आदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र – फडकी मासिक

2
110
_AadivasiSahitya_ChalvalicheMukhapatra_1.jpg

महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य चळवळीसाठी काम करणाऱ्या ‘फडकी’ मासिकाला नोव्हेंबर 2017 मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपणारे ते मासिक निरगुडेवाडी (ता. अकोले, जि. अहमदनगर) या सुमारे नव्वद लोकसंख्या असलेल्या आदिवासी, दुर्गम वाडीतून सुरू झाले. ते तुकाराम रोंगटे, मारुती आढळ, देवराम आढळ, सुनील फलके, सलिमखान पठाण, संजय लोहकरे या व अशा कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जिद्दीने चालू ठेवले आहे.

आदिवासी साहित्याचा प्रवाह समृद्ध व्हावा, नवनव्या लेखकांना प्रेरणा मिळावी, इतर साहित्य प्रवाहांहून आदिवासी साहित्य प्रवाह निराळा आहे याची जाणीव समग्र साहित्यविश्वाला व्हावी या हेतूने ‘फडकी’तून विचारमंथन होते. मासिकाच्या वतीने डॉ. गोविंद गारे व्याख्यानमाला सुरू केली, त्यासही दहा वर्षें झाली. मासिकातून नवोदितांचे साहित्य प्रकाशित होत असतेच. गोविंद गारे यांच्या नावानेच ‘राज्यस्तरीय आदिवासी साहित्य पुरस्कार’ देऊन दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील नवोदित साहित्यिकांना गौरवण्यात येते. वीस साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत. पुस्तक प्रकाशन हे ‘फडकी’ मासिकाचे स्वाभाविक अंग आहे. बत्तीस नवोदित साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत.

आदिवासी साहित्य चळवळीच्या परंपरेत ‘हाकारा’, ‘नहारकंद’, ‘ढोल’ यांसारखी नियतकालिके प्रकाशित होतात. मात्र त्यांत सातत्य नाही. आदिवासी समाजात वाचनसंस्कृती रूजलेली नाही. त्यामुळे नियतकालिक चालवताना लेखन मिळवणे ही मोठी समस्या भेडसावते. त्या समस्येला ‘फडकी’ तोंड देत आहे. कोणत्याही नियतकालिकाच्या दीर्घायुष्यासाठी आर्थिक साहाय्य व दूरदृष्टी असावी लागते. कोणतेही आर्थिक साहाय्य नसताना समाजातील काही निष्ठावंत, दानशूर, व्यक्तींच्या सहकार्याने ‘फडकी’ मासिक गेली दहा वर्षें नियमित प्रकाशित होत आहे; सबंध महाराष्ट्रात साहित्य संस्कृती रुजवण्याचे प्रयत्न करत आहे.

बहुतेक नियतकालिके साहित्याबरोबरच समाजातील अन्याय, ढोंगीपणा, साचलेपणा आणि शोषणाची परंपरा यांविरूद्ध लढताना, आवाज उठवताना दिसतात. ‘फडकी’नेही समाजातील नकली चळवळी, राजकारणी यांच्याकडून समाजाची होणारी दिशाभूल, ठेकेदारांकडून होणारे शोषण, समाजातील लबाड समाजसेवक आणि विकासाचा निधी लुटणारे ठेकेदार यांच्याविरूद्ध आवाज वेळोवेळी उठवला आहे. परिणाम म्हणून समाजाचे शोषण करणाऱ्या ठेकेदारांनी, समाजद्रोह्यांनी संपादकांना धमक्याही दिल्या, परंतु कोणतेही प्रसारमाध्यम अशा समाजद्रोह्यांना भीक घालत नाही. तशी ती ‘फडकी’नेही घातलेली नाही.

आतापर्यंत चार कविसंमेलने, एक आदिवासी धर्मपरिषद, चार पुस्तक प्रकाशन सोहळे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनावणे व ‘भूमिसेना चळवळी’चे कार्यकर्ते काळुकाका धोदडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मासिकाचे विशेषांकही प्रकाशित केले आहेत. मासिकाने राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन 12 मे 2012 रोजी योजले होते.

