आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
266

पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे…

भारतीय संस्कृती ही जगातील एकमेवाद्वितीय संस्कृती आहे. तिला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक संस्कृती उगम पावल्या व त्यांचा अस्त झाला. रोमन, बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन, इजिप्शियन, मायन अशा कित्येक संस्कृतींचा अभ्यास इतिहासाच्या पुस्तकांमधून झाला आहे. त्यांच्या काळांमधील भग्न इमारतींचे अवशेष वगळता त्या संस्कृतीच्या कसल्याच खाणाखुणा दिसत नाहीत. तशातच भारतीय संस्कृतीचा वेगळेपणा उठून दिसतो. अनादि काळापूर्वी उगम पावलेली ती संस्कृती. ती हजारो वर्षांनंतरही, अनेक परकीय आक्रमणांनंतर, प्रत्यक्ष मुळावरच घाव बसलेले असतानादेखील तितक्याच ठामपणे टिकून आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान! ती संस्कृती सदा नूतन आहे व ज्ञानाधिष्ठित आहे. वैदिक कालापासून टिकून राहिलेली भारतीय संस्कृती ही भारताची सर्वात मोठी संपदा आहे!

ती संस्कृती रूजवताना व वाढवताना अनेक परंपरा जन्मल्या. त्यांतील खूप काही गळून पडल्या व कित्येक टिकून आहेत. भारतीय ज्ञानव्यवस्था म्हणजेच Indian Knowledge System हे या ज्ञानाधिष्ठित संस्कृतीचे अधिष्ठान आहे. चार वेद, सहा उपवेद, सहा दर्शने, रामायणमहाभारत ही महाकाव्ये, पुराणे, चौदा विद्या आणि चौसष्ट कला अशा या ज्ञानव्यवस्थेमुळे काही परंपरा निर्माण झाल्या. भारतीय अद्वैताच्या तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाची सहा प्रमाणे सांगितलेली आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. अतिरिक्त प्रमाणांमध्ये सांभव्य आणि परंपरा यांचा समावेश होतो. आधुनिक विज्ञान बदलणारे आहे. परंतु परंपरा हा चिरंतर ज्ञानाचा एक प्रकार आहे. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता या प्रस्थानत्रयीने भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला चिरंतर ज्ञान दिले आहे. संतांनी त्या चिरंतर ज्ञानाचा प्रसार परंपरांच्या रूपातून जनमानसामध्ये घडवून आणला आणि संस्कृतीचा प्रसार केला. ज्ञानाचा, कर्माचा आणि भक्तीचा विलोभनीय त्रिवेणी संगम परंपरांमध्ये पाहण्यास मिळतो. ज्ञानेश्वर माऊली ‘कर्मे ईशु भजावा’ असे म्हणतात, तेव्हा ते ‘ईशु’ असे ज्ञानाला संबोधतात आणि भजावा असे भक्ताला संबोधतात.

ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचे सहजसोप्या भाषेत रूपांतर केले. तुकाराम महाराजांनी तर जणू पाचवा वेदच लिहिला! भाव व भक्तिमार्ग याद्वारे सदाचरणाची शिकवण देणाऱ्या या दोन तत्त्ववेत्त्या संतांनी भागवत धर्माची पताका रोवली. पंढरीची वारी ही त्याच भागवत धर्माची एक विहंगम परंपरा!

वारी ही त्या काळाची गरज होती असे जरी मानले, तरी तिचे औचित्य आजदेखील तितकेच आहे. तसे नसते तर ती परंपरा टिकून राहिली नसती. ती परंपरा नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारीत भाग घेणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत लाखोंच्या पटीत वाढ झालेली दिसते. एकेकाळी केवळ अशिक्षित श्रमिकांची आणि कष्टकऱ्यांची, असा अनाठायी शिक्का बसलेली वारी सर्वसमावेशक बनली आहे. तरुण, सुशिक्षित, अशिक्षित, नोकरदार, बेरोजगार, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष या सर्वांना तितक्याच प्रेमाने आपलेसे करणारी वारी पूर्वीपेक्षा जास्त जोमाने, अपार भक्तिरसाने ओथंबलेल्या एखाद्या अखंड प्रपातासारखी पंढरपुरावर कोसळते. तीनशे वर्षे अविरत चालू असलेली, कसलेही भेदभाव नसलेली, जनसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेली, कोणत्याही प्रकारचे सामूहिक अथवा वैयक्तिक नेतृत्व नसलेली वारी. ती जगातील एकमेवाद्वितीय परंपरा आहे. कर्म, ज्ञान व भक्ती यांचा यथायोग्य मेळ असलेली वारी हा एक विलक्षण अनुभव आहे.

