अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू

अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला !

अशोक ढवण यांचा नावलौकिक उपक्रमशील आणि आस्थावान कुलगुरू म्हणून आहे. ते परभणी- बदनापूरच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते. अशोक हे मराठवाड्याच्या मातीतील, त्या परिसरातील, त्याच विद्यापीठात शिकलेले आणि सर्वसामान्यांतून मोठे झालेले असे व्यक्तिमत्त्व आहे.

त्यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील उजनी हे आहे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण एकत्र कुटुंबातील पन्नास-साठ माणसांमध्ये गेल्यामुळे त्यांच्या मनात स्वाभाविकपणे समूहभाव तयार झालेला आहे. अशोक यांना त्यांच्या बालपणाविषयी बोलताना मोहरून येते. त्यांचे वडील हे घरातील चौथ्या क्रमांकाचे भाऊ. कारभारकी मोठ्या भावाकडे. त्यामुळे वडील शेतात सतत राबत असत. त्यामुळेच, त्यांचा हा मुलगा त्या व्यथा-वेदनांतून बाहेर पडला !

अशोक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावी झाले. गावातील शाळा चांगली होती. त्यामुळे त्यांची जडणघडण उत्तम झाली. त्यांना कवितेची, विज्ञानाची गोडी आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून रुजत गेल्या. म्हणून त्यांच्या भाषणातून कवितेच्या ओळी सहज पेरलेल्या असतात आणि त्यांच्या भाषणात वैज्ञानिक दृष्टिकोनही हमखास व्यक्त होतो. त्यांच्या गावात गणेशनाथ महाराज म्हणून जे संत होऊन गेले त्यांची एक पोथी आहे, त्याविषयी ते सतत म्हणतात, की त्याचे कोणीतरी नीट संशोधन करण्यास हवे. अशा तऱ्हेचा सांस्कृतिक भाव त्यांना लाभला आहे.

अशोक दहावी पास 1974 साली उत्तम गुणांनी झाले. सर्वांची अपेक्षा त्यांनी मेडिकल विषय निवडावा अशी होती, पण सरांनी कृषी महाविद्यालयाची निवड केली आणि त्यांच्या मनाला जे वाटले तेच शिकून त्यातील शिखर गाठले. त्यांना शिकवणाऱ्या एका शिक्षकांनी शेतीचेही विज्ञान असते ही भावना त्यांच्या मनी रुजवली होती. त्यांचे मेहुणे परभणीच्या कृषी विद्यापीठात शिकण्यास होते, त्यांच्याकडूनही कृषी शिक्षणाची ओढ त्यांच्यात निर्माण झालेली होती. अशोक परभणीच्या कृषी विद्यापीठात 1974 साली शिकण्यास आले. ते विद्यापीठ तेव्हा दोन वर्षांचे (आरंभ 1972) होते. तेव्हापासून सततचा त्यांचा त्या कृषी विद्यापीठाशी संबंध आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग त्या विद्यापीठात घडला. डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे व्याख्यान विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. कृषी क्षेत्रात खरंच करिअर करायचे असेल तर दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थान येथे शिक्षण घ्या, असे स्वामिनाथन त्यांच्या व्याख्यानात म्हणाले. ती बाब अशोक यांच्या मनावर कोरली गेली. ते कठीणतर स्पर्धा परीक्षा कठोर परिश्रमांनी उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थानमध्ये दाखल झाले. अशोक यांनी पदव्युत्तर शिक्षण तेथेच घेतले. त्यांनी संशोधनही तेथेच केले. त्यांनी मृदा विज्ञान या विषयात विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली. त्यांना दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांना ते आकर्षण होते. त्यांनी यशवंतरावांची पुस्तके वाचली होती. त्यांनी यशवंतराव यांच्या शताब्दीच्या वर्षात काही ठिकाणी व्याख्यानेही दिली.

अशोक कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून 1985 साली नोकरीला लागले. त्यांनी पदवीच्या मुलांना दहा वर्षे (1995 पर्यंत) शिकवले. त्यांना अमेरिकेला शिष्यवृत्तीसह जाण्याची संधी (1995) मिळाली. त्यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठांत शेतीविषयक नव्या संशोधनाचा अभ्यास केला. त्यांनी तेथून परतल्यावर पदव्युत्तर वर्गांना 1995 ते 2005 अशी दहा वर्षे शिकवले. त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर, उस्मानाबाद आणि बदनापूर या महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून नेतृत्व करण्याची संधी 2005 नंतर मिळाली.

