ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpg

नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात 1930 पर्यंत होते. त्यापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.

नातेपुते गावाचा इतिहास इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत पाहता येतो. नातेपुते गावाचे ग्रामदैवत गौरीहर मंदिराच्या बांधकामावरून ते ध्यानी येते. देऊळ बहामनी काळात (1350) हेमाडपंती शैलीत बांधले गेले आहे. गावाबाहेरील तळ्याचा नातेपुते गावाच्या पाणीपुरवठा योजनेत साठवण तलाव म्हणून वापर होतो. त्यास फुटके तळे असे म्हणतात. तलावाच्या बांधकामावरील चिन्हावरून तो इतिहास देवगिरीच्या यादव राजांपर्यंत पोचतो. गावाभोवती भक्कम भुईकोट किल्लेवजा तटबंदी होती. तिचे थोडे अवशेष भग्नावस्थेत दिसतात. औंध, फलटण, सातारा, पुणे, नगर, विजापूर इत्यादी ऐतिहासिक संस्थांनांचा कारभार शेजारी होता. तटबंदीच्या आतमध्ये त्याकाळी शंभर-दीडशे कुटुंबे असावीत. ग्रामदैवत गिरिजापती (गौरीहर) मंदिर म्हणून त्यात वतनदार, मंदिराचे पुजारी बडवे, घडशी समाजातील भोसले, कलावंत-शेख कुटुंबे, प्रामुख्याने पाच-दहा कुटुंबे वाणी-जंगमांची होती व शेतकरी कुणबी अशी छोटी लोकवस्ती होती.

नातेपुते गावास इतिहासकाळात ‘शंकरापठण’ असे नाव होते. जुन्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे (हैदराबाद संस्थानचा मराठवाडा) कुलदैवत असल्याने त्या भागातील अनेकांनी देवळाच्या बांधणीस हातभार लावला आहे. त्यांची नावे पायऱ्यावर, खांबांवर, फरशीवर, दरवाज्यांच्या उंबरठ्यावर वगैरे ठिकठिकाणी खोदलेली आढळतात. गिरिजाशंकर मंदिरासमोर चांगला विस्तीर्ण व उत्तम दगडी बांधणीचा तलाव आहे. पूर्वी उन्हाळ्यात त्या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे. शाहू महाराजांचे आध्यात्मिक गुरू, ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी तो तलाव यात्रेकरूंच्या सोयीसाठी बांधला आहे. तलावाच्या बांधकामासाठी दहा हजार रुपये खर्च झाला आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी भिक्षाद्रव्य गोळा करून लोकोपयोगी देवालये, तलाव, विहिरी बांधल्या आहेत. त्यांना छत्रपती, पेशवे व काही मराठे सरदार यांच्याकडून पंधरा हजार आठशेतेहतीस रुपयांचे भिक्षाद्रव्य मिळत असे.

औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याचा पुत्र शहाजादा आंजुमशहा याने शिखर शिंगणापूर येथील ते देऊळ त्याच्या परवानगीने पाडून टाकले. देवाची यात्रा त्या वेळेपासून ‘शंकरापठण’ ऊर्फ नातेपुते येथे बादशहाच्या अंमलात भरत होती. शाहू छत्रपतींच्या काळात बसंतराव त्यांचा विश्वासू खोजा होता. त्याने त्या देवळाचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी स्वामी शाहू महाराजांची परवानगी घेऊन पूर्वीचे हेमाडपंती यादवकालीन देवालय होते ते नवीन बांधले. त्याने श्री शंभू महादेव यांचे देवालय बांधून त्याचे नाव श्री सन्मुख उंबर्‍यालगत घातले आहे. त्यावर चरणी तत्पर बसंतराव निरंतर अशी अक्षरे कासवालगत काढली आहेत. लाखो यात्रेकरूंचे पाय त्या नावावर लागतात, त्यामुळे ते एक पुण्यप्रद काम ठरते.

_EtihasikSandarbhacge_Natepute_3.jpgबसंतराव खोजा याने शिखर शिंगणापूरच्या देवळाचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर नातेपुते येथे भरणारी देवाची यात्रा मना केली. त्याने शिखराखाली यात्रा पुन्हा भरण्यासाठी सरकारच्या शिक्क्यासह कौल दिला. बसंतराव खोजा याचे आडनाव कासुर्डे असून तो जातीने वाणी होता.