भारत देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे. त्याने नेत्रदीपक कामगिरी अनेक क्षेत्रांत केली आहे. भारताने त्या सर्व क्षेत्रांत अग्रेसर राहवे व देश महासत्ता म्हणून ओळखला जावा हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. परंतु भारतीय ज्या संस्कृतीमुळे व ज्ञानामुळे ती प्रगती करू शकले, त्या संस्कृतीची जोपासना व वृद्धी करण्याचे, तेच भारतीय विसरलेले आहेत. भारतीयांचे त्यांच्या या दोन महत्त्वपूर्ण ज्ञान व संस्कृती संपदांकडे दुर्लक्ष झालेले आहे. जग भारताला एक प्राचीन संस्कृतीचा देश म्हणून ओळखते. परंतु ती ओळख भारतीय विसरलेले दिसतात. अभिमानाची गोष्ट ही की विविध संस्कृतींच्या प्रवाहातदेखील भारतीय संस्कृती टिकून आहे.

वारी ही अशी परंपरा आहे, की तिच्यामुळे भारतीय संस्कृतीची जोपासना होते. कसल्याही प्रकारचे शासकीय अथवा अधिकारिक स्वरूप नसलेली वारी ही केवळ जनसामान्यांनी जागृत ठेवलेली परंपरा आहे. वारीची अंगे अनेक आहेत. वारी म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना. मॅनेजमेंट टेक्निक्स आणि मॅनेजमेंट स्कील्स हे विषय प्रचलित मानले जातात. ते टेक्निक्स आणि स्कील्स यांचा कुशलतेने वापर करण्यासाठी संस्थांना प्रशिक्षित मॅनेजर लागतो. परंतु जनसागराचा सहभाग असलेली ही वारी कोणत्याही मॅनेजरशिवाय किंवा आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कोणत्याही तज्ज्ञाशिवाय विनासायास तीनशे वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. या स्वनियोजित वारीचा अभ्यास आधुनिक तज्ज्ञांनी केल्यास व्यवस्थापनशास्त्रातील काही नवे धडे त्यांना शिकता येतील.

वारीतील पालख्या जेथून प्रस्थान करतात, त्या आळंदी-देहू या गावांना जर नदीच्या उगमस्थानाची उपमा दिली तर ते प्रवाह पुणे येथे संगम पावतात. तेथून ते प्रवाह परत दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी वाटेत छोट्या छोट्या तीर्थक्षेत्रांना स्पर्श करत, पंढरपूरच्या सागरात विलीन होतात. पंढरपूरच्या सागरात विठोबा ही ज्ञानरूप धारण केलेली मूर्ती आहे. त्या ज्ञानमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या जनसागराच्या प्रबोधनासाठी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा सुयोग्य वापर केला जाऊ शकतो. आळंदी, देहू व पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे ज्ञान-विज्ञानाची तीर्थक्षेत्रे म्हणून परावर्तित होऊ शकतात. कीर्तन व निरूपण यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता, जलसंपादन वगैरे गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. वारीच्या रस्त्यावर मोठमोठे व्हिडिओ स्क्रीन्स बसवणे, लॅपटॉप, मोबाईल या माध्यमांचा वापर करून संदेशवहन करणे अशा गोष्टींनी पारंपरिक रीतिरिवाजांना आधुनिक ज्ञानाची जोड लावली जाऊ शकते. आळंदी येथे विश्वशांती केंद्र ‘माईर्स (एमआयटी, पुणे)’ यांच्यातर्फे आधुनिक विज्ञानाची कास धरून लोकशिक्षणाच्या उद्देशाने ‘विश्वरूप दर्शन मंच’ या नावाचा भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर सिमेंट काँक्रिटचा विशाल पडदा उभारण्यात आला आहे. त्या प्रकल्पाद्वारे लोकविलक्षण आणि लोकजागृतीचे कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. कीर्तन, प्रवचन व अन्य कार्यक्रम यांतून समाज प्रबोधन केले जाते. तेथे जमणाऱ्या भाविकांचा त्या प्रकल्पाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. तशाच प्रकारचे प्रकल्प देहू आणि पंढरपूर येथे उभारण्याची ‘विश्वशांती केंद्रा’ची योजना आहे.

कीर्तनकार, निरूपणकार हेदेखील आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊ शकतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, कीर्तनकार पर्यावरण व जटाधारी शंकर यांची तुलना करू शकतो. हिमालय पर्वत हे भगवान शंकराचे रूप असेल तर त्यावरील वनसंपदा ही शंकराच्या जटांसारखी आहे. शंकराने त्याच्या जटांमध्ये जीवनदायी गंगेला धारण केले आहे. तेथील तिचा प्रवाह आटून जाईल. ती भयावह परिस्थिती वास्तविकपणे उभी आहे. अशा प्रकारे निरूपण केल्यास जनसामान्यांचे निश्चितपणे प्रबोधन होऊ शकते व परिणामकारक रीत्या जनजागृती होऊ शकते.

