कनाशी – शाकाहार जपणारे गाव

3
55
carasole

चकधर स्‍वामींनी कनाशी गावाला भेट दिल्‍यापासून गेली सातशे वर्षे गावाने शाकाहाराची परंपरा पाळली आहे.कनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे! भिन्न विचार अन् भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे.

खानदेशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. रूढी, परंपरा आणि त्यांचा इतिहास यांमुळे त्या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. तेथील कृषिसंस्कृती, खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील बोलीभाषा, अहिराणीचा गोडवा वेगळाच आहे. तेथील धार्मिक स्थळेही जगप्रसिद्ध आहेत. पाटणादेवी, उपनदेव, शहादा-प्रकाशा, ऋषिपांथा, कनाशी, म्हसदी, शेगाव आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात.

कनाशी हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावे असतील; परंतु जळगावातील कनाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो वा आनंदी भाविक असो त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तरच नवल! बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

चक्रधर स्वामी त्यांच्या अनुयायांसह वेरूळ, कन्नड, सायगव्हाण, वाघळीमार्गे कनाशी येथे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात आले. ती त्यांची मराठवाड्यातील प्रबोधन यात्रा होती. त्याचवेळी स्वामींना भेटण्यासाठी त्यांचे काही भक्त मराठवाड्यात गेले. तोपर्यंत स्वामी जळगाव जिल्ह्याकडे गेले होते. मग भक्तही खानदेशकडे रवाना झाले. मात्र, त्यांची आणि स्वामींची भेट काही होईना. शेवटी जेव्हा स्वामी वाघळी‌हून कनाशीकडे निघाले, तेव्हा भक्त वाघळीत पोचले. तेथे त्यांना कळले, की स्वामींनी सकाळीच कनाशीकडे प्रयाण केले. तेव्हा त्या भक्तांतील महादाईसा यांनी प्रतिज्ञा केली, की ‘स्वामींचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही.’ त्या भक्तांची आळवणी स्वामींपर्यंत पोचली आणि त्यांनी कनाशीतच मुक्काम करण्याचे ठरवले अशी भाविकांची श्रद्धा आहे.

स्वामी त्यांच्या भक्तगणांसह कनाशी गावाबाहेर असलेल्या मळ्यात थांबले. त्यावेळी कनाशी गावातील गढीवर एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी त्या मळ्यातील झऱ्यातून पाणी वाहून नेत होती. झऱ्याचा प्रवाह कमी असल्याने त्यांना एका फेरीसाठी खूप वेळ लागत होता. मात्र, स्वामी मळ्यात येताच त्यांच्या आगमनासोबतच्या सकारात्मक वातावरणाने झऱ्याचा प्रवाह वाढला. त्यावेळेला ब्राह्मणाची पत्नी पाणी घेऊन घरी लवकर आल्याने ब्राह्मणाने आश्चर्यचकित होऊन तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले, ‘गावाबाहेरच्या झऱ्याकडे दैवी पुरुष अवतरले आहेत, त्यांच्या आगमनाने झऱ्याचे पाणी वाढले.’ ब्राह्मणही स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तेव्हापासून आजतागायत कनाशीतील त्या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे.

कनाशी गावाबाहेरील गढीवर असलेले सुरेख मंदिर गावाने पुढे महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाचे घर असलेल्या गढीवर सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कोणालाही त्या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. चक्रधर स्वामींनी त्या गावाला भेट दिली तेव्हापासून त्या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. कुणीही मांसाहार करत नाही. गावातील प्रत्येक नागरिकाने महानुभाव पंथ स्वीकारला आहे. तेथील तरुण पिढीनेदेखील एकीकडे स्मार्ट फोन हाती धरला असला, तरी वर्षानुवर्षे चालत आलेली शाकाहाराची परंपरा जोपासली आहे. गावातील दुकानात साधे अंडेही मिळत नाही. गावकऱ्यांची पावले नकळत मांसाहाराकडे वळू नये यासाठी गावात कोंबडी, शेळी यांसारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत.

कृष्ण जन्माष्टमीला घराघरात चक्रधर स्वामींची पूजा करण्यात येते. घरोघरी पाहुण्यांचा राबता सुरू होतो. रात्री संपूर्ण गाव मंदिरात गोळा होते. भगवान कृष्ण आणि चक्रधर स्वामी यांच्या नावाने जयघोष केला जातो. तेथील आश्रमातील कवीश्वर कुलाचार्य खामनीकर बाबा येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महानुभाव पंथाची महती सांगतात. चक्रधर स्वामींचे गुरू परमेश्वर अवतार गोविंद प्रभू यांनी वार्धक्यावस्थेत त्यांची हलणारी दाढ हाताने काढली व समोर बसलेल्या साध्वीला ती दिली. महानुभाव पंथात त्या दाढेला खूप महत्त्व आहे. कनाशीतील मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेला ती दाढ दर्शनासाठी ठेवण्यात येते.

(मूळ लेख – प्रशांत देसले, महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 30 ऑगस्ट 2014)

About Post Author

3 COMMENTS

  1. उदबोध माहिती. अभिनंदन. कमलाकर
    उदबोध माहिती. अभिनंदन. कमलाकर सोनटक्के

  2. i am very happy after…
    i am very happy after reading all about village KANASI. Soon I will visite the Temple .

Comments are closed.