गंगाधरशास्त्री यांचा खून पंढरपूर क्षेत्रामध्ये 1815 मध्ये झाला. त्रिंबकजी डेंगळे हा दुसर्‍या बाजीरावाचा कारभारी. त्यानेच तो खून केल्याचे सांगून बाजीराव पेशव्यांमार्फत त्याला अटक करण्यास भाग पाडले. त्याला 1815च्या ऑक्टोबरमध्ये ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. इंग्रजांनी तुरुंगातील बंदोबस्तासाठी दक्षता घेऊनही त्रिंबकजी 12 सप्टेंबर 1816 रोजी फरार झाला. त्याने तुरुंगातून तबेल्याच्या भिंतीस भोक पाडले. त्याने त्यासाठी घोड्याची निगा राखणारा इसम हाती धरला. तो बाजीरावाने पाठवला होता. तो घोड्याच्या तबेल्यात राहून निगा राखता राखता गाणी गायचा. त्या गाण्याचा अर्थ इंग्रज शिपायांना कळत नसे, पण त्रिंबकजीला समजत असे. त्रिंबकजी त्याचा फायदा घेऊन निसटला. तो प्रथम खानदेशात गेला. नंतर सातार्‍याजवळ महादेवाच्या डोंगरात राहू लागला. त्याने त्यावेळी नातेपुते भागातील लोकांतून मदतीसाठी बारा विश्वासू सहकारी तयार केले. त्याने ब्रिटिशांविरूद्ध बंडाळी पुन्हा चालू केली. ब्रिटिशांनी त्रिंबकजीला पकडून देणार्‍याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्रिंबकजीचा नुसता ठावठिकाणा, पत्ता लावून देणार्‍यास इंग्रजांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस व एक चाहूर जमीन देण्याचे जाहीर केले.

त्रिंबकजींचा पत्ता ठाऊक असून जर कोणी त्याची माहिती इंग्रजांना दिली नाही तर त्याचे पारिपत्य केले जाईल असा जाहीरनामा पेशव्याने जरी काढून त्यावेळच्या पंढरपूरच्या कमाविसदार बाबुराव गणेश याला कळवला तरी प्रत्यक्ष बाजीराव पेशवाच त्रिंबकजीला सहाय्य करत होता. त्रिंबकजी डेंगळे याने जमवलेले विश्वासू बारा साक्षीदार नावानिशी पुढीलप्रमाणे : 1. बापू गायकवाड शेटफळकर, 2. नागोजी वाळुंज, 3. रविराव शिंदे लोणीकर, 4. महादजी पंत नातेपोतेकर, 5. तिमाप्पा वडारी, 6. गोधाजी डेंगळा, 7. सयाजी मुळे, 8. आप्पाजी पाकुरवावीकर,9. निंबाजी जाधव फलटणकर, 10. महिपतराव डेंगळा, 11. बापू वरडकर, 12. दाजी डफळे.

बाजीराव पेशव्याने नातेपुते महालाचा महालकरी त्रिंबकजीला मदत व्हावी असाच कारकून नेमला.

त्यावेळी घटना ज्या घडत होत्या त्याचे नातेपुते हे काही काळ केंद्रच बनले. संताजी घोरपडे, सेनापती याची हत्या 1697 च्या आषाढ महिन्यात नागोजी माने म्हसवडकर याने केली. बादशहाचा तळ त्यावेळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे होता. त्याने बादशहाकडे अर्ज करून ज्या मागण्या केल्या आहेत त्यात नात्यापोत्याची गढी त्याला मिळावी; तसेच, ती गढी आतील साहित्य, शस्त्र, दारुगोळा यांसह मिळावी असा अर्ज औरंगजेब बादशहाकडे केला. त्यावरून त्या ठिकाणची गढी लष्करी दृष्ट्या महत्त्वाची होती हे लक्षात येते. गढीचे काही अवशेष नातेपुते गावी दिसून येतात. त्रिंबकजी साष्टीच्या तुरुंगातून पळाला, त्याने वरघाटी येऊन-डोंगरात राहून जमाव सुरू केला.

