कोरोना – जीवन पूर्ववत होईल? (Corona – England Back to normal)

5
20

आम्ही सध्या लंडनमध्य़े राहतो. माझा वाढदिवस मार्चमध्ये असतो. तो यंदा, 2020 साली तिसावा वाढदिवस होता. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व होते. मी आणि माझी पत्नी वाढदिवस एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये दोन मित्रांसमवेत साजरा करायला निघालो. मार्चची ती संध्याकाळ स्वच्छ आणि थंड होती. परंतु इटाली आणि स्पेन या देशांत कोविद19 ने तेव्हा हाहाकार माजवला होता आणि सोशल डिस्टन्स हा शब्द लंडनमध्येही परवलीचा होत होता. मात्र रोग इंग्लंडमध्ये पसरलेला नव्हता, त्यामुळे त्या दिवसाची मौज करून घेऊया असे आम्ही ठरवले. तरी त्या दिवशी आमच्या गप्पा तो रोग त्या रोगाने बदलत जाणारी व्यवस्था याचकडे वारंवार वळत होत्या. विशेषत: वाहतूक व्यवस्था आणि घरगुती गरजेच्या जिनसांचा पुरवठा या गोष्टी बदलून जाणार होत्या. तशी चिन्हे समाजात दिसूही लागली होती. परंतु तरीही त्या रात्री असे मनातही आले नाही, की जेवायला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाणे ही गोष्टच त्यानंतर पूर्णत: विस्मरणात जाणार आहे!

इंग्लंडमध्ये दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला, कारण कोरोनाबाधित रोग्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. आम्ही लंडनला काय काय बेत आखून आलो होतो! आम्हाला भटकायचे होते, नवे जग पाहायचे होते; चरितार्थासाठी काम तर करायचे होतेच होते. पण आम्हाला लंडनमध्ये येऊन सहा महिने झाले नाहीत, तोच ही आपत्ती भलत्याच कोठून तरी उद्भवली होती! आम्हाला आमच्या जीवनक्रमाचाच फेरविचार करण्यास लावणारे असे काहीतरी घडत आहे याची जाणीव झाली. मी म्हणालो पाहू, की हे किती काळ टिकेल, कदाचित एक महिना, दोन महिने?
देवयानी व सागर साठे

         मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघे भारतात जन्मलो. आमचे संगोपन ऑस्ट्रेलियात झाले. आम्ही ऑस्ट्रेलियननागरिक आहोत. ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून आम्हाला इंग्लंडमध्ये राहण्याच्या, हिंडण्याफिरण्याच्या काही सवलती आहेत. आम्ही तेथे एक-दोन वर्षांपर्यंत निवास करू शकतो. आम्हा दोघांची ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पाच-सात वर्षे नोकरी करून झाली होती, म्हणून आम्हाला वाटले, की काहीतरी वेगळे करून पाहूया. म्हणूनच आम्ही इंग्लंडमध्ये येऊन राहण्याचा निर्णय ऑक्टोबर 2019 मध्ये घेतला. दुसर्‍या देशात जायचे आणि तेथे राहण्या-जगण्याचा अनुभव घ्यायचा अशी ती कल्पना होती. 


घडलेही तसेच. कोविद-19 चा प्रादुर्भाव होण्याआधीच्या तीनचार महिन्यांत आम्ही युरोपातील आठ स्थळांना जाऊन आलोदेखील. त्यामध्ये स्कॅन्डेव्हिया आणि आईसलँड या देशांमधील आमच्या दोघांची आवडती दोन शहरेही होती. तो आमचा अनुभव खरोखरच भव्यदिव्य म्हणावा असा होता. कारण सहसा टूर प्लानमध्ये पर्यटकाचे कोणत्याही शहरी राहणे जेमतेम एखाददोन दिवस असते. परंतु आम्ही आमच्या मर्जीने त्या प्रत्येक स्थळी जात होतो-तेथून निघत होतो. आमच्या त्या आनंदयात्रेला लॉकडाऊनमुळे अचानक खीळ बसली. तरीही येता काही काळ तरी लंडन हेच आमचे शहर असणार आहे. आम्ही गेल्या डिसेंबरमध्ये लंडनचा ख्रिसमस अनुभवला, त्यानंतर आम्ही लंडनच्या थंडीत तेथील गडबडीच्या आयुष्याशी सरावत होतो. परंतु आमचे तेथील जीवनात मिसळून जाणे काही दिवसांच्या अवधीतच हरवले गेले.

