आदर्श मोठे – विकसनशील छोट्यांसाठी

मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तालुक्याच्या शहराचा मूळचा रहिवासी. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील एकसळ नावाच्या छोट्याशा खेडेगावात 1992पासून माझे स्थायिक होणे हा केवळ योगायोग. गाव छोटेसे पण स्वातंत्र्यसेनानी कै. दादासाहेब साखवळकर यांच्यामुळे कीर्तिरूपास आलेले. दादासाहेब साखवळकर या एकसळचेच रहिवासी होते. मला ग्रामीण जीवन आवडते आणि त्यातच गांधींचा खेडयांकड्चा ओढा माझ्या शालेय जीवनापासून मनावर बिंबलेला. त्याची परिणती म्हणूनही माझे एकसळ येथे स्थायिक होणे घडले असेही म्हणता येईल.

मी एकसळला थोडी शेती घेऊन शेतातच घर बांधले. घराला ‘पृथ्वी’ हे नाव दिले. माझ्या मुलाला 2000मध्ये मुलगी झाली. तिचे नाव वैदेही असे ठेवले. वैदेहीच्या आमच्या कुटुंबातील प्रवेशामुळे उल्हसित होऊन मी स्वखुशीने 2000सालीच गणेशचतुर्थीचा मुहूर्त धरून तिच्या नावाने ‘पृथ्वी’ या आमच्या घराच्या प्रांगणात ‘वैदेही-गणेश व्याखानमाला’ हा उपक्रम सुरू केला. दरवर्षी गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे दहा-अकरा दिवस हा उपक्रम चालतो. 

एकसळ व पंचक्रोशीतील बालवाडी ते शाळा-कॉलेजांतील मुले-मुली, शेतकरी, सामान्य नागरिक (स्त्री-पुरुष) यांची व्याख्याने गणेश व्याख्यानमालेत आयोजित केली जातात. व्याख्यानासाठी मुले-मुली मिळावी म्हणून निरनिराळ्या शाळा-कॉलेजांच्या प्रमुखांशी संपर्क साधतो. व्याख्याता किती वेळ बोलला, व्याख्यान ओघवते होते की अडखळत, थांबत-थांबत होते याला इथे महत्त्व नसून वैदेही-गणेश व्याख्यानमाला मनात चांगले विचार उत्पन्न होण्याला महत्त्व देते. तसेच, ही स्पर्धा नसून या उपक्रमाची उद्दिष्टे अशी –

1. वक्तृत्वकला अवगत होण्यासाठी किंवा शिकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, 2. समाधीटपणा प्राप्त होणे, 3. साहित्य, वृत्तपत्रे इत्यादी वाचण्याची आवड निर्माण होणे, 4. मनात चांगले विचार उत्पन्न होण्याकडे कल वाढणे व बहुश्रुत होणे, 5. श्रोत्यांना चांगले विचार ऐकायला मिळणे, 6. सहभागी व्याख्याते-श्रोते यांच्यात स्वत:च्या मनातच स्वत:च्या व्यक्तित्वाचे मूल्यमापन, स्वत:च्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया सुरू होणे, 7. श्रोत्यांनीही व्याख्यानास उत्स्फूर्तपणे उद्युक्त होणे इत्यादी.

वैदेही गणेश व्याख्यानमालेचे मोजमाप म्हणजे श्रोत्यांची संख्या नसून यातील एखादा तरी व्याख्याता, श्रोता नरहर कुरुंदकर, पु.ल. देशपांडे, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, ए.पी.जे. अब्दुल कलाम, बाबा आमटे, साने गुरुजी इत्यादींच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या जीवनाची आणखी दैदीप्यमान व समाजोपयोगी वाटचाल करणारा निघावा ही आशा या उपक्रमाद्वारे केली जाते.