नातेपुते गावाची लोकसंख्या 1875 साली दोन हजार तीनशे शहात्तर, 1881 साली दोन हजार दोनशेएकसष्ट, 1971 साली सात हजार नउशेबेचाळीस, 2001 साली सोळा हजार सात व 2011 साली सतरा हजार नउशेएकोणसाठ अशी वाढत गेलेली आहे. गावात अठरापगड जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, व्यापार व घोंगडी तयार करणे असा होता. शेतमालाची मोठी बाजारपेठ म्हणून पूर्वीपासून नातेपुते प्रसिद्ध आहे. (सोलापूर जिल्हा गॅझेट, 1884). नातेपुते गावच्या परिसरातील चाळीस-पन्नास खेड्यांचा व्यापारउदीम, देवाणघेवाण नातेपुते बाजारपेठेत होतो. शेतमालाबरोबरच कापड, किराणा व भुसार माल, सोने-चांदी व फर्निचर या क्षेत्रांत तेथील व्यापार्‍यांनी मोठी भरारी घेतलेली आहे व फार मोठी आर्थिक उलाढाल त्या क्षेत्रात होते. नातेपुते गावचा आठवडी बाजार दर बुधवारी असतो. तो मोठा व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. माल व प्रवासी वाहतूक यासाठी खाजगी सर्व प्रकारच्या गाड्या तेथे उपलब्ध आहेत. शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे गावचे लोक कष्टाळू, उद्योगी व स्वयंभू; तसेच, समाधानी व सुखी आहेत.

गावात कापसाच्या आठ जिनिंग फॅक्टरी 1960 ते 1980 च्या काळात दिवसरात्र चालत होत्या. त्यामुळे रोजगार भरपूर होता. त्याकाळी नातेपुते ही मोठी बाजारपेठ शेंग-गूळ-कापसाची होती.

सद्यस्थितीत बराचसा नोकरवर्गही गावात स्थायिक झालेला आहे. स्वतंत्र आधुनिक बंगले व कॉलनी यांमुळे गावचे रूप पालटून गेलेले आहे. नातेपुते गाव पुणे-पंढरपूर रस्त्यावर असल्याने व शेजारी परिसरात वाडीवस्त्या व खेडी यांची संख्या जवळजवळ पंचवीस-तीस असल्याने रोज मोठे दळणवळण होत असते. तेथून सुमारे दीडशेभर एस.टी. बसगाड्यांची रोज ये-जा होत असते. त्याचा परिणाम म्हणून नातेपुते गावचे शहरीकरण-नागरीकरण वेगाने होत आहे व त्यामुळे तेथील जमिनींचे बाजारभाव खूप चढे आहेत.

नातेपुते गावाला पूर्वी ऐतिहासिक साखरबावी विहीर व पांडुरंगाच्या मंदिराशेजारचा आड यांचे पाणी पिण्यासाठी वापरात होते. पाऊसपाणी नियमित असल्यामुळे गावचा ओढा बारा महिने वाहत असे. त्यामुळे दुष्काळातही पाणी कमी पडत नसे. गावाला सॅण्ड फिल्टरेशनची चांगली पाणीपुरवठा योजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 1970 च्या आसपास सुरू झाली. तिचे विस्तारीकरण होत आहे. तसेच नातेपुतेच्या इशान्य बाजूने ब्रिटिशांनी बांधलेला नीरा उजवा कालवा गेला आहे. त्यापुढे भोर तालुक्यात असलेल्या नीरा-भाटघर-देवधर-गुंजवणी या धरणांमुळे पंढरपूरपर्यंतचा भाग सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. नातेपुते गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या जुन्या तळ्यात नीरा उजव्या कॅनॉलचे पाणी साठवले जाते. ते टाक्यांमधून फिल्टरेशन व निर्जंतुकीकरण करून गावाला नळावाटे दिले जाते. ग्राम पंचायतीला नागरिकांना सुमारे आठ लाख लिटर पाणी दिवसाला पुरवावे लागते. गाव पाण्याबाबत पूर्वीपासून सुखी व समाधानी आहे. नातेपुते गावाची पाणीपुरवठा योजना राज्यात आदर्श अशी मानले जाते.

नातेपुते ग्रामपंचायतीची स्थापना 1933 साली झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ’ ही संस्था पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. कालांतराने आणखी तीन खाजगी सहकारी शेतकरी सोसायट्या निर्माण झाल्या. सध्या पाच राष्ट्रीकृत बँका, सहा नागरी सहकारी बँका व अकरा सहकारी पतसंस्था, साठ महिला बचत गट व अनेक खाजगी फायनान्स कंपन्या गावात कार्यरत आहेत. मार्केट कमिटीत मोठा व्यापार होतो.

