कुंकूप्रसिद्ध गाव – केम (Kem)

-karkhana-

करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर, स्टार्च पावडर आदी वापरले जाते. केमची कुंकू कारखानदारी सर्वदूर पोचली आहे. कुंकू दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, जयपूर, उज्जैन, पटना, वैष्णोदेवी, केरळ आदी ठिकाणी जात असते. गावाने कुंकू निर्मितीच्या उद्योगधंद्यामुळे चांगली प्रगती केलेली आहे; बेरोजगारीमुळे गाव ओस पडलेले नाही. कुंकवाचे दर वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार ते भाव ठरवले गेले आहेत. एका कारखान्यात दोन मजुरांपासून दहा मजुरांपर्यंत माणसे कामाला असतात.

गावची कुंकू निर्मितीची परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी त्यावेळी कुंकू निर्मितीचा शोध हळकुंडे, टाकणखार आणि लिंबाचा रस यांचा योग्य उपयोग करून लावला. अलिकडील काळात लिंबू किंवा इतर पदार्थांतील घटक असणारे रंग-गंध यांसाठी विविध कंपन्यांचे डबे उपलब्ध आहेत. ते या कुंकू निर्मितीच्या कामात वापरले जातात (उदाहरणार्थ, सायट्रिक अॅसिड). विविध रंगांची रांगोळी, गुलाल, बुक्का, अष्टगंध आदी निर्मितीही गावातून होते. 

केम गावातील कुंकूनिर्मितीबाबत शालेय अभ्यासक्रमातही माहिती दिली जाते. कुंकू कारखानदार संघटनेचे अध्यक्ष आप्पा विश्वनाथ वैद्य सांगतात, की त्या गावात रोज चाळीस ते पन्नास टन हळदीकुंकू निर्मिती केली जाते. ते ट्रक-टेम्पो आदी वाहनांनी विक्रीसाठी बाहेर नेले जाते. केम हे गाव महामार्गावर वसलेले नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी काही समस्या गावापुढे आहेत. त्याकरता केममधील काही व्यावसायिकांनी त्यांच्या सोयीनुसार पंढरपूर, टेंभुर्णी, पुणे अशा ठिकाणीही कुंकवाची कारखानदारी सुरू केली आहे. केमला रेल्वे जंक्शन आहे. रेल्वेची सुविधा ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे. मात्र तेथे रेल्वेद्वारे माल वाहतुकीची सुविधा नाही.-mandir-hanuman

गावात अठरापगड जातींचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहत आहेत. गावातील धार्मिक, सामाजिक कामात गावातील युवक; तसेच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी होत असतात.

केमची सांस्कृतिक कलापथकेही प्रसिद्ध आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘फॅण्ड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांचे काही चित्रीकरण केम गावात झालेले आहे. गावातील कलापथक; तसेच, गावातील हलगी वाजवणारे वाद्यवृंद प्रसिद्ध आहेत. केम गाव व हलगी यांचा उल्लेख दोन्ही चित्रपटांत येतो. हलगी वाजवणारे कलाकार चित्रपटात दिसतात. ‘फॅण्ड्री’तील नायक जब्या अर्थात सोमनाथ अवघडे हा केम गावातील आहे. त्याचे वडीलही हलगी वाजवतात. केम गावात नंदकुमार ढावरे यांच्या मार्गदर्शनाने हलगी वाद्यवृंद आहे. त्या ग्रूपमध्ये ‘फॅण्ड्री’ चित्रपटातील कलाकार सोमनाथ अवघडे यांचे वडील लक्ष्मण अवघडे हे हलगी वाजवण्याचे काम करतात. ‘फॅण्ड्री’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये सोमनाथला मानाचा पुरस्कार मिळाला आहे. तरीही सोमनाथ अवघडे ऊर्फ जब्या यांचे पुढील आयुष्य अंधकारमय आहे, कारण शिक्षण नाही. केम गावात त्याचे छोटे घर आहे. मात्र सोमनाथ ऊर्फ जब्याबद्दल लोकांना कुतूहल आहे.

गावातील व्यक्ती विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. गावातील श्री उत्तरेश्वर हे मोठे प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले गेले आहे. उत्तरेश्वर देवस्थान हे पुरातन शिवालय. ते हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले मंदिर आहे. शिवालयाबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे उज्जैन नगरीच्या राजाला एक राजपुत्र होता. त्याचे नाव क्षेम राजा होते. त्याच क्षेमराजाने हे नगर वसवले. क्षेम नावाचा अपभ्रंश म्हणून केम असे नाव गावाला पडले. क्षेम राजाच्या शरीराची दुर्गंधी; तसेच, व्याधी गावातील एका कुंडात स्नान केल्याने नष्ट झाल्याने; त्याने हे नगर वसवले.

-kunda-barvaउत्तरेश्वराचे भव्यदिव्य पुरातन शिवालय त्याच पाण्याच्या कुंडाजवळ अथवा बारवेजवळ आहे. मंदिराचे महाद्वार पूर्व दिशेला आहे. भव्य नंदीचे दर्शन महाद्वारातून आत गेल्यावर होते. आत सभामंडप; तसेच, काही पुरातन छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. मंदिराचे काम कलात्मक दृष्टीने केलेले आहे. बारवेच्या लगत काही छोट्या मूर्ती दिसून येतात. उत्तरेश्वराच्या यात्रेला महाशिवरात्रीनंतर तीन दिवसांनी प्रारंभ होतो. यात्रेमध्ये देवाचा छबिना मिरवणूक मार्गावर निघतो. छबिन्यामध्ये शोभेची दारू उडवली जाते. यात्रेत बारा बलुतेदार समाजातील लोकांना मान दिला जातो. गावचे शिवार मोठे असून, तेही अलिकडील काळात फळबागांनी फुलून गेले आहे.

गावात चार महाविद्यालये आहेत.केम गावात दरवर्षी आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. केममध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री राजाभाऊ तळेकर विद्यालय, शारदाताई गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय आणि नूतन माध्यमिक विद्यालय अशी चार विद्यालये आहेत. गावातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा चांगली आहे. ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीसाठी लोकवर्गणी काढून तिचे बांधकाम व सजावट केली आहे. केम गावात अलिकडच्या काळात इंग्रजी माध्यमातील शाळांचीही भर पडत आहे. गावात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. गावात ग्रंथालय आणि व्यायामशाळा आहेत. गावातील युवक विविध क्षेत्रांत अधिकारी, खेळाडू व नामवंत उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. केम गावासाठी पाणीपुरवठा उजनी धरण योजनेतून तीस-पस्तीस वर्षांपासून सुरू आहे. तिची ओळख पहिली पाणीपुरवठा योजना म्हणून तालुक्यात आहे.

 
–  हरिभाऊ हिरडे 8888148083

haribhauhirade@gmail.com 

About Post Author