कुंकवाची उठाठेव

0
61
carasole

कुंकू किंवा कुमकुम ही सर्व भारतीयांना परिचित अशी वस्तू आहे. ती हिंदू धर्मीयांच्या पूजाअर्चेतील आवश्यक बाब आहे. कुंकवाचा रंग लाल. त्यात भगव्या किंवा केशरी रंगाची छटा. पुरुषांनी लावल्यावर त्याला गंध किंवा टिळा म्हणतात. पण जागा कपाळच! कपाळ किंवा भुवयांच्या मधोमध. कुंकवाला स्त्रीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व. ते भांगात भरले, की बहुधा कुंकवाचे सिंदूर होते. गतिमान जगात ‘टिकली’ने स्त्रियांचे हृदय जिंकले असले तरी हळदीकुंकू समारंभात कुंकवाचे स्थानमहात्म्य टिकून आहे. देवदेवतांच्या पूजेतून कुंकवाला कोणत्याही दुसऱ्या वस्तूने हटवलेले नाही.

रंग हा भारतीय सण संस्कृतीचा घटक आहे. होळी, रंगपंचमी या सणांत तर रंगांची उधळण केली जाते! रंगीत पाण्याने आबालवृद्धांना भिजवले जाते. ‘गुलाल उधळीत या’ असे आवाहन केले जाते. रंगांचा हा अनिर्बंध वापर गणपती उत्सवातही वाढलेला आहे. आरासही रंगीबेरंगी. गणपती पूर्वी शाडू (एक विशिष्ट माती)चा असायचा. मूर्ती आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असते. होळी व गणपती हे रंगीत सण हळुहळू पर्यावरणाचा ऱ्हास करणारे म्हणून कुप्रसिद्ध होत आहेत. इतके, की ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या रंगीत सणांबद्दल प्रबोधन करू लागले आहे.

कुंकूसुद्धा त्याच यादीतील एक पदार्थ झालेला आहे. मी स्वत: रंग उद्योगाशी संलग्न उत्पादन व संशोधन यांच्याशी जोडलेला असल्यामुळे यात रस घेतला. होळी व गणपती उत्सवांत पर्यावरण प्रिय रंग वापरले जावेत म्हणून जनजागृतीसाठी जी प्रचार मोहीम सुरू झाली, मी त्यात सहभागी झालो. टी.व्ही.वरील होळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोळकर व गणपती निमित्त कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांच्यासमवेत तज्ज्ञ म्हणून तशा चर्चांत भाग घेतला. होळीचे पर्यावरणप्रिय रंग बाजारात आणताना ‘मुंबई ग्राहक पंचायत’चे सहकार्य लाभले व पर्यावरणप्रिय गणपतीच्या प्रसारकार्यातील सहभागामुळे प्रभादेवीच्या सिद्धिविनायकापर्यंत जाऊन पोचलो. कुंकवाची उठाठेव तेथून सुरू झाली. कुंकवाचे विविध नमुने माझ्या प्रयोगशाळेत आले.

मुंबईच्या ‘सिद्धिविनायक मंदिरा’च्या विश्वस्त मंडळींनी शाडूच्या गणपतीचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात अनेक गणेशमूर्तिकारांनी भाग घेतला. ‘इलेक्ट्रॉन’ कंपनीच्या पर्यावरणप्रिय रंगांचीही एक प्रात्यक्षिक कार्यशाळा आम्ही सुरू केली. प्रदर्शनात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली. या विद्यार्थ्यांना आम्ही शाडूच्या गणेशमूर्ती रंगवायला दिल्या. शाडू व कागद लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती व कागदावरील चित्रकला स्पर्धा (2014) आयोजित केली. आमच्या त्या सहभागामुळे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अजित पटेल यांनी ‘कुंकू’ व ‘सिंदूर’ याबाबत चर्चा केली व कुंकवाचे विविध नमुने माझ्या प्रयोगशाळेत आले! कुंकवाच्या उठाठेवीला सुरुवात अशी झाली.

कुंकू हे सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांत बाटलीतून उपलब्ध होण्यापूर्वी आया-आज्यांच्या करंड्यात असायचे. माझी आई तर काजळ व कुंकू घरातच बनवायची. जुन्या फणसाच्या खोडावर सुकलेल्या सालीचे ढलपे असायचे. अशा सालीच्या तळाशी मखमली लालभडक रंगाचा थर असायचा. तो रंग मेणात मळून माझी आई कुंकवाच्या करंड्यात भरून ठेवायची. अंघोळ करून बाहेर येण्यापूर्वीच कुंकू कपाळावर ठळकपणे दृष्टीस पडले पाहिजे असा दंडक असायचा. अर्थात, करंड्यातील ते कुंकू विक्रेयवस्तू होणे शक्यच नव्हते. कुंकू ही प्रत्येक घरात आवश्यक अशी वस्तू असल्यामुळे त्याचे व्यापारी उत्पादन होणे अपरिहार्यच आहे. हळदीत (आम्ल) ओलसर चुना (कॅल्शियम ऑक्साइड-अल्कली) मिसळला की पिवळी हळद तांबडी होते. तेच पारंपरिक शुद्ध कुंकू! देवळांच्या परिसरात कुंकवाचे ढीग रचलेले दिसतात. ते हळदकुंकू असतेच असे नाही. नसतेच!