नातेपुते गावात सरकारी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय, चोवीस खासगी दवाखाने व तज्ज्ञ सात डॉक्टर आहेत. गावात बालवाडी ते कॉलेज व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बालवाडी ते बारावीपर्यंतच्या तीन खाजगी संस्था, एक महाविद्यालय, एक आय.टी.आय. तर पंचवीस सरकारी अंगणवाड्या सुरू आहेत. त्यांचा लाभ परिसरातील वीस-पंचवीस खेड्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना होतो. ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालय मोठे व चांगले आहे. त्यात सुमारे पंधरा हजार ग्रंथ आहेत.

गावात सुंदर व प्रशस्त ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज उपकेंद्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम व इरिगेशन कार्यालय व कॉलनी, टपाल व दूरध्वनी कार्यालय, स्वतंत्र पोलिस ठाणे, एस.टी. स्टॅण्ड अशी अनेक सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्याच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत.

ग्रामदैवत गिरिजापतीस गौरीहर असेही म्हटले जाते. नातेपुते हे पार्वतीचे माहेर मानले गेले आहे. नातेपुते हे गाव शिखर-शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेले असल्याने परिसरात असलेल्या सर्व हेमाडपंती अष्टलिंग मंदिरांपैकी नातेपुतेचे गिरिजापती मंदिर एक आहे. शिवभक्त बळीराजा हा तिचा भाऊ. त्याचेही सुंदर मंदिर गिरिजापती मंदिराशेजारी आहे. नातेपुते गावच्या मध्यभागी सुंदर असे ऐतिहासिक शिवाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती भक्कम दगडाच्या तटबंदीसह उंचावर बांधलेले आहे. मंदिर बहामनी काळातील (1350) आहे.

तसेच नातेपुते गावाच्या दक्षिणेला छोट्या टेकडीवर निसर्गरम्य सुंदर असे श्री पर्वतेश्वराचे दुसरे शिवमंदिर आहे. ते रचनेवरून पेशवेकालीन वाटते. मध्ये गावाचा ओढा आहे. मंदिराला जाण्यासाठी गावातून पूर्वेला व पश्चिमेला ओढ्यातून दोन पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मोठी झाडे असल्याने भाविकांच्या मनाला तो प्रवास  आल्हाददायी व आनंदी वाटतो. तेथे राष्ट्रीय पक्षी मोरांचा वावर खूप आहे. गावाच्या ओढ्याची पूर्व बाजू तर ‘मोरांचा ओढा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राम पंचायतीने उत्तम अशी स्मशानभूमी पर्वतेश्वराशेजारी सर्व जाती-धर्मांसाठी तयार केलेली आहे.

_EtihasikSandarbhacge_Natepute_2.jpgग्रामदैवत गौरीहराचे मंदिर हे मराठवाड्यातील लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. तेथे चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात मोठा उत्सव असतो. अनेक मानाच्या काठ्या व कावडी वाजतगाजत पायी देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी येतात. पंचमीला देवाला हळदी लागतात व अष्टमीला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा पार पडतो. या शिव-पार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावाच्या ‘भातंगडी काठी’चा मान मोठा आहे. भातंगडी काठी म्हणजे पाण्याची कावड देवाला वाहिली जाते. पुढे ती काठी शिखर शिंगणापूरी जाते. पाण्याच्या अशा अनेक कावडी चैत्र यात्रेवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पायीपायी, वाजतगाजत येतात. विवाह समारंभ मंदिरात रात्री होतो. देवळासमोरील उंच दीपमाळा पेटवल्या जातात. दीपमाळा शिखर शिंगणापूरच्या उंच डोंगरावरील देवळावरून दिसतात. तो लग्नसोहळा गावातील मानकरी, वतनदार, बडवे, भोसले, कलावंत-शेख, पाटील, देशमुख, देशपांडे, सर्व गावकरी आनंदाने मिळून पार पाडतात. लग्नातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील माळशिरसच्या वाघमोडे पाटलांकडे तर नवरीचा मान नातेपुत्याच्या पांढरे-पाटील घराण्याकडे आहे.गावकरी दैनंदिन जीवनात परंपरेने चैत्र महिन्यात अनेक गोष्टी व्रताप्रमाणे पाळतात. श्री शंकर-पार्वतीचे लग्न प्रतीकात्मकच असते.

