कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)

अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला …

दाभोळ ही त्यांची कर्मभूमी. ते दाभोळ येथे वास्तव्यास 1960 साली आले. त्यांनी उदरनिर्वाहासाठी म्हणून पूनम मेडिकल सुरू केले. पण ते साठ वर्षे रमले दाभोळच्या खाडीला येऊन मिळणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या दोन्ही तीरांवरील सांस्कृतिक व सार्वजनिक आयुष्यात. त्यांनी कोकण प्रांताला प्राचीन इतिहास नाही असे जेव्हा म्हटले जात होते त्या काळी, सत्तरच्या दशकात ‘कोकणाला प्राचीनच नव्हे, तर अतिप्राचीन इतिहास आहे’ हे सिद्ध केले. तशी इतिहासाची अनेक साधने त्यांनी इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांनी डहाणू ते कारवार हा परिसर जवळपास पन्नास वर्षेपर्यंत पिंजून काढला.

अण्णांनी सागरपुत्र विद्या विकास संस्था हे विद्यार्थी वसतिगृह दाभोळमध्ये 13 जून 1983 रोजी सुरू केले. ते दाभोळ किनारपट्टीवरील झिंगाभोई, सरोदे, नाथजोगी, मच्छिमार अशा उपेक्षित समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार ठरले. तसेच, त्यांनी वाशिष्ठी कन्या छात्रालय सुरू करून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यास मर्यादा सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीमुळे कधीच आली नाही. त्यांनी वसतिगृहातील मुलांना जेवणखाण देण्यास पैसे नाहीत अशी परिस्थिती असताना, पत्नी नंदिनीचे दागिने विकले व वसतिगृह चालवले ! त्यांच्या जीवनावर आई चंद्रभागा यांचा प्रभाव होता. त्यांना सेवाधर्माची दीक्षा आईच्या दैनंदिन वागण्यातून व जगण्यातूनच मिळाली !

अण्णांनी दाभोळमधील लोकांसाठी जे जे आवश्यक वाटतील ते उपक्रम सुरू केले. त्यामध्ये बालवाङ्मय, सहकारी संस्था, उद्योजक सहकारी केंद्र, महिला बचत गट, विविध चर्चासत्रे, पर्यटनव्यवस्था, शेती-सहकार, व्यसनमुक्ती, व्यायाम-खेळ, निसर्ग निरीक्षण प्रकल्प असे अनेक उपक्रम… त्यांसाठी त्यांनी काही संस्थांचे, स्थानिक विद्यापीठाचे सहकार्य मिळवले. त्यातून दाभोळ हे ज्ञानकेंद्र व उद्योगकेंद्र बनण्यास मोठी मदत झाली. त्या जोडीला दानशूर व्यक्तींकडून कपडेलत्ते, धान्य, पुस्तके गोळा करायची आणि गरजूंना वाटायची यांसारखे धर्मादाय म्हणता येतील असे अण्णांचे उपक्रम चालू असायचे. त्यांच्या देवाणघेवाणीच्या हिशेबाच्या वह्याच्या वह्या भरल्या आहेत त्या ‘समाजोपयोगी व्यवहार हा पारदर्शकच हवा’ या विचारातून !

अण्णा शिरगावकर हे व्यक्तिमत्त्व विलक्षणच होते. त्यांना लहानपणापासून रंगीत दोरे, रंगीत काचांचे तुकडे, पाखरांची पिसे अशा नाना वस्तू जमवण्याचे वेड होते. ते गो.नी. दांडेकर यांच्या संपर्कात आल्यानंतर त्या छंदाला वेगळी दिशा मिळाली. त्यांनी ऐतिहासिक, पुरातन वस्तूंचा पाठपुरावा घेत विविध प्रकारच्या जुनी नाणी, शिलालेख, सनदा, पत्रे, हस्तलिखिते, तोफा, बंदुका, पिस्तुले, भाले, परशू, चिलखत, तलवारी, कट्यारी, मूर्ती, काष्ठशिल्पे इत्यादी- वस्तूंचा संग्रह केला. खरे तर, सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या माणसाला असा छंद वा संग्रह परवडणारा नाही; पण अण्णांनी तो मोठ्या जिकिरीने केला. त्यांनी त्यांना संग्रहासाठी जागेची अडचण भासू लागली, तेव्हा तो संग्रह रत्नागिरी नगर वाचनालय, दापोलीतील टिळक स्मारक मंदिर आणि ठाणे येथील बेडेकर यांच्या ‘द कोकण म्युझियम’ या तीन संस्थांना विनामूल्य देऊन टाकला !

