कैलास भिंगारे – साहित्य-संस्कृतीचा शिलेदार

0
47

सरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन

कैलास भिंगारेकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील वाचनालय चालवणाऱ्या कार्यकर्त्‍यांना कला महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी जागा द्यावी, ही विनंती केली होती, ती घटना फार थोड्यांना माहीत असेल! पुणे महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांच्या त्या विनंतीकडे जराही लक्ष दिले नाही. अर्थात, तात्यासाहेबांनी ती विनंती ज्याच्यासाठी केली होती, तो मात्र विलक्षण जिद्दीने, महापालिकेच्या अतिक्रमणाच्या फुफाट्यात वाहून न जाता खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुण्यासारख्या शहरात साहित्य-संस्कृतीचा शिलेदार म्हणून आत्मविश्वासाने वावरत आहे.

कोथरूड-कर्वेनगर-वारजे या पश्चिम पुण्यातील विस्तारलेल्या उपनगरातील विविध सांस्कृतिक आणि वाङ्मयीन उपक्रमांच्या आरंभीची आणि विस्ताराची पार्श्वभूमी ज्याच्या उत्साहामुळे आणि सक्रियतेमुळे तयार झाली, तो कार्यकर्ता आहे कैलास भिंगारे!

कैलास भिंगारेकैलासची आणि माझ्यासारख्या पत्रकार-लेखकाची पहिली भेट झाली त्याला पंचवीस-तीस वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळी त्याची पुस्तकाची टपरी पौड फाट्यापाशी रस्त्याच्या मध्यभागी होती. तो रस्ता अरुंद आणि नादुरुस्त असा होता. त्याने सरस्वती लायब्ररी त्याच रस्त्यावरील टपरीवर महापालिकेची परवानगी घेऊन सुरू केली. त्यावेळी कोथरुड परिसर विकसित होत होता, वस्ती वाढत होती आणि विविध थरांतील लोक त्यांची नवी घरे बांधून तेथे राहायला येत होते. त्या वर्गाची भूक वाचनाची होती. ती लक्षात घेऊन कैलासने सरस्वती लायब्ररी सुरू केली होती. कैलासचे लहान भाऊ त्याला त्यात मदतीला होते.

कैलासचे वाहन होते सायकल. त्याच्यावर पुस्तके व मासिके यांचे गठ्ठे घेऊन तो ने-आण करी. कैलास साहित्य परिषदेचा चार आणे सदस्य नव्हता किंवा अशा संस्थांच्या उद्दिष्टांविषयी फार जागरूक होता असेही नाही. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळच्या अकोले बुद्रुकच्या शेतकरी कुटुंबातील तो मुलगा उदरनिर्वाहासाठी पुण्याकडे आला. त्याने छोटी-मोठी कामे सुरू केली आणि मग तो सरस्वती लायब्ररीच्या पूर्ण वेळ कामात रमून गेला. त्याचे जीवनध्येय त्याला त्या कामात गवसले. त्यामुळेच तो शिलेदार वाढत्या कोथरूड परिसरातील लोकांच्या साहित्य-संस्कृतीविषयक अपेक्षा लक्षात घेऊन कामाला लागला होता.

कर्वे रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाल्यावर, कैलासच्या टपरीसाठी जागा करिष्मा सोसायटीच्या चौकातील रस्त्याच्या डाव्या बाजूला मिळाली. तेथे त्याच्या लायब्ररीला बहर आला, सभासद वाढले, लेखक-पत्रकारांची वर्दळ वाढली. लेखक जी.ए.कुलकर्णी यांनी देखील रस्त्याच्या कडेच्या त्या टपरीत जाऊन सभासद नोंदणी केली! जीएंनी त्यांचे नाव जी.एल.कुलकर्णी असे नोंदवले होते. त्यांना एक वेगळे पुस्तक हवे होते, त्यासाठी त्यांनी विचारणा केली. कैलासच्या लायब्ररीत ते पुस्तक नव्हते. पण त्याने ते विकत आणले आणि जीएंना घरी नेऊन दिले. त्याच वेळेला त्याला तो मोठा लेखक आहे हे समजले आणि त्याने सवयीप्रमाणे त्यांचे पाय धरले. त्यांची ओळख समजल्यावर तेथे परततील, ते जीए कसले! ते नंतर परत आलेच नाहीत. त्यांचे निधनही काही दिवसांतच झाले.

