अक्षरमित्र – विवेकी विचारांची पेरणी

carasole

‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र! लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे ते ठाऊक नसते. काय वाचायचे ते ठाऊक असले तरी तो वाचनाचा जामानिमा कोठून मिळवायचा ते ठाऊक नसते. म्हणूनच ‘अक्षरमित्र’ ही चळवळ वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दूवा होण्याचे काम करत आहे. चळवळीचा उद्देश केवळ वाचक मिळवणे किंवा वाचकांपर्यंत पोचणे; किंबहुना, पुस्तकांची ‘विक्री’ करणे एवढाच नाही, तर शालेय स्तरातील मुलांमध्ये उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तके, नियतकालिके पोचवणे, त्यांच्या कोवळ्या वयातील मनांमध्ये विवेकाची ज्योत पेटवणे, त्यांना त्यांच्या वयानुरूप पडणाऱ्या अनेक प्रश्नांच्या उर्मीला रीतसर उत्तरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशी उद्दिष्ट्ये बाळगून ‘अक्षरमित्र’ काम करत आहे.

‘अक्षरमित्र’ ही आमीर शेख या तरूणाची संकल्पना. आमीरने ती संकल्पना अहमदनगर येथून रूजवण्यास २०१३ साली सुरूवात केली. त्याचे पुणे आणि लातूर येथेही काम सुरू झाले आहे. आमीर हा तेवीस वर्षांचा तडफदार, उत्साही तरूण कार्यकर्ता आहे. मात्र त्याचा पिंड विविध मुद्यांसाठी रस्त्यावर उतरून निषेध, मोर्चा, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याचा नाही. विविध प्रकारच्या चळवळी आणि आंदोलने यांच्याकडे आकृष्ट होत असतानाच आमीरच्या लक्षात आले, की तो त्या माध्यमातून त्याला अपेक्षित काम करू शकणार नाही. आमीरची समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी, ध्यास भिन्न होती. त्याने ते वेळीच ओळखून, वाचनाच्या प्रांतात ‘अक्षरमित्र’ सारख्या वेगळ्या क्लृप्तीसह काम करण्यास सुरुवात केली.

आमीर ‘अक्षरमित्र’ची संकल्पना आकाराला येण्याविषयी सांगतो, की “प्रत्येक व्यक्तीत वाचक व रसिक दडलेला असतो. मी त्याला जागे करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात लोप पावत चाललेल्या संवादाचे माध्यम व्हायचे ठरवले. किशोरावस्था नाजूक असते. त्या वयात मुलांवर होणारे संस्कार, त्यांना त्यांच्या प्रश्नांची मिळणारी उत्तरे, त्यांच्या विचारांना मिळणारी दिशा या गोष्टींवर त्यांचे भवितव्य ठरत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविचार, विवेकवाद वाढीस लागणे गरजेचे आहे. त्याकरता पुस्तकांशिवाय दुसरे उत्तम माध्यम असू शकत नाही हे माझ्या लक्षात आले. मला शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये विवेकवाद चांगल्याप्रकारे रूजू शकतो हे माझ्या अनुभवातून-आकलनातून कळत होते. त्यासाठी मी विवेकी, सत्य, वास्तववादी, विज्ञानवादी माहिती सांगणारी पुस्तके लोकांपर्यत पोचवण्यासाठी माध्यम होण्याचे ठरवले आणि ‘अक्षरमित्र’ची सुरुवात झाली. लोकांच्या मनात एकाचवेळी अस्वस्थताही निर्माण करायची आणि त्याचवेळी त्यांना आशावाद, सकारात्मकताही दाखवायची असा माझा उद्देश होता.”

