अध्यापन – एक परमानंद

_Adhyatma_EkParmanand_1.jpg

मी माझ्या लहानपणी आजोबांबरोबर ओसरीवर बसून पावकी, निमकी, दिडकी वगैरेंबरोबर एक ते तीस पाढे रोज संध्याकाळी म्हणायचो. बरेचसे पाढे मला तोंडपाठ आहेत. बरेचसे म्हणायचे कारण, की मी सोळा साते, सतरा नव्वे ताबडतोब सांगता येणे म्हणजे पाढे पाठ असणे असे मानतो. जर सोळा सातेला सोळा एकेपासून सुरुवात करून, सोळा सातेपर्यंत म्हणत, ‘एकशेबारा’ असे सांगितले तर मी त्याला पाढे येतात, पण पाठ नाहीत असे समजतो. त्यामुळे मला पाढे तीसपर्यंत जरी येत असले तरी पंचवीसच्या पुढील पाढे गुणगुणावे लागतात. बालवयातील त्या सरावाचा परिणाम म्हणजे गणित हा माझा आवडता विषय झाला!

मला सतत वाटायचे, की मुलांनी गणिताविषयी भयंकर धसका घेतलेला असतो. म्हणून मी ‘फादर अॅग्नेल संस्थे’चे संचालक फादर अल्मेडा यांना त्यांच्या संस्थेत गणित शिकवण्याची काही संधी देता येईल का अशी विचारणा 2010 साली केली. त्यांनी त्यांच्या ‘बालभवन’ ह्या अनाथ मुलांसाठीच्या संस्थेत शिकवण्याची संधी मला दिली. नंतर स्कॉलरशिपच्या सातवीतील विद्यार्थ्यांना शाळेनंतर एक तास शिकवण्याची परवानगी दिली. फादर अल्मेडा यांच्यामुळे माझा शिकवण्याचा हा प्रवास निवृत्तीनंतर सुरू झाला.

मी माझा गणित विषय शिकवण्याचा आत्मविश्वास अशा तऱ्हेने वाढल्यामुळे नवी मुंबईतील जुईनगरच्या ब्रह्मकुमारी परिवाराच्या ‘अमृता विद्यालयम्’च्या प्रिन्सिपल रेखा यांची भेट 2012 साली घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती घालवण्यासाठी मला शाळेत शिकवण्याची संधी द्यावी अशी विनंती एक सामाजिक कार्य म्हणून केली. त्यावर त्यांनी दोन प्रश्न विचारले, “अध्यापनाचा अनुभव काय आहे व गणिताची भीती घालवण्यासाठी काय करणार आहात?”

मी म्हटले, “संपूर्ण वर्गाला शिकवण्याचा अनुभव मला नाही व मी नक्की काय करणार आहे याबद्दल काहीही ठरवलेले नाही, पण मला स्वतःला गणिताची खूप आवड आहे. ती आवड विद्यार्थ्यांच्या मनांत निर्माण करीन असा विश्वास मला वाटतो.”

त्यांनी माझ्यावर भरवसा ठेवून, शाळेच्या समन्वयक शिक्षकाला (Co-ordinator) बोलावून मला जे पाहिजेत ते तास अनुपस्थित शि़क्षकांच्या वर्गात देण्यास सांगितले. त्याचबरोबर, शाळेतील शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेऊन, नंतरच मला शिकवण्याची परवानगी किती काळ द्यायची ते ठरवले जाईल असेही बजावले. त्यावेळी, छोटी आणि मोठी सुट्टी यांच्या दरम्यान, शाळेचे दोन तास असायचे. मी त्या दोन तासांमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. त्यांना गणिताची गरज व महत्त्व पहिल्या तासात समजावले. अगदी रस्त्यावरची गजरे विकणारी मुलेच काय पण भीक मागणारी मुलेसुद्धा पैसे मोजता येणे व हिशोबासाठी गणित शिकलेली असतात; त्यांना शाळेतील इतर विषय अजिबात माहीत नसूनसुद्धा त्यांचे जीवनात काही अडत नाही. शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याने, ‘I LOVE MATHS’ हे विद्यार्थ्यांचे ब्रीदवाक्य ठरवून दिले. गणित हा विषय सोपा असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवून टाकले. गणित विषय कठीण वाटतो, कारण आकडेमोड करण्यात, अगदी बेरीज-वजाबाकी करण्यात कमी पडल्याने व त्यातच वेळ जाण्याने परीक्षेत उत्तरे लिहिण्यास वेळ पुरत नाही, म्हणून गुण कमी पडतात. पण गणित ही एक वेगळी स्पर्धा आहे. तेथे वेगाने धावण्याऐवजी वेगाने आकडेमोड करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमीत कमी एक ते वीसपर्यंतचे पाढे तोंडपाठ असायलाच पाहिजेत, कारण एकोणीस एके एकोणीसपासून एकोणीस नव्वेपर्यंत म्हणत जाऊन किंवा 19×9 चा गुणाकार करून एकशेएकाहत्तर या उत्तरापर्यंत पोचण्यापेक्षा एकोणीस नव्वे एकशेएकाहत्तर तोंडपाठ असणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तर लगेच लिहितो व पुढील उदाहरण सोडवण्यास लागतो!