नातेपुते गावातील गिरिजापती मंदिर, बळीराजाचे मंदिर, समोरील तळे व संपूर्ण परिसर हा सातार्‍याचे राजे भोसले कुटुंबीयांच्या खाजगी मालकीचा आहे. सातार्‍याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दरवर्षी दैनंदिन पूजाअर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते. बडवे कुटुंबीय पिढ्यान्पिढ्या ते सर्व श्रद्धेने व निष्ठेने करतात. देवाच्या पूजाअर्चा व व्यवस्था यांसाठी सातारा संस्थानातर्फे पुजारी बडवे, घडशी समाजाचे भोसले व कलावंत-शेख यांच्या कुटुंबीयांना उपजीविकेसाठी वतने म्हणून जमिनी दिलेल्या आहेत व देवस्थानाची व्यवस्था लावून दिलेली आहे.

नातेपुते गावाला ठरावीक अशी यात्रा-जत्रा परंपरा नाही. परंतु नातेपुते हे गाव आळंदी-पुणे-पंढरपूर मार्गावर असल्याने पूर्वीपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान महाराज; तसेच, अनेक थोर साधुसंतांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दरवर्षी जून-जुलै महिन्यात तेथूनच पायी जात-येत असतो. तो सोहळा मोठा व नयनरम्य असतो. नातेपुते या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. पालखी सोहळा हा नातेपुते गावाच्या लोकांचा सर्वात मोठा अभिमानाचा, आनंदाचा, श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. चार ते पाच लाख वारकर्‍यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था सर्व जाती-धर्मातील गावकरी आनंदाने व कर्तव्यभावनेने करतात; सामाजिक ऐक्य व एकोपा यांचे दर्शन घडवतात. भजन, कीर्तन, प्रवचन व नामस्मरण अशा धार्मिक वातावरणात सारा गाव, आसमंत काही काळ डुंबून जातो.

_EtihasikSandarbhacge_Natepute_1.jpgनातेपुते गावाच्या दक्षिणेला, ओढ्याच्या पलीकडे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर छोट्या टेकडीवर श्रीपर्वतेश्वर हे निसर्गरम्य शिवालय आहे. मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक कालावधी निश्चित सापडत नाही. परंतु मूळ गाभार्‍याचे बांधकाम, तटबंदी प्राचीन असून सभामंडपाचे बांधकाम मात्र शंभर वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या थोडेसे दक्षिणेला ज्योतिबा तर आग्नेयेला सिद्धनाथ ही दोन छोटी मंदिरे आहेत. गावकरी श्रावणातील नागपंचमी उत्सव/सण दरवर्षी पर्वतेश्वराच्या मंदिराजवळ साजरा करतात. अलिकडे त्यास गावजत्रेचे स्वरूप आलेले आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी नागोबा देवतेची प्रतीकात्मक पूजा नाभिक समाजातील राऊत कुटुंबीय करतात. गावकरी त्याचे दर्शन घेतात. त्यानिमित्ताने मंदिरातील परिसरात महिलांचे पारंपरिक खेळ, युवक व बालकांचे पतंगोत्सव, मैदानी खेळ; तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सर्व प्रकारची खेळणी, मेवामिठाई यांचा आस्वाद गावकरी निसर्गसान्निध्यात घेतात.

श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी ग्रामदैवत गौरीहराच्या मंदिरात गावकऱ्याच्या वतीने महाप्रसाद भंडार्‍याचे (अन्नदान) व सायंकाळी महादेव आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन ग्राम पंचायत व नातेपुतेकर ग्रामस्थ यांच्या मार्फत केले जाते.

नातेपुते गावात मुस्लिम समाज बराच आहे. शेख, तांबोळी, मुस्लिम, आतार, बागवान, नदाफ (पिंजारी) अशी पारंपरिक व्यावसायिक मंडळी आहेत. मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ ऐतिहासिक शाही मशीद मोगलकालीन आहे. त्याचे इमाम व मानकरी काझी व मुलाणी हे आहेत. गावाबाहेर जुने दर्गे व पीर आहेत. मुस्लिम समाजाचे धार्मिक उत्सव व कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात.

जैन धर्मीयांनी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुख्य पेठेत 1921 साली बांधले. त्या ठिकाणी 1008 भगवान श्री आदिनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धारही अलिकडील काळात करण्यात आला. जैन समाज गुजरात-राजस्थान या भागातून उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात दोन-तीनशे वर्षांपूर्वी आला. तो समाज व्यापार-उद्योगधंद्यात स्थिर व यशस्वी आहे. नातेपुते गावास व्यापारी पेठ म्हणून जो लौकिक प्राप्त आहे त्यात त्या समाजाचा वाटा मोठा आहे.

