केल्याने तीर्थाटन…

carasole

केल्‍याने तीर्थाटन...‘तरति पापादिंकं यस्मात’ – ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय!

‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ – ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापकर्मांचा क्षय होतो ते तीर्थक्षेत्र होय! – स्कंदपुराणात तीर्थक्षेत्राची व्याख्या अशी केली आहे.

तीर्थ या शब्‍दाचा शब्‍दशः अर्थ – पवित्र अशा सागरसरितांचे जल. तशा सागरसरितांच्या किनारी वसलेले स्थान म्हणजे ते तीर्थस्थानच होय.

प्राचीन काळी देवदेवतांनी, ऋषिमुनींनी जलाशयाजवळची, समुद्र-नदीतटावरची शांत, निसर्गरम्य अशी स्थळे ईश्वरी तपश्चर्येसाठी, साधनेसाठी निवडली आणि तेथे राहून कठोर उपासना केली. देवदेवतांनी काही पुण्यवंतांना त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन साक्षात दर्शनही दिले. परमेश्वरी अस्तित्व तेथे जागृत झाले आणि ते स्थान पावन होऊन तीर्थक्षेत्र बनले. त्या साधनेची पवित्र स्पंदने, लहरी तेथील परिसरात आणि तेथील वातावरणात भरून राहिली. हा भावनेचा भाग आहे. म्हणून माणूस जेव्हा तीर्थस्थानी जातो, परमेश्वराला अनन्यभावे शरण जातो तेव्हा त्याला तेथील जागृत परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती येते. त्याच्या मनातील षड्रिपूंचा नाश होतो आणि चांगल्या भावनांचे, विचारांचे तरंग त्याच्या मनात उमटतात. त्याचे मन आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होते. त्याच्या मनाने त्याच्याशीच साधलेला तो आत्मसंवाद, चुकांची प्रांजळपणाने दिलेली कबुली आणि सदाचाराने वागण्याचा केलेला निर्धार होय. म्हणजेच त्याने मन, देह, विचार आणि कृती शुद्ध करणे होय. माणूस तेथील पवित्र जलात जेव्हा स्नान करतो तेव्हा त्याचे मन हलके होते, मनावरचे दडपण कमी होते आणि चित्त शांत होते, कारण त्या स्थानाचा महिमा आणि तेथील वातावरणाचा प्रभाव त्याच्या मनावर घडतो.

संत एकनाथ म्हणतात,

शुद्ध व्हावया अंत:करण | करावे गा तीर्थी गमन |
तीर्थयात्री श्रद्धा गहन | तीर्थाटन या नाव ||

तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिक वातावरणातील पवित्र लहरी माणसाला प्रेरणादायी असू शकतात. तेथील निसर्गाची भव्यता आणि रमणीयता यांचा त्याच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि तो सत्कर्म करण्यास, सद्गुणांचा अंगीकार करण्यास प्रवृत्त होतो. तीर्थक्षेत्री आचरणात आणलेले नियम, पथ्ये पुढे आपोआप त्याच्या अंगी रुजू शकतात आणि त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होतो.

जव हे सकळ सिद्ध आहे | हात चालावया पाय |
तंव तू आपुले स्वहित पाहे | तीर्थयात्रे पाय चुको नको ||

जोपर्यंत माणसाचे हातपाय चालत आहेत तोपर्यंतच तीर्थयात्रा कराव्यात, त्‍याने स्वहित साधावे, भगवंताला शरण जावे आणि पुण्य गाठीशी बांधावे असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनाही तीर्थयात्रेची आणि तीर्थक्षेत्रांची ओढ होती. ते म्हणतात,

जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन | तरी देवतीर्थभजन न सांडित |
भूतळींची तीर्थे पाहवी नयनी | असे आर्त मनी आहे माझ्या ||

जेथे भगवंताचे जागृत अस्तित्व आहे ते तीर्थक्षेत्र म्हणजेच मोक्षमुक्तीचे अंतिम ठिकाण आहे आणि त्या मोक्षमुक्तीच्या दिशेने जाणारी वाट हीच खरी तीर्थयात्रा आहे!

केल्‍याने तीर्थाटन...ब्रम्हपुराणात तीर्थांचे दैवतीर्थ, असुरतीर्थ, आर्षतीर्थ, मानुषतीर्थ असे चार प्रकार सांगितले आहेत.

१. दैवतीर्थ : ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिदेवांनी त्यांच्या दैवी शक्तीद्वारे भूतलावर पवित्र स्थाने निर्माण केली. ती स्थाने म्हणजे त्रिदेवांची शक्तिपीठेच होत. अशा स्थानी असणाऱ्या आणि त्याबरोबरच गंगा, सरस्वती, नर्मदा, यमुना, भागीरथी, विशोका, वितस्ता, तसेच विंध्य पर्वताच्या दक्षिण भागातील गोदावरी, तुंगभद्रा, तापी, वेणिका, पयोष्णी या नद्यांनाही ब्रम्हपुराणात ब्रम्हदेवाने ‘तीर्थ’ म्हटले आहे.

