अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)

18
51

तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे. तिचाही व्यासंग दांडगा. तिने हेन्रिक इब्सेन आणि विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील स्त्रिया आणि त्यांचे स्त्रीवादी विश्लेषणया विषयावर पीएचडी मिळवली आहे. तिचे एकेक प्रकल्प तोंडात बोट घालण्यास लावणारे असतात. उदाहरणार्थ तिने एमफिलच्या अभ्यासासाठी परीकथांचा हेतू व उद्देश असा व्यापक विषय निवडला होता. ती या जूनअखेर निवृत्त होणार आहे, तर त्यानंतरच्या काळासाठी तिने योजलेला पहिला प्रकल्प म्हणजे जगन्नाथ पंडितांनी लिहिलेल्या गंगालहरीचे भाषांतर इंग्रजीत करणे. ती तो प्रकल्प तिच्या भावंडांसोबत करणार आहे. गंगालहरीच्या बावन्न संस्कृत श्लोकांचे प्रथम मराठीत भाषांतर होईल. संस्कृत-मराठीच्या तज्ज्ञ सरोजा भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषांतराची तपासणी केली जाईल आणि नंतर अपर्णा गंगालहरी इंग्रजी भाषेत उतरवेल.

 

[youtube=https://www.youtube.com/watch?v=zvs_z8Ao_ws&w=320&h=266]
          अपर्णाचे इंग्रजी भाषेवर प्रेम आहे. ती त्या भाषेत लडिवाळपणे लिहिते. तिने अनेक इंग्रजी कथा, लेख आणि कवितांचे मराठीत भाषांतर केले आहे. चाकण येथील ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी ती प्रयत्नशील असते. त्यासाठी अपर्णाचे इंग्रजीत उपक्रम सतत चालू असतात. कॉलेजमध्येही ती खेड्यातील मुले इंग्रजीत प्रवीण व्हावीत म्हणून प्रयत्नशील असते. गुरुवार, 23 एप्रिलला ग्रंथदिन. शेक्सपीयरचा जन्म (1564) आणि मृत्यू (1616) त्या एकाच दिवशी येतो. भोपाळची Our club literati  ही संस्था त्यानिमित्ताने शेक्सपीयर महोत्सव भरवते. तो यंदा ऑनलाइन होत आहे. तर अपर्णाचा खटाटोप बघा. तिने शेक्सपीअरच्या Hamlet मधील गाजलेले स्वगत मराठी करून तेथे सादर करण्याचे ठरवले आहे. तिने तसा व्हिडियो बनवला व पाठवला. महोत्सव संयोजकांनी तो स्वीकारला व 25 एप्रिलला सायंकाळी तो सादर करण्याचे योजले आहे. (व्हिडियो सोबत) अपर्णाचे मराठीतही लेखन प्रसिद्ध होत असते. तिचे विविध विषयांवर वैचारिक लेख आणि लघुकथा अनेक मान्यवर वेबपोर्टल, मासिके, दिवाळी अंक आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत.
          विदुरचे सतारवादनाचे कार्यक्रम जगभर होत असतात -युरोपात विशेष. पण तो नित्य येथे पुण्यात सतार वाजवण्यास शिकवतो. त्याचे चाळीस विद्यार्थी आहेत. तो म्हणाला, की मी कोरोनाचा काळ माझ्यापुरता रियाझासाठी आणि आत्मचिंतनासाठी म्हणून वापरत आहे. त्याने अकरा दिवस अकरा राग, दहा दिवस दहा थाट असा सराव चालवलेला आहे. त्याचबरोबर त्याने, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले आहे. त्याचा रोख त्या प्रत्येकाने, या एकांतवासाचा फायदा घेऊन स्वतंत्रपणे विकसित व्हावे असा आहे. त्यासाठी त्याने योजलेली पद्धत मला आवडली. प्रत्येक विद्यार्थ्याने दहा मिनिटांची ध्वनिफीत विदुरकडे पाठवायची. त्यांतील एक निवडली जाते. विदुर ती फीत निनावी पद्धतीने विद्यार्थ्यांत प्रसृत करतो. त्यासंबंधी साधकबाधक चर्चा होते. मग दुसऱ्या दिवशी त्यांतील ज्याची ध्वनिफीत निवडली गेली असेल तो विद्यार्थी त्याचे भाष्य करतो.