कैलासने कोथरूड परिसरात पुस्तकांचे प्रेम असलेल्या लोकांसाठी आणि साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम आखले. त्यामुळे जाणारे-येणारे रसिकजन काही मिनिटे तरी टपरीत डोकावत असत.

त्याला एकदा कल्पना सुचली, की दिवाळीच्या सुमारास तीन दिवस लेखकांच्या भेटी आणि मुलाखती यांचे कार्यक्रम आखायचे आणि त्या निमित्ताने रसिकांना चांगली मेजवानी द्यायची. त्याचा परिणाम असा झाला, की कोथरूड परिसरातील अनेक पत्रकार-लेखक कैलासचे त्या कामातील मित्र तर झालेच, शिवाय सहकारीही बनले. तशा कामात सर्वांनाच रस असतो. तो कोणताही निरोप देण्यासाठी सायकलवरून भिरीभिरी फिरायचा आणि संपर्क साधायचा. त्याने संपर्क साधण्याची हातोटी खूप मेहनतीने कमावली होती. त्याला कष्टांची लाज नव्हती आणि तो समाजाच्या चांगल्यासाठी ही वणवण करत आहे, याची निश्चिती त्याच्या मनात होती. त्यामुळे तो त्याच्या लायब्ररीची वेळ संपल्यावर उन्हाळ्यात, हिवाळ्यात भर दुपारी सायकलवरून संपर्कासाठी फिरत असताना दिसत असे.

सरस्‍वती लायब्ररीत शांता शेळके आणि रविंद्र पिंगे यांसोबत कैलास भिंगारेतीन दिवस चालणाऱ्या त्या कार्यक्रमाची सुरुवात लेखकांच्या मुलाखतींनी व्हायची. त्यातही त्याने नवेपणा आणला. साधारणत:, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर होते. त्याच दरम्यान, दिवाळी असते. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्षपदी निवड झालेल्या लेखकाचा सत्कार होत असतो. कैलास त्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर दीड-दोन तास आखायचा. लेखकाला विनंतिपत्र अगोदरच गेलेले असायचे. त्यामुळे नियोजित अध्यक्ष कैलासच्या कार्यक्रमाला आवर्जून यायचे. शंकर पाटील, मधु मंगेश कर्णिक, राम शेवाळकर, शांता शेळके, अरुण साधू, राजेंद्र बनहट्टी, विद्याधर गोखले, रा.चिं.ढेरे, रवींद्र पिंगे, वि.स.वाळिंबे, द.मा.मिरासदार, सुभाष भेंडे, सरिता पदकी, शिवाजी सावंत, रमेश मंत्री, नरेंद्र सिंदकर, के.रं.शिरवाडकर, बा.रं.सुंठणकर, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अभिनेते निळू फुले, दिग्दर्शक राम गबाले असे अनेक मान्यवर कैलासने योजलेल्या कार्यक्रमांतून तेथील वाचकांना, चाहत्यांना भेटत गेले.

मी आणि माझ्याबरोबर सुभाष नाईक, श्रीराम रानडे, सुधीर भोंगळे, सुनील कडुसकर, श्रीकांत कुलकर्णी, अरविंद सुभेदार असे अनेकजण कैलासच्या मदतीला जायचो. आम्ही आमच्या नोक-या सांभाळून त्या कामात सहभागी व्हायचो. त्या कामाचा आनंद वेगळाच होता. त्यातील एका कार्यक्रमात बोलताना अरुण साधू यांनी कोथरुड हे स्वयंपूर्ण उपनगर झाले आहे असे म्हटले होते, ते मात्र खरोखर पटून गेले!

सरस्वती लायब्ररीच्या टपरीत फर्ग्युसनचे प्राचार्य बाळ गाडगीळ, समीक्षक वि.भा.देशपांडे, ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी –  नंतरच्या काळातील डेप्युटी एडिटर दिनकर रायकर, ज्येष्ठ संशोधक-समीक्षक ह.श्री.शेणोलीकर, विधिज्ञ भास्करराव आव्हाड, हॉटेल ‘पथिक’चे मालक कृष्णकांत कुदळे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजीराव चौधरी, ‘कमिन्स’चे अरविंद ढवळे असे अनेकजण येत असत. संध्याकाळी आलेले अनेकजण लायब्ररी बंद होईपर्यंत गप्पा मारत तेथेच उभे राहत, असा तो अड्डाच बनून गेला! कैलास धावपळ करून चहाची व्यवस्था करी. ते सगळे क्षण इतके अनौपचारिक आणि ओलाव्याचे होते, की आपण काही मोठे काम करत आहोत, असा कोणताही भाव आमच्या कोणाच्याच ध्यानीमनी नव्हता.