२. असुरतीर्थ : असुरांच्या त्रासाने भयभीत झालेल्या प्रजेने एखाद्या विशिष्ट देवाची किंवा देवतेची आराधना करून, त्या देवतेला आवाहन करून असुरांचा नाश करण्याची प्रार्थना केली तेव्हा देवदेवतांनी प्रसन्न होऊन प्रजेला अभय दिले आणि असुरांचा नाश केला, प्रजेचे रक्षण केले. ज्या स्थानी अशा दुष्ट असुरांचा वध झाला त्या स्थानाला ‘असुरतीर्थ’ मानले गेले. कोल्लासूर, वृत्त, अन्धक, लवण, त्रिपुर, नमुचि, श्रृंगक, यम, मय, पातालकेतु, पुष्कर अशा काही असुरांनी त्‍यांना वर प्राप्त करून घेण्यासाठी तपश्चर्याही केली होती. ज्या ठिकाणी त्‍यांनी तपश्चर्या केली ती स्थाने म्हणजे असुरतीर्थे होत.

३. आर्षतीर्थ : वसिष्ठ, भारद्वाज, गौतम, भार्गव, प्रभाव, अगस्ती, कश्यप, मनू या तपस्वी श्रेष्ठ ऋषींनी प्राचीन काळी ज्या ज्या स्थानी घोर तपश्चर्या आणि उपासना केली; ती स्थाने व त्यांचा परिसर म्हणजे ‘आर्षतीर्थ’ होय. ऋषिमुनींनी केलेल्या तपश्चर्येने तो परिसर पावन झाला आहे. त्या वातावरणात शुद्ध, सात्त्विक आणि पवित्र लहरींची स्पंदने आहेत. नैमिष्यारण्य, बदरिकाश्रम, नर्मदातट ही स्थाने ‘आर्षतीर्थ’ म्हणून ओळखली जातात.

४. मानुषतीर्थ : काही राजेमहाराजांनी यश, सत्ता, ऐश्वर्य, वैभव, पुत्रलाभ, मोक्ष किंवा काही सिद्धी यांचा लाभ व्हावा या हेतूने जेथे तप:साधना, यज्ञयाग, होमहवन आदी केले त्या स्थानाला किंवा परिसराला ‘मानुषतीर्थ’ असे संबोधले गेले आहे. अंबरीष, मनू, पुरू, हरिश्चंद्र, कुरू, सगर, अश्वयूप, नचिकेत, वृषाकपि, मांधाता, कनखल, अरिंदम अशा काही राजेमहाराजांनी समाजकल्याणाबरोबर तप:साधना आणि दिव्य यज्ञयाग ज्या ठिकाणी केले होते ती ‘मानुषतीर्थे’ होत.

५. मानसतीर्थ : व्यासमुनींनी ‘मानसतीर्था’चे वर्णन करताना म्हटले आहे, की मानवी देहातील आत्मा म्हणजे नदी, संयम हा त्या नदीचा घाट, सत्य हे जल, शील हा त्या आत्मरूपी नदीचा किनारा आणि दया, क्षमा, शांती हे सद्गुण म्हणजे त्या जलावरील निर्मळ तरंग होत. माणसाचे मन जर शुद्ध आणि निर्मळ नसेल तर तो करत असलेली सर्व कर्मे आणि त्याने पुण्यसंचयाच्या हेतूने केलेले दान, जपतप, यक्ष, शास्त्रश्रवण अशी उपासना फोल ठरते.

वेदवाङ्मयातून आणि पुराणांतूनही तीर्थांचे प्रकार सांगितले आहेत. तीर्थ किंवा तीर्थक्षेत्र या शब्दाची संकल्पना आणि अर्थ केवळ एखादे पवित्र स्थान, देवतेचे मंदिर, वास्तू, नदी, सागर इत्यादीपुरता मर्यादित नाहीत तर तीर्थ म्हणजे आदर्श, आदरणीय, सद्गुणी, सदाचारी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा संतस्वरूप व्यक्ती. त्यांनाही ‘तीर्थ’ समजले जाते. त्यांचा उल्लेख ‘तीर्थरूप’ अशा संबोधनाने केला जातो. पूर्वी वडील माणसांना उल्लेखताना तीर्थरूप असेच म्हटले जाई. दैवी कलागुणांची उपासना, अध्यात्मविद्या, ज्ञान यांचा अभ्यास जेथे चालतो अशी स्थानेसुद्धा तीर्थक्षेत्रेच आहेत.

त्या दृष्टीने तीर्थांचे प्रकार:

केल्‍याने तीर्थाटन...१. धर्मतीर्थ : धर्माबद्दल आदर, अभिमान निर्माण व्हावा, धर्मात सांगितलेल्या नीतिनियमांचे, सदाचाराचे, शास्त्रांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी काही ठिकाणी धर्मशिक्षण दिले जाते. धर्मजागृतीचे आणि धर्मप्रचाराचे कार्य जेथे चालते असे स्थान धर्मतीर्थांत मोडते.

