अनिल चाचर – शाळाबाह्य मुलांचा वाटसखा (Anil Chachar)

0
25
_Anil_Chachar_1.jpg

अनिल चाचर वाल्हे गावच्या ‘हनुमानवस्ती (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे)’ या द्विशिक्षकी शाळेत बदलीने हजर झाले. वाल्हे हे निरा-जेजुरी या परिसरातील गाव. नीरा गावाच्या वायव्य दिशेला. अनिल चाचर सध्या सोमेश्वर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्याच्या ‘आशा’ (आमचा शिक्षण हक्क आमचा अधिकार – ASHAA) या प्रकल्पात ‘शिक्षक मार्गदर्शक’ म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करतात. त्यांना त्या कामात साथ आहे ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार संतोष शेंडकर यांची. ‘आशा’ प्रकल्पात ती दोघे सोबत आहेत.

शाळेचे बांधकाम ‘सर्व शिक्षा अभियाना’मधून झाले असले, तरी अनिल चाचर यांनी शाळेत विविध सुविधा करण्यासाठी, शाळा देखणी करण्यासाठी दीड लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून मिळवला; वॉल कंपाउंडसाठी तीन लाख रुपयांची मदत मिळवली. वाल्हे येथे अनिल चाचर यांची बहीण राहत असे. त्यामुळे ते त्यांचे पाहुण्यांचे गाव झाले. तेथे त्यांचे जाणे-येणे असल्यामुळे माजी सभापती गिरीशनाना पवार यांची व त्यांची पूर्वीची ओळख होती. संतोष गायकवाड यांचीही ओळख होती. चाचर गुरुजींनी त्या ओळखींचा सुयोग्य असा फायदा घेतला. तेथे त्यांच्या नजरेत शाळेत न जाणारी, गावात भटकणारी डोंबारी समाजाची मुले आली. चाचर गुरुजी जवळच्या माळवाडी आणि वाल्हे येथील शिक्षकांना भेटले; त्यांना त्यांनी त्या मुलांना शाळेत घेण्यास सांगितले. मुले शाळेत जात नव्हती, त्यांचे शाळेत स्वागत होत नव्हते. ‘नसती आफत’ कोण ओढवून घेणार? म्हणून टाळाटाळ करत. चाचर यांनी ती मुले ‘हनुमानवस्तीच्या शाळे’त नेण्याचा निर्णय घेतला. हनुमानवस्तीची शाळा तेथून अडीच-तीन किलोमीटर अंतरावर. चालत जाणे अशक्य नसले, तरी अवघड होते. जे कधीच शाळेत गेले नाहीत अशा मुलांसाठी  चाचर यांनी इको व्हॅन घेतली. मुलांना रोज त्यांच्या वस्तीतून ‘हनुमानवस्तीच्या शाळे’त घेऊन जायचे, शाळा सुटल्यावर परत त्यांच्या वस्तीत सुखरूप आणून सोडायचे. चाचरगुरुजींनी 2013 च्या मे महिन्यात त्या वस्तीत एकसारख्या चकरा मारल्या. लोकांच्या भेटी, शिक्षणाचे महत्त्व सांगणे अशी त्यांची धडपड सुरू होती. सोबतीला गिरीश नाना आणि संतोष गायकवाड होतेच. अखेर त्या धडपडीतून सत्तावीस मुले शाळेचा गणवेश घालून दिनांक 17 जून 2013 ला तयार झाली. गुरुजींची व्हॅन मुलांच्या वस्तीवर हजर झाली. दप्तर घेतलेली मुले व्हॅनमध्ये बसली. अशा प्रकारे पहिली पिढी शाळेची पायरी चढण्यास तयार झाली! गुरुजींनी शिक्षणाच्या वाटेवर प्रकाश टाकला होता आणि मुले त्यांचे बोट धरून वाट चालू लागली होती.

