उद्धव महाराजांचे वाठार (How Wathar is connected with saint Eknath!)

बुवांचे वाठार हे सांगलीपासून जवळ असलेले गाव प्रसिध्द आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. उद्धव महाराजांचे वास्तव्य वाठार या गावी होते. हे उद्धव महाराज म्हणजे एकनाथांचे नातू. वाठार गाव निसर्ग संपन्न आहे. वारणाकाठचा रम्य परिसर आणि हिरवीगार राने यांनी मन मोहून घेतल्याशिवाय राहत नाही. एकनाथ हे मराठी संत मांदियाळीतील श्रेष्ठ संत. नाथांना दोन मुली. त्यांची दोन्ही नातवंडे मुक्तेश्वर आणि उद्धव महाराज पंचगंगा आणि वारणा नदीकाठी आलेली दिसतात.

            बुवांचे वाठार (तर्फ उदगाव) हे हातकणंगले तालुक्‍यातील अडीच-तीन हजार वस्तीचे गाव. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शिवाजीराजे यांनी वाठार गाव उद्धव स्वामी यांना इनाम दिले. त्यांनी तशी सनद 1705 मध्ये केली. उद्धव स्वामींनी वाठार येथे मठाची स्थापना करून धार्मिक सण-समारंभ सुरू केले. 

           उद्धव महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी अठराव्या शतकाअखेर समाधी मंदिर उभे केले. तेथे वार्षिक उत्सव सुरू झाला. या समाधी मंदिराचा जीर्णोध्दार अलिकडे करून त्या जागी सुंदर इमारत बांधण्यात आली आहे. समाधी मंदिरावर सुंदरसे शिखर आहे. या नव्या वास्तूत प्रसन्न वाटते.

            वाठार गाव शेतीप्रधान आहे. त्या गावाला पूर्वी तावडे वाठार म्हणत असत. त्या गावाची नोंद बुवांचे वाठार तर्फ उदगाव अशी शिवाजीराजांच्या सनदीनंतर झालेली दिसते. उद्धवस्वामींना त्या गावचे इनाम मिळाल्यानंतर आसपासच्या गावातील जमिनीपण इनामाद्वारे मिळाल्या. उद्धवस्वामींनी सर्वसामान्यांना त्या जमिनी वाटून टाकल्या. त्यांना वर्षासने ठरवून दिली त्यामुळे त्या भागाचा विकास प्रवाहित झालेला दिसतो. 

          उद्धव महाराजांच्या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यांना भानुदास एकनाथांचा वारसा लाभला असल्याने उद्धव महाराजांनीदेखील कीर्तनावर भर दिला. त्यांना लळिताकरता वारणा परिसरातील अनेक ठिकाणांवरून निमंत्रणे येत. उद्धव महाराजांनी संसारदेखील केला. त्यांना पाच मुले होती. तरी त्यांनी भागवत धर्माचे पालन प्रामाणिकपणे केलेले दिसते. त्यांनी त्यांना लाभलेल्या प्रतिभाशक्तीचा उपयोग जनहितार्थ केला. अशी एक गोष्ट सांगितली जाते, की कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजीराजांनी एकदा दुष्काळाचे वर्ष असताना उद्धव महाराजांना पाचारण केले होते. त्यावेळी राज्यात अवर्षण होते. सारे चिंतातुर होते. पावसाची वाट पाहत होते. त्यावेळी उद्धव महाराजांनी ध्यानस्थ होऊन देवाला साकडे घातले. पाऊस सुरू झाला. सर्वांना आनंद झाला. उद्धव महाराजांच्या संदर्भातील जन्मदिन, त्यांचा कालखंड, त्यांच्या समाधीची तारीख याविषयी माहिती मिळत नाही. त्यांनी 1705 सालच्या मध्यास समाधी घेतली असावी असा अंदाज आहे. त्यांनी आताच्या मठाच्या जागेतच समाधी घेतली. वाठारला जाण्यासाठी पेठ वडगावहून जाता येते. तसेच सांगलीहून कवठेपिरान, दुधगाव, खोची, वारणा बंधारा मार्गे जाता येते.

प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

डॉ. प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ पुस्तके व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी साहित्याचे पश्चिम रंगहे सदर तरुण भारतमध्ये पाच वर्षे लिहिले होते.
————————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. उद्धव महाराजांच्या विषयी कांहीच माहीती वाचनात आली नव्हती.कुळकर्णीसरांना धन्यवाद.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here