आमीरने पुस्तकांच्या माध्यमातून ‘विवेकी पिढी निर्माण करण्याचा’ ध्यास घेऊन, काम सुरू केले. त्याला सुरूवातीला पुस्तके कोठून मिळवायची ते ठाऊक नव्हते. तो पुण्यात प्रकाशन संस्था अधिक असल्याने नगरहून पुण्यात येऊ लागला. त्याला सुरूवातीला त्यातील गणित कळत नव्हते. प्रकाशकही फारसे दाद देईनात, तरीही त्याने चिकाटी सोडली नाही. तो शहरातील एका प्रकाशन संस्थेतून दुसऱ्या प्रकाशन संस्थेकडे पायी फिरत राही, नवीन माहिती मिळेल तिकडे धाव घेई. त्याची धडपड पाहून ‘साधना साप्ताहिका’ने त्याच्यावर सर्वात पहिला विश्वास टाकला. ‘साधना प्रकाशना’ची अनेक दर्जेदार पुस्तके आहेत, मात्र ती पुस्तके पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘साधना मिडीया सेंटर’ वगळता राज्यात अन्य ठिकाणी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मग आमीरने ‘साधना’ आणि ‘वाटसरू’ या नियतकालिकांचे वर्गणीदार तयार करण्याच्या माध्यमातून वाचनवेडे लोक गोळा करण्यास सुरुवात केली. त्याने त्यासाठी मल्टिलेव्हल मार्केटिंगप्रमाणे कार्यप्रणाली योजली. नगरमधील दोन परिचित व्यक्तींना वर्गणीदार करायचे. नंतर त्यांच्या परिचयातील, वाचनाची आवड असणारे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र अशा पाचजणांची नावे घ्यायची. मग त्या पाच व्यक्तींकडे जाऊन, त्यांना वर्गणीदार बनवून, त्यांच्याकडून आणखी पाचजणांची नावे घ्यायची. आमीर ओळखीतून असा सेतू बांधत गेला. त्याने ‘मास’वर फोकस करण्यापेक्षा ‘क्लास’वर फोकस करत ‘रीडर्स क्लब’ तयार केला.

आमीर ‘क्लब’मधील प्रत्येकाला महिन्यातून एकदा भेट देतो. तो मुलांसाठी, पालक-शिक्षकांसाठी व इतर वाचकांसाठी पंधरा ते वीस पुस्तके सोबत घेऊन फिरतो. त्या लोकांना पुस्तकाची माहिती सांगायची, त्यांना नवी चांगली पुस्तके सुचवायची. मग त्यांनी ती विकत घेवोत अगर न घेवोत, तो कित्ता गिरवत राहायचा. ‘अक्षरमित्र’चे काम अशा प्रकारे सुरू झाले. सुरूवातीला त्यांना ‘साधना’च्या शिफारसीने ‘मनोविकास प्रकाशना’ची पुस्तके मिळाली. मात्र त्यांना ती पुस्तके स्वत: विकत घेऊन पुढे न्यावी लागत असत. पुस्तकाची विक्री न झाल्यास ती ठेवायची कोठे येथपासून त्यांचे करायचे काय येथपर्यंत प्रश्न उभे राहायचे. त्यामुळे ‘अक्षरमित्र’ने प्रत्येक महिन्यात फक्त एक-दोन पुस्तके विकत घेऊन फिरायचे ठरवले. हळुहळू वाचकच त्यांच्याकडे वेगवेगळ्या पुस्तकांची मागणी करू लागले. ती पुस्तके घरपोच केली जाऊ लागली. वाचकांचा आणि प्रकाशकांचा ‘अक्षरमित्र’वरील विश्वास वाढला. प्रकाशक ‘अक्षरमित्र’ला दोन-तीन लाखांच्या उधारीवर पुस्तके देऊन त्यांच्या खपानंतर पैसे घेऊ लागले. या ‘वाचन चळवळी’त पुस्तकांमध्ये प्रकाशकांकडून मिळणारी सवलत हा ‘अक्षरमित्र’चा नफा आहे, मात्र सध्या ‘अक्षरमित्र’चे काम ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नफ्याची रक्कम पुन्हा ‘अक्षरमित्र’च्या कामात गुंतवणे अशा प्रकारे सुरू आहे.

आमीरच्या लक्षात आले, की अनेकांना पुस्तकांबरोबर नियतकालिके वाचायची असतात. मात्र लोकांना सगळीच नियतकालिके उपलब्ध होत नाहीत. पुस्तकांपेक्षा नियतकालिके मिळणे अवघड असते. अनेकदा नियतकालिके वर्गणीदारांपर्यंतच पोचतात, पण त्यांना नवे वर्गणीदार गोळा करण्यात मर्यादा येतात. काही वेळा वर्गणीदार पुन:र्नोंदणी करण्यास कमी पडला की मागे सुटतो. तर नव्याने तयार होणाऱ्या वाचकांना विविध नियतकालिके हवी असतात. ‘अक्षरमित्र’ने ते लक्षात घेऊन नियतकालिकांवर लक्ष केंद्रित केले आणि ती त्यांच्या नफ्याचे मुख्य स्रोत होऊन गेली.

