अरुणा ढेरे – साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श

0
54

यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला ममत्वशील संवाद! त्यांचे दीड तासाहून अधिक चाललेले (सेहेचाळीस पानी) भाषण अमृतानुभव देऊन गेले. विवेकी विचारांच्या आणि जाणिवांच्या दुष्काळात पडलेला तो विवेकी पाऊस साहित्यरसिकांना तृप्त करणारा होता. साहित्य संमेलनातील रसिकगण तो अमृतवाणिवर्षाव जिवाचे कान करून ऐकत होते. ते मंत्रमुग्ध होणे या वाक्प्रयोगाचे आणि ज्ञानदेवांच्या संकल्पनेतील हृदयसवांदाचे प्रत्यंतर होते. त्यांनी विद्वतेचा अभिनिवेश न बाळगता कमालीच्या संयतपणे संदर्भबहुल, अर्थपूर्ण व व्यासंगी भाषण केले. त्यांनी विनम्रतेने साधलेला तो संवाद आश्वासक आणि माय मराठीच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारा व साहित्यवास्तव मांडणारा होता. त्यांनी प्राचीन साहित्य ते कला, साहित्य, संस्कृती, साहित्यनिर्मिती, साहित्यकारांची बांधिलकी अशा विविध विषयांचा उहापोह केला; गंभीर वृत्तीने नव्याने लिहिणाऱ्यांचा – त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव केला आणि उद्याच्या साहित्याबद्दलची अपेक्षाही व्यक्त केली. हे सारे महत्त्वपूर्ण आहे. ज्या साहित्यिकांनी संमेलनावर निमंत्रण वापसीवरून बहिष्कार घातला आणि संमेलनाकडे पाठ फिरवली त्यांनी ती पाठ संमेलनाकडे न फिरवता मराठी वाचकांकडेच फिरवली! साहित्यिकांचे राजकारण आणि त्यांची कंपुगिरी, साहित्यबाह्य आपपर निष्ठेचे ते दर्शन! किमान निमंत्रित साहित्यिकांना नयनतारा यांचा अपमान जसा झोंबला तसा अरुणा ढेरे यांचा सन्मान जाणवायला हवा होता. त्यांनी संमेलनास जायला पाहिजे होते. साहित्याच्या, संमेलनाध्यक्षांच्या सन्मानासाठी तरी! परंतु मनाचे हे मोठेपण, औदार्य त्यांना दाखवता आले नाही. त्या साहित्यिकांच्या निष्ठा आणि त्यांची बांधिलकी कोणाप्रती आहे? वाचक, साहित्य की आणखी काही?

वास्तविक, पाहता अरुणा ढेरे या तरुण पिढीच्या आणि नव्याजुन्या साहित्याची यथायोग्य दखल घेणाऱ्या, नव्या लेखकांचे स्वागत करणाऱ्या, एक जाणत्या स्त्री लेखिका, कवयित्री आहेत. त्या संमेलन अध्यक्ष होत्या. त्या सर्वांच्या आहेत; सर्व प्रवाहांची सामिलकी मानणाऱ्या आहेत. साहित्यिकांना किमान स्त्रीअध्यक्ष आणि अरुणा ढेरे यांच्या सन्मानासाठी आलो आहोत अशा स्वागतशील वृत्तीने, न रुचलेल्या गोष्टींविषयी निषेध नोंदवूनही उपस्थित राहता आले असते; परंतु त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवून, त्यांच्या मनाचा कोतेपणा दाखवून दिला. लेखक-साहित्यिकही कोणत्यातरी विचारधारेचे असतात, तसे असावेतही. परंतु त्यांनी ‘बिनबुडाचे गाडगे’ असता कामा नये; त्यांनी साहित्यशारदेच्या संवादभूमीबाबत तरी त्यांच्या वैचारिक व्युहांचे तुरुंग होऊ देऊ नयेत. राजकीय अभिनेवेश, राजकीय निष्ठा, राजकारण बाजूला ठेवून साहित्याकडे निखळ साहित्य आणि सामिलकी यांच्या जाणिवेतून पाहणे गरजेचे आहे. साहित्य आणि साहित्यिक यांनी नेहमीच समाजाभिमुख राहिले पाहिजे. परंतु आजचे साहित्य हे वाचकांचा विचार करत नाही; म्हणून त्यांना वाचक हा घटक साहित्याच्या केंद्रस्थानी वाटत नाही.

