कोरोना काळात गवसली आनंदाची गुरुकिल्ली: सोनाली जोग (Lockdown In Search Of Spirituality)

 

अमेरिकेत सरकारी पातळीवर कोरोना वायरसशी सामना करण्यासाठी हालचाली 1 मार्चच्या सुमारास सुरू झाल्या. तोपर्यंत करोनाग्रसतांचा आकडा तसा कमीच होता, परंतु त्याच्यापुढे येऊ घातलेल्या परिणामांची चाहूल लागल्याने, आम्हाला घरून काम करण्याचे आदेश 10 मार्चच्या सुमारास मिळाले. त्याच दरम्यान, पर्ड्यु युनिव्हर्सिटीत शिकणारा माझा मोठा मुलगा वेदांत, West Lafayette, Indiana ते Clarksburg, Maryland असा इंटरस्टेट प्रवास करून आठवड्याच्या सुट्टीसाठी घरी आला. त्याचे येणे आणि घरून काम करण्याचा आदेश मिळणे हा योग चांगलाच जुळून आला. त्यामुळे मी मनोमन खूप सुखावले. सगळे कुटुंब एकत्र, मग काय गप्पा मारत वेगवेगळे पदार्थ बनवणे त्याचा फडशा पाडणे आणि सिनेमे बघणे...! आठवडा अगदी मजेत गेला. शाळा व सरकारी ऑफिसे बंद होत होती. वेदांतच्या युनिव्हर्सिटीनेसुद्धा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना शिकवायचे त्या करता लागणारे रेकॉर्डिंग्स, अभ्यासक्रम ह्याची तयारी नव्हती. त्यामुळे शाळाकॉलेजातील शिक्षक-प्रोफेसरसुद्धा थोडे गोंधळले. अमेरिकेतहीबऱ्याच लहान मुलांकडे लॅपटॉप नसल्याने आधी ते वाटण्यात आले, त्यांच्या कुटुंबाना इंटरनेटची सोय करून देण्यात आली. तो पर्यंत फक्त अभ्यासाच्या असाईनमेंटस् दिल्या जात होत्या. पण एकूणच पुरेशी तयारी नसल्याने शाळेतील मुलाचा अभ्यास फारच कमी झाला. कॉलेजचा अभ्यास तसा भरपूर, पण तरीही वेदांत आणि सिद्धांत ही माझी दोन्ही मुल जाम खू होती. आरामात उठायचे, हवे तेव्हा आवरायचे आणि मनाला येईल तसा अभ्यास करायचा हेत्यांनाही तसे नवीनच होते. पण ते त्यांना आवडले. एकूण काय तर मुलांची मज्जा चालू होती!

          आम्हा दोघांचेही आयुष्य थोडे सोपे झाले होते. हवे तेव्हा काम करता येत होते, प्रवासाचा त्रास नव्हता; शिवाय, मुले सोबतीला होती. अमेरिकेत कामवाली मावशी हा कन्सेप्टच नाही त्यामुळे घरातली सगळी कामे स्वतः करण्याची सर्वांना सहज सवय होती. म्हणून लॉकडाऊनचा तोतोटाही मला जाणवत नव्हता. भारतातील लॉकडाऊन सुरु झाले आणि त्याच दिवसां, भारतातील माझ्या बहिणी, मैत्रिणी यांच्या कामवाल्या मावश्या नसल्यामुळे होणाऱ्या तारांबळीच्या कंप्लेंट ऐकून मजा वाटायची. त्यांना मी गंमतीत म्हणायचे, आता तुम्ही अमेरिकेत यायला-राहायला तयार झालात!’तोवर तरीआम्हाला परिस्थितीचे गांभीर्य फारसे जाणवले नव्हते.

          संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडल्यावर बरेच ओळखीचे चेहरे, मित्र-मैत्रिणी भेटत होते. पण हळूहळू बाहेरची परिस्थिती बदलत आहे ह्याची जाणीव होऊ लागली. दुकाने, मॉल बंद झाले. फिरण्यास बाहेर पडणारे लोकही कमी झाले. भारतीय पदार्थ मिळणाऱ्या दुकानातील वस्तू महागल्या. बऱ्याच वेळेला, त्या संपलेल्याही असायच्या. माझा नवरा रणजीत सर्व सामान आणण्यास आठवड्यातून एकदा बाहेर पडे.तेव्हा त्याने आणलेले सामान काळजीपूर्वक धुन-पुसून वापरास घेणे, बाहेरचे कपडे वेगळे धुणे... आम्ही ह्यासारखे नियम तंतोतंत पाळू लागलो. काळजी घेणे आपसूक जमू लागले! एरवी, शनिवाररविवारची सकाळची वेळ भारतात फोन करण्यासाठी राखलेली असायची, पण त्यानंतर फोनवर बोलणे रोजच होऊ लागले. सातासमुद्राच्या अंतरावर राहणाऱ्या सगळ्यांवर अचानक ओढवलेल्या त्यासंकटाची थोडी भीती वाटू लागली आणि एकमेकांविषयी वाटणारी काळजीही वाढली.
          दोन आठवड्यानंतर वाटू लागले, की आपण काय करतोय? नुसता वेळ वाया जातोय! मग घरसफाई, बागेची सफाई यांसारखी कामे जमेल तशी सुरू केली. नेटफ्लिक्स, मेझॉन प्राईमवर उपलब्ध असणाऱ्या, पूर्वी वेळेअभावी पाहण्याच्या राहून गेलेल्या, पण आवडीच्या सगळ्या मालिका, सिनेमे, सगळे अगदी डोळे थकेपर्यंत बघून झाले. त्याचाही कंटाळा आला. त्याच्याच जोडीला, वॉटसअॅपवरचे जोक्स, कविता, लेख वाचण्यास, मजा येत होती त्याचाही कंटाळा आला. अनेक सेलिब्रिटी, नेते आणि सोमेगोमेही कोरोनावर कवितालेखन, भाषणे आणि सल्ले देताना पाहण्याचा आणि ऐकण्याचा तर प्रचंड कंटाळा ला. दोन ते तीन आठवड्यात मज्जाह्या शब्दाची, जागा कंटाळाने घेतली!
खरे तर इतका रिकामा वेळ मला कधीच मिळाला नव्हता म्हणून माझेही, सुरुवातीला, अचानक लॉटरी लागल्यावर होते तसे झाले. वेळच-वेळ! शाळाकॉलेजांतील सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोन, झूमच्या मदतीने झालेल्या भेटी यांची खूप मज्जा वाटली. परंतु खूप साठलेल्या गप्पा, जुन्या आठवणींना मिळालेला उजाळा, थोडेसे गॉसिप... सगळे-सगळे एक- दोन आठवड्यांमध्ये कमी झाले. गप्पाचे विषय संपले. एकीकडे आयुष्यात काहीतरी सुटत आहे, तुटत आहे सतत वाटत होतेच. तोवर पाच आठवडे संपत आले होते. तेव्हा वाटले, की स्वतःला ज्या गोष्टी करण्यास इतर वेळी फार वेळ मिळत नाही, त्या गोष्टी सुरू कराव्या. तेव्हा चार-पाच स्केचेस
काढली, एक-दोन पेंटिंग्स केली, अर्धवट राहिलेली काही चित्रे पूर्ण केली, गाणी रेकॉर्ड केली, कविता लिहिल्या, काव्यवाचन करून त्याचे रेकॉर्डिंग केले, पुढे त्याच कवितांचे व्हिडिओ करून युट्यूबवर प्रसिद्धसुद्धा केले!त्याशिवाय लेख लिहिले, कपडे शिवण्याची मशीन बाहेर काढून मास्क शिवले, कलाकुसरीला नुसता ऊत आला होता! सगळ्यानी भरभरुन कौतुक केले. एरवी, ऑफिसमुळे लवकर झोपायचेलवकर उठायचे टेंन्शन असायचे म्हणून. ज्यातून स्वतःला खरा आनंद मिळतो तेच करण्यास वेळ नसे.स्वतःआयुष्य खूप मेकॅनिकली जगत आहोत ह्याची खंत वाटे. स्वतःचे छंद जोपासण्यास मिळाले तर मज्जा येईल असेहीवाटायचे. पण प्रत्यक्षात वेळ मिळाला तेव्हा हे सगळे छंद पुरे करण्याचा म्हणावा तसा आनंद मिळाला नाही. बहुतेक एखाद्या लहान मुलाला एकदम वेगवेगळ्या प्रकारची शंभर चॉकलेटे दिली तर त्याची किती धांदल उडेल? कोणते चॉकलेट आधी खाऊ आणि कोणते नंतर? किती खाऊ? मग कोठेतरी चॉकलेट मिळाल्याचा आनंद बाजूला राहून ते संपवण्याचे टेंन्शन उरेल ना! सेच काहीसे माझेही झाले. घरभर पेपर्स, पेंट, शिलाई मशीन, कपडे पसरलेले दिसू लागले… आणि माझा आनंद मिळवण्याचा प्रवास काय सुटत आहे ह्याचा शोध चालूच राहिला.
 सात आठवड्यांचा गृहवास होत आला तेव्हा बाहेर परिस्थिती खूपच बिकट झाली होती. म्हणजे भारतातील आमची काळजी करणाऱ्या नातेवाईकांच्या रोज येणाऱ्या फोनमुळेच आम्हाला येथील भीषण आकड्यांची टक्केवारी कळत होती. आम्ही न्यूज फारसे बघतच नव्हतो आणि आमची येथील मित्रमंडळी सगळी त्या आजारपासून दूरच आहेत. म्हणून आम्हाला कोणाला त्याचे गांभीर्य कळत नव्हते. येथे आमच्या सगळ्या मित्रमंडळींचे आयुष्य आरामात चालू आहे. नोकऱ्या व पगार चालू आहेत. फोनवरून भाज्या, इतर किराणा व रेस्टारंटसुद्धा घरपोच सगळे पोचवत आहेत. एकट्याने कंटाळा येतो म्हणून व्हिडिओकॉलवर गप्पा मारत जेवणे चालू आहे. काही लोक अक्षरशः दहा आठवड्यापासून अंगणातसुद्धा बाहेर पडलेले नाहीत, तर काही जण सुट्टयाअसल्यासारखे सर्वत्र फिरत आहेत. कोरोना झालेल्या लोकांचा आकडा वाढत आहे अशाबातम्या येत असल्या तरीही खूप गंभीर वातावरणाचा अनुभव आम्हाला मिळाला नव्हता. भारतामध्ये सण असो, की असा गंभीर काळ असो सगळे एकदम हपनिंग वाटते.अमेरिकेत आम्ही बारा महिने आणि चोवीस तास आयुष्य तुटकच जगत असतो. म्हणजे कायमच सेल्फ क्वारंटाइन म्हणा ना!       