अक्षरमित्रची २०१४-१५ची वार्षिक उलाढाल ३० लाखांची होती. नफा शून्य होता. येत्या वर्षातील (२०१६-१७) मध्ये ती उलाढाल दीड ते दोन कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. ‘अक्षरमित्र’ने उलाढाल जाणीवपूर्वक वाढवली आहे. पुढील वाटचालीसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांना ते आवश्यक आहे.

‘अक्षरमित्र’ची ‘युएसपी’ अशी, की ते नव्या वाचकांचा शोध घेत त्यांना वाचायला उद्युक्त करतात. ‘अक्षरमित्र’ निवडक पुस्तकांच्या विक्रीबरोबरच ‘साधना’, ‘वाटसरू’, ‘अंतर्नाद’, ‘मुक्तशब्द’, ‘प्रबोधनपत्र’, ‘विचारशलाका’ ही मराठी नियतकालिके आणि ‘कारवान’, ‘फ्रंटलाईन’ ही इंग्रजी नियतकालिके यांचे नवे वर्गणीदार जोडत आहेत. ‘अक्षरमित्र’च्या  नफ्यातील ऐंशी टक्के वाटा इंग्रजी विज्ञान नियतकालिकांचा आहे. त्यामध्ये ब्रेन वेव्ह, टेल मी व्हाय, बीबीसी नॉलेज, स्टोअर, संदर्भ यांचा समावेश होतो.

आमीर  बीड जिल्ह्यातील आष्टी या गावचा. त्याच्या वडिलांनी आमीरचे प्राथमिक शिक्षण आष्टी या गावी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी लातूर येथे पाठवले होते. तो अभ्यासात हुशार होता. बहुतांशवेळा पालक त्यांच्या हुशार मुलांना डॉक्टरकीच्या किंवा इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमासाठी वळण्यास भाग पाडतात. आमीरच्या बाबतीत तेच घडले. पालकांनी त्याला लहानपणापासून डॉक्टर व्हायचे हेच घोकवले. आमीरचा आठवीपासून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. विकास आमटे यांच्या आनंदवन, सोमनाथ अशा विविध सामाजिक प्रकल्पांशी संबंध आला. त्यांच्या प्रभावातून तो डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू लागला. तो इतर सामाजिक चळवळींशीही जोडला गेला. तो डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभर खपून अभ्यास करत होता. त्याने बारावीच्या परीक्षेनंतर वैद्यकिय प्रवेशाच्या तयारीसाठी ब्रेक घेतला. मात्र, तो ब्रेक त्याच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरला.

आमीर वैद्यकीय प्रवेशपरीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेस प्रचंड अस्वस्थ होता. आमीरला त्याला हे करायचे नाही, त्याचा पिंड या पद्धतीने समाजसेवा करणारा नाही हे हळुहळू लक्षात येऊ लागले होते; मात्र, नेमके काय करावे असा मार्ग सापडत नव्हता. अखेर त्याने काय करायचे नाही ते स्वत:पुरते ठरवून टाकले. त्यामुळे डॉक्टर होण्याचे प्रकरण निकाली निघाले. त्याच सुमारास त्याच्या वाचनात ‘नीलची शाळा समरहिल’, रश्मी बन्सल यांचे ‘स्टे हंग्री स्टे फुलीश’ आणि ‘आय हॅव ड्रीम’ ही पुस्तके आली. त्याच्या मनावर वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची प्रक्रिया सांगणाऱ्या, वेगवेगळ्या कल्पनांनी सामाजिक व्यवसायाचा डोलारा उभा करणाऱ्या तरूण, उमद्या व्यावसायिकांची कथा असलेल्या त्या पुस्तकांचा विलक्षण प्रभाव पडला. त्याला शिक्षणाच्या क्षेत्रातील व्यवसाय आणि सामाजिक कार्य यांचा मेळ घालावासा वाटू लागला. आमीरला ‘नीलची शाळा समरहिल’ पुस्तकामुळे प्रयोगशील शाळा कशी असू शकते ते कळले होते. त्या अनुषंगाने त्याच्या मनात ‘शिक्षणक्षेत्रात काहीतरी करूया’ असा विचार घर करू लागला होता. तरीही त्याची अवस्था ‘कल्पना भारंभार, पण प्रत्यक्षात मात्र काहीच नाही’ अशी होती. त्याला ‘आय हॅव ड्रीम’ पुस्तकामुळे प्रथितयश उद्योजकांनी स्वत:चे व्यवस्थापनकौशल्य सामाजिक कामांसाठी कसे उपयोगात आणले ते कळले आणि तशा उद्योजकांची पुस्तकातूनच ओळखही झाली. त्यामुळे आमीरच्या मन:पटलावर शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य असे काहीतरी अॅबस्ट्रॅक्ट चित्र आकार घेऊ लागले. त्याने डॉक्टरकीचा अभ्यास सोडल्यामुळे त्याच्या घरचे वैतागले होते. त्यांनी आमीरने किमान इंजिनियरींगकडे तरी वळावे यासाठी त्याची मनधरणी सुरू केली. त्यावेळेस आमीर नेमके काय करावे ते ठरवू शकला नाही. मग त्याने घरच्यांची विनंती मान्य करत इंजिनियरींगचे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर गाठले.