मी टीव्हीवरील बातम्या दररोज पाहत नाही. पण मी अलीकडे बातम्या व पंतप्रधानांची भाषणे औत्सुक्याने ऐकतो. तेवढ्या कुतूहलाने मी ती पूर्वी कधी ऐकलेली नाहीत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत. ते व त्यांचे सहकारी कोविद-19संदर्भात जवळजवळ दररोज निवेदने करत असतात. इंग्लंडमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधात सूट देण्याची घोषणा 15 जून 2020 रोजी करण्यात आली. त्यानंतर सरसकट सर्व दुकाने नेहमीप्रमाणे उघडली गेली. 23 मार्चच्या पूर्ण लॉकडाऊननंतर जवळजवळ तीन महिन्यांनी दुकाने उघडली जात होती. तरीसुद्धा दुकाने आणि त्यांतील खरेदी-विक्री व्यवहार कोविदपूर्व खुलेपणाणे सुरू झाले नाहीत. काही बंधने कायम होती. मोकळ्या जागांवर आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टन्स म्हणून दोन मीटर अंतर आवश्यक ठरवले गेले. दुकानांत प्रवेश करताना आणि सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना प्रत्येकाने तोंड आणि नाक झाकणे हेही आवश्यक ठरवले गेले. इंग्लंडमध्ये कोविद-19मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटत गेली आहे. मात्र कोविदची साथ पुन्हा प्रबळ होऊ नये म्हणून सरकारने सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.

         

इंग्लंड, अमेरिका वा भारत, कोठेही गेले तरी सध्या स्वत:ची सुरक्षितता हे सगळ्यात मोठे पथ्य आहे. इंग्लंडमध्ये आम्हाला दिवसातून एकदाच व्यायाम अथवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी यासाठी बाहेर पडता येते. पहिले काही दिवस अशा बंधनांचा त्रास झाला नाही, पण नंतर मनात आले, की आपण बऱ्याच गोष्टी गृहित धरतो का? प्रकृतीची काळजी/स्वत:चे आरोग्य याबाबत आपण फार जागरूक नाही का?  या ज्या स्वत:च्या स्वत:ला सवयी होत्या त्या अशा वेळी खूप महत्त्वाच्या ठरतात; त्याचप्रमाणे संकटकाळात व्यक्तिगत गरजा व सार्वजनिक सुरक्षितता याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

          जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर झाला. युरोपातील देशांनी त्यांच्या राष्ट्रीय सीमा बंद करून घेतल्या होत्या. आता त्या काही देशांनी खुल्या केल्या आहेत. त्या देशांना जाऊन इंग्लंडमध्ये परत येणे शक्य झाले असले तरी आल्या आल्या विलगीकरण करावे लागते. या विविध बंधनांमुळे आम्ही आमचा इंग्लंडमध्ये राहण्याचा आणि त्यातील वेगळेपणा अनुभवण्याचा बेत मात्र रद्द केलेला नाही. वा इंग्लंडमधील मुक्कामात कपात केलेली नाही.
निसर्गाने मानवाचे आयुष्यच कुंठित करून टाकले आहे. सर्व देशांच्या सर्व लोकांपुढे काही प्रश्न उभे राहिले आहेत. ते मला येथे शब्दबद्ध करावेसे वाटतात. जनजीवन पुन्हा कोविदपूर्व काळात होते त्याप्रमाणे पूर्ववत होणार आहे का? आम्ही आमचे इंग्लंडमधील जीवन पूर्वीप्रमाणे सुरू करावे की नाही? का आम्ही आयुष्य सोशल डिस्टन्सचा नवा नियम स्वीकारून नव्या आव्हानाने जगणे सुरू करावे आणि जणू 2020 हे वर्ष आपल्या आयुष्यात आलेच नाही असे म्हणून ते मागे सारावे? जीवनाविषयीच्या एरवी कधीच समजल्या नसत्या अशा गोष्टी आपल्याला या वर्षभरात कळल्या का? जीवन पुन्हा पूर्ववत होईल? की सुरळीत जीवन हीच नव्या काळातील सर्वात महागडी गोष्ट असणार आहे?
सागर साठे sgrsthe@gmail.com
सागर साठे यांचे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनी येथे मास्टर ऑफ बिझनेसचे शिक्षण झाले आहे. ते डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये कार्यरत आहेत.
————————————————————————————————————————– 

———————————————————————————————————-

About Post Author

5 COMMENTS

  1. सुंदर लेख.श्री साठे यांनी उपस्थित केलेले प्रश्न खरोखर च मूलभूत आहेत.जनजीवन पूर्ववत् होईल का आणि कधी ? हा प्रश्न सा-या जगाला भेडसावत आहे.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.

  2. आजवर या प्रकारचे परदेशी भारतीयांचे बरेच लेख वाचले. अन्य देशातले प्रत्यक्ष अनुभव काय आहेत याची माहिती मिळते. अनुभवातले सारखेपण आढळते 

  3. खूपच छान लिहिले आहेस सागर. अगदी प्रत्येकाच्या मनातील विचारच मांडले आहेस

  4. जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न चांगला आहे.. . भ्रमंती मस्तच – नयन भादुले-राजमाने 'साहित्यनयन',लातूर

  5. खूप छान!इंग्लंड मधील असेच अनुभव ऐकायला नक्की आवडेल.तेव्हा लिहीत जा.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here