वाचकांनीच त्या गोष्टीचा संमेलनात निषेध केला हे एक बरे झाले. आजचा साहित्य-समीक्षाव्यवहार काही ठरावीक वाचक डोळ्यांसमोर ठेवून होत असतो. परंतु त्या छोट्या अंतर्वर्तुळाच्या पलीकडे मोठे वर्तुळ आहे. लोकजीवन, लोकभाषा, लोकानुभव यांपासून विलग झालेले साहित्य समाजप्रिय कसे होईल? तुकोबांची कविता आणि संतसाहित्य लोकांपर्यंत का पोचले? तर त्यातील अनुभवांच्या, भाषेच्या सुगमतेने! सोपेपणा जपूनही विस्तृत, व्यापक, खोल असा जीवनानुभव अभिव्यक्त करता येतो आणि त्यातून त्याची प्रातिभ उंचीही राखता येते हे संत तुकारामांच्या कवितेने दाखवून दिले. परंतु तुकोबांच्या काव्याचा वारसा सांगणारे मात्र त्यांचा वसा विसरून गेले आहेत. म्हणून आजची कविता सामान्यजनांपर्यंत पोचत नाही. ती दलित साहित्याप्रमाणेच एकसुरी, एकशैली झाली आहे. आम्ही जागतिकीकरणाच्या काळातील सर्वसामान्यांचे दैन्य, त्यांचे जगणे मांडत आहोत हा त्यातील आभासमय अभिनिवेश हे आक्रोशचित्र आहे. पण तो आक्रोश बोजड, शब्दबंबाळ आहे; न भिडणारा आहे.

अरुणा ढेरे यांचे साहित्यक्षेत्रातील स्थान आणि त्यांचे साहित्यविषयक भान अद्वितीय आहे. त्यांना रा.चिं. ढेरे यांच्यासारख्या तपस्वी विद्वान संशोधकांचा जन्मजात वारसा लाभला आहे. तो त्यांनी त्यांचे स्थान स्वकर्तृत्वाने साहित्यक्षेत्रात निर्माण करून जपला आहे. त्या अभिजात परंपरेच्या आणि नवतेच्या वाहक, एक संगम पूल म्हणून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विनम्रतेने उभ्या आहेत. त्यांचे अध्यक्षीय भाषण साहित्यक्षेत्राला नवदृष्टी प्रदान करणारे, साहित्यसुक्त आहे.