गावातील सधन व प्रतिष्ठित शंकरराव घुगरदरे, रघुनाथराव घुगरदरे, रघुनाथ इंगोले, मोहिनीराज ख्रिस्ती व गावकरी यांनी मिळून श्रीराम मंदिराची उभारणी व मूर्ती प्रतिष्ठापना शके 1848 मध्ये केलेली आहे. गावातील व्यापारी खंडो रामजी सोनवळ यांनी रामपंचायतनाच्या सुंदर व संगमरवरी मूर्ती दान म्हणून दिल्या. पूर्वीचे राम मंदिर गिरिजापती मंदिराजवळ होते. ते कालौघात नष्ट झाले. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या गिरवी या आजोळी जात असताना सध्याच्या पेठेतील जागा राम मंदिरासाठी योग्य आहे असे गावकर्‍यांना सुचवले. त्यानंतर मंदिर उभारणी झाली. राम मंदिर व शेजारील मंडईतील हनुमान मंदिर यांचा ट्रस्ट 1993 साली केला गेला. मंदिराचा जीर्णोद्धार 1999 साली केला गेलेला आहे. गावचे कै. नरहर बंदिष्टे यांच्या घराण्यात प्रथमपासूनच दैनंदिन पूजा व उत्सव यांचा मान आहे.

बलखंडी गणेश मंदिर, साखरबावी विहीर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर नातेपुते गावाच्या नैऋत्य दिशेला जुन्या वेशीबाहेर गावाच्या ओढ्याकाठी श्री पर्वतेश्वर रस्त्यावर आहेत. मंदिर प्रमाणबद्ध चौकोनी आकारात ताशीव व घडवलेल्या दगडात आणि चुन्याने बांधलेले आहेत. वर गोल घुमट आकार व कळस आहे. दगडी सुंदर नक्षीकाम व रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. तशा प्रकारची व आकाराची दोन मंदिरे सांगली संस्थानच्या मुख्य गणपती मंदिराशेजारी आहेत. गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची संगमरवरी दगडाची रेखीव व सुंदर आहे. त्या ठिकाणी मंदिरात एक व बाहेर एक अशी दोन समाधिस्थाने आहेत. मंदिरात असलेली दगडी समाधी ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे गणेशभक्त बलखंडी महाराजांची आहे. त्यांनीच ती गणेशमूर्ती स्थापलेली आहे असे म्हणतात. म्हणून ते समाधिमंदिर असे ओळखले जाते.

मूळ मूर्ती 1970 च्या आसपास भंगली, त्यामुळे गावकर्‍यांनी जयपूरहून (राजस्थान) मूर्तिकारांना आणून मूळ मूर्तीच्या साच्यावरून हुबेहूब संगमरवरी मूर्ती तयार करून घेतली व तिची प्राणप्रतिष्ठा केली. मूळ मूर्ती समुद्रात विसर्जित केली.

मंदिराच्या जमिनीचे मालक अतुलशेठ बावकर यांच्यातर्फे गणेश जयंती व गणेशोत्सव हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. दररोजची पूजाअर्चा श्रीधर कुलकर्णी परंपरेने पाहतात.

श्री भवानी माता मंदिर हे छोटे पण टुमदार मंदिर नातेपुते गावाच्या पश्चिमेला ऐतिहासिक बुरुजाजवळ छोट्या टेकडीवर आहे. गावाच्या मुख्य वतनदाराचा वाडा त्या ठिकाणी पूर्वी होता व जवळच गावाची वेस होती. भैरवनाथाचे मंदिर ओढ्याजवळ होते. त्या देवस्थानची जमीन पैठणकरांकडे आहे.

_EtihasikSandarbhacge_Natepute_5.jpgमंदिरातील भवानीदेवीची संगमरवरी मूर्ती प्रसन्न व मनोहर आहे. तिचीही पुनर्स्थापना व मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, कारण जुनी मूर्ती भंगली. माजी सरपंच कै. नानासाहेब देशमुख यांनी ते काम केले. त्यांच्या पुढील पिढ्यांकडून दैनंदिन पूजाअर्चा व्यवस्थेचे काम ब्राह्मण पुजार्‍यांकडून केले जाते.

