अचलपूरचे जिंदादिल राजकारणी माधवराव पाटील

2
223

अचलपूरचे माधवराव भगवंतराव पाटील हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात कमी वयाचे आमदार होते. ही गोष्ट 1957 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विधानसभेची. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. व्यासंग प्रचंड होता. त्यांची बुद्धिमत्ता चतुरस्र चाले. त्यांचे वर्णन त्यांचे समकालीन ‘प्रेमळ हृदयाचे धनी’ असे करत.

माधवराव पाटील यांचा जन्म अचलपूरच्या नौबाग जहागीर नावाच्या श्रीमंत जहागिरीत 8 ऑगस्ट 1927 रोजी झाला. त्यांचे वडील भगवंतराव शिवाजी पाटील हे चारशे एकर जमिनीचे स्वामी ! गर्भश्रीमंत असे हे पाटील घराणे. म्हणूनच तत्कालीन वातावरणात भगवंतरावांचे नाव मोठे; दबदबा फार ! भगवंतराव हे अचलपूर शहर नगर परिषदेचे अध्यक्ष होते. सामाजिक जबाबदाऱ्या स्वत:हून शिरावर घेण्याची त्या घराण्याची परंपराच आहे. माधवरावांकडे पिढीजात श्रीमंतीमुळे आलेली बिनधास्त आणि दिलदार वृत्ती होती, परंतु माधवरावांना अहंकार, बेदरकारपणा कधी शिवला नाही.

त्यांचे शिक्षण ग्वालियर स्कूलमध्ये झाले. तेथील संस्थानी वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर झाले. तेथेच त्यांना हिंदी-इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवण्याची संधी लाभली. त्यांनी पुढील शिक्षणासाठी बिट्स पिलानी या नामांकित संस्थेत प्रवेश घेतला, पण कौटुंबिक कारणांमुळे त्यांना अचलपुरात परतावे लागले. त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्नही पाहिले. पण त्यांना तो बेतदेखील रद्द करावा लागला. अखेर, ते अमरावतीच्या शिवाजी लॉ कॉलेजमध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी दाखल झाले. तेथे पंजाबराव देशमुख यांनी माधवरावांना शिवाजी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी नेमून टाकले ! ते तेथे पाच वर्षे होते.

त्यांची विचारपद्धत विश्लेषणात्मक होती. त्यामुळे त्यांचे मुद्दे लगेच समजत व निर्णय लगेच घेतले जात. द्विभाषिक मुंबई राज्याऐवजी मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य व्हावे म्हणून मोठी चळवळ महाराष्ट्रात सुरू होती. संयुक्त महाराष्ट्र दृष्टिपथात आला होता. विधानसभेसाठी निवडणुका 1957 मध्ये झाल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र काँग्रेसचे नेते होते. माधवराव पाटील यांना अचलपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली गेली. ते निवडून आले आणि विधानसभेतील सर्वात तरुण आमदार ठरले. महाराष्ट्र 1960 मध्ये अस्तित्वात आला. यशवंतराव संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. कन्नमवार यांचा मूत्यू झाला. वसंतराव नाईक यांच्याकडे राज्यातील राजकारणाची सूत्रे आली.

शिक्षण, वाचन आणि समाजसेवा ही माधवरावांची आवडती क्षेत्रे होती. माध्यमिक शिक्षणाच्या पुरेशा सोयी ग्रामीण भागात पोचल्या नव्हत्या. परतवाडा-अमरावती रस्त्यावरील भूगावच्या लोकांनी त्यांच्या लहानशा गावात शाळा सुरू करण्याची आवश्यकता माधवरावांना बोलून दाखवली. तेव्हा माधवरावांनी लोकांना बजावले ते महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘शाळा सुरू करणे हे सोपे काम आहे, पण जबाबदारी मात्र गावकऱ्यांना घ्यावी लागेल’. त्यांनी गावकऱ्यांना संस्था चालवण्यासाठी प्रवृत्त केले. आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना भूगाव येथे 1961 मध्ये करण्यात आली. आदर्श विद्यालय हे जिल्ह्यात नाव कमावून आहे.

