अठ्ठाविसावे साहित्य संमेलन (Twenty Eighth Marathi Literary Meet – 1943)

 

 

श्रीपाद महादेव माटे हे सांगली येथे 1943साली भरलेल्या अठ्ठाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. श्री. म. माटे यांचे नाव उच्चारता क्षणीच, त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी झोकून दिले होते त्याची आठवण होते. जणू ह्या दलितेतर माणसाने दलित चळवळीची सुरूवातच केली ! वास्तविक, दलितोद्धाराची सुरूवात काही प्रमाणात एकोणिसाव्या शतकाच्या टोकाला झाली, पण माटे यांच्यासारख्या काही समाजसेवकांचे हात त्या चळवळीला विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लागले. पूर्वास्पृश्य समाजाचे प्रश्न विसाव्या शतकाच्या सुरूवातीला तर अतिशय तीव्र होते. त्या प्रश्नांना न्याय देणारे श्री. म. माटे हे प्रतिभावान लेखक त्यांच्या समाजसेवेतून जगले आणि त्यांनी त्यांच्या कथांतून ते जगणे अक्षरबद्ध केले. माटे यांना पूर्वास्पृश्य समाज ज्ञानमार्गावरून गेल्याशिवाय त्याचे प्रश्न सुटणार नाहीत ह्याची जाणीव होती. माटे यांनी रात्रशाळा काढून अस्पृश्य समाजाला विनाशुल्क ज्ञानदान केले. ते दिवसा इंग्रजीचे क्लास घेत आणि त्या मिळालेल्या पैशांतून रात्रीची शाळा चालवत. त्यांनी रात्रशाळा 1916साली काढली आणि अस्पृश्यांना सतत वीस-पंचवीस वर्षे विनामूल्य शिकवले. माटे मास्तर असे अक्षरशः कित्येक वर्षे झिजले. त्यांनी त्या मिळालेल्या अनुभवातून शैलीदार कथा लिहिल्या.

माटे यांच्या घराण्यात वेदसंपन्नता होती. त्याच बरोबर माणुसकीचे गहिवर पाहण्याची, त्यात स्वतःला विसरून जाण्याची मानवी जिव्हाळ्याची वृत्ती जोपासली गेली होती. माटे यांनी पहिल्यांदा मराठीतील ग्रामीण कथा, दलित कथा लिहिली. मराठी कथेत दारिद्र्य, भूक आणि शोषण यांनी नासलेले ग्रामीण जीवन प्रथम आणले. दलितेतर माटे दलित होऊन जगले आणि त्यांनी तसे लिहिले. ‘माणुसकीचा गहिवर’, ‘उपेक्षितांचे अंतरंग’ यांसारखे सहा कथासंग्रह, ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ हा महत्त्वाचा ग्रंथ, ‘अनामिका’, ‘साहित्य धारा’ यांसारखे चाळीसएक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. प्रतिभावान, शैलीदार लेखक म्हणून त्यांचा लौकिक होता. माटे यांनी सुखदुखाःचा भरजरी पट त्यांच्या कथांतून विणला.

श्री. म. माटे यांचा जन्म 2 सप्टेंबर 1886रोजी वऱ्हाडातील शिरपूर येथे झाला. ते एक वर्षाचे असताना वडिलांचे छत्र गेले आणि माटे यांची आई त्यांच्या पाच मुलांना घेऊन शिंगणापूरला स्वत:च्या वडिलांकडे राहण्यास गेली. माटे यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. त्यांचे शिक्षण साताराव पुणे येथे एम ए पर्यंत झाले. ते जन्मभर शिक्षकी पेशात राहिले. ते प्रथम सातारा येथे 1905 साली त्यांची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षक झाले. ते शिक्षक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल (पुणे) येथे 1906 साली सामील होते. ते नूतन मराठी विद्यालयातही 1920साली शिक्षक म्हणून होते. ते मराठीचे प्राध्यापक सर परशुरामभाऊ कॉलेजात 1935साली झाले. ते निवृत्त 1945साली झाले.

           त्यांना त्यांच्या विद्यार्थिजीवनात रँग्लर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, गो. चिं. भाटे, पां. दा. गुणे, सीतारामपंत देवधर ह्यांसारख्या थोर अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर ह्यांच्या जीवनांचाही प्रभाव माटे यांच्यावर पडला.

            माटे यांनी त्यांच्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात केसरीप्रबोध (1931) ह्या ग्रंथाचे संपादक म्हणून काम केले. माटे हे रोहिणीह्या मासिकाचे पहिले संपादक होते. त्यांनी शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञानप्रसाराचे महत्त्व जाणून विज्ञानबोध संपादला, त्याला दोनशे पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना लिहिली. त्यांनी विज्ञानयुगाकडे पाहण्याचा वैचारिक दृष्टिकोन त्या प्रस्तावनेत विवेचला असून ती प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहे.

            त्यांनी त्यांचे आयुष्य अध्यापन-चिंतन-मननात घालवले. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात. ते अठ्ठाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हा त्यांच्या ध्येयवादी विचारसरणीचा बहुमान होय. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विचारवंतांनी समाजाचे अवलोकन करावे आणि ते सहानुभूतीने करावे. त्यांनी त्यांचे मन समाजाच्या थराथरातून सहानुभूतीने खेळत ठेवल्यास अगदी जिवंत वाङ्मय वाटेल तितके निर्माण होईल!”

            माटे यांचा मृत्यू 25डिसेंबर 1957 रोजी कर्करोगाने पुणे येथे झाला.

वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 9920089488

——————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here