कुसुमाग्रजांसोबत कैलास भिंगारेकैलासची स्वत:ची कामाची शैली होती. ती थोडी गावरान होती. पण तिला आपुलकीचा स्पर्श असे. एकदा झाले असे, की मागच्या नवजीवन सोसायटीत राहणा-या के.रं.शिरवाडकर यांच्याकडे त्यांचे बंधू कुसुमाग्रज आले होते. शिरवाडकरसरांनी मला त्यांना भेटायला बोलावले. माझी आणि तात्यासाहेबांची ती भेट मी कधीच विसरणार नाही. मी तेथून बाहेर पडलो आणि कैलासला सांगितले, की कुसुमाग्रज आले आहेत. झाले, तो लागला कामाला. दुस-या दिवशी साधारणत: बाराच्या सुमाराला तात्यासाहेब कर्वे रस्त्यावरील कैलासच्या टपरीत आले तेव्हा सारा परिसर जणू मंत्रमुग्ध होऊन गेला. कैलासने तात्यासाहेबांचे पाय धरले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. कोथरूडचे आमदार शशिकांत सुतार हे तात्यासाहेबांना घेऊन आले होते. तो सगळा प्रसंग खरा आहे की स्वप्नातील, याच्यावर विश्वास बसत नाही. त्यानंतर तात्यासाहेब तेथे अर्धा तास बसले. आम्हा सर्वांशी बोलले. त्यांनी कैलासच्या लायब्ररीच्या अभिप्रायवहीत त्याचे कौतुक लिहिले. भारतीय साहित्यातील एक मानदंड सरस्वतीच्या एका सामान्य शिलेदारापाशी प्रेमाने आला होता आणि आम्ही सारे भावुकतेने ते पाहत होतो. ती टपरी त्या दिवशी अहोधन्य होऊन गेली होती!

जीए कोथरूडमधील संगम प्रेसजवळच्या रस्त्यावर राहात होते. ते गेल्यावर त्या रस्त्याला जीएंचे नाव द्यावे, अशी चांगली कल्पना त्या भागातील लोकप्रिय नगरसेवक राजा मंत्री यांना सुचली आणि त्यांनी तिचा पाठपुरावा केला. जीएंच्या नावाची पाटी तेथे लावण्यासाठी पुल, सुनिताबाई, समीक्षक सु.रा.चुनेकर, जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, महापौर सुरेश शेवाळे, स्वत: राजाभाऊ असे सारे सकाळी आयोजलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर नंदातार्इंच्या घरी चहा-पोह्यांचा बेत झाला. कैलासही तेथे आमच्याबरोबर आला आणि त्याने सर्वांसमक्ष पुलंचे पाय पकडले. त्याने त्याच्या लायब्ररीत येण्याची पुलंना विनंती केली. भांबावलेल्या पुलंनी ती स्वीकारली आणि मग ते सुनिताबार्इंसह कैलासच्या लायब्ररीत गेले. त्यांना त्याचे फार कौतुक वाटले. त्यांनी त्यानंतर चार-पाच महिन्यांनी एका वाचकाला पाठवलेल्या पत्रात आवर्जून सरस्वती लायब्ररीचा उल्लेख केला होता.

पु. लं. देशपांडे आणि कैलास भिंगारेत्या टपरीत कधी कोण येईल, हे सांगता यायचे नाही. कारण ती अनेकांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर होती. कधी ह.मो.मराठे, तर कधी अश्विनी धोंगडे, लीला दीक्षित, तर कधी रमेश धोंगडे, मल्हार अरणकल्ले, नाना शिंदे, अनिल बळेल, श्री.र.भिडे,  शिशिर मोडक, एक जुने सामाजिक कार्यकर्ते (दिवंगत) मोहन शिराळकर, बँक ऑफिसर जयंत वाघ, मंदाकिनी भारद्वाज, शैला मुकुंद हे तेथे हमखास भेटायचे. मंगेश तेंडुलकरांबरोबर तेथे अनेकदा गप्पा व्हायच्या. त्याच गप्पांमधून कोथरुड भागात उपनगर साहित्य संमेलन घ्यावे अशी कल्पना पुढे आली आणि मग मोहन शिराळकर आणि कैलास यांनी आम्हाला सर्वांना कामाला लावले. त्यानंतर ती संमेलने सलग चार वर्षे तरी सुरू होती. विभा, तेंडुलकर, सुभाष नाईक, कुलकर्णी असे अनेकजण कैलासच्या त्या टपरीसमोर टाकलेल्या सतरंजीवर बसून संमेलनाचे कार्यक्रम पक्के करायचे. शिराळकर मागे लकडा लावत उभे असायचे.