ते विद्यापीठाने कोणत्या वर्षी कोणते नवे वाण शोधले त्याचा तपशील सविस्तरपणे विनाकागद देऊ शकतात; त्यांचा जीव इतका त्या विद्यापीठात गुंतलेला आहे ! त्यांना विद्यापीठाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून 2012 साली नेमण्यात आले. तेव्हा त्यांचा शेतकऱ्यांशी संबंध प्रत्यक्ष आला. त्या दरम्यान जिल्हा मासिक कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, प्रक्षेत्र भेटी, पाचशे चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. अशोक यांनी विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम करत असताना कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व विभागीय विस्तार केंद्र यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवले. त्यांपैकी महत्त्वाचे काही प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत. त्यांनी ‘विद्यापीठ आपल्या दारी- तंत्रज्ञान शेतावरी’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला. शेती शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या व शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान पद्धतींचा परिचय करून दिला. मराठवाड्याच्या जालना, औरंगाबाद, बीड येथील जिल्ह्यातील मोसंबी बाग वाचवण्याचे विशेष अभियान 2012-13 या दरम्यान अशोक यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत तळ्यातील गाळ काढून हलक्या मुरबाड जमिनीचे पुनरुज्जीवन करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्या तंत्रज्ञानामुळे उस्मानाबादमध्ये तेरला डॅम परिसरातील मुरबाड जमिनी सुपीक झाल्या. तो प्रकल्प गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ या महाराष्ट्र शासनाच्या लोकचळवळीत रूपांतरित झाला आहे. ‘उमेद’ हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जवळपास पाचशे गावांत राबवला गेला. दोन गोष्टी त्या उपक्रमात साधल्या गेल्या. शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन केले जाई. तसेच, मुली त्यांच्या वडिलांना, कितीही बिकट परिस्थिती आली तरी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये अशी भावनिक साद घालत. त्या उपक्रमाने विद्यापीठ शेतकऱ्यांसोबत आहे असा विश्वास निर्माण केला. त्याचा परिणाम असा की पाचशे गावांपैकी एकाही गावात आत्महत्येचा अनुचित प्रकार घडला नाही. अशोक यांनी विद्यापीठात संचालक (शिक्षण) म्हणून काम करताना मराठवाड्यातील कृषी क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण व अध्यापनाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 2018-22 या काळात पदभार सांभाळला. अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात ‘स्वच्छ परिसर, हरित परिसर, सुरक्षित परिसर’ ही घोषणा तयार करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्यातील विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व शैक्षणिक संस्थांचे परिसर स्वच्छ, हरित व सुरक्षित करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अशोक यांची कुलगुरू म्हणून काम करत असताना सर्वांना कार्यप्रवण करून, सोबत घेऊन काम करण्याची हातोटी कामी आली. त्यातून अद्ययावत अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्रातील योगदान व शिक्षण विस्तार या तिन्ही पातळ्यांवर विद्यापीठाला त्याच्या अखत्यारीतील संस्थांचा समन्वय साधून भरीव योगदान देता आले. विद्यापीठाने त्या काळात चालू केलेला डिजिटल अॅग्रीकल्चर हा प्रकल्प शेतीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणारा आहे. शेतीसाठी रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यापीठ रोबोट हाताळण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देते.

मी त्यांच्या उस्मानाबादच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनासाठी गेलो तेव्हा पहिल्यांदा ‘तीफणसाज’ हा कार्यक्रम सादर केला. मी तेथे जवळजवळ अडीच तास बोललो, खूप मजा आली. तेथे प्राचार्य म्हणून सरांची लोकप्रियता आणि नेतृत्वकौशल्य अनुभवता आले. आमच्या सोबत विलास पाटील होते. त्यांनी नंतर तेथील कृषी महाविद्यालयात त्याच विषयावर त्यांच्या मृदाविभागामध्ये माझे व्याख्यान ठेवले होते. सरांनी तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कवितेवर नितांत प्रेम केले आहे.

