‘अवतार’ – तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!

0
20

  – किरण क्षीरसागर

      जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ हा ताज्या सर्वेक्षणानुसार इंटरनेटवरून अनधिकृतरीत्या डाऊनलोड करून पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये अग्रस्थानी आहे. तिकिटखिडकीवर तर या चित्रपटानं सगळेच विक्रम मोडीत काढले होते! पण या चित्रपटानं प्रेक्षकांवर जे गारुड केलं त्याचं श्रेय चित्रपटाचं की त्यातल्या तंत्राचं, हा खरा प्रश्न आहे आणि त्याची चर्चा सद्यकाळ समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

– किरण क्षीरसागर

     जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ हा ताज्या सर्वेक्षणानुसार इंटरनेटवरून अनधिकृतरीत्या डाऊनलोड करून पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये अग्रस्थानी आहे. तिकिटखिडकीवर तर या चित्रपटानं सगळेच विक्रम मोडीत काढले होते! पण या चित्रपटानं प्रेक्षकांवर जे गारुड केलं त्याचं श्रेय चित्रपटाचं की त्यातल्या तंत्राचं, हा खरा प्रश्न आहे आणि त्याची चर्चा सद्यकाळ समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

     पृथ्वीवरील माणसं पँडोरा नावाच्या एका ग्रहावर खनिजांच्या शोधार्थ जातात. मानवांच्या एका प्रतिनिधीला नावींकडे पाठवण्यात येतं. त्यानं मैत्री करून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोचवणं अपेक्षित असतं. पण घडतं उलट. नावींचं आयुष्य जाणून घेताना, तो त्यांच्याशी, त्यांच्या निसर्गाशी एकरूप होत जातो. अखेरीस झालेल्या ‘नावी विरूद्ध मानव’ अशा युद्धात तो नावींच्या बाजूनं उभा ठाकतो! निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात असलेल्या माणसाचा पुन्हा निसर्गाकडे होणारा प्रवास इथं दिसतो.

     निसर्ग आणि मानव यांच्यामधील नात्यावर आधारलेली ही संकल्पना आवडण्यासारखी होतीच, पण चित्रपटातले ग्राफिक्सही प्रभावी होते. नावी जमातीचं आठ ते दहा फूट उंच असलेलं शरीर, त्यांच्या त्वचेचा निळा रंग, त्याचे लांब कान, त्यांची शेपटी, त्याचे मोठाले डोळे, त्यांच्या मांजरासारखी बुबुळं अशी त्या शरीरांची वैशिष्ट्यं होती. पँडोरा ग्रहावरचा निसर्ग, तेथील आश्चर्यकारक आकाराची झाडं, ड्रॅगनसारखे प्राणी… असं सगळंच विशेष तांत्रिक मेहनतीनं तयार केलं गेलं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर हा निसर्ग कसा तयार करण्यात आला असेल? याचं चित्रीकरण पृथ्वीवरच्या कोणत्या भागात करण्यात आलं?  नावी जमातीचा मेकअप नक्की कसा केला गेला? हे काही केल्या कळेना. अखेर, हे सगळं फार चांगल्या पद्धतीनं तयार केलं गेलं असं ढोबळ विधान मनात ठेवून मी गप्प बसलो.

     पण अचानक एक दिवस, ‘अवतार’चा ‘मेकिंग ऑफ’ माझ्या पाहण्यात आला आणि माझ्या अनेक समजांना सुरूंग लागला! चित्रपटात दिसणारी ती निळी माणसं प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती. तो मेकअप नव्हता तर ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमाल होती. निसर्गाच्या अवाढव्य रूपापासून लहानमोठ्या दगडांपर्यंत प्रत्येक गोष्ट कृत्रिम होती. तो ‘मेकिंग ऑफ’ माझ्या मनातल्या शंका फिटवण्याऐवजी अनेक नव्या प्रश्नांना जन्मालाघालण्यास कारणीभूत ठरला.

     स्पेशल इफेक्ट काय असतात, हे समजण्यापुरतं जुजबी ज्ञान मला आहे. पण हे काहीतरी अचाट वाटलं. नसलेल्या गोष्टी ख-याखु-या आहेत असा विश्वास बसावा इतकं सगळं बेमालूम! मोठमोठे बॉम्बस्फोट, पृथ्वीवर पडणा-या उल्का, एलियन्स अटॅक किंवा सुपरहिरोंचे चित्रपट… एरवी, चित्रपटांत दिसणा-या अशा दृश्यांमध्ये भरगच्च स्पेशल इफेक्टस् असतात. पण ते पाहताना ‘हे स्पेशल इफेक्ट आहेत’ ही जाणीव मनात राहते. तसं ‘अवतार’मध्ये घडलं नाही. पडद्यावर दिसणारं सगळं खरं आहे असं मनानं चटकन मान्य केलं आणि हे गंभीर वाटलं.

एकेकाळी चित्रपट केवळ स्टुडिओमध्ये चित्रित केला जात असे. बाजार, बगिचे, रस्ते वगैरेंचे सेट उभारून चित्रीकरण पार पाडत असत. त्यानंतर चित्रपट स्टुडिओबाहेर बाहेर आला. चित्रपटाला वास्तवाचा जास्तीत जास्त स्पर्श व्हावा या हेतूनं चित्रपट निर्मिणा-यांकडून प्रयत्न होऊ लागला. पण गेल्या दशकभराच्या काळात चित्रपट अधिकाधिक वास्तव करण्याच्या नादात कृत्रिमतेचा आधार घेण्याचा कल वाढला आहे. याचा परिणाम म्हणजे तयार केले जाणारे चित्रपट हे तंत्रबंबाळ होतात. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि पर्यायाने तिचा परिणामही तंत्राच्या भडिमारात गुदमरू लागला आहे का?