          विदुर म्हणाला, की मी एरवी फेसबुकवर ॲक्टिव्ह असतो. पण सद्यकाळात फेसबुक लाईव्ह, झूम या माध्यमातून सतारवादन प्रकटपणे करावे असे मला वाटत नाही. हा काळ आत्मगत होण्याचा आहे. या संकटामधून आपण मनुष्यसमाज म्हणून वेगळे काहीतरी होऊन बाहेर पडणार आहोत. उदाहरणार्थ, माणुसकी या मूल्याची लक्षणेच कदाचित बदलून जातील! विदुरपुढे म्हणाला, की मी दर बुधवारी विद्यमान परिस्थिती असे एक टिपण लिहितो आणि ते विद्यार्थ्यांना पाठवतो. विद्यार्थ्यांनी त्यावरही त्यांची टिपणे/भाष्ये पाठवावी असे अपेक्षित असते. ते पाठवतातही. या सर्व लेखनाचा आढावा कोरोना जेव्हा केव्हा संपेल आणि आम्ही सारे क्लासमध्ये एकत्र येऊ तेव्हा घेता येईल. विदुरचा संगीताचा प्रवास रोमांचकारक आहे. तो विद्यार्थी असल्यापासून सतार शिकत-वाजवत आला असला तरी तो एमए झाला तत्त्वज्ञान विषय घेऊन. त्यामुळे त्याला तात्त्विक डूब लाभली आहे. त्याने व्यवसाय केला तो बॉक्सेस बनवण्याचा -भावांबरोबर भागीदारीत. वयाची पंचेचाळीशी आली तेव्हा त्याने पूर्णवेळ सतारवादनात गुंतण्याचे ठरवले व कारखान्यातून अंग काढून घेतले. तो निर्णय घेताना, तो सणकीत कर्नाटकातील अपरिचित परंतु संगीताने भारलेल्या प्रदेशात, कोणतेही नियोजन न करता भटकून आला. त्याने त्याचे ते अनुभव शब्दबद्ध केलेले त्याच्या एका पुस्तकात वाचण्यास मिळतात. विदुर कविता करतो. त्याचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याने सरकारी लाचलुचपतीविरूध्द लढा दिला, तोही शोधयात्राया पुस्तकात वर्णन केला आहे.
          त्याने शास्त्रीय संगीत समाजाच्या सर्व वर्गांत, विशेषतः तळच्या वर्गात जावे यासाठी गेली काही वर्षे मोहीम चालवली आहे. त्याला संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे एक वाक्य सतत त्रस्त करत असते. तो सतार शिकत असताना चंदावरकर त्याच्याजवळ म्हणाले होते, की ते, उस्मानखाँ असे सतारिये पुण्यात असूनदेखील महाराष्ट्रात सतार ही काय चीज आहे ते ठाऊक नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”  विदूरला तळेगावात त्याचा प्रत्यय वारंवार येई. त्याने त्याच्या घरी सतारीचा रियाझ केला तरी बाजूच्या शंभर यार्डांवर असलेल्या वस्तीत सतार नावाचे वाद्य माहीतदेखील नाही हे त्याला जाणवे. हे वास्तव हा त्याच्या मोहिमेचा आधार आहे. तो खेड्यापाड्यांत गावकऱ्यांसमोर, शालेय मुलांसमोर सतारीचे कार्यक्रम करतो. त्यांना सतारीची माहिती देतो. गावकऱ्यांनी ते वाद्य पाहिलेलेही नसते. त्याखेरीज, तो लोणावळ्याच्या कैवल्यधाम आश्रमात साधकांसमोर दर महिन्याला सतारीचा एक तासाचा कार्यक्रम सादर करून संगीत व अध्यात्म साधना यांचा वेध घेत असतो. माझा त्याला आग्रह असतो, की त्याचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि संगीताची जाणकारी यांचा समन्वय करून, त्याने भारतीय संगीतशास्त्रात काही नवी मांडणी आधुनिक परिभाषेत करावी.
[youtube=https://www.youtube.com/watch?v=vF6RgTdjwP4&w=320&h=266]