माझ्या प्रयोगशाळेत कुंकवाचे नमुने आले व मी रंगरुपादी तपासण्या सुरू केल्या. तेव्हा माझे मन बालकाच्या एका आठवणीने सुन्न झाले. ती आठवण सवाशिणींच्या कुंकवाशी जोडलेली आहे. माझ्या जानशी (ता. राजापूर – जैतापूर परिसर) या जन्मगावच्या पंचक्रोशीत ब्राम्हण कुटुंबात लाल आलवणातील विकेशा स्त्रिया असायच्या. बोडकी बाई असा त्यांचा उल्लेखही होई. पतिनिधन झाल्यामुळे कपाळावर कुंकू कोठून असणार? प्रत्येक विधवा लाल आलवणातच असायची असे नव्हे. मुख्यत: तारुण्यातील वैधव्याची ती खूण. तशा स्त्रियांना आरशात बघणे हीदेखील चोरी. कुंकू लावण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या बालपणी चर्चिल्या गेलेल्या गोष्टी! गृहकलहामुळे असेल वा विरक्तीमुळे असेल, एक भिक्षुक गृहस्थ जो घराबाहेर पडला तो पुन्हा कधी घरी परतलाच नाही. दुसऱ्या एका घरंदाज स्त्रीचा पती मुंबईकर होता. त्याने म्हणे, आत्महत्या केली. आता या दोन्ही स्त्रियांच्या नवऱ्यांचा कोणाला थांगपत्ता लागलेला नाही. ते जिवंत नसल्याचा कोणाजवळ पुरावाही नाही. आता त्यांच्या बायकांना काय म्हणायचे? त्या स्त्रिया स्वत:ला सौभाग्यवतीच म्हणावायच्या; चांगले ठसठशीत कुंकू कपाळावर लावायच्या. त्याही इतर बायकांप्रमाणे अंजनेश्वराच्या देवळात सोमवारी जायच्या. निरोप घेताना त्या बायका एकमेकींना हळदकुंकू लावायच्या. अशा एका प्रसंगी एका भोचक भवानीने त्या दोन बायकांच्या वर्मावर बोट ठेवले. ‘तुम्हा दोघींना तर कुंकू लावायलाच हवे. तुम्ही कायमच्या – अक्षय्य – सवाशिणी.’ पतींच्या शोधात असलेल्या त्या दोघी नंतर अंजनेश्वराच्या दर्शनाला गेलेल्या नाहीत.

मला कुंकवाचा लाल-केशरी-भगवा रंग अन्य कोणत्या गोष्टींमुळे येऊ शकतो याचा विचार करायचा होता. मी कुंकवाच्या नमुन्यांचा वास घेऊन पाण्यात टाकत होतो, त्यावर अन्य रासायनिक पदार्थांचे थेंब टाकून काय होते त्याची निरीक्षणे नोंदवत होतो. रक्तचंदन, केशर अशा वस्तू त्यांचे बाजारमूल्य माहीत असल्यामुळे बाद केल्या होत्या. मला कुंकू बनवताना दोन पथ्ये पाळायची होती. ते दिसायला कुंकवासारखे दिसले पाहिजे. त्यातील प्रत्येक वस्तू निसर्गदत्त पर्यावरणप्रिय असायला हवी. त्याच्या वापराने आबालवृद्ध कोणालाही त्रास होता कामा नये. मला त्यात यश मिळाले. लाल व केशरी रंगाचे कुंकू प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळींनीसुद्धा पसंत केले. गणपतीच्या ‘मॅजिक कलर्स’मध्ये कुंकवाने प्रवेश केला. विशेष म्हणजे लंडनला सिद्धिविनायकाच्या मंदिराची स्थापना होणार आहे, त्याच्या शिलान्यासाच्या सामग्रीबरोबर ते कुंकूही रवाना झाले आहे.

आता या कुंकवामुळे गणपतीची मूर्ती, सोनेरी मुकुटासह शंभर टक्के पर्यावरणप्रिय झालेली आहे.

– राजा पटवर्धन, 9820071975

(लेखक ‘इलेक्ट्रॉन ग्रुप’चे संशोधन सल्लागार आहेत)

About Post Author

Previous articleबहुढंगी मुंबई
Next articleप्रल्हाद पाटील-कराड – प्रगतशील शेतकरी
राजा पटवर्धन हे ‘थिंक महाराष्ट्र‘च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध‘ मोहिमेत कार्यकर्ते म्हणून सामील होते. त्यांचे अणुशक्तीवर ‘जैतापूरचे अणुमंथन’ हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे अलीकडेच ‘पुनर्शोध महाभारता‘चा पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. राजा पटवर्धन यांचा जन्‍म जैतापूरच्या प्रकल्प परिसरातील जानशी गावातला. त्यांनी शिक्षण झाल्यानंतर रासायनिक उद्योगात नोकरी केली. ते कोकण विकास, देशापुढील आर्थिक प्रश्न आणि विशेष करून ऊर्जा समस्या यांबद्दल लिखाण व व्याख्याने करत असतात.