इतर विषय समजणे केव्हाही उत्तम, पण आवश्यक नाही, कारण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातच कोठेतरी दडलेले असते व ते शोधून पाठ करून ठेवले, की गुण मिळतात. पण गणित विषयात गणित कसे करायचे ते कळलेच पाहिजे. मुले नेमक्या त्या बाबतीत कमी पडतात. उदाहरणार्थ, डझनाचा भाव देऊन तीन फळांची किंमत काढताना कशाने गुणायचे आणि कशाचा भागाकार करायचा हे कळले नाही, तर गणित चुकते व गुण मिळत नाहीत. गणित पाठ करून ते परीक्षेत सोडवता येईलच असे नाही, कारण वर्गात सोडवलेल्या गणितातील एखादा अंक परीक्षेत बदलला जातो व त्यामुळे पाठ केलेले गणित परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवताना कामी येत नाही. गुण न मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे अनाहुतपणे केलेल्या चुका (silly mistakes). त्या कमी केल्या तर गुण वाढण्यास मदत होते.

मी शिक्षक न आल्याने त्या मोकळ्या तासात (off period) गणितासारखा धास्ती वाटणारा विषय शिकवण्यास जातो, तरी बहुतांश मुलांना, मी वर्गावर आल्याचा आनंद होतो. काहीजण नाराज होतात, कारण ते गणिताचा तिटकारा करत असतात. दोन सुट्ट्यांदरम्यान तीन (चैाथा ते सहावा) तास असतात. मला आठवड्याला चौथी ते दहावीपर्यंतच्या एकवीस वर्गात पंधरा तास गेल्या चार वर्षांपासून शिकवावे लागते. त्या तीन तासांत एखाद्या वर्गात कोणतीच शि़क्षिका गैरहजर राहिली नाही, तर मला तशा वर्गांवर महिनाभरसुद्धा जाण्यास मिळत नाही. तेव्हा त्या वर्गातील विद्यार्थी त्यांच्या वर्गावर मी का येत नाही म्हणून विचारणा करतात. त्यामुळे मला माझी गणिताबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी वाटचाल योग्य दिशेने होत आहे याची खात्री पटते. कधीकधी, दुसऱ्या दिवशी तिसरा किंवा सातवा तास मोकळा आहे अशी माहिती मिळाल्याने मला येण्यास सांगितले जाते. पण मी शाळेत फक्त चौथा ते सहावा तास एवढ्या वेळातच असतो असे सांगितल्यावर त्यांची झालेली निराशा माझेच मन खट्टू करते.

