असे घडले – सुलभा स्पेशल स्कूल

0
45
ase-ghadle-sulbha-special-school

सात मुलांची धावण्याची शर्यत होती. शर्यत सुरू होऊन, सर्वांनी धावण्यास सुरुवात केली. एक मुलगा अडखळला आणि धपकन खाली पडला. त्याच्या ओरडण्याने, बाकीच्या मुलांनी वळून पाहिले; तो उठत आहे का याची वाट काही क्षण बघितली, पण त्याची उठण्याची लक्षणे दिसेनात. तेव्हा ती सर्व मुले मागे फिरून त्याच्याजवळ गेली. सर्वांनी मिळून हात देऊन त्याला उठवले. ती मुले त्याला घेऊन परत मागील ओळीजवळ आली. त्या मुलांना ‘वेडी’ म्हणता येईल का? 

काही मुलांच्या मेंदूची व कधी कधी शारीरिकही वाढ कमी होते. इतर (नॉर्मल) मुलांप्रमाणे वयाच्या प्रमाणात त्यांच्या मेंदूचा विकास होत नाही. त्यांचे विकासाचे टप्पे (वाढीचे माइल स्टोन्स) उशिराने घडलेले असतात. उदाहरणार्थ, दोन वर्षाचे मूल सहसा चांगले चालू-बोलू लागते, पण काही मुलांना चालणे-बोलणे पाचव्या-सहाव्या वर्षी जमते. म्हणून त्यांना मंदबुद्धी असे म्हटले जाते. पण त्यांची चिकाटी किंवा अन्य गुण प्रबळ असू शकतात. सर्वसामान्य मुलांना तेच ते काम सतत करण्याचा कंटाळा येतो, पण ती मुले तशी कामे न कंटाळता करू शकतात. 

‘सुलभा – मतिमंद मुलांची शाळा’ ही कै. मीना रानडे यांच्या कल्पनेतून उदयाला आली. ती संस्था ‘सुलभा ट्रस्ट फॉर स्पेशल एज्युकेशन अँड रिसर्च’ या नावाने नावारूपाला आली आहे. शाळेला आरंभ विक्रोळी येथील जगडुशा नगरमधील एका खोलीत पाच मुलांना घेऊन 15 जानेवारी 1979 रोजी मंदबुद्धीच्या मुलांसाठी प्लेग्रूप म्हणून झाला. ते वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ द चाइल्ड’ होते. ती संस्था काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन त्याआधीच्याच वर्षी, 1978 च्या अखेरीस रजिस्टर केली होती. मतिमंद मुलांसाठी फारच कमी संस्था त्यावेळी मुंबईत अस्तित्वात होत्या; दादरच्या पुढे ठाण्यापर्यंत तर तशी एकही शाळा नव्हती. 

मीना रानडे यांना त्यांचे एक अपत्य मतिमंद असल्याने त्यांच्या समस्यांची जाण होती. तसेच, त्यांचा अनुभव त्या मुलांना ट्रेनिंग योग्य वेळी मिळाले, तर ती समाजात व्यवस्थित राहू शकतात व थोड्याबहुत प्रमाणात अर्थार्जनही करू शकतात असाही होता. म्हणून, त्या स्वतः, रमेश जांभेकर, प्रस्तुत लेखिका जयश्री जांभेकर, डॉक्टर सुलभा भाटवडेकर, श्रीलेखा कुलकर्णी, वकील सुबोध परांजपे, डॉक्टर पूर्णिमा पंडित, शरद मुळये (पालक) अशा सर्वांनी मिळून तो ट्रस्ट स्थापन केला होता. पैकी रमेश, जयश्री व श्रीलेखा हे एमएसडब्ल्यू म्हणजे समाजकार्यातील विशेषज्ञ झालेले होते. मी – जयश्री जांभेकरने रोजचे कामकाज बघावे असे ठरले; डॉक्टर भाटवडेकर यांना समाजात उत्तम लौकिक लाभला होता. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला ‘सुलभा’ असे नाव देण्याचे ठरले. त्यांचे योगदान शाळेला महत्त्वपूर्ण राहिले आहे. सुरुवातीला, एक आया मदतीला ठेवली होती. शाळेसाठी लागणारे साहित्य सर्वांच्या घरून वापरले गेले. नंतर शाळेला मदत वेगवेगळ्या स्तरांतून मिळत गेली. कोणी पैसे दिले, कोणी वस्तू दिल्या, कोणी ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली; तर कोणी शाळेत मुलांसोबत वेळ ऐच्छिक देऊ लागले. मुलांची संख्या वाढू लागली. 