मुले शाळेत आली खरी, पण मुलांचे बोलणे गुरुजींना कळत नसे. शाळा ही गोष्ट, दिवसभर शाळेत थांबणे हे सारे त्या मुलांसाठी नवे होते. मुलांना शाळेत आणणे जेवढे अवघड होते, तेवढेच अवघड त्यांना शाळेत थांबवून ठेवणेही होते. त्यावर तोडगा सापडला तो दीपकचा. तो गुरुजींचा मदतनीस झाला. त्याला मुलांचे बोलणे समजत होते आणि गुरुजींचेही. तो मुलांना काय म्हणायचे आहे ते गुरुजींना सांगू लागला. त्यामुळे थोडा-थोडा संवाद होऊ लागला. मुले कधी एकमेकांशी भांडायची, दीपक भांडणाचे कारण गुरुजींना सांगायचा. गुरुजी रागावले, की मुले गुरुजींना ‘तू मर झूम (तू उद्या मरणार)… तुझं पोट फुटू दे’ असे म्हणायची!

_Anil_Chachar_2.jpgकाही वेळा मुलांची शाळेतील भांडणे वस्तीत जायची अन् वस्तीतील भांडणे शाळेत यायची. ती मुले शाळेत राहणे अवघड दिसत होते. दिवसभर भटकणारी ती मुले गावात भीक मागायची. जेजुरी गडाच्या पायरीवर खोबरे गोळा करायची. पैशांसाठी तोंड वाईट करून केविलवाण्या नजरेने हात पसरायची. गावात फिरून बाटल्या-भंगार गोळा करायची. त्या ‘आझाद पंछीं’ना शाळा तुरुंगासारखी वाटली नाही तर नवल! गुरुजींनी लोकसहभागातून मुलांच्या सकाळच्या नाश्त्याची सोय केली. उपमा, शिरा, दुपारी शालेय पोषण आहार, भात – दुपारचा उरलेला भात चारच्या सुट्टीत द्यायचा… गुरुजींना मुलांची बोलणी हळुहळू समजू लागली. मुलांच्या भाषेतील शब्दांचा कोश त्यांच्याकडे तयार होऊ लागला. दोन भाषांचा मेळ घालण्यास त्यांना सहा महिने लागले. मुलांबरोबर त्यांच्या जेवताना गप्पा होत. गुरुजी एकेक शब्द मुलांकडून शिकत होते. मुलांनी कृती करत गणित शिकावे असे साहित्य तयार केले गेले. भाषा शिकण्यासाठी वाचनकार्ड, चित्रकार्ड, वाक्य-पट्ट्या तयार केल्या गेल्या. सूर जुळू लागले. मुले शिकू लागली. पोटासाठी नाही, तर शिकण्यासाठी मुले अशा प्रकारे शाळेत येऊ लागली.

पण त्या मुलांच्या घरी वेगळाच प्रश्न सुरू झाला. मुले शाळेत जाऊ लागल्यावर मुलांकडून घरात येणारे जे थोडेफार पैसे होते ते येण्याचे थांबले. त्यांच्या आया भांडू लागल्या-पैशांची विचारणा करू लागल्या. गुरुजींनी एक हजार रुपयांप्रमाणे पाच मुलींना रक्कम दिली. तो उपक्रम पाच वर्षें सुरू आहे. दरवर्षी त्याच मुली. गुरुजींनी पालकांना विश्वास दिला होता – “मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. शिक्षणाच्या खर्चासाठी मुले घरात पैसे मागणार नाहीत. जशी मुले पोटासाठी भीक मागत होती, तसा मुलांच्या शिक्षणासाठी समाजात मी भीक मागेन; पण मुलांचे शिक्षण थांबू देणार नाही.” गुरुजींनी ‘कॅनडा रोटरी क्लब’मार्फत प्रत्येक मुलाला पाच हजार रुपये किंमतीचे ‘स्कूल किट’ आणि ‘बेड किट’ मिळवून दिले. शिवाय, ते किट पुरंदर तालुक्यातील आठशे मुलांना मिळाले. पुण्यातील मित्रपरिवाराच्या मदतीने वस्तीत मुलांची रात्र अभ्यासिका सुरू केली. स्वयंसेवक म्हणून प्रमोद कुंभार काम करत होते. स्वयंसेवकाचे मानधन गुरुजी देत होते पण त्यांचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर. मोठी मुले लहानांना शिकवत होती. त्यांना शिकण्यास एकमेकांची मदत होत होती.

