एकोणिसावे साहित्य संमेलन – Nineteenth Marathi Literary Meet 1933)

एकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती. त्यांनी त्यांच्या नाटकांतून देशकालाशी निगडित विषय घेतले आणि त्यांच्या प्रभावी लेखणीतून त्यांना अमर केले. त्यांनी त्या वेळी प्रचलित परकीय भाषांतरित नाटकांचा तोंडवळा ठेवण्याची पद्धत बाजूला सारली. त्यामधूनही त्यांचा देशाभिमान दिसून येतो. त्यांच्या कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यूयांसारख्या नाटकांचे विषयच मुळी त्या देशस्थितीत रसिक प्रेक्षकांना आणि नाटकांच्या वाचकांना भारावून टाकणारे ठरले. त्यांना नाटकाचा ध्यास मोठा होता. त्यांची संगीत मानापमान’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण यांसारखी पंधरा नाटके प्रसिद्ध आहेत.

कृष्णाजी प्रभाकर यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1872 रोजी सांगली येथे झाला. त्यांनी बी ए, एलएल बी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षकाची नोकरी काही काळ केली.

त्यांचा लोकमान्य टिळक यांच्याशी प्रथम परिचय ऑगस्ट 1896 मध्ये झाला आणि ते केसरीत दाखल झाले. मग ते वृत्तपत्र व्यवसायातच राहिले. त्यांचाराष्ट्रीय महोत्सव हा पहिलाच लेख टिळक यांनी केसरीचा अग्रलेख म्हणून प्रसिद्ध केला. त्यांनी केसरी’, ‘मराठाह्या लोकमान्य टिळक यांच्या वृत्तपत्रांचे संपादन काही काळ केले. त्यांनी टिळक यांच्या मृत्यूनंतर केसरीशी संबंध सोडला आणि ते मुंबईतील लोकमान्यदैनिकाचे संपादक 1921 साली झाले. त्यांनी तेथे संपादकपद दोन वर्षे भूषवले. त्यांनी वृत्तपत्रीय लेखन भरपूर केले. त्यांनी चित्रमय जगतमधून महायुद्धावरील लेखमाला 1914 साली लिहिली. ती विशेष गाजली. तिचे दोन खंडही प्रसिद्ध झाले.

त्यांनी स्वत:चे नवाकाळहे नवे दैनिक एप्रिल 1923 साली सुरू केले. त्यानंतर आठवड्याचा नवाकाळसप्टेंबर 1925 मध्ये अवतरले. सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील एका लेखामुळे फेब्रुवारी 1929 मध्ये राजद्रोहाचा खटला भरला. त्यात काकासाहेबांना एक वर्षाची शिक्षा झाली. तेव्हा त्यांनी नवाकाळचे संपादकत्व त्यांचा थोरला मुलगा यशवंत ह्याला दिले.

तुरुंगातून सुटून आल्यावर, मात्र त्यांचे लक्ष अध्यात्माकडे वळले. ते सांगलीस दत्तमंदिरात योगविषयक प्रवचने 1933-35 पर्यंत देत असत. त्यांनी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरीयांवर लेखन केले आणि ग्रंथनिर्मिती केली. त्यांनी अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन 1935-47 पर्यंत केले.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, भाषेचा प्रभाव सूक्ष्म पद्धतीने पडत असतो, कर्त्या पुरुषाचा पराक्रम तात्काळ फलदायक होत असतो, वेदांतून भाषेला धेनू म्हटलेले आहे आणि ही धेनू रोजच्या व्यवहारात लागणारे दूध तर देतेच, पण भक्त मिळाल्यास कामधेनूही होते…

ते 1907 साली तिसऱ्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, 1917 साली पुन्हा तेराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि गंधर्व संगीत परिषदेचे 1921 मध्ये अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 1948 रोजी झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

—————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here