अरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष?

2
16
_Aruna_Dhere_1.jpg

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे लेखक, नाशिकचे मराठीचे प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ‘फेसबुक’वर खट्याळ टिकाटिप्पणी केली आहे. तशाच पद्धतीने भाष्य वेगवेगळ्या माध्यमांमध्ये साहित्य संमेलनाध्यक्षांच्या नव्या निवडपद्धतीबद्दल केले गेले आहे. अशा लेखनाचे मूल्य प्रासंगिक असते. ते तेवढ्यापुरते खमंग चर्चेसाठी म्हणून स्वीकारायचे. तथापी, त्यातून काही सूत्रे ध्यानी येतात. त्यांतील एक महत्त्वाचे म्हणजे अपरिचित वाटणाऱ्या अध्यक्षांची जी मालिका गेली काही वर्षें लागली होती ती अरुणा ढेरे यांच्या निवडीने खंडित झाली. खरोखरीच, गेल्या काही वर्षांतील अध्यक्ष साहित्यिकदृष्ट्या हिणकस होते का? तर अगदी गेल्या वर्षीचेच लक्ष्मीकांत देशमुख. त्यांची साहित्यसंपदा मोठी आहे. ते अजूनही लिहीत असतात. त्यांच्या साहित्यातील विविधता व अभ्यासूपणा थक्क करणारा आहे. त्यांना मराठी भाषेची कळकळ आहे आणि नव्या विचारांची दिशा आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील मुद्दे अनेकांना विचारार्ह वाटले होते. परंतु त्यांची निवड जेव्हा झाली (ते रवींद्र शोभणे यांना पराभूत करून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले), तेव्हा आम साहित्यप्रेमींनी हे कोण नवे अध्यक्ष असेच आश्चर्य व्यक्त केले होते! खरे तर, त्यांचे प्रतिस्पर्धी शोभणे हे खंदे व मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे मोठी कथावस्तू. त्यांची योजनाबद्ध मांडणी, पण त्यांच्या पराभवाचीही चिकित्सा कोणी केली नाही. त्या आधी प्रवीण दवणे यांची हालत तशीच झाली होती. लक्ष्मीकांत यांचा बडोदा संमेलनातील वावर कोणताही ठसा उमटवून गेला नव्हता. असे का होते? साहित्य संमेलनाला लोक गर्दी करून जमतात. तेथे मौजमजा चालते, परिसंवादही होतात. परंतु त्यांपैकी कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; ना त्यातील कोणत्याही विचारांचा पाठपुरावा होत. नवीन लेखक-कवी नजरेत भरल्याचे गेल्या कित्येक साहित्य संमेलनांत दृष्टोत्पत्तीस आलेले नाही. साहित्य संमेलन हा एक वार्षिक ‘इव्हेण्ट’ बनून  गेला आहे.

अरुणा ढेरे यांच्या निवडीनंतर मात्र राज्यातील साहित्यप्रेमी व रसिक हरखून गेले. त्याचे कारण अरुणा ढेरे या मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहेत. त्या जुन्या साहित्यिकांच्या वाङ्मय कर्तृत्वाशी नाते सांगतात आणि त्याच वेळी नव्याबद्दल जागरूक व संवेदनाशील असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासच जुन्या जमान्याची ती संपन्नता लाभली आहे. त्यांच्याकडे विचार आहेत, संशोधन आहे व लेखनशैली आहे. अशा त्या विद्यमान मराठी साहित्यातील जवळजवळ एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड निर्विवाद आनंद देऊन गेली.