अण्णांनी कोकणला दिलेली अनमोल देणगी म्हणजे ‘कोकणचा इतिहास’ ! तो त्यांनी पायपीट करत, अपार कष्टांनी मिळवलेल्या संसाधनांमुळे प्रकाशात आला. त्यांच्या परिश्रमपूर्ण प्रयत्नांतून नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेली पन्हाळेकाजीसारखी ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण लेणी जगासमोर आली. वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की पन्हाळेकाजी येथील लेणे म्हणजे एकूण अठ्ठावीस शैलगृहांचा (लेण्यांचा) समूह आहे. ती लेणी दुसरे शतक ते चौदावे शतक इतक्या विस्तीर्ण कालखंडात आकाराला आली. तेथे विविध संप्रदायांनी वास्तव्य केले आहे, हे लक्षात आले. त्यांत हीनयान, वज्रयान, महायान, शैव, नाथ, गाणपत्य अशा पंथांचा उल्लेख करता येईल. पन्हाळे हे छोटेसे गाव शिलाहार काळात दक्षिण कोकणाधिपती असलेल्या विक्रमादित्याचे राजधानीचे गाव होते. असा प्राचीन इतिहास अण्णांनी पुरवलेल्या संसाधनांमधून उलगडला गेला.

अण्णांच्या शोधक नजरेने शिलाहार, चालुक्य, त्रैकुटक यांचा इतिहास सांगणारे नऊ ताम्रपट मिळवले. त्या व्यतिरिक्त त्यांच्या संग्रही इतरही काही ताम्रपट आहेत. एका माणसाने व्यक्तिगत संग्रहात एवढे ताम्रपट मिळवणे ही विक्रमी बाब होय. त्या संदर्भात ते सांगत, की पुण्यातील एक नामवंत महाविद्यालय कोकणातील ताम्रपट संशोधनासाठी दरवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती देत. त्यांनी ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना सतत तेरा वर्षे दिली, पण त्यांना एकही ताम्रपट मिळाला नाही. अण्णांनी ते साध्य केले, कारण त्यांनी घेतलेली अपार मेहनत. ते कित्येक मैल अंतर पायपीट करत, ते ग्रामस्थांना त्यांच्याशी बोलीभाषेत संवाद साधून विश्वासात घेत. ते ताम्रपटाला ‘देवाचा हुकूम’ समजणाऱ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेला ठेच न पोचवता कौशल्याने ताम्रपट मिळवत.

अण्णांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. पण ते जात्याच कुशाग्र बुद्धीचे व संशोधक वृत्तीचे. ते बातम्या, स्फूट लेखन वयाच्या विसाव्या वर्षांपासून करू लागले. त्यांनी रोजनिशी पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ नियमितपणे लिहिली आहे. ते वयाच्या पंच्याहत्तरीनंतर पुस्तक लेखनाकडे व प्रकाशनाकडे वळले. त्यांनी ‘शोध अपरांताचा’ हे पुस्तक लिहून इतिहास अभ्यासकांना दिशा दिली. कोकण प्रांताला ‘अपरान्त’ हा शब्द रूढ करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याशिवाय त्यांची ‘ऐतिहासिक दाभोळ – वर्तमान व भविष्य’, ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’, ‘आनंदिनी’, ‘इस्राइल आणि युरोप’, ‘गेट वे ऑफ दाभोळ’ अशी चौदा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा गो.नी. दांडेकर, मधु मंगेश कर्णिक या साहित्यिकांशी विशेष स्नेह होता. अण्णांनी गोनीदां शारीरिक दृष्ट्या पूर्णतः थकलेले असताना त्यांची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढली होती.

अण्णांनी राजकारणही केले. अण्णांचा स्वभाव नर्म विनोदी, परंतु तेच अण्णा राजकीय व्यासपीठावर जनसंघाची धगधगती तोफ होती. त्यांनी ओणवसे गावचे सरपंच, दापोली पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे सभापती अशा विविध पदांवर काम केले. त्यांचा गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांत सक्रिय सहभाग होता. ते आणीबाणीच्या काळात 1975-77 या दरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी, 1982 साली राजकारणाचा त्याग केला व स्वतःला पूर्णतः सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले.

ते दापोली तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष 2001 साली होते, तर पहिल्या दापोली तालुका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 2006 साली होते. त्यांनी ऐतिहासिक साधने आणि छंद व त्यांचे उपयोग या विषयांवर देश-विदेशांत चारशेहून अधिक भाषणे दिली आहेत. अण्णांना राजीव गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे, स्वामी स्वरूपानंद, पांडुरंगशास्त्री आठवले अशा नामवंत व्यक्तींच्या हस्ते सन्मान प्राप्त झालेले आहेत.

संकलन – अश्विनी भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com

(मुख्य आधार – ‘व्रतस्थ’ हे धीरज वाटेकर यांनी संपादित केलेले पुस्तक)

—————————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. लेख माहिती पूर्ण आहे.. दादरच्या रूपारेल कॉलेज जवळ ज्यूइश कम्युनिटी सेंटर आहे.खूप वर्षांपूर्वी त्या ठिकाणी, एकदा त्यांच्या कार्यक्रम घडवून आणला होता त्याची आठवण आली. इस्राएल वर त्यांचे विशेष प्रेम होते.
    संध्या जोशी

  2. अश्विनी ताई तुम्हाला लाख लाख धन्यवाद. केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व तुम्ही आज उलगडून दाखवलंत. वाचतानाच नतमस्तक होतं होते. छुपा हिरा आहेत. हयांना सरकारचा सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा होता.एक माणूस एवढं करू श कतो ह्यवारच विश्वास बसणार नाही. खरच धन्य धन्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here