कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन

27447095

डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘राणी आई’ म्हणून ओळखण्यात येते.
 

शिखरावरील मंदिर
 

देवीचे मूळ पीठ चौदाशे फूट उंचीच्‍या डोंगरावर असून तेथे चढून जाणे अवघड आहे. मूळ मंदिराचा उल्‍लेख ‘गडमंदिर’ असा केला जातो. डोंगराचा तो भाग सुळक्यासारखा असून त्याची उंची पन्नास ते साठ फूट असावी. डोंगरशिखराचा भाग देवीच्या मंदिरासारखा दिसतो व दक्षिणेतील गोपुराचाही  आकार तेथे प्रतीत होतो.  शिखरामुळे आपणाला इतर डोंगरांच्या मालिकेतून महालक्ष्मीचा डोंगर लांबूनही सहज दाखवता येतो. या शिखरावर दरवर्षी निशाण लावण्यासाठी जाणा-या इसमाशिवाय कोणीही जात नाही. डोंगरावर चढण्‍यास डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि चारोटी नाक्‍यापासून सहा किलोमीटर अंतरावर असणा-या वधवा गावातून पाय-यांचा रस्‍ता आहे. साधारण नऊशे पाय-या चढून जाव्‍या लागतात. वर जाण्‍यास दुसरा रस्‍ता पायथ्‍याशी असलेल्‍या महालक्ष्‍मी मंदिरापासून सुरू होतो. प्रथम डोंगरावरील देवीचे दर्शन घ्‍यावे आणि त्‍यानंतर डोंगराच्‍या विरुद्ध बाजूस पायथ्‍याजवळ असलेल्‍या देवीचे दर्शन घ्‍यावे, अशी मूळ प्रथा आहे. मात्र गुजरातकडून येणारे भाविक प्रथम पायथ्‍याच्‍या देवीचे दर्शन घेतात. गुजराती भाविकांची संख्‍या जास्‍त असल्‍याने त्याच पद्धतीने दर्शन घेण्‍याचा पायंडा पडला आहे.
 

तळच्या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. म्हणजेच मुख्य टेकडीवरील मंदिराकडे तिचे मुख आहे. मूर्ती गाभा-यात असून देवीचा मुखवटा दर्शनी दोन फूट उंचीचा लांबट चेहरा असून शेंदूरचर्चित आहे. मस्तकावर चांदीचा मुकूट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून त्याच पाषाणात दर्शनी मुखवटा कोरून काढलेला आहे. मुखवट्यासमोर चांदीचे सिंह व जयविजय यांच्या मूर्ती मांडलेल्या असतात, पण त्यांचा मुख्य मूर्तीशी काही संबंध नाही. सभामंडप, यज्ञकुंड, दीपमाळा सर्व काही आहे. आजुबाजूला मोठ्या धर्मशाळा आहेत. पूर्वीचे मंदिर लाकडाचे होते. ते पावसामुळे खराब होत गेल्यामुळे लाकडी खांब काढून तेथे दगडाचे मजबूत अठ्ठावन खांब बसवले. खांबांवर मोठा घुमट, तीन लहान घुमट आहेत. मंदिर रंगसंगतीने रंगवून आकर्षक केले आहे. मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने सुंदर समजले जाते.

मंदिरातील पुजारी आदिवासी असून त्या लोकांत ही देवी ‘कोळवणची महालक्ष्मी’ म्हणून प्रसिद्ध आहे. कोळवण या शब्‍दाचा अर्थ कोळी लोकांची देवी. मात्र तसा कुठेच लिखित उल्‍लेख नाही. देवीचे वर्षभरात चैत्र पौर्णिमा उत्सव, नवरात्रोत्सव आणि माघ महिन्यातील शुद्ध द्वादशीला ‘वाघ बारसी’चा उत्सव असे तीन उत्सव होत असतात. देवीच्या दर्शनासाठी भंडारी, वाडवळ, कोळी, इराणी, बागायतदार, आदिवासी यांची नेहमी गर्दी असते. तिन्ही उत्सवांत अष्टमीला होम होतात. देवीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवस भरते.
 

