आदिवासी रेडगावात डिजिटल शाळा

1
31
carasole copy

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

रेडगाव(बु)ची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावाच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. पटसंख्या एकशेपाच आहे. पुढील वर्षी सातवीसाठी परवानगी मिळणार आहे. त्या पुढील वर्षी आठवी. गावातील पन्नासपेक्षा जास्त मुले गावाबाहेर शाळेत जात होती. ती जिल्हा परिषद शाळेतील सुधारणा पाहून त्या शाळेत दाखल झाली. शाळेत नियमानुसार दोन शिक्षक आहेत, पण आणखी एक शिक्षक कमी पटसंख्या असलेल्या शाळेतून येथे वर्ग केले आहेत, तर एका शिक्षकाची नियुक्ती उपसरपंचानी खाजगी रीत्या केली आहे.

मुख्याध्यापक अमीत यशवंत निकम यांचे शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न होते. त्यांचे जन्मगाव निफाड तालुक्यातील चांदोरी. त्यांचे शिक्षण बी.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. त्यानी बी.ए.ला मराठी हा विषय घेतला होता. त्यांचे वडीलही शिक्षक होते. त्यांची आतापर्यंत दहा वर्षें सेवा झाली आहे. त्यांनी या पूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात नांगरबारी या आदिवासी गावात काम केले आहे.

रेडगावच्या शाळेला नवीन इमारतीसाठी परवानगी मिळाली व सहा लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. मुख्याध्यापकांनी इमारतीच्या बांधकामात जातीने लक्ष घालून प्रत्येक कामावर  देखरेख  केली. सर्व हिशोब चोख ठेवले व सर्व व्यवहार पारदर्शी ठेवला. दर दिवशी होणारे काम, त्याला झालेला खर्च, याचे तपशील देणारे बोर्ड तयार करून ते गावात रहदारीच्या जागी म्हणजे देऊळ, सलून अशा ठिकाणी लावले. ग्रामस्थांना बांधकामासाठी आणलेल्या मालाचे मोजमाप करण्याची व दर्जा पडताळण्याची मुभा ठेवली. ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला. त्यामुळे मजुरीचा खर्च नियंत्रित करता आला. एका खोलीला तीन लाख रुपये अशा प्रमाणात दोन्ही खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.

इमारतीला निसर्गरम्य बगीचा अन् क्रीडांगण यांचा साज चढवण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे व तेथे पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेतली गेली आहे.

शाळेची आधीची इमारत मोडकळीस आली होती. ती निर्लेखित न करता तिच्यासाठी मार्चअखेरीस अनुदान मिळवून आवश्यक डागडुजी करून पुन्हा वापरात आणली गेली आहे. त्यामुळे शाळेचे कामकाज करण्यास पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत.

रेडगावच्या ग्रामस्थांनी मुलांच्या पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यासाठी निकमसरांनी  व त्यांच्या सहशिक्षकांनी ग्रामस्थाना, शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय घालणे का व कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. डिजिटल शाळेचे व ज्ञानरचनावादाचे फायदे  लक्षात आणून दिले. जसे, की डिजिटल शाळा ही आधुनिक आनंददायी शिक्षणपद्धत आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांचा शिकण्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून कठीण विषय, संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातात. शिक्षणास गुणवत्ता लाभते.

ज्ञानरचनावादाच्या साधनांमुळे पांरपरिक फळयाऐवजी व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड, इंग्रजी अक्षर बोर्ड, गणित बोर्ड, ग्राफ बोर्ड असे विविध बोर्ड वापरून अध्यापन  प्रभावी करता येते. यामध्ये विद्यार्थी गटा-गटाने हसत-खेळत ज्ञान संपादन करतात. पहिली ते चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ती शिक्षणपद्धत सुरू करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणित आणि मराठी हे विषय पक्के होतात. यामध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचशे व एक हजार एवढ्या रकमेच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे  हे संस्करण आहे.

हे सर्व ग्रामस्थांना नीट ध्यानात यावे व त्याची निकड त्यांना स्वत:ला मनापासून पटावी म्हणून ग्रामस्थांच्या पंधरा-सोळा जणांच्या गटाला घेऊन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘पष्टे पाडा’ या आदिवासी गावातील ‘संदीप गुंड’ यांच्या शाळेला भेट दिली.

‘पाष्टे पाड्या’ची शाळा पाहिल्यानंतर ग्रामस्थांनीही डिजिटल शाळेच्या उभारणीत रस घेतला व गेल्या चार वर्षांत अकरा लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले. त्यातूनच गावातील शाळा ‘हायटेक’ झाली आहे.

प्रत्येकी पंचवीस हजाराचे दोन लॅपटॉप दोन शिक्षकांना देण्यात आले आहेत. पुण्याच्या ‘टेक्नोसेस कंपनी’ची या कामात मदत झाली. ‘ई लर्निंग’साठी आवश्यक असलेल्या बाबींपैकी शाळेत, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, लॅपटॉप या सर्व बाबींचा समावेश आहे. शाळेचे अंतर्गत रंगकामही केलेले असून त्यात भींतीवर तक्ते, तसेच फरशीवर शैक्षणिक सापशिडी, अक्षर फलक ,वाक्ये फलक, आकडे पट, बेरीज व वजाबाकी  करण्यासाठी विविध वस्तूंची चित्रे इत्यादी अनेक बाबी विद्यार्थ्याना ज्ञानरचना वादानुसार शिक्षण देण्यास सुलभ होईल अशा त-हेने रंगवून घेतल्या आहेत.

शाळेत सध्या एकशेपाच विद्यार्थी आहेत व त्या पैकी पन्नास मुले संगणक हाताळू शकतात. चौथी,  पाचवी  व सहावीच्या मुलांना सर्व विषय संगणकावर शिकवले जातात. वीज नसेल तेव्हा शिक्षक शिकवतात. दोन्ही  पद्धतीचा समन्वय  घातला आहे.

शाळेतील प्रयोग पाहण्यासाठी आतापर्यंत दीडशे शाळांनी भेटी दिल्या आहेत. तालुक्यातील दोनशे अडतीस शाळांत या शाळेचा गुणानुक्रम शेवटून तिसरा होता, तो पहिल्या तिनामध्ये स्थिरावला आहे.

शाळेला १ जानेवारी २०१६ रोजी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले.

शाळा म्हटले, की तेथे चालणाऱ्या कामकाजाचे तीन बाबींत वर्गीकरण करता येते. अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन. जर तिन्ही बाबी जी शाळा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे करत असेल तर त्या शाळेला डिजिटल शाळा असे म्हणता येईल. यातील मुल्यमापन वगळता बाकी दोन निकष या शाळेकडून पूर्णत्वास गेले आहेत. त्यामुळे ही शाळा डिजिटल ह्या उपाधीला पात्र झाली आहे.

– अनुराधा काळे

Last Updated On – 24th August 2016

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.