किल्ले विजयदुर्गची तटबंदी!

3
54

विजयदुर्ग किल्ल्यातील मराठ्यांच्या पराक्रमात तेथील दुर्गरचना, आरमारी गोदी आणि समुद्रांतर्गत तटबंदी यांचाही समावेश करता येईल. तेथील बलाढ्य आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम आखली होती. मोहिमेत तीन युद्धनौका पाठवण्यात आल्या. पण त्यांची ती मोहीम यशस्वी झाली नाही, कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर त्या युद्धनौका बुडाल्या. त्या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखाली राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली उभारलेली आहे. इंग्रजांच्या युद्धनौका त्या अदृश्य तटबंदीला धडकल्या आणि बुडाल्या! प्रकाशचित्र तज्ज्ञांनी त्या संदर्भात काही वर्षांपूर्वी अभ्यास केला असता ते बांधकाम सतराव्या शतकातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.

मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकावणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रजांनाही त्या किल्ल्याची फार आस होती. इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीने आंग्रे यांचा पाडाव केला. तो किल्ला जिंकला. त्या वेळी त्यांनी पेशव्यांबरोबर तह असा केला, की विजयदुर्ग किल्ला त्यांच्याकडे राहील व त्या बदली बाणकोट व विजयदुर्गजवळची दहा गावे पेशव्यांना मिळतील. इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयदुर्ग!

शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम ११९५ ते १२०५ या कालावधीत केले. कालांतराने, किल्ल्यावर देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरचा आदिलशहा यांच्याकडे हा किल्ला आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून तो किल्ला १६५३ मध्ये जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते.

महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकरावरून सतरा एकर एकोणीस गुंठे एवढे झाले. चिलखती तटबंदीवर महाराजांनी सत्तावीस भक्कम बुरूज बांधले. त्यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! शिवाजी महाराजांनीच त्याची बांधणी केली.

शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टींतून लक्षात येते. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेले बलभीम मारुतीचे मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! किल्ल्यात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असे नाव आहे. तो मार्ग जांभ्या दगडातील आहे. तो दरवाजा सुरक्षिततेच्या दृष्टीने वळणावळणाचा आहे. दरवाज्यासमोर डावीकडे समुद्रकिनाऱ्यापर्यंत खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. तो रस्ता मातीचा भराव टाकून नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.

सतराव्या शतकात त्या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात त्याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशवे यांच्याविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी त्यांच्या चार पौंडी सोळा तोफा जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पायऱ्या लागतात. तोच दिंडी दरवाजा!

दिंडी दरवाज्याची रचना अशी आहे, की किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूच्या नजरेत तो दरवाजा येत नाही. शत्रूने केलेल्या तोफांच्या माऱ्याच्या निशाण्या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर ते मुख्य प्रवेशद्वार बंद केले जात असे. त्यानंतर आत येणाऱ्या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाज्यातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. त्या दरवाज्यावर मोठमोठे खिळे आहेत.

दिंडी दरवाज्यावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजवले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. ध्वजस्तंभाजवळ जाणाऱ्या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. तो खलबतखाना! शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करण्याची असली तर ती खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकू जात नसत. अचंबित करणाऱ्या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.

ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असे नाव आहे. ती आयताकृती आहे. तेथे टोकाला बसलेल्या सैनिकालाही आवाज स्पष्ट ऐकू यायचा. त्याबरोबरच, भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाड्याकडे जाणारे भुयार, भवानी मातेचे मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला प्रेक्षणीय होतो.

शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यानंतर कान्होजी आंग्रे यांची कोकणातील राजकीय कर्तबगारी सुरू झाली. इंग्रज व पोर्तुगीज यांचे आंग्रे यांच्याशी कधीच जुळले नाही. आंग्रे यांच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागातील गोदीवाडी येथे आरमारी गोदी होती.

आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर कॅप्टन डेव्हिस यांना १९५२ साली सापडला होता. तो साडेतेरा फूट लांब आणि आठ फूट रुंद होता. नांगरावरून त्या काळच्या जहाजांची कल्पना येते. तो नांगर अठराव्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियममध्ये तो जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी तो संग्रहालयाकडे पाठवला. गोदीमध्ये जहाजदुरुस्तीबरोबरच नवीन जहाजेही बनवली जात. आंग्रे यांनी गोदीची निर्मिती केली. ती गिर्ये गावाजवळ वाघोटन खाडीच्या काठावरचा खडक खोदून. गोदीची लांबी ३५५ फूट व रुंदी २२७ फूट इतकी होती. गोदीमध्ये पाचशे टनी जहाजे ये-जा करू शकत.