देवीचे स्थान शिखरावर आहे, परंतु मंदिर पायथ्याशी कसे? याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्या वेळी दर्शनाला नियमाप्रमाणे शिखरावर जात असताना तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. तिला पुढे जाणे अशक्य झाले. तिने मातेची प्रार्थना केली. त्यावेळी दृष्टांतात देवीने तिला सांगितले, की मी पायथ्यापाशी आहे. तेथे दर्शनाला ये. आदिवासी स्त्री खडबडून जागी झाली आणि ती पायथ्याजवळ येताच महालक्ष्मी देवीने तिला दर्शन दिले. त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले.

वणी येथील सप्तशृंगी, औंधची यमाई, पुण्याची चतु:श्रृंगी यांचा इतिहास पाहिला तर तोही याप्रमाणे आहे. मूळ स्थाने चढून जाण्यास कठीण आहेत अशा ठिकाणी पायथ्याजवळ मंदिरे आढळतात.

कोळवण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदताना सोन्याची मूर्ती व इतर धातूंच्या तेरा मूर्ती मिळाल्या. त्या छोट्या मूर्ती बाहेर काढताच परिसरातील लोकांवर संकटे कोसळू लागली असा समज पसरला. म्हणून त्या मूर्ती पुन्हा धार्मिक विधी करून गाडून टाकल्या गेल्या अशी आख्यायिका आहे.

डोंगरावरील देवीचे मंदिर उभारणे व पाय-या करणे हे अवघड काम नारायणराव जावरे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाले. पूर्वीचे कोनवाड्यासारखे छोटेसे देऊळ डोंगराच्या दोन कड्यांमध्ये गुहेत होते. त्यात ती तपश्चर्या करण्यात बसत असे. त्या परिसरातील कडे तोडून डोंगरावरील दगडगोटे एकत्र करून, खड्डे बुजवून सर्व भाग प्रथम सपाट करण्यांत आला. त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. विटा, रेती, सिमेंट, लाकडे, पाणी व बांधकामाला लागणारी हत्यारे मजुरांनी डोक्यावर, पाठीवर घेऊन चढवण्यात आली. देऊळ परिश्रम घेऊन बांधण्यात आले. बांधकामाला जवळजवळ सहा वर्षे लागली. देवळाचे क्षेत्र पंचाण्णव फूट लांब व साठ फूट रुंद असे स्लॅब टाकून पूर्ण करण्यात आले आहे.

महालक्ष्‍मी मंदिराकडून डोंगरावर जाण्‍यास वाट आहे. त्या वाटेने देवस्‍थानापर्यंत पोचण्‍यास दीड तासांचा अवधी लागतो. वाटेत मुसळ्या डोंगर लागतो. तेथून पुढे जाण्‍यासाठी काँक्रिटचा रस्‍ता बांधलेला आहे. वाटेत अन्‍नपूर्णा देवीचे मंदिर लागते. तेथून मुख्‍य देवस्‍थान पंधरा मिनिटांवर आहे. मात्र तेथून पुढील मार्ग थोडा कठीण आणि जास्‍त चढ असलेला आहे. मग हनुमानाचे मंदिर दृष्‍टीस पडते. तेथून महालक्ष्‍मीचे मुख्‍य मंदिर पाच मिनिटांच्‍या अंतरावर आहे. डोंगरावरील मंदिराजवळ पोचल्‍यानंतर सभोवतालच्‍या परिसराचे विहंगम दृश्‍य नजरेस पडते.
 

मंदिराच्‍या आतील गाभारा संगमरवरी दगडाचा असून त्यात गणपती, महालक्ष्मी, सरस्वती, अंबामाता, राम-लक्ष्मण, सीता व राम, समोर हनुमान व शंकराची पिंड बसवण्यात आली आहे. मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणांच्या हस्ते माघ शुद्ध एकादशी, द्वादशी, त्रयोदशी (1992) असे तीन दिवस चालू होता.
 

गाभा-याच्‍या उजव्‍या बाजूला लहान गुहा आहे. त्या गुहेतून पुढे गेल्‍यानंतर महालक्ष्‍मीच्‍या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येते. गुहा उंचीने फारच लहान आहे. त्‍यामुळे भाविकांना सरपटत आत जावे लागते. आत कमी जागा असल्‍याने एकावेळी दोन किंवा तीनच भाविकांना दर्शन घेता येते. गुहेच्‍या आत डाव्‍या बाजूला वळण आहे. तेथे पाणी पाझरताना आढळते. मात्र अरुंद जागा आणि अंधार असल्‍याने तेथे कुणी जात नाही.