मी माझ्या गावात भाऊबीजेच्या दिवशी विचारांची भाऊबीज हा कार्यक्रम करत असे. गावाचा विकास व्हावा, लोकांना गावाची उंची वाढवता यावी म्हणून मी पोपटराव पवार, भास्करराव पेरे-पाटील यांच्यासारखी माणसे गावाकडे नेऊ लागलो. कुलगुरू झाले त्या वर्षी मी भास्करराव पेरे पाटील यांना बोलावले होते. त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक यांना येण्याची विनंती केली. त्यांनी होकार दिला आणि नुसते माझ्या गावी आले; एवढेच नाही तर त्यांनी गावी जाण्यापूर्वी भास्करराव पेरे पाटील यांच्यासह स्वतःच्या बंगल्यावर आम्हा सगळ्यांना अल्पोपहारासाठी बोलावले आणि सगळ्यांचे स्वागतही केले.

मी माझे ऑनलाईन तास लॉकडाउनच्या काळात घेत होतो. मी माझ्या ग्रूपवर त्या तासाचे व्हिडिओ टाकत असे- कोणाला उत्सुकता वाटली तर ते पाहतील म्हणून, तर, अशोक यांनी माझे त्या काळातील जवळजवळ सर्व तास पाहिले ! माझा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जेवढ्या मिनिटांचा व्हिडिओ आहे तेवढी मिनिटे संपली की लगेच त्यांचा फोन येई, ‘सर, माझी हजेरी टाका. मी तुमचा आजचा तास केला.’ मला त्यामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या त्या शेऱ्याच्या ‘धास्ती’ने माझे ते सगळे तास इतके उत्तम झाले, की महाराष्ट्रात पुढे आणखी काही कुलगुरूंनी, प्राचार्यांनी आणि इतर अनेकांनी त्यांना पसंती दिली.

अशोक विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांचा त्या विद्यापीठाशी जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपासून संबंध आहे. विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव त्याच वेळी आला. विद्यापीठाचे स्वतःचे विद्यापीठ गीत नव्हते. अशोक भारतातील आणि जगातील अनेक विद्यापीठांत गेले आणि त्यांनी तेथील विद्यापीठ गीते ऐकली तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना वाटे, त्यांच्याही विद्यापीठाचे गीत असावे ! त्यांनी मला सुचवले, की मी परभणी कृषी विद्यापीठासाठी गीत लिहावे. त्यांनी मला गीतात काय अपेक्षित आहे ते सविस्तर सांगितले. त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या विद्यापीठ गीतांचे जमवलेले व्हिडिओदेखील मला दिले, नमुना म्हणून पाहण्यासाठी. विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती विद्यापीठ गीत लिहून घेण्यासाठी नेमली. तो सगळा विद्यापीठ गीत लिहिण्याचा दोन-तीन महिन्यांचा काळ आनंदात गेला. मी ज्या गावात राहतो त्या परिसरातील विद्यापीठासाठी गीत लिहिण्याची संधी अशोक यांनी मला दिली ! त्यांनी गीतनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर रस दाखवला व सूचना केल्या.

अशोक यांनी मराठी साहित्य वाचलेले आहे. ते अजूनही वाचतात. उत्तम मराठी भाषा आणि उत्कृष्ट वक्तृत्व ही त्यांच्या बोलण्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. ते उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘शेतकऱ्यांचे साहित्यातील चित्रण’ या विषयावरील परिसंवादासाठी अध्यक्ष होते.

ते महाराष्ट्र कृषी अनुसंशोधन परिषदेच्या कार्यकारिणीवर आहेत. त्यांचा सहभाग राष्ट्रीय पातळीवरील कृषीविषयक धोरणात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतही असतो. ते महाविद्यालयांचे मूल्यमापन करणाऱ्या नॅकच्या कमिटीतही आहेत.

अशोक ढवण 9421849226

इंद्रजित भालेराव 8432225585 inbhalerao@gmail.com
—————————————————————————————————————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. श्री अशोकराव ढवण हे माझे 1974 च्या batch चे वर्ग मित्र. अतिशय अभ्यासू व मनमिळाऊ व्यक्तिमत्व. पहिले दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर मी अन्नातंत्रज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. अशोकरावांनी कृषी महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करून त्याच क्षेत्रात आपले करिअर बनवले. आमच्याच विद्यापीठात कुलगुरू बनले. त्यांच्या करिअर अचिएव्हमेन्ट सर्वांश्रुत आहेत. कोणालाही अभिमान वाटावे असे त्यांचे करिअर आहे. ते माझे वर्ग मित्र असल्यामुळे तसेच ते आमच्या भागातील असल्यामुळे मला विशेष अभिमान वाटतो. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच व सतत होत राहील अशी अपेक्षा करून त्यांना पुढील आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्या देतो.
    धन्यवाद 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here