त्यांचे बोलणे म्हणजे अभिजात काव्यच होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून श्रोत्यांसमोर एक विचारशिल्प उभे केले. म्हणून त्यांचे भाषण हा अभिजाततेचा उत्तम नमुना ठरावा. त्यांचे भाषण साहित्यक्षेत्राला पुढे घेऊन जाणारे आणि आजची वास्तविकता प्रकट करणारे आहे. त्यांची बांधिलकी साहित्याशी अन् साहित्याशीच आहे, हे त्यांच्या शब्दातून जाणवले. परंतु निषेधकर्त्यांनी मात्र साहित्यबाह्य घटकांची दखल घेत, त्यांनाच मोठे करत त्यांच्या ऱ्हस्व दृष्टीची जाणीव करून दिली. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरही सहिष्णू-असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा वर आला. वास्तविक, महाराष्ट्राच्या मातीत सहिष्णू वृत्ती आहे. सध्या असहिष्णुतेचा मुद्दा राजकीय अभिनिवेशाने व सत्ताधारी आणि सत्ताविरोधी, सत्तावान्च्छित यांच्यातच झडताना दिसतो. त्या त्या विचारधारेतील लोक त्याची पाठराखण अथवा त्यास विरोध करतात. महाराष्ट्रात सर्व विचारांचे, जातींचे, धर्मांचे लोक राहतात. गावखेड्यात तर हिंदू आणि मुस्लिम, दोघेही सौहार्दपूर्ण वातावरणात राहतात. हिंदू -मुस्लिम एकत्र येऊन जत्रा, यात्रा महोत्सव साजरे करतात. त्यांना त्यांच्या जीवनकोशात असहिष्णुता हा शब्द आणि अर्थही माहीत नाही. अहमदनगर जिल्ह्याचे पूर्वेकडील शेवटचे टोक आणि मराठवाड्याचे तिकडील म्हणजे निजाम राजवटीचे तत्कालीन प्रवेशद्वार असलेल्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पौष महिन्यातील पौर्णिमेनिमित्त बन्नोमा जत्रा पार पडते. त्या जत्रेत आजुबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व हिंदू आणि मुस्लिम बंधुभावाने एकत्र येतात. असे सकारात्मक चित्र साहित्यात उमटत नाही. असहिष्णुतेचा बोलबाला राजकीय अभिनिवेशातून होत आहे आणि साहित्यक्षेत्रातही राजकीय क्षेत्राप्रमाणे एकप्रकारची झुंडशाही होत आहे याचेच ते निदर्शन आहे. साहित्याच्या माध्यमातून राजकीय जीवनावर केवळ भाष्ये होतात, त्यावर अल्प प्रमाणात लेखन होते, राजकीय कथा, कादंबरी, नाटक, कविता यांचे प्रमाण इतर जीवनानुभवाच्या संदर्भात व्यस्त दिसते. लेखकांना राजकीय सत्तेने निर्माण केलेली असहिष्णुता खुपत नाही, ती दिसत नाही, त्या अनुभवांना कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त करावे असे वाटत नाही. असे का घडते? एकूणातच सर्व साहित्यव्यवहार संकुचित आणि भयग्रस्त झाला आहे का? त्याचेही चिंतन संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून अभिव्यक्त झाले आहे. या सर्व परिस्थितीत कवी नरेंद्र यांच्यासारखा बाणेदारपणा दाखवावा लागेल. त्यांनी राजसत्तेकडून दिले गेलेले आमिष नाकारले. स्वत:चे सत्त्व अबाधित ठेवले. त्यांनी त्यांचे काव्य विकाऊ नाही हे निर्भीडपणे दाखवून दिले. राजसत्तेने दिलेली पदे, पुरस्कार भूषवायची, पण साहित्य संमेलनापासून मात्र पळ काढायचा हा पलायनवाद सोडला पाहिजे. साहित्य संमेलन हे संवादाचे व्यासपीठ आहे, परंतु ते काही साहित्यबाह्य गोष्टींमुळे आणि झुंडशाहीमुळे वादग्रस्त होत आहे. संमेलने गौण क्षुद्र वादाने गाजून ती विकृत बनत आहेत. तेव्हा समाजाच्या साहित्यजाणिवा, साहित्यप्रेम निखळ करण्याची वेळ आली आहे. अरुणा ढेरे यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले ते आजच्या परिस्थितीवर नेमके भाष्य करणारे आहे. राजकीय वरदहस्त आणि आर्थिक निधी नाकारायचा असेल व स्वाभिमान टिकवायचा असेल तर एक महाकोश निर्माण करावा ही त्यांची सूचनाही स्वागतार्ह आणि गांभिर्याने घेतली गेली पाहिजे.

साहित्यक्षेत्रातील वाढता स्पर्धात्मक व्यक्तिवाद हाही साहित्यक्षेत्र आक्रसण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या भाषणातील तो मुद्दा महत्त्वाचा आहे. साहित्यक्षेत्राला ती बाब नवी नाही. स्पर्धेमुळे साहित्यक्षेत्राचे नुकसानच झाले आहे. ‘कलेचे कातडे’सारख्या कादंबरीतून तो वाद मागील पिढीतच प्रत्ययास आला. तो आज अत्यंत खालच्या थराला जाऊन एकमेकांचे दुश्मन ठरवण्यापर्यंत झडत आहे. साहित्यसमीक्षेच्या भाषेतही तो प्रमाद काही मान्यवरांकडून घडला आहे. त्यांच्या हाती सत्ता-अधिकारांच्या जोरावर त्यांच्याच माणसांची वर्णी लावण्याची अहमहमिका चालू आहे. साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर क्षमता, दर्जा, पात्रता असूनही डावलेले गेले आहेत, जात आहेत. तेथे वयाचा, अधिकाराचा, जातीचा, धर्माचा असे साहित्यबाह्य निकष नकोत. एका मान्यवर लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळणार असताना, दुसऱ्या लेखकाची वयोज्येष्ठता लक्षात घेऊन त्या वर्षी तो (नाकारलेल्या त्या लेखकाला) पुरस्कार ज्येष्ठ लेखकाला दिला गेला. ही बाब त्या समितीतील सदस्यांनीच नंतर, काही वर्षांनी सांगितली. ती घटना काय दर्शवते? पात्रता, दर्जा, साहित्यातील सकसता असूनही काही साहित्यिकांचा कोणताही सन्मान झालेला नाही. आता काहींना हे सन्मान प्राप्त झाले. काहींची तर दखलही घेतली गेली नाही, असे का? एकूणच, अरुणा ढेरे म्हणतात त्याप्रमाणे निखळ गुणग्राहकतेची कास धरली गेली पाहिजे. साहित्यकारांनी वाङ्मयीन व्यभिचाराला बळी पडता कामा नये.