पण तोपर्यंत आमीरला ना डॉक्टरकीत रस उरला होता ना इंजिनियरींगमध्ये. त्यामुळे आमीरचे अभ्यासात लक्ष लागेना. त्या सुमारास त्याने नगर येथील ‘स्नेहालय’ येथे प्रत्यक्ष काम करण्यास सुरूवात केली होती. आमीरचा आत्मविश्वास तेथील निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना वाढत गेला. त्याला स्वत:च्या बलस्थानांची जाणीव झाली. आणि एके दिवशी ‘स्नेहालया’च्या आवारातच ‘अक्षरमित्र’ या संकल्पनेने जन्म घेतला.

आमीरने ‘अक्षरमित्र’ उपक्रमाला पुस्तक विक्रीकेंद्र बनवायचे नाही हे निश्चित केले होते. आमीर म्हणतो, की ती केवळ चळवळ नव्हे तर ‘सामाजिक उद्योजकता’ही आहे. मुळात अक्षरमित्र ही फर्म कंपनी म्हणून उभी करायची तर आर्थिक स्थैर्य हवेच होते. चळवळीतील लोकांना अशी आर्थिक विधाने खटकतात, मात्र मला अक्षरमित्रला ‘एनजीओ’चे स्वरूप द्यायचे नव्हते. कारण मी काही संस्थांमध्ये काम करताना ‘एनजीओ’ला देणगी घेऊन काम केल्याने काय अडचणी, मर्यादा येतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यामुळे मला ‘सामाजिक उद्योजकता’ (सोशल एन्ट्रप्रिनरशीप) हा प्रकार सोयीचा वाटला आणि मी त्यापद्धतीतून काम सुरू केले.

आमीरने पुस्तकविक्रीतून हाती येणारी नफ्याची रक्कम नव्या पुस्तकांच्या आणि ‘वाचन चळवळी’च्या प्रसारासाठी गुंतवायची व पुढील काम करायचे असे ठरवले. सामाजिक काम करायचे म्हणजे विनामूल्य, मोफत स्वरूपात काम करायचे अशी सर्वसाधारणपणे विचारधारा असते, मात्र आमीरने सामाजिकतेला उद्योजकतेची जोड हवी या विचाराने पुस्तकांची घरपोच विक्री आणि त्यातून काही नफा अशी कार्यपद्धत ठरवली. त्याची ‘घरपोच पुस्तक’ ही कल्पना त्याच्या कामाची वेगळी ओळखही ठरू शकणार होती. त्याने लोकांना चांगली पुस्तके शोधून देण्यासाठी प्राथमिक स्तरावर स्वत:चे वाचन, संशोधन महत्त्वाचे आहे हे ओळखले होते. मग त्याने तो अभ्यास सुरू केला, अनेक प्रकारची माहिती गोळा केली. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यास सुरुवात केली.