मी एकदा वयाबद्दल गणित घातले व त्याचे उत्तर, ‘मी माझे वय आहे’ म्हणून सांगितले. ते उत्तर जेव्हा अठरा आले, तेव्हा दोघाचौघांना इतके आश्चर्य वाटले, की त्यांच्या तोंडाचा वासलेला ‘आ’ बंद होत नव्हता! वयावरील माझ्या आणखी एका गणिताचे उत्तर एकावन्न आले तेव्हा आणखी काही जणांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना सांगावे लागले, की मी जर पन्नास वर्षांपूर्वी गणित शिकलो तर माझे वय एकावन्न कसे असेल? त्याच गणिताचे उत्तर एकाने छातीठोकपणे एकशेएकोणव्वद काढले होते! सांगण्याचा मुद्दा हा, की मुलांचा तसा निरागसपणाच मन मोहून टाकतो. तिसरीतील मुलांची वर्गात शांत बसून लक्ष केंद्रित करण्याची तयारी नसते व मी मूळचा शिक्षक नसल्याने अशा वर्गाला कसे हाताळायचे ते मला जमत नाही. मागील वर्षी, तिसरीतील दोन-तीन मुली दोन महिने जवळजवळ रोज मला भेटत होत्या व ‘सर, आमच्या वर्गावर या ना. प्लीज ना सर? आम्ही गप्प बसू, इतरांनाही गप्प करू.’ म्हणून काकुळतीला येऊन विनवणी करत. शेवटी, मी पुढील वर्षी म्हणजे चौथीपासून तुमच्या वर्गात जास्त वेळा येईन असे म्हटले; तेव्हा त्यावर ‘Promise?’ ‘Yes, promise!’ असा संवाद झाल्यावर त्या आनंदाने नाचत गेल्या होत्या. एके दिवशी, त्यांच्यातील एका मुलीने गंभीर चेहरा करून विचारले, ‘मी तिसरीत नापास झाले तर?’ मला तिला ‘असे काही होणार नाही व तू चौथीत नक्की जाशील’ म्हणून धीर द्यावा लागला होता. एके दिवशी, मी तिसरीच्या वर्गात गेलो असताना दोन मुली माझ्या जवळ आल्या व दोघींनीही सांगितले, की ‘त्यांनी काल देवाकडे प्रार्थना केली, की मला त्यांच्या वर्गावर पाठवावे. देवाने त्यांचे ऐकले व मी आज त्यांच्या वर्गावर आलो आहे!’ ह्या निरागसतेने मन अगदी भरून येते.

मी पाढे पाठ असण्याबद्दल आग्रही आहे. त्याची फलश्रुती म्हणजे 2012 साली चौथी ते आठवीपर्यंत फक्त एका विद्यार्थ्याला माझ्या व्याख्येप्रमाणे पाढे पाठ होते. गेल्या वर्षी, ती संख्या पंधरा-वीस विद्यार्थी इतकी झाली आहे. मुलांनी त्यांचे वीसपर्यंतचे पाढे पाठ आहेत म्हणून अभिमानाने सांगितले तेव्हाही माझे उद्दिष्ट साध्य होत आहे याची प्रचीती आली.

मला अध्यापनाच्या कामात मिळणारे आत्मिक समाधान हे अवर्णनीय आहे व त्याचे श्रेय विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रतिसादाला जाते. या अध्यापनाचा अनुषंगिक एक फायदा मला असा झाला, की माझे शाळेत जाण्यायेण्यासाठी रोजचे चालणे होते व शाळेत तीन मजले चढण्याचाही व्यायाम आपोआप होतो. वाचकांपैकी ज्यांना गणिताची आवड आहे त्यांनी ते ज्ञान पुढील पिढीला दिले तर ज्या भूमीत आर्यभट्ट, भास्कराचार्य ते रामानुजन यांच्यासारखे काही गणिती होऊन गेले, त्या भारतात गणिताची होत असलेली दुरवस्था कमी होईल हा माझा दृढ विश्वास आहे.

अभिनेते नाना पाटेकर म्हणाले होते, की ‘नाम फौंडेशन’च्या कामामुळे त्यांना ‘मरेपर्यंत जगण्याचे कारण मिळाले!’ अगदी तीच भावना माझी आहे. मी मला ती संधी देणारे फादर अल्मेडा व प्रिन्सिपल रेखा यांचा सदैव ऋणी आहे व राहीन.

– श्रीनिवास दर्प
shri2409@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. आपले वडील त्या काळी पाढे पाठ…
    आपले वडील त्या काळी पाढे पाठ असणे आवश्यक आहे असे सांगून ते करून घ्यायचे म्हणुनच आजही पाढे पाठ आहेत. एक खरा खुरा अनुभव या लेखात आहे. गणिताची गोडी लहान मुलाना लागावी म्हणून करीत असलेल्या कामाला सलाम!

Comments are closed.