या मंदिराच्या व गिरिजापती, पर्वतेश्वर या जुन्या ऐतिहासिक मंदिरांच्या समोर भग्न सतिशीळा, वीरगळ, भग्न मूर्ती व गद्धेगळ पाहण्यास मिळतात.

साखरबावी ही भलीमोठी चिरेबंदी विहीर पर्वतेश्वर मंदिरास पश्चिमेकडील पाणंदीतून जाताना ओढ्यानजीक तुटलेल्या रहाटासह दिसते. बाव, बावी म्हणजे विहीर आणि तिचे पाणी साखरेसारखे गोड म्हणून ती साखरबावी. सातारा जिल्ह्यातील धावडशीचे राजगुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या व बांधल्या. त्यांपैकी ती एक सुंदर विहीर आहे व ते इतिहासातही नमूद केलेले आहे. विहिरीला खूप व चांगले पाणी आहे. तिचे पाणी कोणत्याही मोठ्या दुष्काळात आटले नाही वा कमी पडले नाही. नातेपुते गावाला पिण्याच्या पाण्याचा तोच मुख्य स्रोत 1960 पर्यंत होता. सर्व गाव साखरवाबी व तिच्याच पूर्वेला थोड्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक पांडुरंगाच्या मंदिरासमोरील आडाचे पाणी पित होते. त्याकाळी ओढाही बारा महिने वाहत होता. कालानुरूप ग्राम पंचायतीने तेथे टाकी बांधली, इंजिन-पंप बसवले व त्यानंतर 1970 च्या दशकात नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. गावाची लोकसंख्या वाढली. साखरबावी ग्राम पंचायतीची की खाजगी मालकीची या वादात अडकली व तिच्याकडे दुर्लक्ष झाले. विहिरीच्या उत्तरेला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ते समर्थ स्थापित आहे असे म्हटले जाते. त्या मंदिराच्या खालून साखरबावीस मोठा पाण्याचा झरा आहे.

इंदूरचे राजे होळकर संस्थानची जागा, दस्तऐवज व महादेवाला वाहिलेली प्रचंड मोठी मानाची कावड व त्यास पंचधातूचे मोठे हंडे येथील चांगण कुटुंबीयांकडे होते. चैत्र महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कावडीने पाणी ग्रामदैवत गौरीहराला वाहिले जाई. ती प्रथा चालू आहे. नातेपुते गावाचा ऐतिहासिक वारसा शोधण्याचा प्रयत्न उपलब्ध ऐतिहासिक वास्तू, त्यांचा काळ, पारंपरिक कल्पना, गावातील ज्येष्ठ व जाणत्या व्यक्ती यांच्याशी चर्चा यामधून केला आहे. परंतु प्रत्यक्षात लेखी दस्तऐवज कोठेच नाही. काही ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन मंदिरे व पडक्या वास्तू या आधारे शोध करावा लागते. नातेपुते गावाचा उल्लेख सुमारे बारा-चौदा ऐतिहासिक महत्त्वाच्या ग्रंथांत आलेला आहे. त्यावरून ऐतिहासिक काळापासूनचे गावाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

– रविंद्र प्रभाकर चांगण

Last Updated On 25th Sep 2018

About Post Author

8 COMMENTS

  1. बरेच संदर्भ नव्याने कळाले,…
    बरेच संदर्भ नव्याने कळाले, धन्यवाद

  2. बरेच काही नवीन समजले सर…
    बरेच काही नवीन समजले सर धन्यवाद…..

  3. खूपच छान माहिती मिळाली
    खूपच छान माहिती मिळाली

  4. अप्रतिम। बरेच सुंदर संदर्भ…
    अप्रतिम। बरेच सुंदर संदर्भ मिळाले

  5. अप्रतिम सर अभिनंदन सर
    अप्रतिम, अभिनंदन सर.

  6. अप्रतिम,thanks sir.
    फोंदशिरस…

    अप्रतिम,thanks sir.
    फोंदशिरस मधील वाघमोडे आणि मोटेवाडी (फोंदशिरास,मोटे यांचे मूळ गाव , इत्यादि माहीती मिळू शकते का सर ),तसेच माळशिरस मधील अकलूज रोड लागत असणाऱ्या सामध्या ह्या वाघमोडे घराण्याच्या आहेत हे बोल जाते तर त्याबद्दल माहिती मिळेल का सर.

Comments are closed.