कोरोना – किती काळ? (Corona – How Long?)

 

कोरोनाहे एक अटळ वास्तव म्हणून लोकांनी आता स्वीकारले आहे. त्या संबंधातील चर्चा दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसते. म्हणजे आर्थिक मंदी, सामाजिक-सांस्कृतिक संभाव्य बदल हे प्रश्न भविष्यावर सोडून देऊन सध्या लोकांना त्रस्त करणार्‍या दोन गोष्टी कोणत्या? तर लक्षणे नसताना कोरोना पॉझिटिव्ह येतो म्हणजे काय होते? त्यातून तो रोगी बरा झाला असे कसे समजायचे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना संपणार तरी केव्हा आहे?
          पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील फिजिशीयन व जेरीआट्रीशीयन डॉक्टर संदीप तामणे याच्या मते, कोरोना हा फार झपाट्याने व सहजतेने संसर्ग होणारा रोग असल्याने त्याची बाधा सर्वत्र होत जाते. तो दुर्बल व्यक्तींना बाधतो. बाकी सुदृढ व्यक्तींना त्याचे शरीरातील अस्तित्व जाणवतही नाही. तरीदेखील त्या व्यक्ती स्प्रेडर वा कॅरियर असू शकतात. त्यामुळे त्यांना स्वतःला जरी कोरोना विषाणूचा त्रास झाला नाही, तरी त्यांच्यामुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना विलग ठेवले जाते. तेथे त्यांच्यावर खास उपचारांची गरज नसते. विषाणू नष्ट झाला, की त्यांची रोग चाचणी निगेटीव्ह येते व त्या व्यक्तीची सुटका होते. सामाजिक गरज म्हणून लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला आयसोलेशनमध्ये राहवे लागते. एक विचार तर असा पुढे येतो, की प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लागण होतच असते किंवा होणारच आहे.
          कोरोना किती काळ? या प्रश्नावर डॉ.संदीप तत्काळ म्हणाला, की किमान सप्टेंबरपर्यंत तरी ही साथ त्रास देत राहणार असे आम्ही धरून चाललो आहोत. पण गंमत अशी, की साथ येते तशी जाऊ शकते! ‘सार्स’ रोग तसाच नाहीसा झाला होता आणि कोरोना सार्सच्याच कुळापैकी आहे. पण तो आशावाद झाला. माझ्या कानावर या संबंधात दोन अभ्यास आले आहेत. एकतर इंग्लंडमधील इंपिरियल कॉलेजने केलेला. तो महिन्यापूर्वीचा आहे. त्यावेळी इंग्लंडमध्ये साथीला तीव्र स्वरूप आले नव्हते. कॉलेजच्या प्राध्यापकांनी दीड वर्षाचा अंदाज बांधला आहे व तेवढ्या काळासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे वेळापत्रक तयार करण्यास सुचवले आहे. दुसरा मी ऐकलेला अभ्यास आहे, अमेरिकेतीलहार्वर्ड विद्यापीठाचा. त्यांनी कोरोना 2022 ते 2024 पर्यंत राहू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. खरे तर जगभरच्या वैज्ञानिकसमुदायात याबद्दल गोंधळाचे वातावरण आहे. देशोदेशीचे वैज्ञानिक लस व औषध किती झपाट्याने बनवता येईल यासाठी झटत आहेत. दुसऱ्या आघाडीवर डॉक्टर लोकांनी कोरोना रोगाच्या प्रसारावर मात करण्यासाठी शर्थ चालवली आहे. जगभरची साडेसातशे कोटी जनता हा खेळ भयचकित होऊन पाहत आहे. आपण त्या तपशिलात फार न जाता ‘कोरोना‘ हे पृथ्वीतलावर दीर्घकाळ राहणारे संकट आहे असे गृहित धरून तयारी करावी. म्हणजे 3 मे रोजी लॉकडाऊन संपेल तेव्हा कोरोना संपला असे म्हणून लोकांनी उधळल्यासारखे वागणे ठीक होणार नाही.
          मी डॉ. संदीप यांच्याशी बोलण्याचे कारण म्हणजे तो आमचा कुटुंबमित्र आहे. मी त्याची अभ्यासू वृत्ती त्याच्या बालपणापासून पाहत आलो आहे. शिवाय तो मितभाषी आणि त्याची वृत्ती नेमस्त… त्यामुळे कितीही मोठे संकट उभे ठाकले तरी शांत चित्ताने व धीराने सामोरा जाणारा. तो कधी खळबळाटी विधान करणार नाही. शिवाय, संदीप मुंबईतून एमबीबीएस व एमडी झाल्यावर इंग्लंडमध्ये जाऊन जेरिआट्रिक या वृद्धत्व काळातील आजारांचा विशेषज्ञ होऊन आला आहे. तो 1997 ते 2003 अशी सहा वर्षे इंग्लंडमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलांत काम करत होता. त्याने एडिंबरोच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’ची एफआरसीपी ही मानाची पदवी मिळवली आहे. त्यामुळे तो एमआरसीपी(युके) या जगन्मान्य परीक्षेसाठी एक्झॅमिनर होण्यास पात्र ठरला आहे.