जगातील ग्रंथांची साम्यस्थळे शोधण्याची झाल्यास वारी ही एखाद्या व्यावसायिक किंवा शैक्षणिक संमेलनासारखी आहे. ज्याप्रकारे अनेक व्यापारी, शैक्षणिक, वैज्ञानिक अथवा अन्य संस्था या वार्षिक संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे घडवून आणतात; त्याच प्रकारे, पंढरीची वार्षिक वारी हे भागवत धर्मियांचे एक महाप्रचंड संमेलनच होय. ते तीनशे वर्षांपासून भरत आहे. त्या संमेलनात कोठल्याही वैज्ञानिक ‘कन्व्हेशन’प्रमाणे नियम पाळले जातात. परंतु कोणताही अधिकृत ठराव संमत न करता, केवळ पांडुरंगावरील भक्ती ही अशीच राहवी हा आंतरिक ठराव संमत होतो व प्रत्येक वारकरी त्याच्या घरी परततो. त्या भक्तिसागरातील एक थेंब बनणे हे प्रत्येक वारकरी त्याच्या भाग्याचे समजतो. वारीमध्ये त्याला अध्यात्माची प्रचंड अनुभूती होते.

आता अज्ञान अवघे हरपे | विज्ञान नि:शेष करपे | आणि ज्ञान ते स्वरूपे | होऊनि जाईजे ||

वारीसारख्या परंपरांना अनुचित ठरवणे हे संकुचित विचारसरणीचे लक्षण आहे. वैज्ञानिकाला नवीन शोध लावल्यानंतर ज्या प्रकारच्या आनंदाची अनुभूती होते, तशी वारीमध्ये भाग घेणाऱ्या वारकऱ्याला विठोबाचे दर्शन घेतल्यावर होते काय? या प्रश्नाचे वारकऱ्याचे उत्तर असेच आहे, की विज्ञानातील शोध हे पुष्कळ चढाओढीनंतर किंवा ईर्षेतून घडून आल्याचे अनेक वेळा दिसून येते, परंतु वारकऱ्याला होणाऱ्या विठोबाच्या दर्शनामुळे किंबहुना, विठ्ठल मंदिराच्या कळसाच्या दर्शनामुळेदेखील मिळणारा आनंद हा कोणत्याही चढाओढीमुळे किंवा ईर्षेमुळे झालेला नसतो; तो केवळ त्याचा आंतरिक आनंद असतो, जो कोठल्याही इतर आनंदापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म ही ज्ञानाची रूपे आहेत. अल्बर्ट आईन्स्टाइन, मॅक्स प्लँक या वैज्ञानिकांना त्यांच्या वैज्ञानिक शोधांमधून ईश्वराचेच दर्शन घडले. पाश्चात्य माध्यमांनीदेखील ईश्वराचे अस्तित्व मान्य केले आहे. एका प्रसिद्ध अमेरिकन साप्ताहिकाने 1985 मध्ये ‘गॉड इज डेड’ हा मथळा असलेला लेख लिहिला होता. त्या साप्ताहिकाने दहा वर्षांनंतर, 1995 साली ‘गॉड इज वायर्ड विदीन यू’ अशा मथळ्याचा लेख छापून ईश्वराचे मानवी शरीरातील अस्तित्वच मान्य केले आहे. वैज्ञानिकांना सुरुवातीपासून ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल व सत्यतेबद्दल संभ्रम पडलेला आहे. परंतु वारीतील सश्रद्ध वारकरी अशा कोणत्याही प्रश्नांच्या नादी न लागता केवळ आत्मिक इच्छेने आणि वारीतील सहभाग हा ईश्वरदर्शनाचाच प्रत्यक्ष अनुभव असल्याचे प्रमाण धरून त्यामध्ये सामील होतो. संतांनी ईश्वराला त्रिकालाबाधित सत्य मानले आहे. त्या सत्याचे दर्शन घेतलेल्या संतांचे पाईक म्हणजेच वारकरी हे ईश्वराची सत्यता व अस्तित्व मान्य करून भाविकतेने वारीची मार्गक्रमणा करत असतात.

त्या संदर्भात आणखी सांगायचे म्हणजे विज्ञान हेदेखील श्रद्धेवर उभे आहे. श्रद्धा म्हणजेच सत् + धारण. म्हणजे सत्याचे धारण. श्रद्धा ही अंध होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ. सखोल अभ्यासान्ती विज्ञानातील गणितात मांडलेले अनेक सिद्धांतदेखील काही एक श्रद्धा गाठीशी ठेवून मांडलेले आढळतात. तीच श्रद्धा ईश्वराच्या अस्तित्वावर दाखवली तर ज्ञान-विज्ञानाचा अनोखा संगम घडल्याचे दिसून येईल. गीतेतील श्रद्धावान्लभते ज्ञानं | तत्पर : संयतेद्रिय: || या वचनात म्हटल्याप्रमाणे श्रद्धावान व्यक्तीलाच केवळ ईश्वराचे, ज्ञानाचे दर्शन घडू शकते.

वारीची असामान्य परंपरा अनेक वर्षे चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील. त्या परंपरेला आध्यात्मिक ज्ञानाची आणि आधुनिक विज्ञानाची व तंत्रज्ञानाची जोड देऊन वारीचे औचित्य आणि त्यातील श्रद्धाभाव तसाच कायम राहवा अन् त्यातून लोकशिक्षण, लोकजागृती घडून यावी. देदिप्यमान भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा. अशीच मी प्रार्थना करतो.

विजय भटकर vijaypbhatkar@gmail.com

(जडण-घडण, जुलै 2016 वरून उद्धृत)

——————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here