उपळव्याचे अनोखे वाचनालय

फलटण शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे उपळवे हे माझे गाव. फलटण हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. उपळवे गाव डोंगराच्या जवळ वसलेले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. गावाला जाण्याकरता कच्चा रस्ता. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ त्या रस्त्यावर खूपच कमी. गावात सातवीपर्यंतची शाळा. गावात निरक्षरांचे प्रमाण जास्त. काही शिकलेले ते बेरोजगार. महत्त्वाचे काम असेल तर लोक फलटणला जात असत. फलटणहून गावाला येणाऱ्या एस. टी. गाड्या दोन. सकाळी साडेनऊ वाजता व संध्याकाळची मुक्कामी एस. टी. एकंदरीत सर्व बाजूंनी गैरसोय. गावात वाचनाची, करमणुकीची, संपर्कासाठी टेलिफोन वगैरे यांपैकी कशाचीच सोय नव्हती. मी एम.एस्सी.ची परीक्षा देऊन नुकता गावी आलो होतो. त्याच वेळेस गावात नवीन हायस्कूल सुरू झाले. आठवीचा वर्ग. मी त्या हायस्कूलमध्ये रूजू झालो. गावात वर्तमानपत्र वाचायला मिळत नसे. गावात एकदोन लोकांकडे टीव्ही होता. टीव्हीवरूनच संध्याकाळच्या बातम्या समजत. परंतु तालुक्यातील घडामोडी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक किंवा बाजारभाव अशा सविस्तर बातम्या कळत नव्हत्या किंवा त्या समजण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. फलटणला गेले तरच वर्तमानपत्र पाहायला मिळत असे किंवा एखादी व्यक्ती फलटणला गेल्यावर वर्तमानपत्र घेऊन येई. मग ते वर्तमानपत्र सर्वजण वाचत.

गावातील बरीचशी तरुण मंडळी गप्पा मारण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली बसथांब्यावर जमत. तेथे गप्पा सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत चालत. मीही त्या गप्पांमध्ये सामील होत असे. त्यावेळेस माझ्याकडे काही वाचनीय पुस्तके होती. ज्यांना कुणाला वाचनाची आवड होती ते माझ्याकडून पुस्तके वाचायला नेत. त्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की गावातील काहींना वाचनाची, माहिती जाणून घेण्याची हौस आहे.

एका सकाळी एस. टी. स्टॅण्डवर गप्पा मारत असताना मी म्हणालो, की आपण वर्तमानपत्र सुरू करू! सर्वजण म्हणाले, ते कसे शक्य आहे? मग मी सर्वांना सविस्तर समजावून सांगितले. फलटणमध्ये जाऊन सर्व माहिती काढली. वर्तमानपत्राच्या दुकानात माझ्या ओळखीची व्यक्ती होती, तीस गावात वर्तमानपत्र सुरू करायचे म्हणून सांगितले. त्याने शंभर रुपये डिपॉझिट भरावे लागेल म्हणून सांगितले. ती सर्व माहिती मी गावातल्या मुलांना सांगितली. महिन्याचे एका वर्तमानपत्राचे सरासरी बिल पासष्ट रुपये व टाकणावळ मिळून सत्तर रुपये खर्च येईल म्हणूनही सांगितले. वर्तमानपत्र सकाळच्या साडेनऊच्या एस.टी.ने येईल हे बजावले. हा दरमहा खर्च मित्रांना जास्त वाटला. परंतु आपण फलटणला आठवड्यातून एकदा तरी जातोच व येताना वर्तमानपत्र घेऊन येतो, म्हणजे आपले कमीत कमी दहा रुपये महिन्याला खर्च होतातच. तेच दहा रुपये एकत्र केले तर आपणास दररोज पेपर वाचावयास मिळेल हे पटवून दिले. ज्यांना वाचनाची आवड होती ते दरमहा पैसे देण्यास तयार झाले. तसे, शासनाकडून वाचनालय सुरू करता येते हे माहीत होते, परंतु त्यासाठी लागणारा वेळ व करावा लागणारा व्याप मोठा होता. प्रत्येकाकडून दहा रुपये जमा करून वर्तमानपत्र लगेच सुरू करणे सहज शक्य होते. शंभर रुपये डिपॉझिट सर्वांकडून गोळा करून फलटणला गेलो. एस.टी. स्टॅण्डवरील वर्तमानपत्र विक्रेत्याकडे डिपॉझिट भरले. एस.टी.ने वर्तमानपत्र पाठवण्यास सांगितले. सकाळी फलटणहून आमच्या गावाकडे येणाऱ्या एस.टी.चे नाव व वेळ सांगितली. वर्तमानपत्राच्या पॅकिंगवर तरुण मंडळ, उपळवे असे लिहिण्यास सांगितले.

