‘केअरिंग फ्रेंड’ मुंबईचे रमेशभाई कचोलिया

_Rameshbhai_Kacholia_1.jpg

मुंबई या अर्थनगरीतील उद्योगविश्वात राहूनही मनाची संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी जपणारे सत्त्याहत्तर वर्षांचे रमेशभाई कचोलिया मूळ अकोला येथील एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. वडील मिलमध्ये सर्वसामान्य कारकून; मात्र त्याही परिस्थितीत वडिलांचा इतरांना जमेल ते देण्याचा स्वभाव व संस्कार… अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांनी एका चाळीत राहून नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले. दहावीपर्यंत कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला. पार्टटाइम काम करून एलएल.एम. व डी.बीएम. केले. बिर्ला कंपनीत महत्त्वाच्या व्यावसायिक पदांवर अठ्ठावीस वर्षें काम केले. त्यांनी १९९२ साली नोकरी सोडून मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू केला व वाढवला.

त्यांचा बाबा आमटे व आनंदवन यांच्याशी १९८१ मध्ये परिचय झाला. बाबा त्यांना त्यांचा मानसपुत्र मानत. मुंबईत राहून ‘आनंदवना’च्या कार्याचा प्रचार-प्रसार, दानदात्यांचा शोध, त्याना ‘आनंदवन’बद्दल माहिती देणे, जमेल तर त्यांना सोबत घेऊन ‘आनंदवना’त जाणे-त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणे यांसारख्या कामांना ते वेळ देऊ लागले. हळूहळू त्यांचे कार्यालय हे ‘आनंदवन’चे कार्यालय बनले.

रमेशभाई कचोलिया यांचे काम विस्तारून ते केवळ ‘आनंदवना’पुरते न थांबता, इतरही ध्येयप्रेरित व तळगाळातील वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांसाठी होऊ लागले. ते त्यांच्यासाठीही मुंबईतून आर्थिक मदत व अन्य आवश्यक सहाय्य गोळा करत. तशा संस्थांची संख्या वाढत जाऊन आता ती दहा राज्यांतील चाळीसपर्यंत पोचली आहे. ते तेवढ्या समाजसेवी संस्थांसाठी मुंबईतील संपर्क व्यक्ती व कार्यालय म्हणूनच नव्हे, तर हक्काचा आसरा व भक्कम आधार आहेत. ते स्वतःच्या व्यवसायातूनसुद्धा २००२ साली बाजूला झाले व तेव्हापासून ते पूर्ण वेळ सामाजिक कामासाठी देतात.

रमेशभार्इंनी मुंबईतील नव्हे तर भारतातील व जगातील अनेक व्यक्ती-संस्थांना त्यांच्या कामात सहभागी करून घेतले आहे. ती संख्यासुद्धा पाचशेच्या वर जाऊन पोचली आहे. त्यातील बऱ्याच व्यक्ती कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व इतरही विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशाली व व्यस्त दिनक्रम असणार्‍या प्रोफेशनल्स आहेत. त्यांना स्वतःला मिळालेले व काही अंशी समाजाला परत करण्याच्या निरपेक्ष भावनेने एकत्र आलेले ते सर्व ‘केअरिंग फ्रेण्ड्स’ आहेत. रमेशभाई व निमेश सुमती शाह हे त्या गटाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. ‘केअरिंग फ्रेण्ड्स’ ही नोंदणी केलेली संस्था नाही वा त्याचे कोणी पदाधिकारी नाहीत. धर्म-पंथ, जात, प्रांत या कोणत्याही भेदाशिवाय समाजातील गरजूंच्या भल्यासाठी, नि:स्पृह व निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना मदतरूप होण्याची इच्छा/तयारी असणारा कोणीही त्या गटात सहभागी होऊ शकतो.

रमेशभाई, निमेशभाई व इतरही बरेचसे केअरिंग फ्रेण्ड्स केवळ दान देऊन मोकळे न होता, ते सर्व चाळीस संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक सुखदुःखांत सहभागी होतात. ते सर्व संस्थांमध्ये जातात, तेथे राहतात, कार्यकर्ते व लाभार्थी यांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात- सल्लाही देतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आजारपण, त्यांच्या वैयक्तिक अडचणी, मुलांचे शिक्षण यांसारख्या अडचणींच्या वेळी त्यांचा मोठा आधार सर्वांना होतो. रमेशभार्इंचे मुंबईतील घर संस्थांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे हक्काचे घर झाले आहे.

रमेशभाई हे ‘मी जे काही करतो त्यात माझे काही नाही. परमेश्वर ते माझ्याकडून करवून घेतो’ अशा आध्यात्मिक भावनेने मुंबईच्या आर्थिक राजधानीत चिखलामध्ये उमलणाऱ्या कमळासारखे निर्लिप्त आहेत!

रमेशभाई हे रोज पाच किलोमीटर फिरायला जातात. त्यांच्याबरोबर चालायचे म्हणजे धावावे लागते! ते नियमित ध्यान व आसने करतात. ते सत्याहत्तर वर्षांचे आहेत. ते ‘एक मिनिट वाया घालवू इच्छित नाही’ असे नेहमी म्हणतात व त्यानुसार वागतात. ते कार्यकर्त्याला आजारी पडण्याचा हक्कच नाही असेही म्हणतात. आजच्या या हिशोबी जगामध्ये त्यांच्यासारखे निरपेक्ष व्यक्तित्व दुर्मीळच!

– अविनाश सावजी 08275329553, 09420722107

sevankur@gmail.com

(‘आम्ही ‘बी’ घडलो’ सकाळ ( विदर्भ आवृत्ती) मंगळवार, २१ मार्च)

About Post Author