कोण होते सिंधू लोक! More about Indus civilization (Sindhu Sanskrutee)

ऋग्वेदाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. त्यांत प्रामुख्याने दोन गट पडतात. एका गटात युरोपीयन पंडित आहेत. ते मॅक्समुल्लरने दिलेला काळ (इसवी सनपूर्व 1200-1000) मान्य करतात. दुसऱ्या गटात प्रामुख्याने भारतीय विद्वान आहेत. त्यांच्या मते, ऋग्वेद पाच हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहे. मी ऋग्वेदाचा काळ ठरवण्यासाठी पुरातत्त्वीय पुरावा उपयोगी पडतो का याचा शोध घेतला. ऋग्वेदात घोडा हा आर्यांचा अत्यंत लाडका प्राणी होता असे सांगितले आहे. तो भारतात इसवी सनपूर्व 1900 पासून उत्तर सिंधू वसाहतीत सापडतो. त्याचा पुरावा नागरी सिंधुकाळात नाही. दुसरा पुरावा लोखंडाचा. ऋग्वेदात त्याचा उल्लेख नाही, कारण त्यात अयसअसा शब्द आहे. त्याचा अर्थ धातू. लोखंडाची प्राचीनता इसवी सनपूर्व 1400 पर्यंत मागे जाते. ह्या पुराव्यांमुळे ऋग्वेदाचा काळ इसवी सनपूर्व 1900 ते 1400 असा ठरवता येतो. अर्थात त्यातील काही भाग त्याहूनही प्राचीन असणार यात शंका नाही.

ऋग्वेदाची रचना करण्यास पाच-सात शतके सहज लागली असावीत. प्रमोद तलगेरी (2005) यांनी त्याचे टप्पे ठरवले आहेत. ऋग्वेदातील मंडले अतिप्राचीन गटात 3, 6,7. मधील गटात 2, 4 तर उत्तरकालीन गटात 5, 8, 9 – अशी येतात. दहाव्या अन्‌ पहिल्या मंडलाची रचना सर्वात शेवटी झाली. काही पंडितांना असे वाटते, की ऋग्वेदाचा काळ म्हणजेच आर्यांचा भारतात येण्याचा काळ. त्याउलट असे म्हणता येईल, की ते येथे आल्यावर हजार-दोन हजार वर्षांनंतर ऋग्वेद रचण्यास सुरुवात झाली. ते पुरते भारतीय झाल्यावर त्यांनी सप्तसिंधूचे गुणगान गाण्यास सुरुवात केली. तोपर्यंत इतर भाषांतील घेतलेल्या शब्दांचे पुरे संस्कृतिकरण झाले होते. म्हणून ते भारतीयच होते असे काहींचे मत झाले. (लाल 2005).