गावात दररोज वर्तमानपत्र आल्याचा आनंद झाला. गावातील एस.टी. स्टॅण्डवर लिंबाच्या झाडाकडे आम्ही सकाळी न चुकता वर्तमानपत्र वाचू लागलो. एक प्रकारचे वाचनालयच लिंबाखाली तयार झाले. हळुहळू वाचकवर्ग वाढू लागला. दुसऱ्या दिवशीची एस.टी. येईपर्यंत आम्ही आदल्या दिवशीचा पेपर लिंबाखाली ठेवायचो. तोपर्यंत ते वर्तमानपत्र ज्यांनी वाचले नाही ते वाचून काढायचे. एस.टी.ची विचारपूस कधी न करणारे एस.टी.ची वाट पाहू लागले.

वाचकवर्ग वाढल्याने एक वर्तमानपत्र पुरेनासे झाले. परंतु नित्याने वाचनास येणारी मंडळी बिल किती आले ते विचारू लागली व बिल आल्यावर न मागता पैसे देऊ लागली. फार तर आम्ही प्रत्येकी दहा रुपये घ्यायचो. पैसे वाढू लागले. मग एकदम चार वर्तमानपत्रे सुरू केली. महिना सरासरी बिल अडीचशे रुपये येऊ लागले. पंचवीस-तीस लोक वर्तमानपत्रे वाचायला दररोज येत. कधी कधी एखादी व्यक्ती मी एकटा बिल भरतो असे म्हणायची, परंतु आम्ही ते पैसे घेत नव्हतो. कारण त्यामुळे पुढे अनेक अडचणी येऊ शकतात हे ओळखले होते.

वर्तमानपत्रातील बातम्यांव्यतिरिक्त इतर गप्पा कमी होऊ लागल्या. गावातील मुलांचे सामान्य ज्ञान वाढू लागले. नोकरीविषयक जाहिराती, इतर शैक्षणिक वाटा किंवा व्यवसायातील संधी सर्वांना कळू लागल्या. लोकांचा माझ्यावरचा विश्वास वाढू लागला. त्यामध्ये गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सुरू केलेले वाचनालय बंद होऊ शकत नव्हते. आमचे हे असे एकमेव वाचनालय होते, की येथे कोणत्याही प्रकारचा हिशोब नव्हता, खोली नव्हती किंवा हे सर्व पाहण्यासाठी एखादी व्यक्ती नव्हती. विशेष म्हणजे, आम्ही कधीच कुणाला बिल भरण्याकरता पैसे मागितले नाहीत. लोक स्वत:हून महिन्याच्या एक तारखेस खिशात दहा रुपये घेऊन येत. दहा रुपयांत दररोज चार पेपर वाचण्यास मिळतात याचा सर्वांना आनंद मिळे. जास्त पैसे जमा झाल्यास पेपरची संख्या वाढे किंवा एखादे साप्ताहिक आणावे असा आमचा उपक्रम दरमहा सुरू होता.

वर्तमानपत्रे सुरू केल्याचे अनेक फायदे दिसू लागले. त्यावेळी शाळेतदेखील वर्तमानपत्र पाहायला मिळत नसे. शाळेतील शिक्षक वर्तमानपत्र वाचून विद्यार्थ्यांना बातम्या सांगत. विद्यार्थी येऊन ठळक बातम्या लिहून घेऊन जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची ओढ निर्माण होऊ लागली. अनावश्यक गप्पा टळू लागल्या. व्यवहारज्ञान वाढू लागले. गावांत होणारे इतर सुधारणात्मक बदल बातम्या वाचल्यामुळे समजू लागले. तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक घडामोडी समजू लागल्या. त्या पूर्वी समजत नव्हत्या. त्यामुळे सर्वांच्यामध्ये सर्वच बाबतींत जागरुकता निर्माण झाली. रोजगाराच्या जाहिराती पाहून बेरोजगार नोकरीकरता प्रयत्न करू लागले. शेतकरी वर्गास बाजारभाव जाणून घेण्याची सवय निर्माण झाली. क्रिकेटप्रेमींना क्रिकेटच्या बातम्या वाचण्यास मिळू लागल्या. सर्व जुनी वर्तमानपत्रे एका ठिकाणी जपून ठेवल्यामुळे एखाद्यास जुनी बातमी किंवा जाहिरात पाहायची असल्यास तो संदर्भ मिळत असे. गावात इकडे तिकडे भटकणारी, उन्हात खेळणारी मुले वर्तमानपत्रे वाचू लागली. गावात सर्वचजण वाईट नसतात. परंतु जे चांगले असतात त्यांच्यामुळे वाईट वागणारे सुधारतात हे दिसून आले.