प्लेग्रूप शाळेला जागा मिळेपर्यंत, 1979 ते 1982 ही तीन वर्षें, थोडे दिवस एका खोलीत, नंतर वर्षभर सर्वोदय हॉस्पिटलच्या जैन उपश्रयात (जैन मंदिरातील एक विभाग जेथे जैन दीक्षा घेतलेले प्रवासी, सन्यासी आश्रयासाठी थांबतात), किंवा विद्याविहार जॉली जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्ट दुपारच्या वेळी रिकामे असते तेव्हा तेथे अशा जागा भाड्याने घेऊन चालवला गेला. तशात एक दिवस, अचानक, दूरदर्शनवरील कमलेश्वर यांच्या नावाजलेल्या ‘परिक्रमा’ या कार्यक्रमात ‘तुमच्या समस्या मांडाल का?’ अशी विचारणा झाली. आमचे ‘म्हाडा’कडे जागेसाठी प्रयत्न चालू होतेच. तो कार्यक्रम पाहून म्हाडाच्या सौजन्याने आम्हाला टिळकनगर, _vastu_pshikhsanचेंबूर येथील वसाहतीत चार बैठ्या खोल्यांची इमारत भाड्याने मिळाली. ती जागा म्हणजे मुख्य रस्त्यापासून दूर, आजूबाजूला भरपूर झाडी, मोकळी, पटांगण असलेली, बैठे घर अशी, चार खोल्यांची होती. सभोवती कामगार वसाहत होती. ती 1980 मध्ये मिळाल्यानंतर हळूहळू पायरी पायरीने, आधी दोन मजले व नंतर काही वर्षांनी शेवटचा एक मजला बांधला गेला. ‘सुलभा ट्रस्ट’ची पाच मजली इमारत तेथे मोठ्या दिमाखात उभी आहे.

कै. श्रीराम जांभेकर हे संस्थेचे अध्यक्ष पंचवीस वर्षें होते. शाळेची इमारत त्यांच्याच देखरेखीखाली उभी राहिली. त्यांनी खूपच धावपळ केली. त्यांच्याप्रमाणेच, संस्थेचे सेक्रेटरी कै. हरिदास दलाल यांनीही शाळेच्या विकासासाठी मेहनत घेतली. कै. रा.ता. कदम हे मुंबईचे महापौर होते. त्यांनी शाळेला मदत वेळोवेळी केली आहे. हशू अडवाणी, गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदारांचीसुद्धा अडचणीच्या वेळी संस्थेला मदत झाली आहे. शाळेला महाराष्ट्र सरकारची मान्यता 1985 साली मिळाली. सरकारकडून अनुदान मिळू लागले. देणगी देणाऱ्यांना टॅक्स एक्झम्प्शनची सुविधा प्राप्त झाली.

हे ही लेख वाचा – 
अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!
मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)

स्पेशल स्कूलमध्ये प्री-प्राइमरी, प्राइमरी, प्रिव्होकेशनल अशा त्यांच्या बौद्धिक स्तरावरील शैक्षणिक पातळीनुसार विद्यार्थी गटबद्ध(मुलांचे गट) केले आहेत. प्रत्येक शिक्षकाच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांना वैयक्तिक, सामाजिक, कला, हस्तकला, भाषा आणि संवादाव्यतिरिक्त कार्यात्मक शैक्षणिक शिक्षण दिले जाते. त्यांच्या मराठी आणि हिंदी या दोन मुख्य भाषा आहेत. संगीत, नृत्य, नाटक आणि इतर विश्रांती वेळ, क्रियाकलाप देखील त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. त्यांच्यासाठी भेट, आउटिंग, शैक्षणिक सहल, साहसी शिबिराचे आयोजन केले जाते. जुन्या विद्यार्थ्यांना पाककलेचाही अनुभव देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कामाशी संबंधित कौशल्ये देण्यास प्राधान्य दिले जाते.

त्याप्रमाणे त्या प्रत्येकाला मार्गदर्शन दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक, मनोरोग चिकित्सक, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, क्राफ्ट टीचर, खेळ व व्यायामासाठी वेगळे शिक्षक, कौन्सिलर्स या सर्वांची मदत घेतली जाते. शाळेच्या मुख्याध्यापक अनुराधा जठार या आहेत.