राष्ट्र ही संकल्पना अर्वाचीन काळातील आहे. त्यासाठी भव्य वास्तू, अधिकारी-वर्ग, प्रबळ शासक, लोकांच्या राहणीतील जाणवणारा फरक, दफन-दहन पद्धती इत्यादींची आवश्यकता असते. शिवाय राजकीय आणि आर्थिक केंद्रे इत्यादीही लागतात. ती सर्व सिंधू संस्कृतीत आढळतात. साम्राज्याची कल्पना काही विद्वानांनी अलिकडे मांडली आहे, ती पुढीलप्रमाणे आहे : 1 निश्चित केलेल्या आणि विस्तृत सीमा. सिंधू संस्कृती खूप विस्तृत होती (पंधरा लाख चौरस किलोमीटर). मेसोपोटेमिया आणि इजिप्त ह्या दोन्ही संस्कृती एकत्र केल्यावरसुद्धा त्यांच्याहून अधिक विस्तृत. जवळजवळ संपूर्ण भारत फाळणीपूर्वीचा आहे. (दक्षिणेकडील पाच राज्ये वगळून); 2 सामाजिक उतरंड. समाजात चार विभाग, त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ स्तर, शिवाशीव कल्पना असावी; ते कुल्हडसारखी एकदाच वापरण्याची भांडी दर्शवतात; 3 कामगारांचे व्यवसायानुसार गट- उदाहरणार्थ कुंभकार, मणिकार; त्यातून जातीची कल्पना उदयास आली असावी. उदाहरणार्थ कुंभार व्यक्ती कुंभाराची मुलगी सून म्हणून आणणार; 4 व्यवसायात प्रावीण्य; 5 शेतीतील वैविध्य; 6 गावाच्या केंद्रभागी आणि कडेला राहणारे व्यावसायिक. सीमेवर नेहमी गडबड असते, तिचा बंदोबस्त; 7 सिंधू लोक शांतताप्रिय होते असा पूर्वी समज होता; परंतु वास्तव वेगळे आहे. परशू, कुऱ्हाडी, तलवारी यांसारखी आयुधे मोठ्या संख्येने ताम्रनिधींत सापडली आहेत. ते उत्तर सिंधुकालीन असले, तरी त्यात सिंधुकालीन हत्यारेही आहेत. सनौली (जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश) येथे सापडलेल्या शेकडो दफनांतही पूर्व सिंधुकालीन आणि उत्तर सिंधुकालीन शस्त्रे सापडली आहेत. एक हजार शस्त्रे तीराग्रे गणेश्वर (राजस्थान) येथे सापडली. तितकेच नव्हे, तर अलिकडे जी शेकडो दफने सापडली आहेत, त्यांतही आयुधे आहेत. सिंधू नगरांची आणि बुरुजांची बांधणी पाहिल्यावर ते लोक सुरक्षिततेच्या बाबतीत किती जागरूक होते याची कल्पना येते.

सिंधू नगरांवर परचक्र आल्याचा उल्लेख मेसोपोटेमियातील कोरीव लेखात आढळतो. रिमुश (इसवी सनपूर्व 2315-2307) या सुमेरियन राजाने मेलुहावर स्वारी केली होती. मेलुहा म्हणजे सिंधुकालीन भारत. त्यात पराभव कोणाचा झाला याचा उल्लेख नाही. कदाचित रिमुश अलेक्झांडरप्रमाणे परत गेला असावा. कारण त्याने ती लढाई जिंकली असती, तर त्या घटनेचा निश्चित उल्लेख केला गेला असता. चकमकी उडाल्याचा पुरावा एक-दोन ठिकाणी उपलब्ध झाला आहे. लोथल (गुजराथ) येथील उत्खननात सापडलेले मानवी सांगाडे त्याची साक्ष देतात. तेथे कवट्या आणि हातापायांची हाडे पुष्कळ मिळाली. शिवाय, ती काळजीपूर्वक दफन केलेली नव्हती, त्यांचा ढीग कसातरी रचलेला होता. तसेच, ती हाडे रुंद डोक्याच्या लोकांच्या कवट्यांच्या मोजमापांवरून होती. त्यावरून ते लोक परकीय होते असे मत शास्त्रज्ञांचे आहे.

ऋग्वेदात हरियुपिय येथे झालेल्या लढाईचा उल्लेख आहे, तो उल्लेख प्राचीन हडप्पाचा असावा. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्यावयास हवी; ती ही, की बहुतेक लढाया उघड्यावर, मैदानात केल्या जातात आणि त्यांचे अवशेष शिल्लक क्वचित राहतात. महाभारत युद्ध नेमके कोठे झाले ते सापडत नाही. शेतकऱ्यांना शेते नांगरताना कुरुक्षेत्र (हरयाणा) येथील काही शेतांत मानवी कवट्या सापडल्या होत्या. त्या महाभारत युद्धातील वीरांच्या असाव्यात असे त्यांनी ह्युएन्‌-त्संग या चिनी प्रवाशाला सांगितले होते.