          विदुर कलावंताची बेहोशी जाणतो आणि त्याला व्यवहारही उत्तम कळतो. त्याचे राहणे तळेगावला एका बंगल्यात आहे. तेथून तीन किलोमीटर अंतरावर मैत्रबन नावाचे त्याचे फार्महाऊस कम जलसाघर आहे. तो तेथे अनेक वेळा सतारीचा रियाझ करण्यास बसतो, छोट्या मैफिली करतो, मित्रमंडळींच्या सभा भरवतो. मी तेथे गेलो ते एका अपूर्व कार्यक्रम कल्पनेतून. त्यामधून अपर्णा-विदुर यांची परस्पर बांधिलकी व्यक्त होते. दहा वर्षे झाली. अपर्णाचा पन्नासावा वाढदिवस होता. तर विदुरने तिच्या शालेय दिवसांपासूनच्या मित्र-मैत्रिणींना तिला न सांगता बोलावून घेतले होते. त्यांना तळेगावात वेगवेगळ्या पाच ठिकाणी उभे केले. विदुर-अपर्णा आणि त्यांची मुलगी नेहा ही तिघेजण त्या वाढदिवशी मॉर्निंग वॉक म्हणून मैत्रबनकडे चालत निघाली. अपर्णाला कल्पनाच नव्हती, पण तिचे एकेक परिचित रस्त्यात तिला भेटत गेले. शेवटचे ठिकाण मैत्रबन हे फार्महाऊस होते. मी त्यांच्या आयुष्यात शेवटी आलेला मित्र म्हणून त्या शेवटच्या टप्प्याला उभा होतो. मी तेथे तिचे स्वागत केले आणि तिला शुभेच्छा दिल्या. तोपर्यंत आम्ही पंधरा-वीस मंडळी जमलो होतो. विदुरने आम्हा सर्वांच्या हाती आदिवासी पट्ट्यातून आणलेल्या पोकळ बांबूच्या बासरी दिल्या. त्या नुसत्या हवेत फिरवायच्या, की त्यामधून नादमधुर आवाज येतात. आम्ही सर्वजण नंतर कितीतरी वेळ त्या बासरींतून नाद काढत अपर्णाचे अभीष्टचिंतन करत होतो. (व्हिडियो सोबत) अपर्णा नवऱ्याच्या त्या प्रेमवर्षावाने भारावून गेली होती.

 

          मी आज त्यांना फोन केला तेव्हा आणखी एक योग जुळून आला, म्हणजे त्यांची मुलगी नेहा हिचा हॉलीवूडपट शुक्रवारी, 24 एप्रिललानेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होत आहे. ती गुणी आई-वडिलांची सव्वागुणी मुलगी आहे. त्याचबरोबर ती सेलिब्रिटीही आहे. हा तिचा हॉलीवूडमधील दुसरा चित्रपट. नेहा सतार उत्तम वाजवते. ते तिचे पॅशनआहे आणि हिंदी-मराठी-इंग्रजी चित्रपटांत कामे करते. विदुर-अपर्णा यांचा तळेगावचा बंगला दुमजली मोठा आहे. कोरोनाकाळात सेवकांची मदत नसताना तो मेंटेन कसा करतात? हे मी त्याला विचारलेच. विदुर म्हणाला, आम्ही दोघे माझे सतारीचे व तिचे अभ्यासाचे उपक्रम दिवसभर करत असतो त्यात अधूनमधून जेवण तयार करून सकाळ-संध्याकाळ ठरल्यावेळी भोजन घेतो. दुपारी चार ते साडेसहा ही मात्र आम्हा दोघांचीही घर सफाई करण्याची आणि बागेला पाणी घालण्याची वेळ असते. संध्याकाळी सातनंतर इष्टमित्रांना, परिचितांना फोन कॉल वगैरे वगैरे… आम्ही टीव्हीच्या बातम्या पाहत नाही. त्या अधिकच खिन्न करणाऱ्या असतात.
अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com
विदूर महाजन  9822559775 vidurmahajan@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
—————————————————————————————————————————
अपर्णा महाजन