 

          मी डॉ. संदीप यांना विचारले, की कोरोनाचात्रास वृद्धांना अधिक होतो. त्या कामाचे दडपण तुझ्यावर सध्या आले आहे का? संदीप म्हणाला, की नाही. अजून रोग आपल्याकडे तसा फैलावलेला नाही. तो दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे, पण अजून आटोक्यात आहे. आमच्या ‘दीनानाथ’मध्ये ‘कोरोना’साठी वेगळी व्यवस्था आहे. तेथे आयसीयु व आयसोलेशन असे दोन विभाग आहेत. शिवाय हॉस्पिटलात ‘फिवर’ हा वेगळा वॉर्ड केला आहे. हॉस्पिटलात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून, रोग्यास गरज असेल तर ‘फिवर’ या वॉर्डात पाठवले जाते. संदीप ‘मेट्रोपोलीस डायग्नोस्टिक सेंटर’ची काही जबाबदारी पूरक फिजिशीयन म्हणून सांभाळतो. तेथे सध्या कोरोनाच्या तपासणी जोरात चालू आहेत. संदीप म्हणाला, की वृद्ध माणसांची प्रतिकारशक्ती मंदावलेली असते. शिवाय, त्यांना मधुमेह, रक्तदाब, मुत्रपिंड, हृदयविकार यांपैकी काही आजार असण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोना त्यांच्यावर अधिक आघात करतो.
डॉ. संदीप याने ‘कोरोना’च्या संक्रमणासंबंधात ‘कर्व्ह’चे curve महत्त्व मुद्दाम सांगितले. तो म्हणाला, की कोणत्याही समाजात कोरोनाचा आलेख चढता दिसतो. तो वरवर जातो त्यानंतर खाली येऊ लागतो. खाली आल्यावर त्याची सपाट रेषा होणे महत्त्वाचे आहे. सध्यातरी डॉक्टरांचे सर्व लक्ष या आलेख रेषेच्या चढउतारावर रेखलेले असते. साधारणपणे शंभर लोकांना कोरोनाची लागण झाली तर त्यापैकी ऐंशी लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे दिसतात. दरम्यान, समाज म्हणून प्रतिकारशक्ती वाढण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकते. (हर्ड इम्युनीटी Herd Immunity). संदीप म्हणाला, की सध्या वेगवेगळ्या संस्था अँटीबॉडी चाचण्या फार झपाट्याने विकसित करत आहेत. त्यांचा उपयोग मर्यादित व सकृतदर्शनी आहे. खात्री पटवण्यासाठी घसा व नाक यांच्यातील स्वॅप घेऊन तपासणी करावी लागतेच. पहिली चाचणी म्हणून अँटीबॉडी टेस्ट चांगल्या आहेत.
          अतिविचार हे भीतीचेच रूप असते असे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचा प्रत्यय ‘कोरोना‘बाबतच्या जगभरच्या चर्चा-लेख-भाषणे यांमधून येत असतो. कधी वाटते, की अजय देवगण, अमीर खान हे जसे दीर्घ श्वास घेऊन, मन:शक्ती जागृत करून खलनायकास नष्ट करतात, तसा कोरोना शत्रूचा निःपात करावा. पण सध्या सगळी स्वप्ने, योजना, संकल्प यांना काही अर्थ राहिलेला नाही, हे लगेच ध्यानात येते व निष्ठेने, जिद्दीने, एकाग्रतेने चोवीस तास कामे करणारे उद्धव ठाकरे, राजेश टोपे, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी दिसू लागतात आणि लॉकडाऊनमध्ये निमूट घरी राहणे हीच स्वतःची जबाबदारी आहे याची जाणीव होते! सहसा विधान असते, की देशासाठी काही करा – देश असेल तर तुम्ही आहात. कोरोनाकाळात विधान उलट आहे – तुम्ही शिल्लक राहाल तर देश राहील! व्यक्तीला असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
डॉ. संदीप तामणे 9822639521 drsandeepuk@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
————————————————————————————————————–