भारतात नैसर्गिक साधने विपुल आहेत. निरनिराळ्या प्रकारचे मौल्यवान खडे आणि खनिजे भारतात मोठ्या प्रमाणावर सापडतात. भारत हा हस्तिदंत, शंख, इमारती लाकूड, तांबे इत्यादींसाठी अतिप्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. त्या गोष्टींना परदेशांत पूर्व सिंधुकाळापासून मागणी होती. ती मागणी सिंधुकाळात वाढल्यामुळे तयार वस्तू निर्यात करण्याच्या उद्योगास चालना मिळाली. मणी तयार करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू झाले. चन्हुदडो (सिंध) आणि लोथल (गुजराथ) येथे कारखाने उभे राहिले. तयार माल गुजराथच्या बंदरांतून समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर निर्यात होण्यास सुरुवात झाली. सिंधू मुद्रा फक्त लोथल आणि चन्हुदडो येथे कोरल्या जात. हा व्यापार मेसोपोटेमियातील अक्कड साम्राज्याचा सम्राट सार्गन याच्या कारकिर्दीत (इसवी सनपूर्व 2350) शिगेस पोचला होता.

सिंधू लोकांनी लक्षणीय प्रगती तत्कालीन तंत्रज्ञानात केलेली होती. गोमेदाचे मणी हे त्यांच्या कलेची साक्ष देतात. ते मणी इतके सुंदर होते, की त्यांच्या बनावट प्रतिकृती केल्या जात. ते इजिप्तपर्यंत पोचले होते. त्यांनी शंखाच्या बांगड्या तयार करण्यासाठी निराळ्या प्रकारची करवत बनवली होती. त्यांनी तयार केलेल्या स्टिंएटाईटच्या सूक्ष्म (Microbeads) मण्यांना ते छिद्र कसे पाडत, हे कोडे पुरातत्त्वज्ञांना उलगडलेले नाही. ते कांस्यमूर्ती Lost Wax तंत्राने तयार करत असत. दायमाबाद येथे सापडलेला रथ (इसवी सनपूर्व 2200) हा जगातील अतिप्राचीन रथ आहे. ते सोन्याचे कलापूर्ण अलंकारही घडवत. त्यांचे हंडे मोहेंजोदारो, कुणाल, मांडा इत्यादी ठिकाणी सापडले आहेत.

त्यांना तो परदेशी व्यापार अत्यंत फायदेशीर होता. सिंधू व्यापारी निर्यातीच्या बदली काय घेत असत याबद्दल विद्वानांत एकवाक्यता नाही. माझ्या मते, ते सोन्याच्या रूपात वसूल करत होते. पुढे इतिहासकाळातही भारतीयांचा व्यापार रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणावर होता; त्याची किंमत ते रोमन सोन्याच्या नाण्यांत वसूल करत असावेत. तसाच प्रकार सिंधुकाळातही झाला असावा. अकेडियन काळात भारताचा मेलुहाशी असलेला व्यापार भरभराटीस आला होता. त्या काळातील कोरीव लेखात, सार्गन राजाच्या कारकिर्दीत, त्याच्या बंदरात तीन देशांतील जहाजे चैनीच्या वस्तूंनी भरलेली उभी असत. ती पूर्वेकडील देशांची; अनुक्रमे डिलमून, मकन आणि मेलुहा या देशांतील असत. त्यांपैकी डिलमून म्हणजे बहरीन, मकन म्हणजे मकरानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे भारत. मेलुहाहून आलेल्या वस्तूंमध्ये गोमेदाचे मणी, शंखाच्या वस्तू, कापड, तांबे, इमारतींसाठी व जहाजबांधणीसाठी उत्तम दर्ज्याचे लाकूड या वस्तू प्रामुख्याने असत. मेलुहाचे स्पष्टीकरण म्लेंच्छ (संस्कृत) > मेलख्ख (प्राकृत) > मेलुहा असे दिले जाते. म्लेंच्छ या शब्दाचा एक अर्थ तांबेअसा आहे. भारतात तांबे नाही असा एक समज आहे. परंतु गुजराथ-राजस्थानमध्ये अंबामाता पट्ट्यात तांब्याचे खनिज भरपूर आहे. त्यावरून भारताला कदाचित मेलुहाहे नाव पडले असावे.