गुरुजींनी काही मुलांना नावे दिली- छकुलीचे करिष्मा, तर मामूचे सचिन अशी नावे ठेवली. मुलांच्या माता शाळेत आल्या, त्यांना सन्मान मिळाला तर त्यांची मुले अधिक चांगली शिकतील, म्हणून मुलांच्या मातांनी शाळेत येण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची योजना शाळेत केली गेली. ‘सावित्रीबाई फुले जयंती’निमित्त आदर्श मातांचा सत्कार, दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांचा सत्कार, डोंबारी समाजातील मातांचा साडी-चोळी देऊन सत्कार, सर्व महिलांनी एकमेकांत मिसळावे म्हणून ‘फनी गेम्स’चे आयोजन केले गेले.

मुलांनी शाळेत यावे म्हणून गुरुजींनी त्यांचे किती कौतुक करावे! मुलांनी मेहंदी काढण्याच्या परातीमधील रंगीत पाण्यात पावले भिजवून शाळेच्या वर्गात प्रवेश करायचा. त्या चिमुकल्या रंगीत पावलांचे ठसे फरशीवर उमटायचे. इतर मुलांनी, गुरुजींनी टाळ्या वाजवायच्या. नववधूचे स्वागत करावे तसे मुलांचे स्वागत! किती सन्मान! का नाही ओढ लागणार त्या मुलांना शाळेची? गुरुजींची गाडी दिसली, की मुले धावत येऊ लागली.

_Anil_Chachar_3.jpgचाचरगुरुजींनी वस्तीतील कुटुंबांना रेशनकार्ड, आधारकार्ड मिळवून दिले आहे; त्यांचा प्रयत्न आणखी काहींना ते देण्यासाठी सुरू आहे. वस्तीतील कुटुंबांना चांगली घरे मिळावीत असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी पुण्याच्या ‘रेलफोर फाउंडेशन’शी संपर्क साधला आहे.

ते सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरात ‘आशा’ प्रकल्पात काम नोव्हेंबर 2016 पासून करत आहेत. तो प्रकल्प शालेय शिक्षण विभाग, टाटा रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत  सुरू आहे. गुरुजींना प्रतिनियुक्तीने त्या प्रकल्पात घेतले गेले आहे. त्यांनी मुलांना शाळेत नेण्याच्या कामात नोव्हेंबरनंतर कधी खंड पडू दिला नाही. कितीही अडचण असली, तरी मुलांची शाळा थांबली नाही. अगदी शक्य नसेल तेव्हा मुलांना शाळेत सोडण्याची पर्यायी व्यवस्था केली, पण मुले शाळेत गेली. ती मुले वाल्हे येथील शाळेत जातात. ती इतर मुलांमध्ये मिसळून जातात. अनिल चाचर यांचा फेरा पुरंदरे, बारामती, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांत असतो. त्यांचे राहणे जेजुरीजवळ आहे. तेथे ते, आईवडील, त्यांची पत्नी आणि दोन मुले असे राहतात. त्यांचा रोजचा प्रवास पन्नास-शंभर किलोमीटरचा असतो. ते वेगवेगळ्या वस्त्यांवरील मुलांना शाळेत येण्यास प्रवृत्त करतात.