साहित्यातील सर्व प्रवाह, नवे-जुने हे सर्व जीवनाचे प्रतिबिंब असते. म्हणूनच जुन्या रचनाबंधाला, संस्कृतीला तुच्छ मानून कसे चालेल? संमेलनाध्यक्षांच्या या मुद्याचाही विचार व्हायला हवा. परंतु साहित्यातील आधुनिकता, उत्तर आधुनिकता यांच्या नावाखाली आजच्या साहित्याने समाजजीवनापासून फारकत घेतल्यासारखी दिसते. या दोन्ही संकल्पना संदिग्ध आहेत आणि त्या सोयीस्करपणे घेतल्या जातात. समाजपुरुषाचे चित्र बाह्यवेशात आधुनिक परंतु वैचारिकतेत मध्ययुगीन असे आहे. कलावंताने त्यातील छोटेसे वर्तुळ आधुनिक झाले, त्यापुढे जाऊन उतर आधुनिकतेकडे वाटचाल करू लागले; म्हणजे संपूर्ण जीवनाचे चित्र तसे आहे या भ्रमात राहू नये. साहित्य आणि समाजजीवन यांतील तसे विसंगत चित्रही भारतीय साहित्यासाठी पोषक नाही. साहित्यातील सहितत्व यास ते संवादी नाही. पाश्चात्य राष्ट्रात साहित्य आणि समाज यांत दोन्हीकडेही आधुनिकतेचे चित्र दिसते. तसे मराठी साहित्याच्याबाबत घडत नाही, म्हणूनच वाचकवर्गास त्यात सभोवतालच्या जीवनाचे चित्र दिसत नाही. ते विहंगम चित्र पाहण्यास ते अनुकूलही नसतात. अर्थात याचा अर्थ स्थितिशील राहवे असाही होत नाही, परंतु ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असेही होऊ नये. जुन्या-नव्याचा यथोचित समन्वय साधून पुढे जावे लागेल.

लोकशाही व्यवस्थेतही लोकांच्या मनातील संस्कृतिनिष्ठ धर्माचा प्रभाव नाहीसा झालेला नाही. लोकांचे आंतरिक जीवन धर्मवादी आणि दर्शनी बाह्य आचारविचार लोकशाहीवादी असा प्रत्यय येतो. ही सांधेजोड कशी करणार? असे एकूणच समाजजीवनातील विदारक, कोलाजचित्र! ते तुकडे कसे जोडायचे हे, खरे तर साहित्य आणि कला यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

अरुणा ढेरे यांनी प्राचीन साहित्य ते आजच्या स्त्रीवादापर्यंतचा पैस, साहित्यक्षेत्रापुढील आव्हाने, समाजमाध्यमे आणि त्यांचा प्रभाव, उत्तम समीक्षकांची-संशोधकांची वानवा, आजचा समीक्षा आणि साहित्यव्यवहार, साहित्यातील वाटा-वळणे, त्यांनी दिलेले आकार, संघर्ष, शिक्षण आणि संशोधनक्षेत्रातील व्यावहारिकता, आधुनिक काळातील परात्मता, वाट्याला येणारे भयाण एकाकीपण या सर्व घटकांची नोंद भाषणात घेऊन खऱ्या अर्थाने एक वैचारिक जागर मांडला आहे. त्यांचे भाषण संयत, सुसंस्कृत आणि अभिजात परंपरेतील असूनही साहित्यातील सर्वंकष जाणिवांच्या प्रदेशाला स्पर्श करणारे आहे. साहित्यातील एकमयताच साहित्याला सर्व दृष्टीनी नवा अर्थ देऊ शकेल. त्यांचा हा आशावाद आणि हा जागर म्हणूनच महत्त्वाचा आहे.

– अशोक लिंबेकर, ashlimbekar99@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here