(राजहंस ग्रंथवेध, जून 2019 च्या अंकातून साभार)

मधुकर केशव ढवळीकर

मधुकर ढवळीकर हे पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत पुरातत्त्वशास्त्राचे अध्यापक नंतर विभागप्रमुख आणि संस्थेचे संचालक होते. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला महत्त्व असते. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन उत्खनन केले. त्यांनी आर्याच्या शोधात’, ‘नाणकशास्त्र’, ‘पर्यावरण आणि संस्कृती’, ‘पुरातत्त्व विद्या’, ‘भारताची अभ्यासपूर्ण कुळकथायांसारख्या मराठी ग्रंथांबरोबरच इंग्रजीतूनही लेखन केले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री, पंतप्रधानांचे सुवर्णपदक यांसारखे सन्मान प्राप्त झाले होते. त्यांचे देहावसन 27 मार्च 2018 ला झाले.

——————————————————————————————————————————————————

टीपा :

          मेसोपोटेमिया : आशिया खंडातील प्राचीन प्रसिद्ध प्रदेश. दक्षिण मेसोपोटेमियाचा भाग बहुविध संस्कृतींचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्या प्रदेशात अनेक उत्खनने झाली आणि अद्यापही चालू आहेत. त्या प्रदेशावर सेमिटिक, हिटाइटआर्मेनियन इत्यादींनी सत्ता गाजवली. जर्मो येथील वसती सर्वांत प्राचीन (इसवी सनपूर्व 5000) असून त्या भागात कृषिसमाजाच्या प्राचीन खुणा आढळल्या आहत.युफ्रेटिस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया (दोन नद्यांमधील) हे नाव दिले. तो प्रदेश विद्यमान इराकमध्ये समाविष्ट होतो.

सुमेरियन संस्कृती : जगातील सर्वांत प्राचीन प्रगत संस्कृती. ती प्राचीन मेसोपोटेमियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात (विद्यमान इराक) नांदत होती. त्या संस्कृतीचा विकास टायग्रिस व युफ्रेटिस या नद्यांच्या दुआबात इसवी सनपूर्व 35001900 दरम्यान झाला. इराणचे आखात व अरबस्तानचे वाळवंट दक्षिणेकडे, युफ्रेटिस नदी पश्चिमेस, समाराच्या जवळ अरबस्तानाचे वाळवंट उत्तरेस व टायग्रिस पूर्वेला या सुमेरच्या प्राचीन सीमा होत. त्यांतील नैर्ऋत्येचा भाग हा सुमेर होय. सुमेर येथे पहिली वस्ती इसवी सनपूर्व 45004000 दरम्यान प्रोटो-युफ्रेटीयन किंवा उबेडियन नामक लोकांनी केली होती.

लोथल (गुजराथ) : प्राचीन सिंधु संस्कृतीमधील भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर. ते गुजरात राज्यातील सरगवाल या खेड्याजवळ वसले आहे. सरगवाल हे खंबायतच्या आखातापासून एकोणीस किलोमीटरवर आहे. खंबायतचे आखात हे भगवा व साबरमती या दोन नद्यांमधील सपाट प्रदेशात येते. तो प्रदेश अहमदाबादच्या आग्नेय दिशेस सुमारे ब्याऐंशी किलोमीटरवर असलेल्या अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुकाजवळ आहे. ख्रिस्तपूर्व सुमारे 2400 वर्षे जुन्या असलेल्या त्या शहराचा शोध 1954 मध्ये लागला. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने तेथे 1954 ते 1962 दरम्यान सलग उत्खनन केले. तेथे त्यानंतरही पुन्हा 1973 मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यातून तेथे सिंधू संस्कृतीशी सादृया दर्शवणारे प्राचीन अवशेष सापडले. त्यात एका सुबद्ध नगराची रूपरेषा दिसून येते. उत्खनित अवशेषांचा काल कार्बन 14 च्या आधारे इसवी सनपूर्व 2450  ते 1600 या दरम्यान ठरवण्यात आला आहे.