चौथी पास झालेली मुले बिजवडी (तालुका माण, जिल्हा सातारा) येथील आश्रमशाळेत शिकत आहेत. पुण्याच्या सायबेज आशा ट्रस्टची खुशबू शिष्यवृत्ती योजना आहे. वंचित-दुर्बल-अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत; इंजिनीयरिंग, मेडिकल, एम एस डब्ल्यू, नर्सिंग या अभ्यासक्रमांतील जवळपास पंधरा मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. त्यांच्या पत्नी रूपाली या जिल्हा परिषदेच्या दौंडज येथील शाळेत शिक्षक आहेत. त्या गुरुजींना प्रेरणा आणि पाठिंबा देतात. कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेतात. जेथे कोणाला मदतीची गरज आहे, त्याची माहिती गुरुजींना देतात. त्या त्यांच्या वर्गाची गुणवत्ता उत्तम ठेवणाऱ्या संवेदनशील शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेतील कल्याणी कदम या विद्यार्थिनीला मणक्याचा त्रास सुरू झाला. तिला उठता येईना. ती झोपून राहत होती. तिची शाळा बंद झाली होती. गुरुजींनी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या वृषाली कौल यांच्याकडून तिला व्हीलचेअर मिळवून दिली. त्याची बातमी वर्तमानपत्रात आली. ती बातमी वाचून खासदार सुप्रिया सुळे यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये कल्याणीचे ऑपरेशन करवून घेतले. त्यासाठी तीन-साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला होता. कल्याणी वॉकरच्या साह्याने चालते. शाळेत जाते – दहावीत शिकत आहे.

सातारा जिल्ह्याच्या पाडेगावजवळच्या बाजूला नीरा नदी काठची वीटभट्टी. वीटभट्टीजवळ दोन झोपड्या. प्लास्टिक कागद, काठ्या, कापड, दोर्‍या – जे मिळेल त्याचा वापर करून निवारा उभा केलेला होता. तेथे वरंगळ – हैदराबादची दोन कुटुंबे राहत होती. एका कुटुंबात पाच मुले. त्यांतील तीन शाळेत जाण्याच्या वयाची. गुरुजींना दोन मुली शाळेत दाखल करून घेण्यात यश मिळाले होते. स्वाती दुसरीत, मनीषा तिसरीत. त्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. ते कुटुंब बारा-तेरा वर्षें महाराष्ट्रात राहते. त्यामुळे त्यांची नावे अशी. त्यांची मातृभाषा तेलुगू. मुली थोडे मराठी बोलत होत्या. नवरा-बायको रस्त्यावर उभे राहून गॉगल विकण्याचा व्यवसाय करतात. त्या कुटुंबातील मोठी मुलगी अकरा-बारा वर्षांची असावी. गुरुजी तिला शाळेत पाठवावे म्हणून कधी शिक्षणाचे महत्त्व सांगत होते, तर कधी कायद्याचा धाक दाखवत होते. कधी विश्वास, कधी प्रेम सगळ्या मार्गांचा अवलंब करत होते. त्यांनी चिकाटी सोडली नव्हती.
पाडेगावच्या दिशेला पुढे रस्त्याच्या कडेला कापड, गोधड्या, कागद, साड्या यांचे छत केलेल्या झोपड्या. झोपड्या आकाराने मोठ्या आणि भक्कम. स्वच्छता, नीटनेटकेपणा, सारवलेली जागा. पुढे शेळ्या, म्हशी. माणसेही दणकट. तेथील भारती वाकोडेला गुरुजींनी आश्रम शाळेत घातले होते. भारती पाडेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीपर्यंत शिकली होती. झोपडीतील बायका तिला शाळेत पाठवण्यास तयार नव्हत्या. पण भारतीने आशा सोडली नव्हती. त्या बायका राजी होतील, असे तिला वाटत होते. ती शाळा सोडल्याचा दाखला हातात धरून बसली होती.