गावात निरक्षर लोकांचे प्रमाण जास्त असल्याने ते लोक तेथे फक्त येऊन बसायचे. ते फक्त वर्तमानपत्र वाचणाऱ्याकडे पाहात बसायचे. परंतु त्यांना आपणास वाचता येत नाही याचे वाईट वाटे. काही निरक्षर लोकांना मी ठळक बातम्या वाचून दाखवत असे. एखादी वयस्क व्यक्ती जवळ यायची व म्हणायची, मास्तर, काय पेपरात आलंय जरा वाचून दाखवा. तसेच ते म्हणायचे, की आम्हालादेखील पेपर वाचायला शिकवा. त्यामुळे मी धाडस करून साक्षरतेचा वर्ग सुरू केला. संध्याकाळी थोडेफार लोक माझ्याकडे येऊ लागले. लोकांचा शिकण्याचा उत्साह पाहून मी शाळेचा वर्ग मागितला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील सहकार्य केले. लोकांना थोडेफार वाचता येऊ लागले. काहीजण अडखळत अडखळत वर्तमानपत्र वाचू लागले. आनंद वाटू लागला. आता दुहेरी भूमिका पार पाडावी लागू लागली – वर्तमानपत्रे चालू ठेवणे व साक्षरतेचा वर्ग चालवणे. या एकंदरीत कामाची चर्चा होऊ लागली. आजुबाजूच्या वाडीवस्तीवरील काहीजण वर्तमानपत्र वाचण्यास येऊ लागले. ‘असे चालते वाचनालय’ या शीर्षकाने वर्तमानपत्रात बातमीदेखील आली. साक्षरतेच्या वर्गाची चर्चा होऊ लागली. साक्षरता अभियानांतर्गत माझ्या साक्षरतेच्या वर्गाची जिल्हा पातळीवर दखल घेण्यात आली व मला साक्षरता अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मिळाले.

वाचनालय व साक्षरता वर्ग यांमुळे मी एका नामांकित वर्तमानपत्राचा वार्ताहर झालो. आजही, मी दरवर्षी येणाऱ्या डी.एड.च्या विद्यार्थ्यांना मी चालवलेल्या अनोख्या वाचनालयाची माहिती देतो. काही विद्यार्थी तो उपक्रम त्यांच्या गावात राबवत आहेत असे फोन करून सांगतात. जीवनात नि:स्वार्थीपणे असे केलेले छोटेसे सामाजिक प्रयोग खूप आनंद मिळवून देतात!

उपळव्‍यामध्‍ये गेल्‍या दहा वर्षांत ब-याच सुधारणा झाल्‍या आहेत. रस्‍ते बांधण्‍यात आले. गावाची प्रगती झाली. लोकांची आर्थिक स्थिती सुधारली. वर्तमानपत्रे घरोघरी येऊ लागली, वाचली जाऊ लागली. या ओघात झाडाखालच्‍या वाचनालयाची गरज कमी झाली. वाचनायल बंद झाले. पण वाचनायलाच्‍या सान्निध्‍यात गावात जोपसल्‍या गेलेल्या वाचनवृत्‍तीने मूळ धरल्याचे जाणवते.

प्रा. महेंद्र जगताप
सौ. निर्मलाताई थोपटे, अध्‍यापक विद्यालय,
भोर, (बोलावडे) ता. भोर, जि. पुणे
८४८३८२५०८९

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय उल्लेखनिय कार्य आपल्या…
    अतिशय उल्लेखनिय कार्य आपल्या कडून झाले आहे. आपल्या या यशस्वी प्रयत्नाला त्रिवार सलाम!

Comments are closed.