को-हाळे (Korhale)

0
51

कोर्‍हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव असून लोकांनी तेथून स्थलांतर केलेले आहे. पण पूर्वी गावाला महत्त्व प्राप्त झालेले होते. गावाच्या तटबंदीच्या भिंती होळकरांनी बांधलेल्या असून (1884) त्या सुस्थितीत आहेत. तटबंदीस लागून बाहेरील बाजूस मोठे मैदान असल्यामुळे गाव बाहेरून आहे त्यापेक्षा मोठे वाटते. ते गाव होळकरांकडून पेशव्यांकडे प्रदेशाच्या अदलाबदलीमध्ये आले होते. उपविभागाचे मुख्यालय तेथे होते. कोर्‍हाळे येथे 1818 साली सरकारी खजिना (A Treasury Subordinate To Ahmednagar) एका ठाणे अंमलदाराच्या संरक्षणात ठेवलेला होता. परंतु ठाणेदाराने अफरातफर केल्यामुळे त्याला बडतर्फ 1830 मध्ये केले गेले. त्यानंतर कोर्‍हाळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर उपविभागास जोडले गेले. कोपरगाव उपविभागाची निर्मिती झाल्यावर कोर्‍हाळे कोपरगाव उपविभागात जोडले गेले. होळकरांच्या अखत्यारीतील हे गाव 1865 मध्ये ब्रिटिशांकडे आले. होळकरांच्या अधिकार्‍यांचे त्या गावातील दोन प्रशस्त महाल हे लिलाव करून विकण्यात आले.

(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून पुन:प्रसिद्ध)

संकलन – समिता कदम

About Post Author