आमीरच्या घरच्यांनी ‘इंजिनियरींग शिकायला गेलेला आमीर या उपक्रमासाठी शिक्षणाचे वय वाया घालवत आहे’ असे वाटून त्याला विरोध केला. आमीरच्या वडिलांनी आमीरला ‘अक्कल यावी’ यासाठी त्याला पैसे पाठवण्याचे बंद केले. शिक्षक असणाऱ्या आमीरच्या वडिलांची, आमीरने शिकावे ही माफक अपेक्षा होती. त्यांनी तोपर्यंत आमीरला नेहमी हवे ते दिले होते. पाहिजे ती पुस्तके, अभ्यासासाठी संदर्भग्रंथ. वडिलांना त्याच्यावर केलेला खर्च आणि मेहनत वाया गेली असे वाटू लागले. त्यामुळे त्याला आपणाकडून मिळणारे पैसेच बंद झाले तर तो ताळ्यावर येईल असा त्यांचा अंदाज होता, मात्र त्यामुळे आमीर अधिकच पेटून उठला. त्याने ‘अक्षरमित्र’चे काम अधिक जोमाने हाती घेतले. आमीर बधत नाही हे पाहून आईवडिल दुखावले. त्यांना मुलावर विश्वास ठेवण्यापलिकडे पर्याय उरला नाही. आमीरने त्यानंतर वर्षभरातच इंजिनियरींगलाही रामराम ठोकून घरच्यांना आणखी एक धक्का दिला. त्या सुमारास ‘अक्षरमित्र’चा नगरमध्ये जम बसू लागला होता.

या सगळ्या प्रोसेसने आपल्याला कसे घडवले हे सांगताना आमीर उत्साहित झाला. तो म्हणतो, अक्षरमित्र ही आमच्यासाठी एक ‘लर्निंग प्रोसेस’ होती. शिक्षण आणि व्यवसाय हे प्रॅक्टिकली समजून घ्यायचे होते. यातून खूप पैसे मिळतील, ब्रॅण्ड तयार होईल, अमूक संख्येने टर्न ओव्हर राहील असा कोणताही विचार डोक्यात नव्हता. त्यातील सगळ्याच गोष्टी कळत होत्या, माहित होत्या असे नाही. काही गोष्टी आनंदाच्या होत्या. आम्हाला काही शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. आम्ही दोन वर्षें वेगवेगळे प्रयोग करत आम्ही शिकत होतो. अक्षरमित्र’चे काम सुरू झाले ते असंघटितपणे. ट्रायल अॅण्ड एरर पद्धतीने असतानाही काही गोष्टी फसत होत्या. वाचकांकडून मागणी तर येत होती, मात्र आर्थिक अडचणी होत्या. आम्ही विद्यार्थी असल्याने आमच्याकडे भांडवल नव्हते. कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग नव्हता. तशा परिस्थितीत गुंतवणूक करणारे पाठीराखे हवे असतात. त्यात तीन ‘एफ’ महत्त्वाचे – फॅमिली, फ्रेंडस आणि फूल्स. पण आमच्याकडे तेही नव्हते. जोडीला ना माणसे ना तंत्रज्ञान. त्यामुळे अक्षरमित्र’साठी यंत्रणा बसवण्याची इच्छा होती. कारण यंत्रणा माणसे बदलली तरी उत्तम काम करत राहते. मात्र त्याच सुमारास सगळ्यांना करिअरच्या वाटा खूणावू लागल्या होत्या. लोकांमध्ये अक्षरमित्र’बाबत विश्वास निर्माण झाला तरी आमच्यावर कर्जही झाले होते. आम्ही लोकांमध्ये चूकीचा समज पसरण्याआधी हा उपक्रम बंद करावा या निर्णयापर्यंत पोचलो होतो. मात्र आम्हा सर्वसामान्यांतील विश्वास तसे करण्यापासून रोखत होता. त्या वाटेत काही माणसे खंबीरपणे उभी राहिली. रविंद्र सातपुते आणि त्यांच्या पत्नी – ज्यांना मी नगरचे आईबाबाच म्हणतो, बारावीचे शिक्षक ईश्वर शिंदे, मित्र संदीप बोराटे, गोविंद लासूरे, कॉम्रेड मेहबूब सय्यद इत्यादी. त्या लोकांनी अक्षरमित्र’चे मनोबल वाढवले, आर्थिक ताकदही दिली. डॉ. अरविंद गुप्ता, मंजिरी निंबकर, डॉ. अनिल सदगोपालन आदी माणसे हे शिक्षणातून विवेकवाद रूजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना मी आदर्शस्थानी मानतो.