हातमागाच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या इंडस्ट्रियल विव्हिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीने माधवराव यांच्या घराजवळ जगदंब महाविद्यालय सुरू केले. माधवरावांनी त्या संस्थेलाही संपूर्ण सहकार्य देऊ केले. संस्थेनेही त्यांना त्यांच्या कार्यकारिणीमध्ये मानाचे स्थान दिले. पण महाविद्यालयाचे व्यवस्थापन करणाऱ्या इंडस्ट्रियल विव्हिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गटबाजी सुरू झाली. एकेकाळच्या त्या प्रतिष्ठित संस्थेला राजकीय ग्रहण लागले. त्या साऱ्या प्रतिकूल बाबींचा परिणाम महाविद्यालयावर देखील झाला. संस्थेने तेथील काही प्राध्यापकांना थेट निलंबित करण्याची भूमिका घेतली. तशा परिस्थितीत त्यांनी सर्वांना ‘एका महाविद्यालयाने काढले म्हणून दुसरे महाविद्यालय मिळणार नाही असे होणार नाही’ या शब्दांत दिलासा दिला. त्यांनी त्यांच्या कौटुंबिक संपत्तीमधून लाखभर रुपये उभे केले. महाविद्यालयासाठी शासनाकडून परवानगी आणली आणि भगवंतराव शिवाजी पाटील कला आणि वाणिज्य महाविद्यालय 1971 मध्ये परतवाडा येथे सुरू केले. ते महाविद्यालय अमरावती येथील भारतीय विद्या मंदिर या संस्थेअंतर्गत चालवले जाते.

माधवराव पाटील यांचे राजकीय जीवन आमदार म्हणून 1957 मध्ये सुरू झाले. ते लोकसभेवर काँग्रेस पक्षातर्फे 1962 मध्ये रामटेक मतदार संघातून निवडून गेले. त्यांना त्यानंतर मात्र संधी मिळू शकली नाही. त्यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून अचलपूर मतदार संघातून 1967 मध्ये लढवली. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुका नंतर लढवल्या आणि ते अचलपूरचे नगराध्यक्ष म्हणून दोनदा निर्वाचित झाले. अचलपूर हे नवाबांचे शहर म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखले जाई. शहरातील सरदार, जमीनदार सुखवस्तू असले तरी तेथे व्यापार कधी फुलला नाही. व्यापारउदीम परतवाडा शहरात केंद्रित झाला. स्वाभाविक, अचलपूर दुर्लक्षले गेले. परिणामी, अचलपूर नगर परिषदेची आर्थिक स्थिती तोळामासा अशी राहिली. त्या स्थितीत परतवाडा आणि अचलपूर या दोन्ही नगर परिषदांचे एकत्रिकरण व्हावे असा प्रयत्न माधवराव पाटील यांनी केला. अचलपूरवासीयांना ज्या काही नागरी सोयीसुविधा मिळत आहेत, त्यासाठी नगर परिषदांचे ते एकत्रिकरण महत्त्वाचे ठरले.

माधवरावांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर स्वत:ला पूर्णपणे पुस्तकांच्या हवाली केले. वाचन हा त्यांचा आवडता छंद. तत्त्वज्ञान, इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्र हे त्यांचे आवडते विषय. त्यांनी त्या विषयांचे शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी विषयाची बंधने ठेवली नाहीत. त्यांनी वाचले सर्व विषयांत. त्यामुळे कोठल्याही विषयाचा विचार हा तर्कसंगंत असण्यास हवा असा त्यांचा आग्रह असे. माधवरावांचे इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांवर प्रभुत्व होते. उर्दूचाही संस्कार अचलपुरातील नवाबी वातावरणामुळे त्यांच्यावर होता. त्यांचे संस्कृतही चांगले होते. त्यांची मुलगी सुरेखा जिचकार सांगतात, “बाबासाहेब आणि आमची आई, दोघेही संस्कृत श्लोकांच्या जुगलबंदीत रंगून गेलेले आम्ही अनेकदा पाहिले आहेत !”

माधवराव पाटील यांना चार मुली आणि एक मुलगा डॉ. मीना पाटील, सुनीता तिडके, साधना डिके आणि सुरेखा जिचकार. त्यांचे चिरंजीव प्रदीप पाटील हे अचलपूरला शेती करतात.

माधवराव यांना सत्तापदांचे आकर्षण होते. पण त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या तडजोडी केल्या नाहीत. लोक त्यांना बाबासाहेब म्हणून ओळखत व त्यांच्याकडे सत्तापद नसले तरी आदराने पाहत.

माधवराव पाटील यांचा एकूण जीवनपट यशस्वीपणे जीवनाचा आनंद घेणारा आनंदयात्री अशा स्वरूपाचा आहे. ते जेवढे दिवस जगले तेवढे दिवस आनंदात जगले. पण त्यांना आयुष्य फार लाभले नाही. त्यांचे निधन 14 सप्टेंबर 1985 रोजी, हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. त्यावेळी त्यांचे वय अठ्ठावन्न वर्षांचे होते.

शशिकांत ओहळे 9561012357 shashi.ohale@gmail.com

(शशिकांत ओहळे यांच्या ‘जननायक’ या पुस्तकातील लेख, संक्षिप्त स्वरूपात)

——————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय महत्वपूर्ण आणि वास्तववादी माहिती भगवंतराव
    पाटलां विषयी लेखकांनी मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here