इतिहास 

बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार, सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्ने, हिरे, मोती, पाचू, माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लिम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधले गेले. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचे दर्शन घेतले होते. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.

सुळक्यावर झेंडा

सप्तशृंगी पीठाप्रमाणे येथेही शिखरावर निशाण रोवणे हे दिव्य समजले जाते. देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री केला जातो. ते काम वाघाडी येथील सातवी कुटुंब करत आले आहे. त्यांच्याकडे पाटिलकी आल्यामुळे त्यांचे आडनाव पाटील पडले. हा ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी एक महिना मांस, मच्छी, दारू सेवन करत नाही व ब्रम्हचर्य पाळतो. तसेच, कुमारिकांकडून जेवण तयार करवून घेतो.
 

जव्हारचे माजी नरेश कै. यशवंतराव मुकणे यांच्याकडून अनेक वर्षांपासून दर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पाच मीटर लांब ध्वज, साडी, चोळी व पूजेचे साहित्य दिले जाते. फाल्गुन वद्य अष्टमीपासून चैत्र वद्य अष्टमीपर्यत पंधरा दिवस यात्रा-उत्सव भरतो.

चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी बारा नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो. त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारलेली असते. ध्वज लावण्याचे ठिकाण देवीच्या पूजेच्या डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचावर आहे. ज्याच्या अंगात देवी संचारते तोच इसम चढतो. पुजारी तीन मैल चढणीचा रस्ता कापून पहाटे तीन वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी सात वाजता परत येतो. ते दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात.

ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो, तो सागाचा असून दर पाच वर्षांनी बदलावा लागतो. देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी दोनशे फूट भुयारातून जावे लागते. त्या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. तेथील पाणी कधीच कमी होत नाही.

मंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की पेशवाईच्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिने मुसा डोंगरावर असल्याचे सांगितले. ते ठिकाण अर्थात डोंगराच्या पायथ्यापासून चौदाशे फूट उंचावर आहे. तेव्हापासून देवीच्या पूजेचे काम सातवी कुटुंबांकडे आले. तत्कालीन सात सातवी कुटुंबांपैकी सहा कुटुंबे हयात असून प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सातवी कुटुंबातील नवीन पुजारी पूजेचे काम स्वीकारतो. तो एक वर्ष पूजा सांभाळतो. मंदिराचे परंपरागत विश्वस्त म्हणून सातवी कुटुंबातली भावंडे या देवीची पूजाअर्चा तसेच आदिवासी परंपरागत विधी आणि उत्सव साजरे करतात. सध्‍या या घराण्‍यातील दहावी पिढी महालक्ष्‍मी देवीची व्‍यवस्‍था पाहात आहे. पूर्वीच्‍या मराठा राजांनी देवीच्‍या पूजेसाठी सातवी कुटुंबातील सात व्‍यक्‍तींची नेमणूक केल्‍याचे सांगितले जाते. त्यासाठी त्‍यांना सभोवतालचा मोठा परिसर इनाम म्‍हणून दिली. ही जागा कसावी आणि देवीची पूजा करावी असा आदेश त्‍यांना दिला. मंदिराच्‍या ट्रस्‍टकडून अस्तित्‍वात असलेल्‍या सहा कुटुंबांपैकी प्रत्‍येक कुटुंबातून दोन, अशा बारा व्‍यक्‍तींची निवड केली जाते. त्या व्‍यक्‍तींकडे देवीच्‍या पूजेपासून मंदिराच्‍या देखरेखीची पूर्ण जबाबदारी असते. सध्‍या लाडक्‍या गोविंद सातवी, नरेश जान्‍या सातवी, रमेश मंगळ्या सातवी, महेश रघुनाथ सातवी, काशीनाथ कान्‍हा सातवी, चंदू गणपत सातवी, सचिंद्र देउ सातवी, अमृत लहू सातवी, अशोक सुरेश सातवी, प्रकाश गणपत सातवी, बाळू गोविंद सातवी, विनोद जगन सातवी अशा व्‍यक्‍ती देवीच्‍या सेवेसाठी कार्यरत आहेत. महालक्ष्मीच्या आदिवासी पुजा-याला सोवळे माहीत नाही. तो अर्ध्या चड्डीवर पूजा करतो. सोवळे न नेसता देवीची पूजा करण्‍याची ही परंपरा सुरू आहे. आदिवासी या देवीला आपले कुलदैवत मानतात.
 

