरावांचे वडील बापूबोवा हेसुद्धा कीर्तनकार होते. भाऊराव यांना एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या. ते कुटुंब बडोद्याला नीळकंठेश्वर मंदिराच्या ओसरीवर राहत असे.

भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. ते ध्रुपद, ठुमरी असे थोडे गायनही  शिकले होते. त्या काळात मल्हारराव महाराजांची कारकीर्द होती. बडोद्यात तमाशा आणि लावण्यांचे फड रंगत असत. भाऊराव आणि त्यांचे बंधू अप्पाराव हे दोघे रात्री गुपचूप तमाशाला जात. त्यांनी तेथे लावणी ढंगाचे गायन आत्मसात केले असावे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या कानावर त्या दोन बंधूंच्या गायनाची कीर्ती आली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी अप्पारावांना मुंबईला बोलावून, त्यांचे गाणे ऐकून त्यांना संगीत नाटकात स्त्रीभूमिका देण्याचा विचार केला आणि मोरोबा वाघोलीकर यांच्याकडे पाचशे रुपये देऊन त्यांना बडोद्याला पाठवले. पण अप्पारावांनी सांगितले, की मी घरात कर्ता मोठा मुलगा आहे. वडील वृद्ध आहेत. त्यामुळे मी येऊ शकत नाही. त्यावेळी भाऊराव म्हणाले, “अप्पा मी जाऊ का रे?” आणि ते मुंबईत किर्लोस्कर नाटक मंडळींत 20 ऑक्टोबर 1882 रोजी आले आणि त्यांनी आठच दिवसांत ‘शाकुंतल’मध्ये नटीची भूमिका साकारली. भाऊरावांनी प्रथम रंगभूमीवर प्रवेश केला त्या दिवशी नाटक मंडळींस पंधराशे रुपयांची प्राप्ती झाली. त्या पूर्वी तेवढी प्राप्ती कधी झाली नव्हती.

भाऊरावांनी बाळकोबा नाटेकर यांचे गायन नुसते ऐकून ते आत्मसात केले. मुंबईत एका ‘शाकुंतल’च्या प्रयोगात बाळकोबा नाटेकर न आल्यामुळे, ते करत असलेल्या ‘कण्व’ ऋषींची भूमिका भाऊरावांनी ऐनवेळी साकारून सगळ्यांना थक्क केले. त्या प्रयोगात भास्करबुवा बखले यांनी ‘शकुंतले’ची भूमिका केली होती. भाऊराव नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘मृच्छकटिक’मध्ये उर्वशीची भूमिका करत. त्यानंतर भाऊरावांनी स्त्रीभूमिका करण्याचे बंद केले. त्यांनी देवल यांच्या ‘शापसंभ्रम’मध्ये पुंडलिकाची (पुंडरीक???) भूमिका केली. ते ‘मृच्छकटिक’मध्ये चारुदत्ताची भूमिकाही करू लागले. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘वीरतनय’मध्ये शूरसेनाची भूमिका उत्तम साकारली. भाऊरावांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या स्त्रीभूमिका गाजल्या होत्या.

भाऊराव हे पूर्वी कंपनीकडून पगार घेत. त्यांना पात्रांना शिकवण्याचा किंवा स्वतःचे काम करण्याचा कंटाळा नसे. तेवढेच नव्हे तर, ते नाटकातून कितीही कमी उत्पन्न होवो व मंडळी कितीही कमी येवोत स्वतःचे काम कसोशीने करत असत. त्यांनी धर्मादाय आणि सार्वजनिक कामांस मदतही केली. भाऊरावांनी गुजरात येथील दुष्काळपीडित गुरांकरता नाटक मंडळींच्या तर्फे अडीच हजार रुपये 1899 साली दिले होते. त्यांना त्या वेळी मुंबईकरांनी सर भालचंद्र यांच्या हस्ते मानपत्र दिले.

पुढे, किर्लोस्कर नाटक मंडळी ग्वाल्हेर येथे गेली असताना, भाऊरावांची प्रकृती ढासळू लागली. त्यांनी तेथे ‘शाकुंतल’मधील ‘दुष्यंत’ची भूमिका अंगात अशक्तपणा असतानाही निभावून नेली. भाऊरावांनी पुण्यात ‘शारदा’ नाटकात ‘कोदंड’ची भूमिका केली. पण तोपर्यंत त्यांची प्रकृती पार ढासळली होती. त्यांनी त्या सुमारास नारायण दत्तात्रेय जोगळेकर या नव्या नटाला किर्लोस्कर नाटक मंडळींत घेतले. जोगळेकर ‘शारदा’ नाटकात ‘कोदंड’च्या भूमिकेत रंगभूमीवर 31 ऑक्टोबर 1900 रोजी आले. आजारी भाऊरावांनी त्या नाटकाचा एक अंक पाहिला आणि त्यांना त्यांचा वारस मिळाल्याचा आनंद झाला. विलायतेत काचेच्या कारखान्यांत शिकण्यास गेलेले गृहस्थ मि. वागळे यांनी मुद्दाम भाऊरावांना तिकडे बोलावले होते. त्यांना तिकडे आल्यास मोठमोठ्या लॉर्ड्स लोकांत ओळख करून देऊन गुणांचे चीज करून देईन असे आश्वासन दिले होते. परंतु भाऊरावांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती विनंती मान्य करता आली नाही.

भाऊरावांच्या रूपाची मोहिनी विलक्षण होती. तसेच, त्यांच्या मधुर गोड गळ्याचीही ! त्यांची तान लवचीक असे, पण ‘वीररसात्मक’ पदात त्यांचा आवाज उंच पट्टीत जाई. ते करुणरसाचा आविष्कारही उत्कृष्ट करत. त्यांच्या गायनात टप्पा, ठुमरी, लावणीचा ढंग असे.

भाऊराव कोल्हटकर यांच्यावरील मृत्युलेखात शि.म. परांजपे यांनी त्यांचे वर्णन ‘लास्ट ऑफ द रोमन्स’ असे केले. मराठी रंगभूमीवरील या श्रेष्ठ नटाच्या मृत्यूने खरोखरच रंगभूमीची मोठी हानी झाली. त्यांचे निधन 13 फेब्रुवारी 1901 मध्ये पुणे येथे झाले.

मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com

———————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here