 

सोनाली जोग त्यांचे पती रणजित जोग
आणि दोन मुले वेदांत आणि सिद्धांत

आता मात्र, आज ना उद्या स्वतःलाही ह्या कोरोनाला सामोरे जावे लागणार आहे ह्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. मग विचार केला, चला! आयुष्य थोडे नियमित बनवून बघू! हवे तेव्हा हवेसेकेल्यामुळे कदाचित हातात काहीच पडत नसावे. मग सगळे काही थोडे थोडे करण्याचे ठरवले. थोडा व्यायाम, थोडी कामे, पण कधी ऑफिसचे काम खूप असते तर कधी कमी, त्यामुळे नियमांचा आग्रह रूनही फारसे चालत नाही हे लगेच लक्षात आले. खरेतर, फेसबुकवर इस्कॉनची खूप सुंदर सुंदर प्रवचने चालू आहेत. खूप भक्तांनी खूपसे नियम करून त्यांच्या ध्यात्मिक प्रगतीवर जोर दिला आहे. माझा मात्र अध्यात्माकडे ओढा असूनही रोजचा जपसुद्धा  दहा वेळा थांबत थांबत चालू असतो. एखादे प्रवचन किंवा थोडेसे वाचन इतकेच कसेबसे जमते. घरच्यांचे मन मोडून फार कशाचा अट्टाहास करायचा नाही, या धोरणावर असणाऱ्या माझ्या विश्वासाचा अडथळा ध्यात्माच्या ओढीवर होत आहे का, असे वाटे. त्याविचारातून येणारे नैराश्य कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात जाणवत असते. लॉकडाऊननंतर नऊ आठवड्यांनी, माझी गाडी रुळावर कशी-बशी येत आहे, थोडासा ध्यात्मिक अभ्यास सुरू झाला आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होतो असे वाटू लागले आहे. गंमत म्हणजे, ह्याच काळात माझ्या वाचण्यात उपदेशामृत नावाच्या पुस्तकातील एक श्लोक आला.त्यात असे म्हटले आहे, कीअती आहार, अती प्रयास (अट्टाहास), वायफळ गप्पा, नियमांचा आग्रह, जनसमुदाय (ज्यांना कृष्णाची आणि भक्ताची आवड नाही अशा लोकांचा समुदाय) आणि लालचीपणा (एखाद्या गोष्टीची अतिइच्छा) या सहा गोष्टी भक्तीमध्ये अडथळा आणतात. या सहा गोष्टी भक्तीकरता मारक आहेत त्याच माणसाच्या आनंदाचा नाश करतात. गंमत म्हणजे त्याआधीच्या नऊ आठवड्यांमध्ये मी तेच तर अनुभवले होते. मी पूर्वी जे प्रिय आहे आणि ज्यासाठी वेळ नाही रडायचे ते सगळे करून बघितले, पण नैराश्य वाटेला आले. कदाचित, मी खरा आनंद कशात आहे याची जाणीव व माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून असेल; खरा आनंद खाण्यात, सिनेमात, इतर छंद जोपासण्यात नसून तो मनातील निखळ आनंद प्रतिबिंबित झाल्यासच जाणवतो हे सत्य मला उमजले. सरकारने ‘स्टे होम सोमवारपासून संपणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे सगळे काही बदलणार आहे. पण मला आनंदाची गुरुकिल्ली मिळाल्याचा ठेवा माझ्याबरोबर कायम राहणार आहे हे नक्की!