‘अक्षरमित्र’ची टीम देशभरातील तज्ज्ञांच्या मदतीने निवडक पुस्तकांचे एक कॅटलॉग तयार करत आहे. ते कॅटलॉग ‘फ्लिपकार्ड’ आणि ‘अॅएमेझॉन’ यांसारख्या संकेतस्थळावर ऑनलाईन पुस्तक विक्रीसाठी उभे राहण्याकरता तयार केले जात आहे. ‘अक्षरमित्र’ने पुस्तकांइतकेच नियतकालिकांसाठी सामायिक वेबपोर्टल आवश्यक असल्याचे ओळखले आहे. त्यांचा मराठी-इंग्रजी या दोन्ही भाषांतील उत्तम नियतकालिके एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या मागे नवे वर्गणीदार तयार करणे व वर्गणीदारांना एकाच ठिकाणी त्यांना हवे ते नियतकालिक उपलब्ध करून देणे असा दुहेरी हेतू आहे. ती कल्पना संकेतस्थळ आणि मोबाईल अॅेप्लिकेशन अशा स्वरूपात लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.

आमीरसह आठजण ‘अक्षरमित्र’चे काम करत आहेत. ‘अक्षरमित्र’ने नगर, पुणे आणि लातूर येथील एकूण वीस शाळांशी टाय-अप केले आहे. ‘अक्षरमित्र’ला तेथे एकाचवेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक भेटतात. ‘अक्षरमित्र’चा त्यांच्यापर्यंत जगभरातील उत्तम माहितीचा खजिना पोचवण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात वाचकांना पुस्तके आणि नियतकालिके यांबरोबर उत्तम चित्रपट आणि माहितीपटही उपलब्ध करून देण्याचा ‘अक्षरमित्र’चा प्रयत्न असणार आहे. आमीर खाजगी शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांनुसार वेगळे मोड्युल घेऊन काम करणार असल्याचे सांगतो. त्याला ‘अक्षरमित्र’ येत्या दोन वर्षांत आर्थिकदृष्टया सक्षम होईल अशी खात्री आहे.

आमीर ‘अक्षरमित्र’चे काम सांभाळत पुण्यात ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त आंतरराष्ट्रीय संबंध व अर्थशास्त्राच्या पदवीचे धडे घेत आहे. त्याला ते धडे अर्थगणितांना उलगडण्यासाठी महत्त्वाचे वाटतात. तो सध्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आमीरचा पुढे, ‘इंटरनॅशनल बिझनेस इन स्ट्रॅटेजीस अॅन्ड ऑपरेशन्स’या विषयात एमबीए करण्याचा मानस आहे. आमीरला मुख्यप्रवाहातही नेमक्या शिक्षणाची वाट सापडली असे म्हणायला हरकत नाही.

आमीरकडे ‘अक्षरमित्र’च्या कामातील एक मार्मिक आठवण आहे. तो नगरमध्ये असताना, सुट्टीत घरी गेला. त्यावेळेस त्याला ‘शिक्षकांनी कोणती पुस्तके वाचायला हवीत’ याची शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेली पुस्तकाची सूची सापडली होती. त्यात ‘नीलची शाळा समरहील’ पासून विविध पुस्तकांची नावे होती. त्याने त्याच्या वडिलांना मुद्दाम ‘नीलची शाळा…’ हे पुस्तक वाचण्यास दिले. ते त्यांना प्रचंड आवडले. त्यावेळेस आमीरच्या डोक्यात ‘अक्षरमित्र’ सुरू करण्याचे विचार घोळत होते. त्याने वडिलांना सांगितले, की तुम्ही शिक्षकांना हे पुस्तक घेण्यास सांगा, मी पुस्तक उपलब्ध करून देतो. वडिलांना ती कल्पना आवडली. वडिलांनी आमीरकडून दोनशे पुस्तके मागवली. आमीरला नंतर माहीत झाले, की ती पुस्तके वडिलांनी विकली नाहीत; तर, स्वखर्चातूनच इतरांना भेट दिली! अशा प्रकारे आमीरच्या ‘अक्षरमित्र’ला विरोध करणारे वडीलच त्याचे पहिले ग्राहक ठरले होते!

– शेख आमीर
विवेकानंद नगर, फ़ेमस चौक,
नवी सांगवी, पुणे – ४११ ०२७
संपर्क – ९४०३७७२३३९, ९७३०३८०६००
aksharmitrabooks@gmail. com

– हिनाकौसर खान-पिंजार

About Post Author

Previous articleअनुराधा राव – संवेदनशील गाईड
Next articleभोगी – आनंदाचा आणि उपभोगाचा सण
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

3 COMMENTS

  1. mala amir shaikh yanche abhar
    Mala Aamir shaikh yanche abhar manave ase vatate. Tyani khup kasht karun ha Aksharmitra tayar kela. Pretek vidyarti sathi ha lekh upyogi padel.

Comments are closed.