2005 साल हे वैदेही गणेशव्याख्यानमालेचे सहावे वर्षं. हे वर्ष  विनोबांनी सिध्द केलेल्या गीताईच्या अमृतमहोत्सवी वर्षात आले. त्यामुळे त्या वर्षी सर्व व्याख्यानसत्रे गीताईस व विनोबांच्या विचारांना समर्पित करण्यात आली होती. एक ‘गीताई-ध्वज’ही तयार करून, तो व्याख्यानमालेच्या उद्धाटनप्रसंगी विनोबांच्या पवनार आश्रमास समर्पित करण्यात आला. गीताई व विनोबांच्या विचारांसाठी अण्णासाहेब जाधव यांच्या हातात देण्यात आला. यावेळी चरखा-पूजनही करण्यात आले. विनोबा आणि गांधी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून तीन चरखे (1. अंबर चरखा, 2. पुस्तक चरखा व 3. पेटी चरखा) येथे कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वत:चे पेळू आणून कुणीही हे चरखे सूत कातण्यासाठी मोफत वापरू शकतो.

वैदेही गणेशव्याख्यानमालेच्या उद्दिष्टांना पूरक म्हणून 2002साली आमच्या ‘पृथ्वी’या घरातच सर्वांसाठी मोफत असे ‘ग्रामविचार वाचनालय’ सुरू करण्यात आले. दैनिके, साप्ताहिके, मासिके, पाक्षिके, द्वैमासिके, त्रैमासिके, निरनिराळ्या प्रकारची पुस्तके वाचनालयात बसून वाचायला तर मिळतातच; पण बालवाडी, अंगणवाडीतील मुलांसाठी प्राणी, वाहने, फळे, फुले, पिके इत्यादींचे सचित्र तक्ते, बाराखडया-अक्षरे यांचे तक्तेही शिकण्यासाठी वाचनालयात जमिनीपासून पाव ते अर्धा मीटर उंचीवर भिंतींना चिकटवून उपलब्ध करून दिले आहेत.

आणखी एक उपक्रम म्हणजे लोकांना वैशिष्ट्यपूर्ण घटना कळाव्यात म्हणून अशा घटनांबाबत ‘पृथ्वी’ या आमच्या घराच्या रस्त्याकडेच्या भिंतरूपी फळ्यावर खडूने दररोज ‘बातम्या’ लिहिल्या जात. घराच्या भिंतीलाच काळा रंग फासून सर्वांना रस्त्यावरून जाता-येताना दिसेल असा हा फळा बनवला आहे. या बाबतचे ‘जीवनशैली’ नावाचे पुस्तकही प्रसिध्द केले आहे. त्या आधी ‘ग्रामोक्ती’ (काका हलवाई सुविचार सप्तशती) या नावाचा सुविचार ग्रंथ विमोचित केला गेला. हा सातशेएक सुविचारांचा छोटेखानी ग्रंथ आहे. शेतकरी, शाळा-कॉलेजांतील मुले-मुली, सामान्य नागरिक यांनी लिहून दिलेले हे सुविचार आहेत.

‘आदर्श मोठे, विकसनशील छोट्यांसाठी’ (IDEAL BIGS FOR DEVELOPING SMALLS) या आणखी एका उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे छोट्या मुलांवर मोठयांकडून किंवा मोठयांमार्फत चांगले संस्कार घडवणे. दर रविवारी सकाळी दहा ते साडेअकरापर्यंत आमच्या घरातच हा उपक्रम अव्याहतपणे राबवला जातो. अशा या मोठयांकडून विकसनशील छोटयांना चांगल्या विचारांचे, व्यावसायिक अनुभवांचे यशस्वीतेसाठी मार्गदर्शन होणे हितावह ठरते.

या वर्षीपासून (2010 पासून) ही व्याख्यानमाला अशा उपक्रमांमध्ये रस घेणार्‍या गावांत/शहरांत भरवली जाणार आहे. एकाच वेळी ती अनेक गावांमध्येही भरवली जाऊ शकेल. संपर्क : ‘वैदेही-गणेशव्याख्यानमाला’,

द्वारा डॉ.शि.म. पंचादेवी,

मु.पो. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा – 415501.

9665261490, 9665261488


About Post Author