गोदीतील पाणी ओहोटीला बाहेर गेल्यावर पूर्वेकडील सदुतीस फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडवले जाई. फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी त्याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठ्यांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या. त्या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. त्या संदर्भात तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी त्या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. त्याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी त्यांचा शोधप्रबंध ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ मध्ये शोधप्रबंध सादर केला होता.

त्यानंतर मुंबईमध्ये भरलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजमधील संशोधक सहायक सचिन जोशी यांनी ‘मिथ्स अँड रिअॅालिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅपट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात, की विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे! कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणाऱ्या ‘डाइक’ प्रकारच्या रचनेचाच तो भाग असल्याचे ते म्हणतात, “ते बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ × २.५ × २.५ मीटर इतक्या मोठ्या आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना त्या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते.”

साधारण ऐंशी ते नव्वद वर्षांच्या इतिहासात, किरकोळ घटना वगळता त्या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. पाण्याखालील ती भिंत मराठ्यांच्या आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठ्यांच्या पराक्रमात कामी आली आहे. तो भाग नैसर्गिक आहे. पण ती जागा आंग्रे यांच्या नौदलाने शोधून काढली आणि तिचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतवण्यासाठी केला गेला.

‘आंग्रे बँक’ म्हणजे समुद्रातील टेकडी! विजयदुर्ग समुद्रामध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यास मिळतो. विजयदुर्गपासून साधारण शंभर किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ऐंशी ते नव्वद मीटर वाढत जाते. पुढच्या तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी वाढते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये खोली अचानक कमी होऊन वीस ते पंचवीस मीटर एवढी होते. तीच आंग्रे बँक! टेकडी तब्बल पस्तीस ते चाळीस किलोमीटर लांब व पंधरा ते वीस किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडे विजयदुर्गकडे असत. त्या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असे ते या टेकडीमुळे मराठा आरमाराने या निसर्गरचनेचा संरक्षणार्थ कुशलतेने उपयोग केला.

मराठा आरमार आंग्रे बँक या ठिकाणी नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला, की मराठ्यांची जहाजे पश्चिमेकडून त्यांना अटकाव करत. बेसावध शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत असे.

– बाळा कदम

(मूळ लेख, ‘प्रहार’, 15 फेब्रुवारी 2015)

Last Updated On 27 Nov 2017

About Post Author

Previous articleसंत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)
Next articleतटबंदी
बाळा कदम हे व्‍यवसायाने पत्रकार. ते 'दैनिक प्रहार'मध्‍ये कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या ऐंशी कथांना साप्‍ताहिके, मासिके आणि दिवाळी अंक यांतून प्रसिद्धी मिळाली आहे. त्‍यातील बावीस कथा पारितोषिक विजेत्या आहेत. कदम यांनी मालवणी कविता, एकांकिका अशाप्रकारचे लेखन केले आहे. त्‍यांना अभिनयाची आवड आहे. त्‍यांनी मच्‍छींद्र कांबळी यांच्‍या 'वस्‍त्रहरण' या गाजलेल्‍या नाटकाच्‍या दोनशे प्रयोगांमध्‍ये 'गोप्‍या' ही भूमिका साकारली आहे. इतर अनेक नाटकांत काम करण्‍यासोबत त्‍यांनी 'किल्‍ला' या चित्रपटात लहान भूमिका केली. त्‍यांनी स्‍वलिखित मालवणी विनोद काव्‍यवाचनाचे एकशे चौ-याण्‍णव प्रयोग केले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9420308100

3 COMMENTS

  1. कदम साहेब लेख अतिशय उत्तम आणि
    कदम साहेब लेख अतिशय उत्तम आणि समतोल लिहिलेला आहे. काही गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकते. तरीही लेख छान लिहिला हे. अभिनंदन.

  2. चौथ्या तटबंदी बाबत कोणताही
    चौथ्या तटबंदी बाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. डॉ. सचिन जोशी यांचे मत योग्यच आहे. ह्या विषयावर मी स्वतः संशोधन केलेले आहे. ह्या चौथ्या तटबंदीचे जनक कै. निनाद बेडेकर आहेत. पण त्यांचे सर्व सिद्धांत निराधार (कागदोपत्री पुरावा नसलेले) आहेत.

Comments are closed.