तो मेढंगी जोशी समाज. नंदीबैल घेऊन गावोगाव भटकणारा. पंचांग पाहून ज्योतिष सांगणारा. स्वतःचे ज्योतिष पाठीवर घेऊन फिरणारा. ते नंदीबैलाला ढवळा नंदी म्हणतात. मोठ्या गोल शिंगांचा नंदीबैल. आता नंदीबैल सांभाळण्याची हिंमत होत नाही. भारतीचे आजोबा पंचांग पाहून ज्योतिष सांगतात. स्त्रिया वाकळ (गोधडी) शिवून देण्याचे काम करतात. जुन्या साड्या, जुने कपडे जोडून केलेली गोधडी. गावोगाव जायचे. गल्ली-गल्लीत आरोळी ठोकत फिरायचे- ‘वाकळ शिवायची हायऽऽका वाऽकळ’. भेटेल त्या दर्जाची वाकळ शिवायची. त्यांच्या जवळच्या गोधड्या बघून आश्चर्यचकित व्हायला होते. त्या गबाळात राहणाऱ्या स्त्रियांच्या हातात जादू आहे. कलाकाराची नजर आहे. राहणे दारिद्र्यातील असले, तरी त्यांची कलाकारी अस्सल वाटते.
लांब-रुंद गोधडी. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या, गडद रंगाच्या एक-दीड इंच रुंदीच्या कापडाच्या पट्ट्या. एक आत एक- अशा कडेकडून मध्याकडे जाणाऱ्या. पिवळ्या रंगाच्या आत हिरवा रंग, त्याच्या आत गुलाबी. चौकोनात चौकोन- मध्याकडे लहान होत गेलेले. दुसऱ्या गोधडीला रंगीत पट्टीऐवजी त्रिकोण-त्रिकोण जोडलेली पट्टी. सुईने घातलेले बारीक टाके. बायका कौतुकाने सांगत होत्या, “अजितदादांनी (अजित पवार) तीन-तीन, चार-चार हजाराला एकेक गोधडी घेतलीया. टेम्पो भरून अमेरिकेला पाठवल्यात!” झोपडीतील सर्वसामान्य स्त्रियांची देखणी कलाकुसर.

चाचरगुरुजी वंचित समाजातील मुले शिकावीत, त्यांचे जग बदलावे; म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत धडपडत आहेत. ते ‘जग बदल घालुनी घाव’ असे फक्त गात नाहीत; गाता-गाता छोटासा घाव घालत आहेत. त्यांना ही प्रेरणा त्यांच्या नोकरीच्या पहिल्या टप्प्यातच मिळाली. ते म्हणाले, की मला नोकरी लागली तीच रायगड जिल्ह्यातील जंगलातील आदिवासी शाळेत. तेथील परिस्थिती इतकी दारिद्र्याची होती, की कोणाही संवेदनशील शिक्षकाला नियमाबाहेर जाऊन सर्वतोपरी काम करावेसे वाटेल. मग ती सवयच लागली. मी जेथे गेलो तेथे काम करत राहिलो. आम्हाला तीस-चाळीस हजार रुपये पगार मिळतो. त्यातील आठ-दहा हजार रुपये मुलांवर खर्च झाले तर काय!   ‘आशा’ प्रकल्पांमुळे अनिल चाचर यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. परेश आणि संतोष शेंडकर हे समाजभान असलेले मित्र त्यांच्यासोबत आहेत. संतोष शेंडकर आणि गुरुजी यांनी नीरा येथील बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. तेथील पन्नास मुलांना त्यांना शाळेत आणायचे आहे. त्यांनी पुरंदर तालुक्यातील एकोणऐंशी वीटभट्ट्यांचा सर्व्हे केला. त्याची तहसीलदारांना फोटोंसह माहिती दिली आहे. तेथील मुलांना शाळेत घ्यायचे आहे. जालना, बीड जिल्ह्यांतून विहीर खोदण्याच्या कामासाठी मजूर येतात. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला जात आहे. ते मुले शाळेत आणण्याचे काम करत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. मूल आनंदाने शाळेत शिकेल यासाठी मदत करत आहेत. एकेक मूल शोधून, त्याचे बोट धरून शिक्षणाच्या वाटेवर नेण्याचे काम सुरू आहे. अनिल चाचर हे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवरील सखा आहेत. सरकारी नोकरीत राहून, चाकोरीबाहेर पडून चांगले काम करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल चाचर. फक्त कायदा करून, नियम दाखवून जे होऊ शकत नाही; ते प्रेमाने, विश्वासाने, जिव्हाळ्याने आणि तळमळीने होते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

– नामदेव माळी

(‘साधना’ १६ सप्टेंबर २०१७ वरून उद्धृत)

About Post Author