२. मोक्षतीर्थ : ज्या स्थानी विद्या, ज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय साधलेला असतो; जेथे यज्ञयाग, होमहवन, जपतप, पूजाअर्चा, वेदपठण नित्यनेमाने चाललेले असते असे स्थान मोक्षतीर्थ महाद्वार असते.

३. कामतीर्थ : कला या दैवी वरदान आहेत, म्हणून जेथे विविध कला म्हणजे गायन, वादन, नृत्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला अशा कलांची उपासना आणि अभ्यास चालतो, जेथे देवदेवतांच्या मूर्ती, प्रतिमा, आध्यात्मिक प्रतीके, कलाकुसरीच्या सुंदर वस्तू, पूजाविधीसाठी लागणारी उपकरणे तयार केली जातात असे कलेचे पीठ म्हणजे ‘कामतीर्थ’ होय.

४. अर्थतीर्थ : पवित्र नदीकिनारी किंवा संगमावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते, अनेकांना रोजगार मिळतो. जेथे कष्ट, मेहनत आणि कर्तृत्व यांना महत्त्व आहे त्या स्थानाला ‘अर्थतीर्थ’ असे म्हटले आहे.

५. भक्ततीर्थ : जो भक्त त्‍याच्‍या आराध्यदैवताला किंवा सद्गुरूला शरण जाऊन त्याच्या चरणी सदैव लीन असतो, एकनिष्ठ असतो, त्याच्या मुखात आणि हृदयात सदैव भगवंताचे नाम असते, जो भगवंतस्वरूपात एकरूप झालेला असतो असा भक्त भगवंताला प्रिय असतो म्हणून तो ‘भक्ततीर्थ’ स्वरूपच असतो.

६. गुरुतीर्थ : जो अज्ञानमय अंधकाराचा नाश करून सत्य ज्ञानाच्या प्रकाशाने शिष्याचे जीवन उजळवून टाकतो असा सद्गुरू म्हणजे परमतीर्थ होय. अशा सद्गुरूच्या चरणी सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य एकवटलेले असते. सद्गुरूंचे चरण हे शिष्यासाठी पवित्र तीर्थक्षेत्र असते. सद्गुरूच त्याच्या परमशिष्याला मोक्षतीर्थाच्या दिशेने घेऊन जातात.

७. मातृपितृतीर्थ : भारतीय संस्कृतीत ‘मातृदेवो भव: | पितृदेवो भव: |’ असे म्हटले आहे. मुलाला जन्म देणारे आणि त्याचे वा तिचे पालनपोषण करून सदैव त्यांचे कल्याण चिंतणारे त्यांचे मातापिता हे त्यांना देवासमान आहेत. मातापित्यांसारखे दुसरे पुण्यतीर्थ नाही. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर, निष्ठा बाळगणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हाच सर्वांसाठी धर्म आहे, तीर्थ आहे आणि त्यातच मोक्षतीर्थाची प्राप्तीही आहे.

८. पतितीर्थ : प्रभुरामचंद्रासारखा एकपत्नी असा जो आदर्श पती असतो, जो त्याच्या सहधर्मचारिणीचे सर्वतोपरी रक्षण करतो, तिचा सांभाळ करतो, तिला योग्य तो मानसन्मान देतो आणि तिच्याशी सदैव कृतज्ञ राहतो असा पती तीर्थासमान असतो.

९. पत्नीतीर्थ : पातिव्रत्याचे पालन करणारी, सदाचारी, धर्मपरायण, ज्ञानी, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारी पत्नी म्हणजेच गृहिणी ही देवतासमान असते. ज्या घरात अशी पत्नी असते ते घरच एक तीर्थ असते.

१०. देवतातीर्थ : जेथे देवतेचे जागृत स्थान असते, त्या देवतेचा तेथे वास असतो. ते स्थान शक्तिपीठ असते. अशा शक्तिपीठाला किंवा स्थानाला ‘देवतातीर्थ’ असे म्हणतात.

११. अवतारतीर्थ : ज्या क्षेत्री साक्षात देवदेवतांनी मनुष्यरूपात अवतार घेऊन धर्माचे रक्षण, प्रसार व प्रचार केलेला असतो; तसेच, अधर्माचा नाश करून भक्तजनांचे कल्याण केलेले असते त्या क्षेत्राला ‘अवतारतीर्थ’ असे म्हणतात.

१२. संततीर्थ : संतमहात्मे कठोर तपश्चर्या, उपासना करून दैवी शक्ती प्राप्त करून घेतात. त्या शक्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करतात. राष्ट्रसेवा, समाजसेवा यांसाठी त्‍यांचे सारे जीवन अर्पण करतात. अशा संत सत्पुरुषांचे जन्मस्थान किंवा उपासना केलेल्या क्षेत्राला किंवा स्थानाला ‘संततीर्थ’ असे संबोधले जाते.

प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
९९२०५१३८६६
pradnakulkarni66@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. खुपच छान माहीती अन तीर्थांचे
    खुपच छान माहिती. तिर्थांचे एवढे प्रकार माहितीच नव्हते. धन्यवाद.

Comments are closed.