About Post Author

10 COMMENTS

  1. लेख वाचला …थिंक महाराष्ट्राचा दृष्टिकोन कशात अडकू नका स्वतःला स्वतंत्र माना आणि कोणत्याही गोष्टीचा सामना करा. जीवन तोकडे करू देऊ नका..गोष्टी बदलत जातात .. जेवण झोप वस्त्र निवारा यानंतर म्हणून काही आयुष्य आहें …त्यामुळे कोणतीही भीती अथवा मर्यादा यावर मात करून पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे ….बदल आणि प्रसंग तात्कालिक आहेत …ते बदलतील त्याची भीती बाळगण्यात हशील नाही ..पण ..नंतर काय हा विचार महत्वाचा..त्याची तयारी करताना आजचा प्रश्न लगेच सुटणार नाही पण सुसह्य होऊन मागे पडेल आणि म्हणूनच लेख आशादायी तसेच महत्वाचा आहें

  2. वास्तवदर्शी आणि आशावादी लेखन आहे. आपण स्वतःची काळजी घेणं हेच सर्वोत्तम. आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करून आशावादी आणि सकारात्मक। रहावं असं वाटतं. त्यामुळे पुढे गेल्यावर कठीण परिस्थिती समजा आलीच तर आपण तयार असू

  3. लेख माहितीपूर्ण असून विचार स्पष्ट आहेत. शेवटी काळच ठरवीणार आहे. – डॉ. अविनाश वैद्य

  4. लेख माहितीपूर्ण आहे. शिवाय तो डाॅ.संदीप तामणे यांच्यासारख्या अभ्यासू डाॅक्टरने लिहिल्यामुळे महत्वाचा.धन्यवाद यथार्थ माहिती दिल्याबद्दल. अनुराधा म्हात्रे

  5. लेख माहितीपूर्वक आचरणात णण्याजोग आहे। विशेषत वृध्दांनी स्वतःची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपली काळजी घेणे अत्यावश्यक आहे स्वतःचे छंद आवडी जपून घरातच राहणे अत्यावश्यक आहे। माझा संगीताचा ग्रुप घरी बसून माऊथ ऑर्गन या वाद्याचा परिपूर्ण अभ्यास करायचा प्रयाण करीत आहेशामकांत सुतार

  6. कोरोना हा छुपा पण घातकी शत्रू बाहेर आपली वाट पाहतोय!पण त्याला हरवायला आपल्याजवळ एक प्रभावी शस्त्र आहे,ते म्हणजे संयम!!!या शस्त्राच्या साहाय्याने आपण ही लढाई जिंकणार आहोत!दुसरं महायुद्ध सहा वर्षे चाललं,तेव्हा सहा वर्षाची मानसिक तयारी करू व आशावादी राहून,वर्ष दोन वर्षांनी सापडू शकणाऱ्या औषधाची प्रतीक्षा करू,हरीची ओळख घ्यायला यापेक्षा सुंदर काळ नाही!!!!!!

  7. सर, नमस्कार 🙏लेख माहितीपूर्ण आहे. कोरोनाशी लढतांना आत्मविश्वास न हरवू देता स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे हेदेखील महत्वाचे आहे. सुंदर लेख…!

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here