ते सगळे होत असताना लायब्ररी अधिक चांगली झाली पाहिजे, तिला मोठी जागा मिळाली पाहिजे, असे आम्हा सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे त्यावेळचे पुणे महापालिकेचे आयुक्त रत्नाकर कुलकर्णी यांचीही तीच इच्छा होती. शिवाय, ते साहित्याचे चाहते वाचक होते. मात्र कैलासच्या लायब्ररीची टपरी बेकायदेशीर म्हणून त्या दरम्यानच्या काळातच आणि अहमदनगरला साहित्य संमेलन सुरू असताना भुईसपाट करण्यात आली! पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या शूरवीर अधिकाऱ्यांनी साहित्याचा हा वारकरी साहित्य संमेलनाला जाऊच नये, अशा वेळापत्रकाने ती टपरी पाडली!

कैलासने त्याच्यावरील अन्यायाची कथा साहित्य संमेलन संपल्यावर लोकांना सांगितली आणि महापालिकेसमोर उपोषणही केले. अनेक लेखक, कलावंत त्यात सहभागी झाले. सुभाष भेंडे यांच्यासारख्या लेखकाने ‘लोकसत्ते’मध्ये (५ फेब्रुवारी १९९७) ‘साहित्यवेड्याची निष्फळ अपूर्ण कहाणी’ हा लेख लिहून कैलासवर आलेल्या संकटाची माहिती महाराष्ट्राला दिली. त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर, महापालिकेचे अधिकारी वसंत पोरेड्डीवार आणि अनेक लेखक यांनी कैलासचे गाऱ्हाणे समजून घेतले आणि त्याला धीर दिला. पुस्तकांच्या एका टपरीने मराठीतील अनेक लेखक जवळ आले होते, पत्रकार हे कार्यकर्ते झाले होते, अशा टपरीची भीती महापालिकेला वाटली नाही तरच नवल! महापालिकेने त्याला पर्यायी जागा दिली. मात्र कालमहिमा असा, की ज्या जागेवरून कैलासला उठवले, तेथे इंग्रजी पुस्तकविक्रीचे टेबल आहे आणि त्याला जोडून नर्सरी उभी राहिली आहे! महापालिकेच्या अतिक्रमण खात्याला शहराच्या पर्यावरणात जास्त रस होता, असा त्याचा अर्थ जाणकारांनी काढला आहे.

अर्थात, कैलास खचणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा नाही. त्याने त्याची जगण्याची ऊर्जा त्याच्या गावाकडे वळवली. टेंभुर्णीजवळच्या त्याच्या गावातील बहुतांश घरांना ओल येत होती. ते पाणी उजनीच्या डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाडीमुळे येत होते. त्याच गावातील स्मशानभूमीतही ओल यायची व तेथून ते पाणी गावाच्या वस्तीत यायचे. त्याने गावकऱ्यांना त्याविरुद्ध जागे केले आणि ग्रामीण विकासाच्या कामात उमेदीची चार-पाच वर्षे खर्च केली. गावातील आतले-बाहेरचे रस्ते दुरुस्त करून घेतले. त्या एकूण प्रकरणात गाव एखाद्या खड्ड्यात असल्यासारखे वसले होते, लोकांनी वस्तीसाठी उंचवट्यावर जावे असा पर्याय समोर आला आणि शेवटी, त्या गावातील चाळीस-पन्नास टक्के लोक मध्यवस्तीतून त्यांच्या शेतावर राहण्यास गेले. त्यांच्या जोडीनेच, त्याने स्वत:ची शेती लक्ष घालून वाढवली. तो त्यातून उत्पादन घेऊन बाजारपेठेत उभा राहिला.