ही निवड कोणी केली? तर ‘साहित्य महामंडळा’च्या सभासदांनी. ते सभासद वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्य संस्थांचे प्रतिनिधी होते. त्यांनीच सुचवलेल्या निरनिराळ्या उमेदवारांना जी मते पडली त्यांचे आकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले आहेत. त्यात ढेरे यांना दहा, प्रेमानंद गज्वी यांना पाच, प्रभा गणोरकर व रवींद्र शोभणे यांना प्रत्येकी एक आणि रामदास भटकळ, बाळ फोंडके, सोमनाथ कुमारपंत व किशोर सानप या प्रत्येकाला एकही मत नाही असे चित्र दिसले. ना.धों. महानोर व भालचंद्र नेमाडे यांनी त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात रस नाही असे कळवल्याचे सांगितले जाते. मी आठ-दहा फोन करून या पलीकडे मराठीत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असू शकतो? तसे नाव या विचारार्ह यादीतून गळले गेले आहे का? अशी विचारणा केली तर त्यामध्ये मला आणखी दोन नावे गवसली. ती म्हणजे आशा बगे आणि महेश एलकुंचवार. या सर्व नावांचा विचार केला तरी अरुणा ढेरे यांच्या इतकी प्रातिनिधिकता क्वचित कोणाला असेल. किंबहुना, प्रज्ञाप्रतिभा, संशोधन आणि लौकिक हे तिन्ही घटक जर अध्यक्षीय उमेदवारात पाहायचे झाले तर तसा योग दुर्मीळच होय. अरुणा ढेरे यांच्यापूर्वी अरुण साधू यांच्या निवडीने नागपूर संमेलनात तो साधला गेला होता. पण अरुणा ढेरे यांना परंपरेवरील विश्वासातून लाभलेले शांतता व समाधान अरुण साधू यांच्याकडे नव्हते. उलट, त्यांचे विश्वभान व म्हणून अंतर्मुखता अधिक सजग होते. त्याआधी व त्यानंतर सातत्याने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे जे नाव आले ते सतत या तीन गुणांच्या बाबतीत विवादास्पद राहिले. अरुणा ढेरे यांच्या निवडीने रसिकांना ते समाधान लाभले, पण नव्या निवडपद्धतीची खरी कसोटी पुढील वर्षी अध्यक्ष निवडताना लागणार आहे.

केवळ साहित्याचा विचार न करता साहित्य-संस्कृतीचा विचार केला तरी वेगवेगळ्या मोठमोठ्या सन्मानांच्या बाबतीत नावांची निवड ही गेली काही वर्षें वादग्रस्तच वाटत आलेली आहे. संयोजक संस्थानादेखील ती अडचणींची ठरत आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचेच उदाहरण घ्या. खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर यांना पुरस्कार  मिळाल्यानंतर मराठी जनमानसात त्यांना सर्वत्र जे विशेष स्थान लाभले ते नेमाडे यांना मिळाले नाही. त्याचे कारण नेमाडे यांचे साहित्य तेवढे प्रातिनिधिक नाही. ते एक वेगळा ‘कल्ट’ व्यक्त करते. त्यांच्याकडे प्रज्ञाप्रतिभा आहे, संशोधन आहे, पण लौकिकाबाबतीत त्यांच्या ‘कल्ट’चे त्यांच्या प्रातिनिधिकतेला ग्रहण लागते! राज्यसरकारचे दोन-पाच लाखांचे काही पुरस्कार गेली काही वर्षें जाहीर होत आहेत. त्यांच्या बाबतीतही तसेच निरीक्षण सांगता येईल. उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्र भूषण’, कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार, कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार… या पुरस्कारांसाठी नवे नाव दरवर्षी जाहीर होते, ते गत वर्षांपेक्षा फिके वाटते.

_Aruna_Dhere_2.jpg‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्कारांना मराठी सांस्कृतिक जीवनात गेल्या दोन दशकांत मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अमेरिकास्थित ते फाउंडेशन स्थानिक संस्थेच्या मदतीने पुरस्कार प्रदान करते. साहित्य व सामाजिक कार्य असे दोन तऱ्हेचे पुरस्कार असतात. प्रथम ‘लोकवाङ्मय गृह’, मग ‘केशव गोरे स्मारक’ व आता ‘साधना’ या ट्रस्टच्या सहकार्याने काम चालत आले आहे. परंतु फाउंडेशन व स्थानिक संस्था यांच्यापुढे दोन लाखांच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी माणसे निवडायची तर पंचाइत असते असे ऐकिवात आहे. संयोजक संस्थेमध्ये निकष बदलण्याच्या, रक्कम छोटी करण्याच्या अशा पर्यायांचा विचार मधूनमधून होत असतो. पूर्वी पुरस्कार द्याव्या अशा व्यक्ती – य.दि. फडके, मे.पुं. रेगे, विजय तेंडुलकर… अशा आसमंतात दिसायच्या. तशा व्यक्ती आता समाजातून हद्दपार झाल्या आहेत का? ‘ग्रंथाली’तर्फे ‘माणसे खुजी होत चालली आहेत का?’ या विषयावर वीस वर्षांपूर्वी परिसंवाद घेतला होता. मे.पुं.च अध्यक्ष होते. त्यावेळी बोलताना चित्रकार प्रभाकर बरवे यांनी दृष्टांत उलटा सांगितला होता, की साप समजून सुतळी धोपटण्याचा प्रकार असतो, तसा दगड हिरा खपवण्याचा प्रकार सहन केला जात आहे.