‘‘फडकी’ मासिकासाठी मनाची खिडकी उघडी ठेवा’ असे आवाहन करणारे ज्येष्ठ साहित्यिक भि.ना. दहातोंडे, सामाजिक कार्यकर्ते एम.एम. लांघा, साहित्यिक रा.चि. जंगले यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आणि संपादक मंडळाच्या प्रामाणिक निष्ठेमुळेच मासिक आदिवासी साहित्याच्या चळवळीत परिवर्तनवादी, स्वाभिमानी आणि निधर्मी विचार रुजवण्याचे काम करत आहे.

आदिवासी साहित्याची चळवळ ही गेल्या दहा-पंधरा वर्षांतील. आदिवासी साहित्य हा लोकसाहित्याचाच एक प्रकार, परंतु ती मंडळी शिक्षित झाली. 2000 सालानंतर प्रभावाने पुढे आली. तोपर्यंतच्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांत अनिल सहस्रबुद्धे, मधुकर वाकोडे, हरिश्चंद्र बोरकर यांनीच फक्त आदिवासी साहित्याची दखल घेतली. कवी वाहरू सोनावणे व मी, आम्ही 2000 सालानंतर आदिवासी पाड्यांवर फिरू लागलो. तेव्हा फार रोमहर्षक अनुभव येत गेला. शिक्षण घेतलेल्या जागृत आदिवासी तरुणांनी त्यांच्या जे जे मनी आले ते लिहून ठेवले होते. वाहरू आणि मी पाड्यावर गेलो, की ते साहित्य बाहेर निघत असे. त्याचे बाह्यरूप झोपडीतील चुलीच्या धुरामुळे काळवंडलेले असे. परंतु साहित्यातील हुंकार नव्या दमाचा वाटे. आम्हा दोघांच्या त्या भटकंतीत एकूण बावन्न तरुणांनी लिहिल्याचे आढळून आले. आम्ही त्यांची हस्तलिखिते ताब्यात घेतली. आम्ही त्यांपैकी बत्तीस जणांचे साहित्य प्रकाशित करू शकलो.

आदिवासी साहित्य चळवळीला तोंड फुटले ते उपेक्षेतून, दुर्लक्षातून आणि घुसमटीतून. आम्ही काही कार्यकर्ते आमचे लेखन वेगवेगळ्या माध्यमांकडे पाठवत असू. पण त्याला दाद मिळत नसे. शेवटी आम्ही स्वत:चा मंच असावा म्हणून ‘फडकी’ हे मासिक डिसेंबर 2007 मध्ये प्रसिद्ध केले. त्यातून आमचे हक्काचे व्यासपीठ तयार झाले.

सर्व नियतकालिकांना असते तशी आर्थिक अडचण ‘फडकी’लादेखील भेडसावते. परंतु आदिवासी समाजातून आलेली काही प्रमुख मंडळी विनंती केल्यानंतर थोडाबहुत निधी देतात तरी. परंतु लेखन कोठून आणायचे? लेखक मंडळी त्यांना हवे ते आणि त्यांना हवे तेवढेच लिहितात. त्यामुळे मासिक भरीव, आशयघन करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. आम्ही पाहिले, की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये आदिवासी समाजातून आलेले बावन्न प्राध्यापक आहेत. त्यांपैकी फक्त चार-पाच जण लेखन करतात. आदिवासी नियतकालिकांना साहित्य लाभते ते हौशी लेखकांकडून.

‘फडकी’ मासिकाला दूरचा पल्ला गाठायचा आहे, आदिवासी साहित्यालाही योग्य मानमान्यता मिळवायची आहे. आमचा ‘फडकी’च्या माध्यमातून तसा प्रयास आहे.

– संजय लोहकरे

About Post Author

2 COMMENTS

  1. अत्यंत कठीण काम करत आहात…
    अत्यंत कठीण काम करत आहात. मासिकाची वार्षिक वर्गणी कीती व ती कशी व कुठे पाठवायची ते कळले तर बरे होईल
    ?

  2. जय आदिवासी जय बिरसा जय…
    जय आदिवासी जय बिरसा जय होनाजी जय राघोजी
    फडकी मासिक हे आदिवासी समाजाचे मुखपत्र आहे याचा अभिमान आहे च परंतु या मासिकातून आपल्या च बांधवाचे अश्लिल भाषेत टोमणे देणे हे या मासिकाला शोभणारे नाही तुम्ही जेव्हा दुसर्यांकडे एक बोट करता तेव्हा चार बोटे तुमच्या कडे आहेत हे विसरू नये
    या वरुन तुमची काय लायकी आहे हे समजत

Comments are closed.