अक्कड साम्राज्य: इराकमधील टायग्रिस व युफ्रेटिस या नद्यांच्या संगमाच्या आसमंतात असलेले राजधानीचे अतिप्राचीन ठिकाण होय. ते पहिला सारगॉन या सेमिटिक विजेत्याने इसवी सनपूर्व 2340 च्या सुमारास वसवले असावे. ‘अगेडी’ हे त्या शहराचे मूळ नाव होते. सेमिटिक लोकांनी तेथून त्यांचे साम्राज्य भूमध्य समुद्रापासून इराणच्या आखातापर्यंत पसरवले होते. 

          सम्राट सार्गन: ऊरुकची सत्ता सुमेर प्रदेशावर इसवी सनपूर्व 2300 च्या सुमारास काही काळ होती. त्यावेळी अक्कडचा सेमिटिक वंशीय पहिला सॅरगॉन (कारकीर्द 2334 — 2279) याने सुमेर पादाक्रांत केले. त्याच्या साम्राज्याचा विस्तार इराणच्या आखातापासून भूमध्य समुद्रापर्यंत होता. सुमेरची सत्ता त्या घराण्याकडे अनेक वर्षे होती.

          अकेडियन काळ: वास्तुशैलीच्या दृष्टीने सुमेरियनबॅबिलोनियन आणि अकेडियन या तीन अवस्था विशेषतः इसवी सनपूर्व 30001275 दरम्यान आढळतात. अरचा प्रसिद्ध पहिला वंश संपुष्टात येऊन, सारगॉनने तेथे अकेडियन वंशाची इसवी सनपूर्व 2340 मध्ये स्थापना केली.

(माहितीस्रोत इंटरनेट (विकिपीडिया) व मराठी विश्वकोश यांवरून)

————————————————————————————————————————————–

About Post Author

7 COMMENTS

  1. Rigveda chi rachna ani tathakathit Arya bhartaat yenya chyaa aadhipasun Bharatiya ani Hindu sanskruti cha itihaas maage jato.Pan durdaivana anekani fakt Maxmuller sarkhyanche sidddhant uchlun dharle.

  2. नवीन संशोधनात सिद्ध झालं आहे की भारतात आधी पासून घोडे आणि रथ अस्तित्वात होते आणि आर्यांचे आक्रमण हा सिद्धांत मुळात चुकीचा आहे.

  3. सध्याच्या बऱ्याच पुरोहित तसेच उत्तर भारतीय उच्च वर्णीय लोकांमध्ये आढळणारा R1a-Z93 हा वाय गुणसूत्राचा हप्लोग्रुप सिंधु संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आढळत नाही. R1a-Z93 हा हप्लोग्रुप मध्य आणि पश्चिम आशियातिल स्टेप्पी गवताळ प्रदेशात देखील आढळतो.रशियातील सिन्तश्ता आणि आर्काईम या पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननात आढळलेले धार्मिक विधींच्या संदर्भातील पुरावे ऋग्वेदात वर्णन केलेल्या धार्मिक विधींशी समानता दर्शवणारे आहेत. तसेच इंडो युरोपियन भाषा (इंग्लिश, लॅटिन, हिंदी, उर्दू) या मूळ स्वरूपात भारतात अथवा भारताच्या पश्चिम दिशेलाच आढळतात पूर्वेला नाही.यावरून सिद्ध होते की आर्यांच स्थलांतर भारतात झाले आहे.

  4. कोण होते सिंधू लोक? हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.https://www.bookganga.com/R/86IV8

  5. पुस्तक छान आहे… राष्ट्रवादी इतिहासकारान्च्या पठडीतील मस्त अभ्यास.. या बाबतीत ढवळीकरांनी मोठे योगदान दिले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here