सोनाली जोग-पानसरे ransonali@gmail.com
सोनाली जोग-पानसरे या मेरीलँड (अमेरिका) येथे वीस वर्षांपासून राहतात. त्या अमेरिकन फेडरल सरकारमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतात. त्यांना चित्रकला,लेखण सामाजिक कार्य असे विविध छंद आहेत. त्याखेरीज त्यांना आध्यात्माची ओढ आहे. त्या दहा वर्षांपासून इस्कॉनशी जोडलेल्या आहेत. त्यांचाजन्म व शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यांनी जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून वाडिया कॉलेज (पुणे), जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेज (औरंगाबाद), इव्हीपी कॉलेज (चेन्नई) अशा तीन ठिकाणी अध्यापन केले. त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. त्यांचे पती रणजित जोग हे आहेत आणि त्यांना वेदांत आणि सिद्धांत अशी दोन मुले आहेत. सोनाली जोग यांचे आजोबा दादा पानसरे हे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचे निकटचे शिष्य आणि भक्त होते.

———————————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleकोरोना: मोदी-ठाकरे यांनी काय करावे? (Protagoras Paradox And Corona)
Next articleथिंक महाराष्ट्र डॉट कॉम – निवेदन आणि आवाहनदेखील! (Think Maharashtra – Appeal)
सोनाली जोग-पानसरे या मेरीलँड (अमेरिका) येथे वीस वर्षांपासून राहतात. त्या अमेरिकन फेडरल सरकारमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतात. त्यांना चित्रकला,लेखण व सामाजिक कार्य असे विविध छंद आहेत. त्याखेरीज त्यांना आध्यात्माची ओढ आहे. त्या दहा वर्षांपासून इस्कॉनशी जोडलेल्या आहेत. त्यांचाजन्म व शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यांनी जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून वाडिया कॉलेज (पुणे), जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेज (औरंगाबाद), इव्हीपी कॉलेज (चेन्नई) अशा तीन ठिकाणी अध्यापन केले. त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. त्यांचे पती रणजित जोग हे आहेत आणि त्यांना वेदांत आणि सिद्धांत अशी दोन मुले आहेत. सोनाली जोग यांचे आजोबा दादा पानसरे हे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचे निकटचे शिष्य आणि भक्त होते.

4 COMMENTS

  1. वा !लेख वाचून खूप छान वाटले .घरात राहून वेळेचा सदुपयोग केला व खरा आनंद कशात आहे हे पण समजून आले .हा फुरसतीचा काळ म्हणजे सोनालीची अंतर्यात्राच वाटली जी अनेक जणांना विचार करण्यास भाग पाडेल . सौ.अंजली आपटे दादर.

  2. खूप सुंदर लेख.सोनाली खूप छान व्यक्त झाली आहे.कोणत्याही संवेदनशील माणसाची हीच मनःस्थिती आहे.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे

  3. सोनाली ताई लेख खूप आवडला.अंतर्मनाचा आवाज तुम्हाला ऐकू आला व आनंदाची गुरू किल्ली तुम्हाला सापडली.जी अवस्था तुम्ही अनुभवलीत त्याच अवस्थेतून अनेकजण जात आहेत.त्यांना हा लेख त्यांच्या आनंदापर्यंत नक्की पोचवेल.ॲड.स्वाती लेले.अलिबाग-रायगड

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here