पण आता वीस वर्षांत समजून येत आहे, की विद्यमान काळाचे दु:ख खुजेपणाचे नाही, तर प्रज्ञाप्रतिभेच्या विपुल व विविध अंकुरांचे आहे. त्या अंकुरांचे सौंदर्य जाणण्याची व्यवस्था निर्माण झालेली नाही. समाज अजून जुन्या व्यवस्था व जुन्या परंपरा यांना बिलगून बसू पाहत आहे. म्हणजे ध्यानात असे येते, की साहित्यकलांचे माध्यम जेव्हा प्रभावी होते तेव्हा लोक त्याबाबत जागरूक होते, त्यांच्यातील रसिकता संवेदनेने भारलेली होती; ते त्या सर्व व्यवहाराकडे औत्सुक्याने पाहत होते. परंतु गेल्या काही वर्षांत टेलिव्हिजनचे आणि इंटरनेटचे माध्यम प्रभावी झाले आहे – मोबाईल हे त्यासाठी लोकांच्या हातचे खेळणे आलेले आहे. त्यामुळे आमसमाजाचा कल करमणुकीकडे अधिक वळला आहे. त्यांना साहित्यकला, त्यांतील सातत्य या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. जगण्याला गती आलेली आहे. साहित्यकलांची सखोलता पारंपरिक रीतीने यापुढे व्यक्त होणार नाही हे वास्तव ध्यानी घ्यायला हवे. त्याचबरोबर समाज जागरूक व बहुश्रृत (इन्फॉर्मड) झाला आहे. त्यामुळे समाजाच्या आवडीनिवडी या व्यक्तिगत पातळीवर खूप वेगवेगळ्या तयार व विकसित होत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांतून तसे पर्याय (ऑप्शन्स) त्यांच्यासमोर येतही आहेत. त्यामुळे रसिक तसे व्यक्त होत असतात. कवितेचे उदाहरण घेऊन म्हणायचे तर बोरकर, पाडगावकर, खानोलकर, यांच्या पिढ्यांतील कवींचे अनन्य स्थान नंतर फार कोणाला लाभले नाही. त्यानंतरचे व सध्याचे कवी तर काही मोजक्या कविता निर्माण करण्यासाठीच जन्माला आले असावे असे वाटते. त्यांच्या त्या कविता उत्कट असतात, परंतु त्यांना कवी म्हणून समाजात स्थान नाही. उलट, मंचावर जे कवी लोकप्रिय आहेत आणि जे साऱ्या महाराष्ट्राचा मुलूख फिरत असतात, त्यांच्या कविता वाचल्या जातात असे नाही. त्यांतील काही कवी तर त्यांना व्यक्तिनिष्ठ (सत्यकथेसारखी) कविता लिहिता येत नाही याबद्दल दु:ख करत राहतात. पण ते दु:ख अस्थानी असते. ते कवीच वेगळ्या प्रकाराचे, मंचीय काव्यप्रकाराचे आहेत. तो त्यांचा लौकिक त्यांनी मिरवावा. ते मी पाडगावकर बनू इच्छितो म्हणू लागले तर कसे चालेल? परंपरा टिकून न राहण्याच्या काळात आपण दंडक परंपरेचे वापरत आहोत, तसे आग्रह धरत आहोत. साहित्यिकासच समाजात ते स्थान उरलेले नाही. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनाध्यक्षांना त्यांचे ते मानाचे जुने स्थान कसे बरे लाभेल? साहित्यकलांचा जमाना हरवत आहे. माणसे संमेलनांकडे ‘इव्हेण्ट’ म्हणूनच पाहणार आहेत. कदाचित अरुणा ढेरे या साऱ्या साहित्यप्रेमींच्या प्रातिनिधिक आवडीच्या अशा शेवटच्या संमेलनाध्यक्ष असतील. म्हणून जोरदार आनंद व्यक्त करूया!

– दिनकर गांगल

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय योग्यश शब्दात केल…
    अतिशय योग्यश शब्दात केल गेलेल लेखन आहे, सध्या साहित्यिकामध्ये प्रज्ञाप्रतिभा, संशोधन आणि लोकीक या तिन्ही गुणांचा मिलाफ असणारे साहित्यीक क्वचितच आहेत बहुधा नगण्यच , अतिशय वास्तवदर्शी लेख

  2. लेखन निरीक्षण छान. फार…
    लेखन निरीक्षण छान. फार चांगले सूत्रबद्ध विचार वाचायला
    मिळाले. धन्यवाद.

Leave a Reply to Shikalgar D. F Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here