 

विदुर महाजन

—————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleथोरो, दुर्गा भागवत आणि प्रल्हाद (Thoreau, Durga Bhagwat And Pralhad Jadhav)
Next articleथोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

18 COMMENTS

  1. वा ! छानच .अशा सुंदर माणसांचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणात अशी माणसे म्हणजे वाळंवटातील हिरवळच वाटते आणि अशा माणसांमुळे जग सुंदर भासते.

  2. हे पती पत्नी दोघेही ग्रेट आहेत.अशी रत्ने शोधून त्यांची माहिती आम्हाला देता म्हणू गांगलसाहेब तुम्हाला ही खूप खूप धन्यवाद. तुमची लेखणी अशीच हि-यामाणकांना शोधत राहो.सौ.अनुराधा म्हात्रे.

  3. या कुटुंबाच्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे. याविषयीचा मला मनवी आनंद आहे.आयुष्याला सामोरे कसे जावे ? आयुष्य जगावे कसे ? माणसे जोडावीत कशी ? हे सर्व या कुटुंबियांकडून शिकण्यासारखे आहे.साहित्य आणि कलेवर नितांत प्रेम करणारं हे कुटुंब आहे.त्यामुळे त्यांच्या जगण्याला एक लय आहे, एक ताल आहे, अन् त्यामुळे त्या सर्वाचा एक स्वतंत्र नाद आहे.या कुटुंबियाकडे असणारी सचोटी, प्रामाणिकपणा वाखणण्यासारखा आहे. कला आणि जीवन व्यवहारात छान प्रांजळपणा असल्याने एकूणच त्याला एक लौकिक सौंदर्य प्राप्त झाले आहे, त्यामुळे आपण या कुटुंबियाच्या प्रेमात कधी पडतो, हे आपल्यालाही कळत नाही. उभयतांच्या भावी आयुष्याला अनेक शुभेच्छा..!!!शिवाजी एंडाईतचाकण.

  4. काय लिहू इतक्या नी छान लिहले आहे मला शब्दच सापडत नाही संपूर्ण नमस्कार लता

  5. Complimentary co existence / partnership /अर्थात सकारात्मक सहजीवन . हे खूप कमी वेळेला, कमी ठिकाणी पाहायला मिळतं. अपर्णा, विदुर बद्दल वाचल्यावर त्या दुर्मिळ सहजीवनाबद्दल आश्वासकता वाटली, वाढीस लागली

  6. नटसम्राट म्हणतात तसे सुखी संसार म्हणजे' गुलबकावलीचे फूल ' ते लाभलेले हे भाग्यवंत लेखात भेटले आणि हुरुप वाटला / वाढला .

  7. तुम्ही आहात आमच्या प्रवासात नेहमीच…मैत्रीच्या पाठिंब्याने!

  8. विदुर अपर्णा आणि नेहा यांच्या प्रवासाची मीही एक साक्षीदार आहे. तुम्ही लिहिलंय ते अगदी सुयोग्य. तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन. माधवी मेहेंदळे

  9. अपर्णा मॅडमला मी कॉलेज मध्ये त्यांची विद्यार्थिनी असल्यापासून ओळखते,मॅडमचा स्वभाव खूपच प्रेमळ आहे, प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून शिकवायच्या, माझ्यातील सुप्त गुणांची ओळखही मला मॅडममुळे झाली. संपूर्ण कुटुंब खूपच प्रेमळ आहे. विदुर सरही फार समजूतदार आहेत..संकटातून ही स्वतःला सावरून खंबीरपणे आयुष्याची यशस्वी वाटचाल केली..तिघांनाहीप पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..प्राजक्ता साळुंके – बोबडे

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here