देवीची यात्रा
 

कोळवणची महालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंत मंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. मंदिर निर्जन जंगलात आहे. मंदिराच्या जवळून महामार्ग जात असल्यामुळे वस्ती वाढली आहे. सुरत, मुंबई मधील हजारो लोक येथे येतात. येथे येण्यासारखी खास बसेस सुटतात.
 

मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. दस-याला जुना ध्वज काढून त्या जागी नवीन ध्वज लावला जातो. यात्रेच्या वेळी ध्वजस्तंभाला बळी देऊन त्याची पूजा करतात. नंतर देवीची पूजा करतात. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहे. त्याच्या दोन्ही बाजूंला दोन होमकुंडे आहेत. डहाणूपासून पुढे थेट गुजरात राज्याच्या सीमेवर जेवढा आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या चालीरीती आणि सांस्कृतिक जीवन या महालक्ष्मीच्या श्रद्धेनेच व्यापलेले आहे. या परिसरात शेत, माळरान व परसात जे पिकते ते या देवीला वाहिल्याशिवाय भक्षण केले जात नाही. 'पितृबारस', 'वाघबारस' आणि 'माहिबारस' हे आदिवासींचे लोकजीवन आणि कलाजीवन जपणारे विधिवत सोहळेच आहेत. निसर्गावर जगणारे, निसर्गाला जपणारे व निसर्ग पूजणारे आदिवासी त्या दिवशी भक्तिभावाने मंदिरात न चुकता जमतात.
 

महालक्ष्मी माता ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्‍यक्‍त करण्यासाठी दरवर्षी वारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदातील पितृपक्षात पितृबारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात, माळात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परसात असूनही कुणी भक्षण करत नाही. पृथ्‍वीमाता ही आदिवासींची मुख्‍य देवता. त्‍यामुळे कुठलेही पिकवलेले नवीन धान्‍य, भाजीपाला देवीच्‍या नावाने वाहिल्याशिवाय तिचे भक्षण केले जात नाही. या खाण्‍यास ‘नवखाणे’ असेही म्‍हणतात.
 

त्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते. त्याआधी एकही आदिवासी कलाकार तारपा वाजवत नाही. दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्‍या कार्यक्रमांनाच तारपानृत्‍य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करते. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी वारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.
 

त्‍यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्‍सव पुजा-याच्‍या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते. तिसरी 'माहिबारस'. ही माघ महिन्यातील शुद्ध द्वादशीला साजरी केली जाते. त्या दिवशी परिसरातल्या लहान देवदेवतांची पूजा केली जाते. बारशीत वंशपरंपरेने जतन केलेली जुनी, दुर्मीळ देवदेवतांची चित्रे पूजली जातात. पायथ्‍याजवळ असलेल्‍या मंदिरातील देवता पुजा-याच्‍या घरी नेऊन पुजल्‍या जातात. हा उत्‍सव पाच दिवस चालतो. प्रत्‍येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दिवसांत भाविक पुजा-याच्‍या घरी जमून देवीची पूजा करतात. पाचही दिवशी पुजा-याकडून भाविकांना जेवण दिले जाते.
 

मंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्रपौणिर्मेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा. या यात्रेची तयारी ज्‍येष्‍ठ प्रतिपदेपासून होते. यात्रेच्‍या निमित्‍ताने मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर घोल या गावाजवळ सूर्या नदीकाठी असलेल्‍या चाचू नावाच्‍या डोहात देवीचे कपडे धुतले जात असत. काठावरील दगडांना छोटी छोटी वर्तुळाकार छिद्रे पडलेली आहेत. त्या छिद्रांत भरपूर पाणी जमलेले असते. छिद्रे असलेले दगड पाहावयास मिळतात. त्याला लोक ‘सासूचे नाक’ म्हणून ओळखतात. जुन्‍या प्रथेनुसार तेथे देवीचे कपडे धुतले जातात. चैत्र महिन्‍याच्‍या पौर्णिमेपासून सुरू होणा-या जत्रेच्‍या पहिल्‍या दिवशी पुजारी देवीच्‍या अंगावरील कपडे घोलगावजवळ सूर्या नदीकाठी धुतात. देवीचे कपडे म्‍हणजे केवळ साडी आणि परकर. दुस-या दिवशी धुतलेले कपडे आणि इतर अलंकार देवीच्‍या अंगावर चढवले जातात. वर्षभरातून देवीच्‍या नऊ अंघोळी होत असून त्या प्रत्‍येक वेळी देवीचे कपडे धुतले जातात. देवीचे कपडे सूर्या नदीत धुतले जात असले तरी देवीला अंघोळ घालण्‍यासाठी मंदिर परिसरात असलेल्‍या विहिरीतील पाणी वापरण्‍याची प्रथा आहे.
 

डहाणू तालुक्यात आदिवासी शेतक-यांकडून घेण्यात येणा-या भात, काकडी, चवळी आदी पिकांचा भोग महालक्ष्मीस चढवण्यात येतो. वारसी उत्सवानिमित्त तेथे एक दिवसाची यात्राच भरते. त्या दिवशी विविध प्रकारच्या मिठायांची, खेळण्याची तसेच शेतीविषयक औषधांची व अवजारांची दुकाने थाटण्यात येतात. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे तेथे मिळणारे चिकन आणि मटण भुजिंग होय. फक्त भुजिंगसाठी इथे येणा-या लोकांचीही संख्याही लक्षणीय असते. चिकनचे भुजिंग बनवण्याकरता कोंबडीच्या मटणाचे छोटे-छोटे तुकडे करून विशिष्ट प्रकारचा मसाला लावून शिगेत घालून ते कोळशावर भाजले जाते. त्याचप्रमाणे मटणाचा खिमा करून त्याच्या मुठिया बनवल्या जातात. आदिवासींनी वर्षभर जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती, सुकी मच्छी, विविध प्रकारचे मसाले, लसूण, कांदे अशा अनेक वस्तूंचा मोठा बाजार ह्या जत्रेत भरतो.
 

देवी

देवी शब्दाचा अर्थ स्त्रीदेवता किंवा देवपत्नी असा असला तरी, पार्वतीलाच देवी म्हणून संबोधले जाते. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे आहेत. पार्वती, उमा, गौरी, भवानी व जगदंबा ही सौम्य तर दुर्गा, चामुंडा, काली, भैरवी ही उग्र रूपे समजली जातात.

देवी द्विभुजा, चतुर्भुजा, षडभुजा, अष्टभुजा, दशभुजा असून तिने बहुतेक सर्व हातांत शस्त्र धारण केलेले आहे. देवींच्या उग्र रूपाला घाबरून भक्त तिला पशुबली अर्पण करतात, शाक्तपंथी लोक तांत्रिक पद्धतीने तिची आराधना करतात.

देवीची प्रमुख नऊ रूपे पाहावयास मिळतात. 1.शैलपुत्री, 2.ब्रह्मचारिणी, 3.चंद्रघंटा, 4.कुष्मांडा, 5.स्कंधमाता, 6.कात्यायनी, 7.काळरात्री, 8.महागौरी, 9.सिद्धिदायिनी.
 

श्री महालक्ष्‍मी मंदिर ट्रस्‍ट
मु. विवळवेढे, पो. चारोटी,
राष्‍ट्रीय महामार्ग, क्र. 8, ता. डहाणू,
जि. ठाणे. पिन कोड – 401607
9272456489, 9226632350

कांचन वडू, मंदिर ट्रस्‍ट अध्‍यक्ष – 9869120249
वसंत सातवी – 9823672234

– बिपिनचंद्र ढापरे
17, बी, शिवम ओंकारेश्‍वर सोसायटी,
विरार पश्चिम, ठाणे – 401303
भ्रमणध्‍वनी – 9637323129

Last Updated On – 28th Feb 2017

About Post Author