_vacha_upchar_kendraसंस्थेमध्ये शिक्षणाचे खालील पाच विभाग आहेत- 1. व्यवहारिक शिक्षण, खेळ, कला, वस्तू बनवणे, हस्तकला या विषयांचे प्रशिक्षण देणारा सुलभा शाळा विभाग, 2. अठरा ते पस्तीस वयोगटातील मानसिक अपंग असलेल्या प्रौढांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणारा दीपक कुमार लालजी छेडा सुलभा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, 3. सहा वर्षाहून कमी वयाच्या मुलांची धीम्या गतीने होणारी वाढ ओळखून तज्ञांच्या सहाय्याने गती वाढवण्याचे कार्य करणारा रुजूता हर्दिनी अमृत गाडा, शीघ्र हस्तक्षेप क्लिनिक, 4. मुलांच्या अधिक विकासासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन देणारा सुलभा समुपदेशन केंद्र, 5. मुकबधीर मुलांसाठी ऑडिओमेट्री आणि स्पीच थेरपी यांची सुविधा देणारा श्रीमती धरती मोन्शी भुईपुरवाला सुलभा वाचा उपचार केंद्र.

शाळेने दिलेल्या प्रशिक्षणामुळे जिल्हा समाज कल्याण कार्यालय, मुंबई – उपनगरीय संस्थेने समुपदेशन केंद्र म्हणून संस्थेची 2006 साली निवड केली. सुलभा स्पेशल स्कूलमधील मुलांनी आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय खेळात

2007 पासून सहभाग घेतला. त्यांनी चेन्नई येथील ‘पथवे फाउंडेशन’ तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 2007 साली दागिने तयार करणे आणि स्वयंपाकातील वस्तू तयार करणे यां मध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय आणि आंतरशालेय स्पर्धेत धावपटू चषक पटकावला. त्यापुढे प्रत्येक वर्षी सुलभा स्पेशल स्कूलने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त केले आहेत.
मुलांनी बनवलेले साहित्य वस्तुप्रदर्शनात सादर केले जाते. तेथे त्या वस्तू विकल्या जातात. तसेच मार्केट बॅग, पाउच, फोल्डर्स, बॅटवास आणि फ्लॉवर, फुलगुच्छे या उत्पादनांची ऑनलाईन विक्रीही सुरूच असते. 

विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे व आवडीप्रमाणे शिक्षण देणे हे नियमित शालेय शिक्षणापेक्षा जास्त जरूरीचे आहे, कारण त्याची बुद्धिमत्ता शालेय शिक्षण घेण्यासारखी नसते. पण समाजात मिळून-मिसळून राहण्यासाठी व थोडेसे तरी आर्थिक स्वावलंबन हवे म्हणून विद्यार्थी व पालक अशा सर्वांनाच समुपदेशनाची गरज वेळोवेळी असते. तसेच, मुलांना फिट्स वगैरेसारखे आजार काही वेळा असू शकतात. त्यासाठी औषधांची जरूर नसते. आईवडील अनभिज्ञ काही वेळा असू शकतात. ते कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी उपचार करतात किंवा मुलांचे फाजील लाड करतात. त्यांनाही मार्गदर्शनाची गरज असते. तशी मुले, त्यांना जर वेळेवर _chalis_vrsha_purnaमदत मिळाली तर स्वावलंबी होऊ शकतात.

मतिमंद मुलांची समस्या पूर्वीपण होती. पण एकत्र कुटुंबपद्धत असल्याने तशी मुले कुटुंबात सामावली जात. त्यांचा बाऊ वाटत नसे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे तो प्रश्न गंभीरपणे जाणवतो. आईवडील, दोघेही कामाला जातात तेथे तर तो प्रश्न फारच जाणवतो.

परदेशात जास्त संस्था तीव्र अपंगत्व किंवा बहुविकलांग मुलांसाठी असतात. बाकी मंदबुद्धी मुलांसाठी सर्वसामान्य शाळांमध्येच एखादा स्पेशल क्लास असतो, त्यामुळे ती मुले इतर वेळी सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळू शकतात. त्यांचे अनुकरण करू शकतात. आमचा मुख्य भर विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करणे यावर आहे. अनेक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या व्यवसायात क्रियाशील झाल्याची उदाहरणे सुलभा शाळेत आहेत. शाळेने 2019 साली चाळीस वर्षें पूर्ण केली आहेत.

– जयश्री जांभेकर 022-2582206  
sulbhaspecialschool@gmail.com

About Post Author