एक वाचनालय चालवणारा शिलेदार कंत्राटदार झाला होता! पैसा हातात आला होता. मात्र साहित्य-संस्कृतीच्या प्रेरणा त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्याने श्रीकांत ठाकरे, शि.द.फडणीस, विकास सबनीस यांसारख्या नामवंत व्यंगचित्रकारांच्या सहवासाने आणखी एक नवे दालन उघडले. पुण्यात पहिल्यांदाच व्यंगचित्रकार संमेलन भरवण्यात आले. पुण्यात वास्तव्याला येत असलेले विख्यात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचा आणि कैलासचा संवाद सुरू झाला. त्याचे ऋणानुबंध बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे, वसंत सरवटे, ज्ञानेश सोनार, संजय मिस्त्री, वैजनाथ दुलंगे या सगळ्यांशी जुळले. सरस्वती लायब्ररीने घेतलेले व्यंगचित्रकारांचे संमेलन गाजले. संमेलनाला जोडून व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील साठ व्यंगचित्रकारांची सुमारे अडीचशे व्यंगचित्रे त्यात ठेवण्यात आली होती. व्यंगचित्रकार हे पत्रकार आहेत असे मत या संमेलनात विजय तेंडुलकर यांनी व्यक्त केले. तेंडुलकरांचे बंधू मंगेश तेंडुलकर हे तर उत्साहाने संमेलनात वावरत होते. त्या दरम्यान, बाळ ठाकरे यांची व्यंगचित्रकलेवरची मुलाखत निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतली होती. कैलासने त्या मुलाखतींची ध्वनिचित्रफीत तयार केली आणि तिला शीर्षक दिले ‘मार्मिक रेषा’. बाळासाहेबांच्या चित्रफितीला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला. कैलासने त्याच्या जोडीनेच आरकेंचे विस्तृत मनोगत असलेली दृकश्राव्यफीत तयार केली. त्या दोन्ही महान कलावंतांनी त्याला शाबासकी देत त्या फितींच्या निर्मितीचे अधिकार दिले.

बाळ ठाकरे, आ. के. लक्ष्‍मण आणि कैलास भिंगारेआरकेंच्या घरी त्यांना तेथून बाहेर नेण्यासाठी कैलास तत्पर असतो आणि तो आल्यावर आरकेंसह त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनाही त्याचे अप्रुप असते. कैलासच्याच सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या वतीने माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आरकेंना ‘भारतभुषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला (२२ सप्टेंबर २०१३). त्या निमित्ताने कैलासने आरके लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे एक प्रदर्शनही भरवले होते. ते पाहण्यात डॉ. कलाम हरखून गेले होते. त्याने त्या समारंभापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये पुण्यात व्यंगचित्र साहित्य संमेलनही भरवले होते. संमेलनाला स्वत: व्यंगचित्रकार असलेले नितेश राणे आणि राज ठाकरे या दोघांनी भेट दिली होती. अशा स्वरूपाचे आठवडाभराचे व्यंगचित्रकार संमेलन महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिले म्हटले पाहिजे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक उदयोन्मुख व्यंगचित्रकारांना संधी मिळू लागली आहे.

कैलास सरस्वती लायब्ररीच्या टपरीतील अनेक क्षण अनुभवत असतो. तो अनेक मोठ्या लेखकांची पत्रे उत्सुकतेने पाहत असतो. व्यंगचित्रांच्या संदर्भात ‘कार्टुनिस्ट कंबाईन’ या संस्थेच्या सहकार्याने व्यंगचित्रकार संमेलन आणि व्यंगचित्रांचे प्रदर्शन तो भरवू लागला आहे. त्याने व्यंगचित्रांची हसरी मैफल हे दालन सासवडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २०१४ साली उभे केले. त्याने त्याच विषयाला धरून प्रबोधनाच्या पातळीवर सामान्य कलावंतांकडून व्यंगचित्रे काढून घेऊन त्याची संवादयात्रा महाराष्ट्रभर काढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यव्यापी व्यंगचित्र स्पर्धा योजली व स्पर्धेत घसघशीत बक्षिसे दिली.

कैलासनेच आयोजलेल्या एका लेखक भेटीत बोलताना रा.चिं.ढेरे यांनी खलील जिब्रानचे विधान उद्धृत केले होते. जिब्रान म्हणतो, शरीराला अन्नाची गरज आहे आणि आत्म्याला पुस्तकांची. ज्या समाजाला जिब्रान हवा आहे, त्याच समाजाला कैलास भिंगारेही हवा आहे. म्हणूनच कैलासला सांभाळणे आणि त्याला पाठबळ देणे हे समाजाचे दायित्व ठरते.

अरुण खोरे
९६०४००१८००
arunkhore@hotmail.com

कैलास भिंगारे
८२, रामबाग कॉलनी, पौड रोड,
स्वासमी समर्थ मंदिराशेजारी, कोथरूड पुणे – ३८
८८८८१२६९१५, ९४२३५२३१०५
bhingarekailas12@gmail.com

About Post Author