      चित्रपट माध्यम हे स्वत:च तंत्राधिष्ठित असल्यामुळे त्यात तांत्रिक अंगानं बदल होणार. पण तो चित्रपट आहे याचा विसर पडू न देणं महत्त्वाचं ठरतं. चित्रांमधून मांडली जाणारी कथा -तिचा आशय, चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक आणि तंत्रज्ञांचा दृष्टिकोन, त्यातून चर्चिल्या जाणार्‍या गोष्टी हे सगळं चित्रपटाला परिपूर्ण करत असतं. त्यातली दृश्यभाषा तर फार महत्त्वाची. ती भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी, एखादा आवश्यक परिणाम साधण्यासाठी तंत्राचा वापर करण्यात यावा, पण घडतंय उलट. त्यामुळे चित्रपट अर्थपूर्ण करण्यासाठी नव्हे तर देखणे, थरारक, रोमांचक अन् लोकप्रिय करण्यासाठी तंत्राचा वापर केला जातो; नव्हे भडिमार केला जातो. त्यामुळे तंत्रज्ञान हे काहीतरी घडवण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट न राहता चित्रपटाची कथा आणि आशय यांच्या रांगेत जाऊन बसलं. प्रेक्षकांचाही तो समज झाला. ‘अवतार’चे इफेक्टस आणि, ‘टॉय स्टोरी’, ‘आईस एज’मधील थ्रीडी टेक्नॉलॉजी, या अ‍ॅनिमेशनपटांतील मॉडेल यांची चर्चा होते. ती व्हावी पण त्याबरोबर आशय आणि अर्थपातळीवरील मूल्यात्मकता या संबंधानंही चित्रपटाचा विचार होणं आवश्यक ठरतं. अनेक माणसं ‘अवतार’ पाहून थरारून गेलेली असतात व तेवढ्यावरच समाधान पावलेली जाणवतात.

     रजनीकांतचा ‘रोबोट’, ‘लव्ह स्टोरी 2050’, ‘क्रिश’ यांसारख्या आणखी काही चित्रपटांसाठी अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात आलं. मात्र या चित्रपटांमधून काय दिलं गेलं हे दुर्लक्षित राहिलं.

     ‘रोबोट’ या चित्रपटात मांडण्यात आलेली संकल्पना म्हणजे ‘यंत्रमानवाला भावना बहाल केल्या आणि तो तुमच्यावर प्रेम करू लागला तर मग काय?’ या संकल्पनेवर 2001 साली स्टीव्हन स्पिलबर्गचा ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ हा चित्रपट आला होता. तो ब-यापैकी यशस्वी झाला. हे ‘रोबोट’संदर्भात घडलं नाही. कारण तो पूर्णपणे मनोरंजनमूल्यांवर आधारित होता.

     हीच बाब ‘लव्ह स्टोरी 2050’ ची. वर्तमानकाळात आपलं प्रेम हरवलेली एक व्यक्ती त्या प्रेमाच्या शोधार्थ भविष्यकाळात जाऊन पोचते हा चित्रपटाचा विषय. भविष्यामध्ये जेव्हा तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली असेल, त्याचा मानवावर, त्याच्या जाणिवा आणि भावनांवर तेवढाच मोठा परिणाम होत असेल, अशा काळात त्याच्या प्रेमाच्या व्याख्या कशा असतील? त्याच्या भावना बदललेल्या असतील का? तो प्रेमाला कोणत्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल? अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पडताळून पाहता आल्या असत्या. प्रत्यक्षात झालं नेहमीसारखंच. हा चित्रपटही भविष्यातलं भौतिक जग दाखवण्यापुरता मर्यादित राहिला. विज्ञानकथेच्या अंगानं जाणारे हे चित्रपट एक फॅण्टसी स्टोरी बनून राहिले. त्यांच्यावर अखेरपर्यंत दिसून आला तो केवळ तंत्राचा प्रभाव.

     तंत्राचा वापर करून बनलेले काही चांगले चित्रपटही उदाहरणादाखल सांगता येतील. ‘कॉण्टॅक्ट’ हा एलियन्स संपर्कावर आधारित, 1997साली आलेला चित्रपट माफक इफेक्टसचा वापर करून देव, माणूस अन् श्रद्धा यांवर भाष्य करतो. वाचोस्की बंधूंच्या ‘मेट्रिक्स’ चित्रपटात (1999) अनेक स्पेशल इफेक्टसचा भरणा होता. मात्र ते चित्रपटावर कुरघोडी करत नव्हते. ‘अवतार’मध्येही बर्‍याच प्रमाणात तंत्रामधून प्रेक्षकाला गुंगावून टाकणारा परिणाम साधण्यात आला आहे. ‘अवतार’ची ही तंत्रं एवढी लोभस आणि आकर्षक आहेत की प्रेक्षक चित्रपटाचा अर्थ लावण्यापेक्षा त्यांच्या देखणेपणातच गुंतून पडतो.

     बदलत्या काळानुसार तंत्र पुढे येणार. पण ते चित्रपटाच्या पुढे न जाता त्याच्या बरोबरीनं वापरलं जाणं गरजेचं आहे. अन्यथा, सध्या ज्या प्रमाणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे थ्रीडीपट केवळ ‘थ्रीडी इफेक्टस्’साठी पाहिले जातात, तसे उद्या बहुतांश चित्रपट हे केवळ त्यांच्यात वापरण्यात आलेल्या मनमोहक तंत्रासाठी पाहिले जातील, अन् भविष्यातले चित्रपट ‘चित्रपट’ न राहता तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेले ‘तंत्रपट’ ठरतील.

किरण क्षीरसागर   संपर्क – 9029557767,   thinkm2010@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleम्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती!
Next articleपालखी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.